जेव्हा महात्मा गांधी म्हणाले, 'मी ज्यू असतो तर…'

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, कुमार प्रशांत
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद सुरू झाला अगदी तेव्हापासून ज्यू समाजामुळे महात्मा गांधींचं या विषयाकडे बारिक लक्ष होतं. युरोपात ज्यू समाजाची जी परिस्थिती होती त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.

1938 साली सीमांत प्रदेशाच्या दौऱ्यावर परतल्यावर त्यांनी पहिला अग्रलेख 'ईसाइयत के अछूत' या नावाने लिहिला. यात ते लिहितात, "माझी संपूर्ण सहानुभूती ज्यू नागरिकांसोबत आहे. मी दक्षिण आफ्रिकेच्या दिवसांपासून त्यांना जवळून ओळखतो. त्यापैकी काहींशी माझी आजन्म मैत्री आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांचा जो अनन्वित छळ झाला, त्याची माहिती मला मिळाली.

"या लोकांना ख्रिश्चन धर्मातील अस्पृश्य बनवण्यात आलं आहे. तुलनाच करायची असेल तर मी म्हणेन ख्रिश्चन लोकांनी ज्यू लोकांना तशीच वागणूक दिली जशी हिंदू धर्मात अस्पृश्यांना दिली जाते.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

"वैयक्तिक मैत्रीव्यतिरिक्त ज्यू नागरिकांप्रती असलेल्या माझ्या सहानुभूतीस व्यापक आधार आहे. मात्र, त्यांच्याशी असलेली गाढ मैत्री मला योग्य काय, हे पहाण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे ज्यू समाजाची 'स्वतःचं राष्ट्रीय घर' ही मागणी मला मान्य नाही. यासाठी बायबलचा आधार शोधला जातोय आणि मग त्या आधारावर पॅलेस्टाईन भागात परतणं कसं योग्य आहे, हे सांगितलं जातं. मात्र, जगात जे सगळेच करतात तेच ज्यू का करू शकत नाहीत. ते जिथे जन्माला आले आणि जिथे त्यांना रोजीरोटी मिळते, त्यालाच ते स्वतःचं घर का मानत नाही?"

ख्रिश्चनांची ज्यू लोकांना अस्पृश्यांसारखी वागणूक

महात्मा गांधींचं म्हणणं होतं, "जसं इंग्लंड इंग्रजांचं किंवा फ्रान्स फ्रेंच लोकांचं आहे, त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनचा प्रदेश अरबांचा आहे. ज्यू लोकांना अरब जनतेवर बळजबरीने थोपवणं चुकीचं आणि अमानवीय ठरेल. ज्यू जिथे कुठे जन्माला आले आहेत आणि जिथे रोजी-रोटी कमवत आहेत तिथेच त्यांना बरोबरीची समान वागणूक मिळणं, हेच योग्य ठरेल. ज्यू लोकांना पॅलेस्टाईनची भूमीच हवी असेल तर त्यांना आज ते जगात जिथे-जिथे आहेत तिथून बळजबरीने बेदखल करणं आवडेल का? की त्यांना मौजमजेसाठी दोन घरं हवी आहेत? 'स्वतःसाठी एक राष्ट्रीय घराची' जी ओरड ते करत आहेत त्याला सहज हा रंग दिला जाऊ शकतो की याच कारणामुळे त्यांना जर्मनीतून काढलं जात होतं."

"जर्मनीत ज्यू नागरिकांबाबत जे घडलं त्याची बरोबर नाहीच. असं वाटतं जणू इतिहासात कुणीच ज्या पातळीला गेलं नाही जी पातळी हिटलरने गाठली आणि तेसुद्धा धर्मकार्याच्या उत्साहासोबत. जणू ते एका विशेष शुद्ध धर्म आणि लष्करी राष्ट्रीयतेची स्थापना करत आहेत. ज्याच्या नावाखाली सर्व अमानवीय कृत्यं मानवी कृत्य बनतील, ज्याचं पुण्य आता इथेच किंवा कधीतरी मिळेलच.

"मानवतेच्या नावाखाली आणि तिच्या स्थापनेसाठी निर्विवाद औचित्य असलेलं युद्ध झालं असेल तर ते जर्मनीच्या विरोधात पुकारलेलं महायुद्ध होय. या युद्धाने एक संपूर्ण समाज नष्ट होण्यापासू वाचवला. मात्र, माझा कुठल्याच युद्धावर विश्वास नाही. त्यामुळे अशा युद्धाच्या औचित्य किंवा अनौचित्याची चर्चा माझ्या मानसपटलावर येतच नाही."

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

"नग्न हिंसा किती पापजन्य, क्रूर आणि भीतीदायक असू शकते, हे जर्मनीने दाखवून दिलं आहे.

"ज्यू या संघटित आणि निर्लज्ज दमनाचा मुकाबला करू शकले असते का? असा कुठला मार्ग आहे का की ज्यामुळे ते स्वतःचा आत्मसन्मान वाचवू शकले असते जेणेकरून ते इतके असहाय्य, उपेक्षित आणि एकटे पडले नसते? मी म्हणेन हो, आहे. ज्या कुठल्या व्यक्तीत ईश्वराप्रती संपूर्ण श्रद्धा असेल त्याला कधीच असहाय्यपणा किंवा एकटेपणा जाणवणारच नाही.

