जर अनंत काळासाठी तुम्ही तुमचं तारुण्य टिकवू शकलात तर?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नमशिवायम गणेश पांडियन
- Role, बीबीसी तामिळसाठी
(मानवी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानसंबंधीची नवी माहिती आणि लेख बीबीसी प्रसिद्ध करत असते. या लेखांमधील मते आणि वक्तव्ये ही पूर्णपणे लेखकांची आहेत, बीबीसीची नव्हे. - संपादक)
कोरोनासारख्या रोगाच्या साथीनंतर सगळ्याच वयाचे लोक अकाली मृत्यूला घाबरून आहेत. अशा परिस्थितीत या लेखाचं शीर्षक कदाचित तुम्हाला गमतीशीर वाटू शकतं. ऐतिहासिक तथ्यांचा विचार करता सर्व महत्त्वाचे शोध प्रामुख्यानं युद्धकाळात लागल्याचं सांगितलं जातं.
आज निसर्गात मानवाच्या आरोग्याला अपाय करतील अशा जीव-जंतूंच्या विरोधात आपले अघोषित युद्ध सुरूच आहे.
त्यात आपल्याला काही असे वैज्ञानिक पुरावे मिळाले आहेत ज्यावरून, तारुण्याच्या कालावधीचा विस्तार किंवा दीर्घकाळ तारुण्य टिकवणं शक्य आहे असं म्हणता येऊ शकतं.
हा लेख लिहिताना एक बातमी माझ्या वाचण्यात आली. जगातील अब्जाधीशांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध जेफ बेजोस यांनी अँटि एजिंगवर (वृद्धत्वाचा वेग कमी करणे) संशोधन करणाऱ्या अल्टोस लॅबमध्ये गुंतवणूक केल्याची ती बातमी होती.
ही मानवी इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरू शकते, हे संशोधन म्हणजे तारुण्यासाठी एक वरदानच ठरू शकतं.
या संकल्पनेला असलेली कायमची बाजारपेठ आणि त्यात दिसणारी शक्यता या विचारातून ही गुंतवणूक करण्यात आलीय. नैसर्गिक असो वा अपघाती आप्तेष्टांचा मृत्यू हे नेहमीच मोठं नुकसान असतं. पण "मृत्यूवर मात करणं" अशी वाक्य किंवा संकल्पनांमुळं लोभ आणि खोटेपणा किंवा भोंदू वैद्यकीय तज्ज्ञ यांना प्रोत्साहन मिळू शकतं.
वैद्यकीय विषयावर मत मांडताना भाषा, शब्द जपून वापरायला हवे. या लेखाचं गाभा मृत्यू हा नसून काळ किंवा वेळ हा आहे. कारण काळावर कुणाचंही नियंत्रण नसतं, तो बदलता देखील येत नाही. त्याच संकल्पनेचा अभ्यास करून पेशींवर काम केलं जात आहे.
थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर असं म्हणता येईल की आपण टाइम मशीनवर नाही तर लाईफ मशीनवर काम करत आहोत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images
आपण आपलं आयुष्य वाढवू शकतो?
गेल्या शतकातील माहितीचा अभ्यास केला असता हे शक्य आहे असं म्हणता येईल. कारण 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत सरासरी आयुष्य 40-50 वर्षे होतं, ते आता 67-75 वर्षे आहे.
जपानमध्ये सरासरी आयुर्मान 84 पर्यंत वाढलं आहे. तर भारतात 69 पर्यंत वाढलेलं आहे. आपण युद्ध आणि दुष्काळ याकडं कानाडोळा केला, तर संसर्गजन्य रोगांवर औषधींद्वारे मिळवलेल्या नियंत्रणातून आयुर्मान वाढल्याचं समोर येतं.
त्याचवेळी जीवनशैलीमुळं होणारे आजार वाढल्यामुळं कमी वयातच लोकांच्या हातून आरोग्य निसटत चाललंय. त्याचबरोबर आपलं कुटुंब आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील आर्थिक ओझ्यामुळं जीवनशैलीचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.
कर्करोग किंवा पार्किंसन्स सारखे गंभीर आजार होऊच नये, अशी इच्छा असलेले अनेक वृद्ध आहेत. कारण कोणालाही त्रास न देता जगाचा निरोप त्यांना घ्यायचा आहे.
प्रिसिजन मेडिसीन हे औषध क्षेत्रात सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. त्याला भविष्यातील औषधही म्हटलं जात आहे. प्रिसिजन मेडिसीननं ही इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेनं प्रवास केलाय. पण हे भविष्यातलं औषध नेमकं आहे तरी काय?

