एक असं गाव जिथं फक्त जिथं सुबत्ता तर आहे पण ती उपभोगणारी माणसंच गायब आहेत...

फोटो स्रोत, ARUN CHANDRA BOSE
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताने चीनला मागे टाकलंय. आज देशाच्या काही भागांमध्ये लोकसंख्येचं संकट गंभीर झालं आहे तर काही भागांमध्ये अत्यंत विरळ लोकवस्ती आहे.
या विरळ लोकवस्तीमागे मोठं कारण आहे स्थलांतर. यामुळे गावच्या गावं ओस पडली असून काही गावांमध्ये फक्त वृध्द लोकच राहतात. केरळ मधील कुंबनाड गाव असंच ओस पडलंय. बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांनी या गावाला भेट दिली.
या भागातील शाळांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. इथं शाळेचा पट कमी असल्याने शिक्षक घरोघरी जाऊन शाळेत बसवायला विद्यार्थी शोधतात. कधीकधी तर या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येण्यासाठी शिक्षक स्वतःच्या खिशातले पैसे देतात.
कुंबनाडमध्ये 14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 150 वर्षं जुनी सरकारी प्राथमिक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांचा पट 50 इतका आहे. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत हाच पट 700 च्या आसपास होता, तो आता सातत्याने घसरतो आहे.
या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक जण गरीब आणि वंचित कुटुंबातील आहेत. सातवीच्या वर्गात एकूण सात विद्यार्थी आहेत. 2016 मध्ये तर सातवीच्या वर्गात फक्त एकच विद्यार्थी होता.
विद्यार्थ्यांना शाळेत आणणं एक मोठं आव्हान आहे. विद्यार्थ्यांचा घरापासून शाळेत येण्याजाण्यासाठीचा जो खर्च आहे तो शाळेतील आठ शिक्षक करतात. दरमहिन्याला रिक्षाचं (टुकटुक) भाडं 2,800 रुपये आहे.
याव्यतिरिक्त शिक्षकांना घरोघरी जाऊन विद्यार्थी शोधावे लागतात. एवढंच नाही, तर खाजगी शाळांचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. इथले शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. या भागातील सर्वांत मोठ्या शाळेचा पट देखील जेमतेम 70 च्या आसपास आहे.
एका ढगाळलेल्या दुपारी शाळेत शांतता होती. शाळेचा जसा एक विशिष्ट आवाज असतो तसा आवाज तिथे नव्हता. काही शिक्षक एका अंधारलेल्या खोलीत विद्यार्थ्यांना शिकवत होते. बाहेर काही मुलं नुसतीच इकडेतिकडे फिरत होती.

फोटो स्रोत, ARUN CHANDRA BOSE
शाळेच्या मुख्याध्यापिका जयदेवी आर सांगतात, "आम्ही तरी काय करणार? या गावात एकही मुलं नाही. म्हणजे, इथे जेमतेम लोकच राहतात."
आणि त्यांचं अगदी बरोबर होतं. कारण कुंबनाड मध्ये वृद्धांची संख्याच जास्त आहे. केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्याच्या मध्यभागी असलेलं हे गाव ओस पडत चाललंय.
आज देशात 47% लोक 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, याच कालावधीत 47% लोकांपैकी दोन तृतीयांश लोकांचा जन्म झाला होता.
स्थानिक ग्राम परिषद प्रमुख असलेल्या आशा सीजे सांगतात की, कुंबनाड आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुमारे 25,000 लोक राहतात. पण यातल्या 11,118 घरांपैकी सुमारे 15% घरं बंद आहेत, कारण या घरात राहणारे लोक एकतर स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांच्या मुलांसह परदेशात राहतात. या भागात 20 शाळा आहेत, पण विद्यार्थी नाहीत अशी परिस्थिती आहे.
या भागात एक रुग्णालय, एक सरकारी दवाखाना, 30 पेक्षा जास्त अधिक निदान केंद्र आणि तीन वृद्धाश्रम आहेत. या गोष्टी वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येचं द्योतक आहे.
