दक्षिणेची झाशीची राणी जिला इतिहासही विसरला...

अक्कम्मा चेरियन

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, अक्कम्मा चेरियन
    • Author, मेरिल सेबेस्टियन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अक्कम्मा चेरियन यांची त्यांच्या शौर्यामुळे आठवण काढली जाते. त्या मूळच्या दक्षिण भारतातील केरळमधील. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी उडी घेतली होती. 1938 च्या आंदोलनात त्या सक्रीय झाल्या सहभागी झाल्या होत्या.

1938 चं आंदोलन हे त्रावणकोर (आताचं केरळ) प्रांतातल्या स्वातंत्र्यलढ्यातला महत्त्वाचा टप्पा होता, असं इतिहासकार मानतात.

इतिहासाच्या पानांमध्ये ज्या लढाऊ व्यक्तींची नावं अज्ञातवासात गेली , त्यातलं एक नाव अक्कम्मा चेरियन हेही आहे. केरळ राज्याबाहेर चेरियन यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

दिल्लीमध्ये राहणारे समाजशास्त्रज्ञ कनडाथिल सेबेस्टियन यांनी गेल्यावर्षी लिहिलं होतं की, "स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्रावणकोरमध्ये चेरियन या आंदोलनाच्या प्रमुख चेहरा बनल्या होत्या. 15 वर्षांहून अधिक काळापर्यंत त्रावणकोरच्या राजकारणातल्या सर्वात ताकदवान महिला म्हणून त्यांची नोंद होते."

1938 साली महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेऊन चेरियन यांनी नोकरी सोडली आणि त्रावणकोर महिला काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यलढ्याचा भाग होण्यासाठी सक्रिय झाल्या.

'जीविथम : ओरू समारण' (जीवन : एक संघर्ष) या आत्मचरित्रात चेरियन यांनी लिहिलंय की, "शेक्सपियरने लिहिलंय की, आयुष्य हे एक रंगमंच आहे आणि सर्व महिला-पुरुष हे कलाकार आहेत. मात्र, माझ्यासाठी आयुष्य खाचखळग्यांनी भरलेलं आहे."

"रुढी, अर्थहीन कर्मकांडं, सामाजिक अन्याय, फसवणूक, लैंगिक असमानता आणि त्या सर्व गोष्टी, ज्या अन्यायकारक आहेत, असं हे आयुष्य आहे," असं त्यांनी आत्मचरित्रात लिहिलंय.

चेरियन तेव्हा केवळ 29 वर्षांच्या होत्या. त्रावणकोर महिला काँग्रेसला ब्रिटिशांनी बेकायदेशीर घोषित केल्याच्या काही महिने आधीच त्या त्यात सहभागी झाल्या होत्या.

हुकूमशाहीविरोधात बुलंद आवाज

पक्षाचे अनेक नेते तुरुंगात गेल्यानंतर 11 वे अध्यक्ष कुट्टानाड रामाकृष्णा पिल्लईंनी अटकेआधी चेरियन यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली.

याबाबत आत्मचरित्रात चेरियन यांनी लिहिलंय की, "या जबाबदारीचं महत्त्वं आणि गांभीर्य मला कळलं होतं. शिवाय, जबाबदारीचे परिणामही माहित होते. तरीही ही जबाबदारी घेण्यासाठी मी पुढे आले."

चेरियन यांच्या नेतृत्त्वात त्रावणकोरमध्ये मोठी रॅली निघाली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद या रॅलीला मिळाला.

23 ऑक्टोबर 1938 ला दहा हजारांहून अधिक लोक त्रावणकोरच्या राजमहलाबाहेर जमले. चेरियन आणि इतर नेते या लोकांचं नेतृत्त्व करत होते. त्रावणकोरच्या राजाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे आणि पक्षावरील बंदी हटवण्याची मागणी करण्यासाठी ही रॅली होती.

अक्कम्मा चेरियन

फोटो स्रोत, CHICAGO RADIO/MOTWANE

केरळमधील प्रसिद्ध लेखक ईएम कोवूर यांनी चेरियन यांच्याबद्दल लिहिलंय की, "त्या एका उघड्या वाहनात उभ्या होत्या. खादीचे कपडे त्यांनी परिधान केले होते आणि गांधी टोपीही घातली होती. देवी दुर्गासारख्या त्या अन्याय आणि वाईटाला तुडवत असल्याचे दिसत होते. तिथल्या अवकाशात त्यांच्या नावाचा गजर सुरू होता, जसं त्या हुकूमशाहीविरोधातल्या बुलंद आवाज आहेत."

