मुलांना दिलेली संपत्ती आई-वडील परत घेऊ शकतात का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी तामिळ
70-वर्षीय सुरेश (बदललेलं नाव) यांनी आपली संपत्ती मुलाच्या नावे करून दिली. त्यानंतर सगळं काही बदललं. त्यांच्या आयुष्यात त्रास वाढला, कारण मुलाने त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं.
सुरेश यांच्या पत्नीची प्रकृती अशीही चांगली नसायची. मुलाने प्रॉपर्टीची कागदपत्रं घेतली घेतली आणि वडिलांना विपन्नापस्थेत सोडून निघून गेला.
सुरेश आणि त्यांच्या पत्नीने दोन वर्षं कशीबशी काढली आणि मग मद्रास हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.
पोलीस म्हणतात की, सध्या अनेक जेष्ठ नागरिकांवर अशी वेळ येत आहे. त्यामुळे त्यांनी आपली सगळी संपत्ती मुलांच्या नावे करण्याआधी थोडा विचार जरूर करावा.
तसंच, मद्रास हायकोर्टाने म्हटलंय की, संपत्ती देताना ‘प्रेम आणि आपलेपणामुळे दिली’ असं लिहिलं असेल तर आईवडिलांनी मुलांना दिलेली संपत्ती ते कधीही परत घेऊ शकतात.
सुरेश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलाच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचा विचार केला होता.
“मी अनेकदा पेपरमध्ये वाचायचो की जेष्ठांची हेळसांड केली जातेय, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. पण हे माझ्याच बाबतीत होईल यावर माझा विश्वास नव्हता. माझी बायको संधीवाताने आजारी होती. मला मदत करणारं कोणी नव्हतं. माझ्या मुलाकडे पैसै मागितले तर तो माझ्यावर चिडायचा. मग मी माझी प्रॉपर्टी परत घेण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या मुलाने मला एकटं सोडलं, आणि प्रॉपर्टीची कागदपत्रं घेऊन गेला.”
मुलांनी संपत्ती परत केली नाही तर?
जेव्हा सुरेश यांनी तक्रार केली तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला आणि त्याला संपत्तीसंबधी कायदे समजून सांगितले.
त्याला सांगितलं की, संपत्ती परत केली नाही तर त्याला तीन ते सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे सुरेश यांच्या मुलाने संपत्तीची कागदपत्रं परत केली.

फोटो स्रोत, Getty Images
पोलीस अधिकारी दीपक यांनीही अशा प्रकारच्या आणखी एका प्रकरणाचं उदाहरण दिलं.
तामिळनाडूतल्या मडीप्पग गावात राहाणारे पार्थसारखी यांनाही असाच अनुभव आला.
दीपक सांगतात, “पार्थसारथी 82 वर्षांचे आहेत. ते गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलाकडे आपली संपत्ती परत मागत होते. पण मुलगा देत नव्हता. तो वडिलांशी वाईट वागायचा. आमच्याकडे त्याची तक्रार आली. आम्ही थेट पार्थसारथी यांच्या घरी गेलो. त्यांना पार्किसन्सचा आजार आहे. पण त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. ते पैसे गोळा करण्यासाठी आपली मालमत्ता विकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण मुलाने त्यावर हरकत घेतली. पण मग कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्याने मालमत्तेची कागदपत्रं परत केली.”
पालक मालमत्ता देण्याची कागदपत्रं रद्द करू शकतात का?
बीबीसी तामिळने मद्रास हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील राजशेखरन यांच्याशी मद्रास हायकोर्टाच्या ‘आईवडील दिलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकतात’ या निर्णयावर चर्चा केली.
राजशेखरन यांना अशी प्रकरणं हाताळण्याचा अनुभव आहे.
ते म्हणतात, “ज्या आईवडिलांना मुलांनी आपली काळजी घेतली नाही तर आपली संपत्ती मुलांकडून परत घेण्याचा अधिकार हवाय त्यांच्यासाठी दोन पर्याय आहे. एक म्हणजे प्रॉपर्टी त्यांच्या नावे करतानाचा काही अटी-शर्ती घालाव्यात. दुसरं म्हणजे संपत्ती देताना त्या कागदांवर ‘प्रेम आणि आपलेपणामुळे’ असं लिहावं. तरच संपत्ती परत मिळू शकते. जर नुसतीच त्यांच्या नावे केली तर मग ती मिळण्याची शक्यता नसते.”
“म्हणजेच तुम्ही मुलांच्या नावे संपत्ती करत असाल तर त्यात ‘मी माझी संपत्ती माझ्या मुलाच्या/मुलीच्या नावे करतोय/करतेय, या अटीवर की ते माझी आयुष्यभर काळजी घेतील, माझा सगळा खर्च करतील. जर त्यांनी मला सुरक्षितता द्यायला किंवा माझे खर्च उचलायला किंवा माझा वैद्यकीय खर्च उचलण्यास नकार दिला तर मी माझी संपत्ती परत घेईन.’ यालाच कंडिशनल गिफ्ट डीड असं म्हणतात,” राजशेखरन पुढे म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते दुसरा पर्यायही समजावून सांगतात. “अजून काय करता येऊ शकतं तर ‘मी माझी संपत्ती प्रेम आणि आपलेपणाने देतोय/देतेय’ असं लिहिलं पाहिजे. मग मुलं आईवडिलांची देखभाल करतात का? हे पाहाता येईल आणि मुलं काळजी घेत नाही असं दिसलं तर जेष्ठ नागरिक हक्क समिती त्यावर पुढे कारवाई करू शकते. पण तरीही पहिला पर्यायच जास्त संयुक्तिक ठरेल.”
पालक आपल्या संपत्तीसाठी कोर्टात दावा ठोकू शकतात का?
राजशेखर म्हणतात की, पालक मुलांना दिलेली आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी मेंटेनन्स अँड वेल्फेअर अॅक्ट ऑफ पॅरेंट्स अँड सीनियर सिटिझन्सच्या कलम 23 (1) अंतर्गत दावा करू शकतात.
“या अंतर्गत जर मुलं आईवडिलांची काळजी घेत नाहीत असं सिद्ध झालं तर जेष्ठ नागरिक आयोग असं समजतं की, ही संपत्तीची कागदपत्रं जबरदस्तीने पालकांकडून सही करून घेतली आहेत. त्यामुळे ती बेकायदेशीर ठरतात,” ते म्हणतात.
जेष्ठ नागरिकांची मदत कोण करू शकतं?
बीबीसी तामिळने चेन्नई शहरातले समाज कल्याण अधिकारी मंगय्याकरसी यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणतात, “आमच्याकडे आलेल्या तक्रारीची गंभीरता पाहून आम्ही त्यावर कारवाई करतो. आम्ही तात्काळ जेष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन चौकशी करतो. तसंच जेष्ठ नागरिक कमिशनकडून मुलांना दिलेली संपत्ती जप्त करण्याची कारवाईही केली जाते. पण खूपच कमी वृद्ध लोक अशा तक्रारी करण्यासाठी पुढे येतात. पण आमचं हेही सांगणं आहे की तक्रार करण्याआधी तुमच्या मुलांशी बोलून पहा.”
त्यांनी म्हटलं की जेष्ठ नागरिक 14567 या राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईनवरही फोन करू शकतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