या भागात दोन डझनहून अधिक बँका असून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या बँकांच्या आठ शाखा आहेत. परदेशात स्थलांतरित झालेले लोक मागे राहिलेल्या लोकांसाठी पैसे पाठवत असतात.
परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी गेल्या वर्षी जवळपास 10 हजार कोटी रुपये भारतात पाठवले होते. यातील 10% रक्कम तर एकट्या केरळमध्ये आली होती.
केरळ हे अजिबात गजबज नसलेलं राज्य आहे. 2001 ते 2011 मध्ये तिथे लोकसंख्येची वाढ फक्त 4.9 टक्के होती. इथली आयुमर्यादा 75 वर्षं आहे. देशात ही 69 वर्षं आहे.
प्रजननदरही 1.9 टक्क्यांवरून 1.7 वर घसरला आहे. ही स्थिती गेल्या 30 वर्षांपासून आहे.

फोटो स्रोत, ARUN CHANDRA BOSE
लहान कुटुंबांमध्ये मुलांना चांगलं आणि उच्च शिक्षण दिलं जातं. यामुळे संधी मिळताच हे तरुण देशांतर्गत किंवा देशाबाहेर स्थलांतरित होतात, त्यांचे पालक मात्र त्यांच्या मूळ गावीच राहतात.
मुंबईस्थित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसचे प्राध्यापक के.एस. जेम्स सांगतात की, "शिक्षणामुळे मुलांना चांगल्या नोकरीची, चांगल्या आयुष्याची आकांक्षा असते. आणि त्यामुळे ते स्थलांतर करतात."
"पण त्यांचे पालक आहे त्या ठिकाणीच राहतात. काहीजण तर एकटेही राहतात."
74 वर्षांच्या अन्नम्मा जेकब खूप वर्षांपासून एकट्या राहतायत.
त्यांचे पती सरकारी तेल कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. 1980 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना एक 50 वर्षांचा मुलगा आहे, पण आज वीस वर्षं लोटली तो अबू धाबीमध्येच स्थायिक झाला आहे.
अन्नम्मा जेकब यांच्या पासून काही अंतरावर त्यांची मुलगी राहते, पण तिचा नवराही मागच्या तीस वर्षांपासून दुबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतोय.
अन्नम्माच्या शेजारी असलेल्या घरांना कुलूपं लावली होती. त्यांची शेजारीण नर्स असून ती बाहरीनला असते. तिने तिच्या पालकांना तिच्यासोबत बाहरीनला नेलंय. तर दुसरे शेजारी दुबईला असतात. त्यांचं घर एका जोडप्याला भाड्याने दिलंय.
या परिसरात लोकवस्ती विरळ आहे. टॅपिओका, केळी आणि सागवान वृक्षराजींमध्ये वसलेली देखणी घरं रिकामी आहेत, त्यांच्या अंगणात सुकलेल्या पानांचा कचरा पडलाय. गाड्या धुळीने माखल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी मोकाट कुत्र्यांची जागा घेतली आहे.
एकाबाजूला भारतातील गजबजलेली शहरं तर दुसऱ्या बाजूला निर्जन निर्मनुष्य असं कुंबनाड. आज अनेकांनी त्यांची घरं सोडली असतील पण कुंबनाड उध्वस्त झालेलं नाहीये. निर्मनुष्य असलेल्या या घरांमध्ये त्यांचे मालक कोणत्याही दिवशी राहायला येतील म्हणून त्यांना रंग दिला जातो.
अन्नम्मा सांगतात, "मी खूपच एकाकी पडले आहे. माझी तब्येतही चांगली नसते."
अन्नम्मा यांना हृदयविकार आणि संधिवात आहे. मात्र आपल्या लेकाच्या आणि नातवंडांच्या ओढीने अन्नम्मा यांनी जॉर्डन, अबू धाबी, दुबई आणि इस्रायलपर्यंत प्रवास केला आहे.