फोटो स्रोत, Getty Images
औषधांमधील प्रकार/पद्धती
औषधोपचारांचे तीन प्रकार असतात. पहिली म्हणजे भूतकाळातील पद्धत, म्हणजे लक्षणांच्या आधारावर औषध देणं. यात लक्षणांवरून आजाराचं निदान केलं जातं. त्यावर उपचार असू शकतो, पण अंदाज चुकला तर यश मिळण्याचे प्रमाण कमी होतं आणि दुष्परिणाम होऊ शकतात.
सध्याची म्हणजे वर्तमान काळातील पद्धत पुराव्यावर आधारित औषधोपचार ही आहे. यात आम्ही आजाराचं नेमकं कारण समजून घेतो आणि त्यानुसार योग्य उपचार करतो. ही उपचार पद्धती योग्य आहे किंवा नाही ते एका मोठ्या गटावर चाचणी करून करून त्यावरील निष्कर्षांवरून ठरवलं जातं. याचे दुष्परिणाम कमी असून त्यामुळं अनेक आजारांवर प्रभावीपणे उपचार होतात.
भविष्यातील औषध - तिरुवल्लूर यांनी याबाबत माहिती दिली.
"डॉक्टरला आजाराबाबत म्हणजे त्याचे स्वरूप आणि कारण याची चौकशी करू द्या आणि वैद्यकीय नियमांनुसार विश्वासानं त्याला त्यावर उपचार करू द्या," असं तिरुवल्लूर म्हणाले.
यासाठीच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत...
1. आजाराच्या अगदी प्राथमिक टप्प्यावर अचूक निदानासाठीचे प्रोटोकॉल
2. आजाराचं मुख्य कारण शोधण्यासाठी अनुवांशिक आणि अण्विक माहितीचा वापर करणे.
3. आजाराला योग्यरित्या लक्ष्य करून त्याला मुळासकट नष्ट करण्यासाठी उपचाराचे प्रोटोकॉल विकसित करणे
पण जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)आणि 'चिरतारुण्य' या कल्पनेचा वापर करणाऱ्या अचूक वैद्यकीय दृष्टीकोनाचा संबंध काय? याचं कुणालाही आश्चर्य वाटेलं.

फोटो स्रोत, Getty Images
अल्झायमर, हृदयविकार, ऑस्टिओआर्थरायटिस असे शेवटच्या टप्प्यातील काही आजार प्रामुख्यानं वृद्धापकाळामुळं होतात. त्यामुळं वृद्धापकाळाला लक्ष्य करून आपण या आजारांचं व्यवस्थापन करू शकतो.
हाच या संशोधकांचा मुख्य उद्देश आहे. मानवी शरिर आणि यंत्र याची तुलना करून आपण वृद्धापकाळाची नेमकी कारणे काय? याचा शोध घेऊ शकतो. ते कसं शक्य होईल, हे आता पाहू.
टिक टिक टिक टिक - पेशीचक्राचं घड्याळ
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचा एक टायमर असतो. उदाहरणार्थ वयानुसार आपली त्वचा आंकुचन पावत असते. आपल्या त्वचेच्या पेशींच्या विभाजन आणि प्रसाराचा कालावधी हा केवळ 60 वेळा एवढाच असतो.
चित्रात दिसत असलेला डबल हेलिक्स डीएनए हा गुणसूत्रांच्या रुपात एकत्रित घट्ट झालेला असतो. या गुणसूत्रांच्या अखेरच्या टोकाला टेलोमेर म्हणतात.
हे टेलोमेर एकत्र असलेली गुणसूत्रं वेगळी होण्यापासून त्याचं रक्षण करतात. ज्याप्रकारे आपल्या शू लेसच्या टोकाला असलेली प्लास्टीकची कॅप त्याचे धागे वेगळे होण्यापासून बचाव करते, त्याच्याशी आपण या टेलोमेरची तुलना करू शकतो.
पेशीचं विभाजन होतं तेव्हा प्रत्येक वेळी टेलोमेर आंकुंचन पावत असतात. ठराविक प्रमाणात पेशींच्या विभाजनानंतर या पेशी वृद्धत्व किंवा सेल्युलर सेनससमधून जातात, त्याठिकाणी त्यांचं आणखी विभाजन शक्य नसतं.
