आजी-आजोबांपासून दूर राहून नातवंडं काय गमावत आहेत?

आजी-आजोबांपासून दूर राहून नातवंडं काय गमावत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आदर्श राठोड
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगातल्या अनेक देशांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा होतो

आपल्या नातवंडांसाठी आयुष्यातला मोठा वेळ खर्च करणाऱ्या पिढीसाठी हा दिवस समर्पित आहे. ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त करणं, त्यांच्यावर आपलं प्रेम आहे हे सांगणं आणि नव्या पिढीला आजी-आजोबांचं महत्त्व सांगणं अशा गोष्टी या दिवशी करणं अपेक्षित आहे.

त्यामुळे याच वर्षी महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात शाळांना आदेश दिले होते की वर्षातून एक दिवस ‘आजी-आजोबा’ दिवस म्हणून जरूर साजरा करा.

आजी आणि नात

फोटो स्रोत, Getty Images

प्रणव घाबरू व्यवसायाने वकील आहेत आणि दिल्ली हायकोर्टात वकिली करतात. ते म्हणतात की त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आजीची भूमिका फार महत्त्वाची होती.

ते म्हणतात, “मी लहानपणापासून पाहायचो की आजी (वडिलांची आई) दिवसभर कामात असायची. तरीही ती पेपर आणि धार्मिक पुस्तकं वाचायची. मला प्रेरणादायी कथा सांगायची. त्यामुळेच मला लिहायची-वाचायची सवय लागली. ती सवय आजही कायम आहे. त्यामुळे माझ्या व्यवसायातही मला मदत होते.”

प्रवीणसारखं आपणही आपल्या आजी-आजोबांकडून काही ना काही चांगलं शिकलो असू. हिमाचल प्रदेश विद्यापीठात समाजशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यपक असणाऱ्या डॉ स्नेह म्हणतात की आजी-आजोबा लहान मुलांसाठी आदर्श असतात.

त्या म्हणतात, “नातवंडांना आपल्या आजीआजोबांकडून खूप प्रेम, भावनात्मक समर्थन आणि सुरक्षा मिळते. नातवंडाच्या व्यक्तिमत्व विकासाचा पाया आजी-आजोबांकडून रचला जातो. ते मुलांना चांगल्या सवयी लावतात. आपल्या संस्कृतीची माहिती देतात. आजकाल अनेक आईवडील नोकरदार असतात, त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत.”

डॉ. स्नेह म्हणतात की नातवंडांची काळजी घेण्याचं महत्त्वाचं काम आजी-आजोबा करत असतात.

आजी आणि नात

फोटो स्रोत, Getty Images

त्या सांगतात, “तुम्हाला पहिलं बाळ झालं की त्यांची काळजी कशी घ्यावी हेही तुम्हाला तुमचे आईवडील सांगतात. ते तुम्हाला शिकवतात.”

“आईवडील दोघं नोकरी करणारे असतील तर तुम्हाला बाळाला पाळणाघरात सोडावं लागतं. पण तिकडे त्यांची काळजी तितकी चांगली घेतली जात नाही जितकी आजी-आजोबा घेतात.”

नात्यातला दुरावा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आजकाल आजी-आजोबा दिवस साजरा करण्यावर जोर दिला जातोय याचं एक कारण हेही आहे की वेगवेगळ्या पिढ्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.

आजकाल एकल कुटुंबांचं प्रमाण वाढतंय. एकल कुटुंब म्हणजे आईवडील आणि मुलं असणारं कुटुंब. यात आजी-आजोबा नसतात.

बंगळुरूमध्ये राहाणाऱ्या अनिशा जमवाल (बदललेलं नाव) आपल्या परिस्थितीबद्दल सांगतात.

त्या म्हणतात, “आमच्या मुलाला त्याच्या आजी-आजोबांनी एवढं डोक्यावर बसवलं होतं की तो बिघडला. तो कसाही वागला तरी त्याला रागवायचे नाही, ना आम्हाला रागवू द्यायचे. मग जेव्हा माझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्ही बंगळुरू आलो तेव्हा त्याचं वागणं सुधारलं.”

एकल कुटुंबाचे काही फायदेही असतात पण आजी-आजोबा आणि नातवंडांच्या दृष्टीने पाहिलं तर यात काही अडचणी येतात.

समाजशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. स्नेह म्हणतात की भले आपण आपल्या कुटुंबातल्या जेष्ठांच्या भौतिक गरजा पूर्ण करत असलो तरी त्यांच्या भावनात्मक गरजा समजणं गरजेचं आहे.

त्या पुढे म्हणतात, “आजी-आजोबांना एकटेपणा वाटू शकतो. त्यांना आपल्या नातवंडांमध्ये एक साथीदार मिळतो. जर जेष्ठांशी बोलायला कोणी नसलं तर ते एकाकीपणाच्या भावनेतून डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. नातवंडांनाही आजी-आजोबांची कमतरता नक्कीच जाणवते.”

असंच अनीशाच्या सासू-सासऱ्यांच्या बाबतीतही झालं. त्या सांगतात की बंगळुरूला आल्यानंतर काही दिवस त्यांचा मुलगा उदास राहायचा आणि सासू-सासरेही दुःखी झाले होते.

“आम्हालाही वाईट वाटलं. मग आम्ही सुट्टीत दिल्लीला जायचो किंवा त्यांना इकडे बोलवायचो. आठवड्यातून दोन-तीनदा मुलगा त्याच्या आजी-आजोबांशी व्हीडिओ कॉलवर बोलायचा.”

अशा परिस्थितीत काय करायला हवं?

समाजशास्त्रांच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की आपल्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीचा परिणाम आईवडील, मुलं आणि नातवंडं अशा तीन पिढ्यांवर होतोय.

लोकांना आपलं काम आणि घर यांच्या जबाबदाऱ्यांचा सुवर्णमध्य साधताना अडचणी येत आहेत. ते ना आपल्या आईवडिलांकडे लक्ष देऊ शकताहेत ना मुलांना वेळ देता येतोय.

आजोबा आणि नातवंड

फोटो स्रोत, Getty Images

अशा परिस्थितीत म्हाताऱ्या आईवडिलांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय आणि मुलं बिघडत आहेत.

आजी-आजोबा एका शहरात तर नातवंडं दुसऱ्या शहरात किंवा परदेशात असं चित्र अनेकदा पहायला मिळतं.

दरवेळी सुट्टीत एकमेकांना जाऊन भेटणंही शक्य होत नाही. अशावेळी इंटरनेट आणि व्हीडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्कात राहाणं फायदेशीर ठरू शकतं.

डॉ स्नेह म्हणतात की, “एकाकीपणा घालवण्यासाठी तंत्रज्ञानावर खूप अवलंबून राहाणंही चांगलं नाही. कारण ‘मानवी स्पर्शाचं’ एक आगळं स्थान आपल्या आयुष्यात असतं. तो प्रत्यक्ष भेटींमधूनच अनुभवता येतो.”

त्या पुढे म्हणतात, “नोकरीसाठी आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात राहावं लागू शकतं. पण अशा वेळेस सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न करायला हवा. आईवडिलांना आपल्याकडे बोलवायला हवं, किंवा त्यांच्याकडे अधूम मधून जायलं हवं. दुसरं म्हणजे मुलं स्वतःच एकट्याने प्रवास करतील एवढी मोठी झाली की त्यांना एकटंच त्यांच्या आजी-आजोबांकडे जाऊ द्या. याने मुलांनाही बरंच काही शिकायला मिळेल आणि आजी-आजोबाही खूश होतील.”

शाळेत ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण त्याचं औचित्य फक्त एका दिवसापुरतं उरायला नको.

तज्ज्ञ म्हणतात की शिक्षकांनी शाळकरी मुलांना विचारत राहायला हवं की त्यांचे आजी-आजोबा काय करतात, कुठे असतात, त्यांच्याशी एवढ्यात बोलणं झालं होतं का, त्यांच्याकडून तुम्ही काय नवीन शिकलात किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट सांगा.

प्रवीण घाबरू स्वतःचा अनुभव सांगतात, “माझे आई-वडील दोघंही नोकरी करायचे त्यामुळे आम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहायचो तर आजी गावी असायची. मी शनिवार कधी येईल याची आतुरतेने वाट पहायचो. आम्ही शनिवारी रात्री गावी पोचेपर्यंत आजी वाट पाहात असायची. मला वाटतं की आजी-आजोबांच्या आणि नातवंडांच्य भावनिक गरजा एकमेकांना भेटून पूर्ण होतात. त्याची आपण काळजी घेतली पाहिजे.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.