फोटो स्रोत, ARUN CHANDRA BOSE
अन्नम्माच्या दिवाणखान्यात पॅरासिटामॉलच्या गोळ्या, पिस्ता आणि काजू, चायना मेड फुलदाण्यांमध्ये भरलेली पिवळी कागदाची फुले आणि इंपोर्टेड बॉडी वॉशची बाटली अशा जगभरातून आणलेल्या अनेक गोष्टी दिसतात.
एकटीसाठी त्यांनी 12 खोल्यांचं मोठं घर का बांधलं या प्रश्नावर अन्नम्मा हसून सांगतात, "इथले सर्वच लोक टोलेजंग घरं बांधतात. यातून त्यांना आपली आर्थिक स्थिती दाखवायची असते."
अन्नम्माच्या परसदारात टॅपिओका, केळी, आलं, सुरण, फणसाची झाडं आहेत. त्यांचा बराचसा वेळ या बागेत जातो. उरलेल्या वेळात त्या ध्यानधारणा करतात, वर्तमानपत्र वाचतात. त्यांच्याकडे डायना नावाची कुत्री आहे.
अन्नम्मा सांगतात, "कधीकधी मी डायनाशी बोलते, ती मला समजून घेते."
अन्नम्माची ढासळती तब्येत आणि उताराला लागलेलं वय यामुळे त्यांना शेतात काम करणं शक्य नाहीये. शिवाय आजकाल शेतीही परवडत नसल्याचं त्या सांगतात. मजुरांचा तुटवडा तर आहेच पण कामाच्या शोधात असलेल्या मोजक्या लोकांची मजुरी देखील जास्त आहे. सहा तासांसाठी हे मजूर एक हजार रुपये घेतात.
काही गल्ल्या सोडून पलीकडे राहणारे 64 वर्षीय चाको मॅमेन यांना हृदयविकार आणि मधुमेह असे आजार आहेत. पण ते आपल्या शेतात रोज चार तास काम करतात. त्यांच्या शेतात केळीचं पीक आहे. ते पूर्वी ओमानमध्ये सेल्सपर्सन म्हणून काम करायचे.
तिथून परतल्यानंतर त्यांनी एका छोटा उद्योग सुरू केला, पण त्यांना कामाला माणसं मिळाली नाहीत म्हटल्यावर त्यांनी हा व्यवसाय बंद केला. आता ते त्यांच्या शेतातून दररोज सुमारे 10 किलो केळ्यांचं उत्पादन काढतात. ते सांगतात, "मला माणूस कामावर ठेवणं परवडत नाही."
वृद्धांमध्ये काम करण्याची शक्ती नसते, शिवाय त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं मिळणं पण अवघड असतं. बाहेरच्या राज्यातून आलेले कामगार देखील कामासाठी मिळतील असं ही नसतं. अन्नम्मा सांगतात की, बाहेरून आलेल्या मजुरांवर कसा विश्वास ठेवणार, त्यामुळे मी शक्यतो अशी लोकं कामावर ठेवत नाही.
त्या पुढे म्हणतात "आणि मी एकटीच राहते, त्यांनी मला मारून टाकलं तर?"

फोटो स्रोत, ARUN CHANDRA BOSE
या वृद्धांच्या शहरात चोऱ्यामाऱ्या आणि गुन्हेगारीचं प्रमाण फारच कमी आहे.
पोलीस सांगतात की, इथली घरं बंद असल्यामुळे लोक घरात जास्त पैसे आणि मौल्यवान वस्तू ठेवत नाहीत. या भागात शेवटचा खून कधी झाला होता हे देखील त्यांना आठवत नाही.
स्थानिक पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक सजीश कुमार व्ही. सांगतात की, "इथे बरीच शांतता आहे. आमच्याकडे कधीकधी फसवणुकीच्या तक्रारी येत असतात. यात वृध्दांना त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा घरातल्याच एखाद्या नोकराकडून पैशांसाठी फसवलं जातं."