इस्रायलच्या संशोधकांच्या एका टीमनं नुकतीच या टेलोमेरची लांबी वाढवण्यासाठी हायपरबॅरिक ऑक्सिसन थेरपी (HBOT)चा वापर केला. याचा वापर पेशीचक्र नव्यानं स्थापित करण्यासाठी होऊ शकतो, आणि त्यातून चिरतारुण्याचा मार्ग सापडू शकतो.
तसंच टेलोमेरच्या लांबीवर नियंत्रण ठेवणाऱ्या टेलोमेरेस एन्झाइमचा वापर करूनही हे चक्र नव्यान स्थापित करता येऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
एपिजेनेटिक कोड
पेशींच्या पातळीवर विचार करता आपल्या शरीराचं भवितव्य हे एपिजेनेटिक कोड नियंत्रित करत असतं. निरोगी जनुके नियंत्रित करून ते हे करत असतात.
उदाहरण द्यायचं झाल्यास काही मधमाशांच्या अळ्यांना खाण्यासाठी रॉयल जेली दिली जाते, त्यामुळं निरोगी जनुके मिळतात आणि त्यापासून राणी मधमाशी तयार होते.
ही राणी मधमाशी दीर्घकाळ जगत असते. ज्या अळ्यांना अशी रॉयल जेली मिळत नाही त्या कमी वयोमानाच्या कामगार मधमाशा बनतात.
एपिजेनेटिक कोड जात आणि धर्माच्या पलीकडं जात लोकांना ओळखून आपल्या जनुकांवर अन्न आणि पर्यावरणाचा प्रभाव ओळखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. हे एपिजेनेटिक कोड एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत केले जाऊ शकतात. त्यातून ते त्यांचा आरोग्याचा कालावधी ठरवू शकतात.
आपल्या आरोग्याच्या सद्यस्थितीसाठी पूर्वजांना दोष देण्याआधी काहीतरी समजून घेणे गरजेचे आहे. एपिजेनेटिक कोड हे काळात अडकलेले नसतात, ते कधीही बदलले जाऊ शकतात.
"ब्लू झोन" हे उच्च आरोग्य कालावधी असलेल्या भागाला दिलेलं नाव आहे. असे पाच प्रकारचे भाग असतात. या भागातील आरोग्य कालावधीसाठी असणारी प्रमुख कारणं म्हणजे :
1. पूर्णपणे वनस्पती आधारित आहार
2. कॅलरीचा कमी वापर / उपवास
3. मध्यम व्यायाम
4. पुरेशी झोप
5. चांगली उद्दिष्टं
6. निकोप सामाजिक संबंध
आपण याचं पालन केलं आणि चांगले एपिजेनेटिक कोड परत मिळवले, तर कोणत्याही वयात आपण पुन्हा आरोग्य प्राप्त करू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
आतड्यांचे जाळे
सर्व सूक्ष्मजंतू हे रोगजनक (रोग निर्माण करणारे किंवा पसरवणारे) नसतात. मानवी शरीरात आपल्या पेशींच्या तुलनेत सूक्ष्मजंतूची संख्या ही 10:1 एवढी जास्त आहे, हे तुम्हाला माहिती आहे?
आपल्या आतड्याला घर समजणारे कोट्यवधी बॅक्टेरिया हे एपिजेनेटिक कोडबरोबर परस्पर गुंतलेले असतात. ते फक्त आपल्याला पाचनशक्ती प्रदान करत नाहीत, तर त्याबरोबरच रोगप्रतिकाराचा प्रतिसाद आणि आपल्या अवयवांदरम्यान परस्परसंबंधदेखील सांभाळत असतात.
"सर्व आजार आतड्यांपासून सुरू होतात," असं प्राचीन ग्रीक डॉक्टर हिप्पोक्रॅट यांनी म्हटलं होतं. आतड्यांच्या माध्यमातून तयार झालेले परस्परसंबंध हे दीर्घकाळात तुटतात, त्यातून आजार होत असतात. आपल्या आतड्यांच्या जाळ्याचं व्यवस्थापन केल्यास आपण हे संबंध पुन्हा निर्माण करून, आरोग्य कालावधी वाढवू शकतो.
मायटोकॉन्ड्रिया - पेशींच्या इंजीनची दुरुस्ती
पेशींच्या आत असणारा मायटोकॉन्ड्रिया पेशीच्या इंजिनसारखं काम करतो. ते अॅडेनोसिन ट्रायफॉस्फेट नावाचे ऊर्जेचे रेणू तयार करून, सर्व पेशी कार्यरत राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते. तसंच ते पेशींच्या कामात समन्वय केंद्रासारखंही काम करतात.