राजमहलाबाहेर तैनात पोलिसांच्या प्रमुखानं जेव्हा आंदोलकांवर गोळी चालवण्याचे आदेश दिले, तेव्हा चेरियन यांनी आक्रमकपणे म्हटलं की, "मी या सगळ्यांची नेता आहे. पहिली गोळी माझ्यावर चालवा."

असं म्हटलं जातं की, चेरियन यांच्या आक्रमक आव्हानानंतर पोलिसांनी आपला गोळीबाराचा आदेश मागे घेतला. अटक केलेल्या नेत्यांना तुरुंगातून सोडण्याचं सरकार मान्य करत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहिलं.

त्रावणकोरची झाशीची राणी

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते महात्मा गांधीजींनाही त्रावणकोरमधील या आंदोलनाबद्दल कळल्यानंतर त्यांनी चेरियन यांना 'त्रावणकोरची झाशीची राणी' असं संबोधलं. झाशीच्या राणीने 1857 च्या लढ्यात भाग घेतला होता आणि त्या लढ्याच्या झाशीची राणी नायिका बनल्या होत्या.

आंदोलनाच्या वर्षीच चेरियन यांनी देसासेविका संघाची स्थापना केली. महिलांसाठीची ही स्वयंसेवी संस्था होती. चेरियन यांनी त्रावणकोरमधील महिलांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी प्रेरित केलं.

1939 मध्ये प्रांतीय काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाल्यानं चेरियन आणि त्यांच्या बहिणीसह अनेक महिलांना ब्रिटिशांनी अटक केली. तर पुढच्याच वर्षी सरकारी आदेशांचं उल्लंघन आणि आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल पुन्हा अटक झाली.

महात्मा गांधी, चले जाव, भारत छोडो, स्वातंत्र्य दिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी

1942 मध्ये त्या प्रांतीय काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा बनल्या. 8 ऑगस्ट 1942 मध्ये जेव्हा काँग्रेसने मुंबईमध्ये 'चले जाव' आंदोलनाचं आवाहन केलं, तेव्हा चेरियन यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. अध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी हे पहिलं मोठं आंदोलन होतं.

पहिल्या स्त्रीवादी पिढीच्या प्रतिनिधी

'चले जाव' आंदोलनानं ब्रिटिशांकडे पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सक्रिय राजकारणात त्या उतरल्या. त्रावणकोर राज्यात जेव्हा 1947 साली निवडणुका झाल्या, तेव्हा त्या विधानसभेत निवडून आल्या. मात्र, 1950 च्या दशकात जेव्हा लोकसभेचं तिकीट त्यांना दिलं गेलं नाही, तेव्हा त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला.

त्यावेळी प्रांतीय काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षांनी म्हटलं होतं की, महिला घराच्या राणी असतात, राजकारण त्यांचं क्षेत्र नाही.

आत्मचरित्रात चेरियन यांनी लिहिलंय की, "स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या महिलांना नंतर राजकारणातून बाजूला सारलं गेलं. त्यांना कुठलंही महत्त्वाचं पद दिलं गेलं नाही."

चेरियन यांनी स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि काँग्रेसचे सदस्य व्हीव्ही वार्के मण्णमप्लक्ल यांच्याशी लग्न केलं.

लेखक पॉल जकरिया यांनी 2007 मध्ये लिहिलं होतं की, "मी त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्या एका छोट्या घरात राहत होत्या. त्या घरात फर्निचरपेक्षा पुस्तकंच जास्त होती. त्यांची आठवण आल्यास सर्वात आधी त्यांची विनम्रता आणि बुद्धिमता आठवते. हे स्पष्टच होतं की, राजकारण का सोडलं."

अक्कम्मा चेरियन यांचं 1982 साली केरळची राजधानी तिरुवनंतरपुरममध्ये निधन झालं. याच शहरात त्यांच्या नावाचं पार्क आणि एक पुतळा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)