मागच्या वर्षी एका वयोवृद्ध महिलेच्या नातेवाईकाने तिची बनावट सही करून तिच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये लंपास केले होते. त्याचवर्षी पोलिसांनी एका खाजगी वित्तीय कंपनीच्या चार प्रवर्तकांना अटक केली. त्यांनी ठेवींवर भरघोस परतावा देण्याचं आमिष देत 500 स्थानिक ठेवीदारांना गंडा घातला होता.
कुमार सांगतात की, "या भागातला हा सर्वांत मोठा गुन्हा होता. नाहीतर इथे खूप किरकोळ गोष्टी घडत असतात. जसं की, मोठ्याने आवाज करणे, घराबाहेर कचरा टाकणे, अतिक्रमण आदी गोष्टींच्या तक्रारी असतात."
या भागात किरकोळ गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांचा बहुतेक वेळ वृद्धांची काळजी करण्यात जातो. इथले पोलिस नियमितपणे गस्त घालतात. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत वापरता येईल असा मोबाईल अलार्म लोकांकडे दिला आहे. 2020 मध्ये, पोलिसांनी एका घराची डोअरबेल वाजवली असता आतून कोणतंही उत्तर आलं नव्हतं. शेवटी पोलिसांनी दरवाजा तोडला. त्या घरात एक वृद्धा जमिनीवर पडलेली आढळली.
कुमार सांगतात "आम्ही त्यांना जवळच्याच रुग्णालयात घेऊन गेलो. अशाच पद्धतीने आम्ही इतरही वृद्धांना दवाखान्यात नेतो."
वृद्धांची वाढती संख्या हीच कुंबनाडची एकमेव समस्या आहे, असं फादर थॉमस जॉन म्हणाले. जॉन कुंबनाड मध्येच एक जेरियाट्रिक सेंटर चालवतात.

फोटो स्रोत, ARUN CHANDRA BOSE
शहरात तीन वृद्धाश्रम आहेत. अलेक्झांडर मार्थोमा मेमोरिअल जेरियाट्रिक सेंटरच्या पाच मजली इमारती व्यतिरिक्त 150 खाटांचे रुग्णालय आहे. या सेंटरमध्ये 85 ते 101 वयोगटातील 100 हून अधिक स्थानिकांची काळजी घेतली जाते. यातले बऱ्यापैकी लोक अंथरुणाला खिळलेले आहेत आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासाठी महिन्याला 50,000 रुपये पाठवतात.
फादर जॉन सांगतात की, "बहुतेकांची मुलं परदेशात स्थायिक आहेत. आणि त्यांच्या पालकांना वृद्धाश्रमात हलवण्याशिवाय पर्याय नाही."
75 वर्षं जुन्या धर्मगिरी वृद्धाश्रमात 60 वृध्द राहतात. यातले सर्वजण 60 पेक्षा जास्त वयाचे आहेत. गेल्या वर्षी या आश्रमात 31 नवीन लोक आले. इथे पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र इमारती आहेत.
आता तर वेटींग लिस्ट वाढतच आहे. 60 वृद्धांना राहता येईल अशी नवीन 30 खोल्यांची इमारत बांधली जात आहे.
आश्रम चालविणारे फादर के. एस. मॅथ्यूज सांगतात, "आमच्याकडे राहणाऱ्या बहुतांश महिला फसवणुकीला बळी पडलेल्या आहेत. त्यापैकी काहींना त्यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिलंय."
आजारी वृद्ध, वृद्धाश्रम, मजुरांची टंचाई, तरुणांचं स्थलांतर, घटती लोकसंख्या, ओस पडत चाललेली गावं...
प्रोफेसर जेम्स म्हणतात की, "ही एका शहराच्या लोकसांख्यिकीय बदलाची गोष्ट आहे. पुढे जाऊन ती संपूर्ण भारताची गोष्ट ठरेल."