वृद्धत्व आणि त्यासंबंधीचे आजार हे प्रामुख्यानं मायटोकॉन्ड्रियल डीएनएशी संबंधित बाबी, त्याचे एकत्रिकरण आणि मायटोकॉन्ड्रियाचे कार्य यामुळं उद्भवत असतात. जर त्याची अचूकपणे दुरुस्ती करता आली तर, आपण पुन्हा पेशी पूर्ववत करून वृद्धत्वाशी संबंधित आजार टाळू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
पेशी पुनरुत्पादन - गूढ समोर आले!
आईच्या गर्भाशयात असलेल्या स्टेम सेलमध्ये कोणत्याही अवयवात वाढ होण्याची क्षमता असते. प्रत्येक पेशीच्या प्लुरीपोटेन्सी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पेशी किंवा अवयवात वाढ होण्याची क्षमता यामुळं ते घडत असतं.
पालिची शेपटी कापली गेली तर ती पुन्हा उगवू शकते. आपल्या अवयवांमध्ये मात्र तशी क्षमता नसते. अशा प्लुरीपोटेन्सीसाठी जबाबदार किंवा तशी क्षमता असलेली 4 जनुके क्योटो युनिव्हर्सिटीच्या डॉ. शिन्या यमानाका यांनी शोधली आहेत.
या जनुकांमध्ये बदल करून आपण, त्वचेच्या पेशी प्लुरीपोटेन्ट एम्ब्रायोनिक पेशींमध्ये परिवर्तित करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलंय. इंड्युस्ट प्लुरीपोटेन्ट स्टेम सेल टेक्निक नावाच्या या प्रक्रियेसाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
या पुनरुत्पादन तंत्राचा वापर करून आपण जीर्ण झालेले अवयव बदलू शकतो. त्यासाठी आपल्याला अवयव दाते किंवा गर्भाशयातील स्टेमसेलची आवश्यकता नसेल. यामुळंही आरोग्याचा कालावधी वाढू शकतो.
आपण मृत्यूवर मात करू शकतो?
सर्ट्युनिससारखी अनेक कारणं असती तर थोडक्यात सांगायचं झाल्यास अनुवांशिक आणि पेशींमधील परस्परसंवाद कमी होणं ही प्रामुख्यानं वृद्धत्वाची कारणं ठरू शकतात.
जनुकांमध्ये योग्य वेळी बदल करून किंवा पूर्ववत करून आपण या पेशींशी त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यात दुरुस्ती करू शकतो.
जेलीफिश आणि बोहेड व्हेल्स अशा दीर्घकाळ जगणाऱ्या प्राण्यांवर जीनोम संशोधन करून आणि पारंपरिक औषध तंत्राचा आढावा घेऊन आपण हे अधिक अचून बनवू शकतो. सध्या हे संशोधन अगदीच बाल्यावस्थेत असलं तरी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अब्जाधीशांची गुंतवणूक आणि प्रगत होत जाणारं विज्ञान यांच्यातील समन्वयामुळं, अगदी अब्जाधीश ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांसाठी हे फायद्याचं ठरू शकतं.
तोपर्यंत आपल्याला कोणत्याही औषध किंवा अमृताची गरज नाही. आपली जीवनशैली बदलण्याची सुवर्णसंधी आपल्याकडं आहे. आयुर्मान वाढणं याचा संबंध केवळ वैयक्तिक जीवनाशी नसून, त्यामुळं देशांचा विकास होईल आणि मानवतेला पुढच्या टप्प्यावर नेण्यासही त्याची मदत होईल.
वृद्धत्व आणि मृत्यू हे निसर्ग नियमाचा भाग आहेत. कधीही न संपणारं वाक्य हे कंटाळवाणं ठरू शकतं. जीवन आणि या लेखाचं भविष्यही काहीसं तसंच आहे.
(नमशिवायम गणेश पांडियन यांनी चेन्नई आयआयटीमध्ये संशोधन कारकिर्दीला सुरुवात केली. 2008 मध्ये जपानच्या निकाटा युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. सध्या क्योटो विद्यापीठात ते सहायक प्राध्यापक आहेत. 2018 मध्ये त्यांनी थाई लॅबोरेटरी सुरू केली. सध्या ते वृद्धत्व, मायटोकॉन्ड्रिया आणि एपिजेनेटिक कोड यावर संशोधन करत आहेत. अमेरिकेतील रुत्गर्स युनिव्हर्सिटी आणि स्वित्झरलँडच्या एओ रिसर्च कंपनीतही ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून अध्यापन करतात. तसंच रेग्युजेन कं.लि. मध्ये वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