"ज्यू समाजाचा 'यहोवा' ख्रिश्चन, मुस्लीम किंवा हिंदूंच्या ईश्वरापेक्षा कितीतरी जास्त मनुष्याला महत्त्व देणारा आहे. खरंतर तो सर्वांमध्येच आहे, समान आहे आणि कुठल्याही वादाच्या पलिकडचा आहे. मात्र, ज्यू परंपरेत ईश्वराला अधिक मानवी स्वरुप देण्यात आलं आहे आणि तोच मनुष्याच्या सर्व कृतींचं नियमन करतो, असं मानलं जातं. असं असेल तर त्यांनी इतकं असहाय्य वाटून घेण्याची गरजच काय?"

गांधी ज्यू असते तर काय केलं असतं?

महात्मा गांधींचं म्हणणं होतं, "मी ज्यू असतो आणि माझा जन्म जर्मनीत झाला असता आणि तिथेच उदरनिर्वाह केला असता तर त्यावेळी मी हाच दावा केला असता की जर्मनी माझं तेवढंच घर आहे जेवढं एखाद्या उंचपुऱ्या धिप्पाड जर्मनचं आणि मी त्याला आव्हान दिलं असतं की तू मला गोळी घातलीस किंवा मला बंदी बनवलंस तरीही मी इथून बाहेर काढला जाण्यास किंवा कुठलाही भेदभाव स्वीकारण्यास तयार नाही. इतकंच नाही तर इतर ज्यू लोकांनी येऊन या नागरी असहकारात मला साथ द्यावी, याची मी वाटही बघितली नसती. उलट मी या विश्वासाने पुढे गेलो असतो की सरतेशेवटी सर्व माझ्याच मार्गावरून जाणार आहेत."

"एका किंवा सर्वच ज्यू नागरिकांनी मी सांगितलेल्या हा पर्याय निवडला असता तर आज त्यांची परिस्थिती जितकी दयनीय आहे त्याहून अधिक खचितच नसती."

"दक्षिण आफ्रिकेत भारतीयांची परिस्थिती तशीच होती जशी जर्मनीत ज्यू लोकांची आहे. तिथेही दमनाला एक धार्मिक रंग देण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष क्रूझर म्हणत - गोरे ख्रिश्चन ईश्वराने निवडलेली अपत्यं आहेत आणि भारतीयांना गोऱ्यांची सेवा करण्यासाठी निर्माण करण्यात आलं आहे. ट्रान्सवालच्या संविधानातील एक मुख्य तरतूद अशी होती की गोरे आणि काळे (ज्यात सर्व आशियाई लोकांचाही समावेश होता) यांना कुठल्याही प्रकारची समान वागणूक मिळणार नाही."

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

क्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांशी तुलना

"द. आफ्रिकेत भारतीयांनाही त्यांनी ठरवून दिलेल्या वस्त्यांमध्येच राहावं लागे, ज्याला ते 'लोकेशन' म्हणत. जर्मनीत ज्यू लोकांशी जसा भेदभाव केला जाई तसाच तिथेही होता. तरीही तिथे त्या परिस्थितीत मूठभर भारतीयांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. त्यांना बाहेरच्या जगाचा पाठिंबा नव्हता आणि भारत सरकारकडूनही समर्थन नव्हतं. तब्बल आठ वर्ष चाललेल्या लढ्यानंतर जागतिक सार्वमताचा पाठिंबा मिळाला आणि भारत सरकार मदत करायला पुढे आलं."

"मात्र, जर्मनीतील ज्यू नागरिकांची परिस्थिती द. आफ्रिकेतील भारतीयांच्या तुलनेत कितीतरी जास्त बरी आहे. ज्यू जर्मनीत एक संघटित समाज आहे. द. आफ्रिकेतील भारतीयांच्या तुलनेत ते अधिक कुशल आहेत आणि आपल्या लढ्यासाठी ते जागतिक जनमत मिळवू शकतात. त्यांच्यापैकी कुणी धाडस करून आणि विचारपूर्वक लढ्यासाठी उठून उभा झाला आणि अहिंसक कारवाईत त्यांचं नेतृत्त्व केलं तर निराशेने गारठलेले दिवस क्षणार्धात उबेच्या आशेने चमकतील, असा मला विश्वास आहे."

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Imagno/Getty Images

"पॅलेस्टिनी प्रदेशात राहणारे ज्यू चुकीच्या मार्गावर आहेत, यात मला तिळमात्र शंका नाही. बायबलमध्ये ज्या पॅलेस्टाईनचा उल्लेख आहे त्याचा आज कुठलाच भौगोलिक आकार नाही. ते केवळ अरबांच्या उदारपणामुळेच तिथे स्थायिक होऊ शकतात. त्यांनी अरबांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा. अरबांच्या मनातही त्याच ईश्वराचा वास आहे जो ज्यू लोकांच्या मनात आहे. त्यांनी अरबांसमोर सत्याग्रह करावा आणि त्यांच्याविरोधात एक बोटही न उचलता आम्हाला गोळ्या घाला नाहीतर समुद्रात फेकून द्या म्हणत स्वतःला समर्पित करावं."

"मी अरबांनी केलेल्या जुलुमांचा बचाव करत नाही. मात्र, स्वतःच्या मातृभूमीत अनुचित हस्तक्षेपाचा ते करत असलेला विरोध योग्यच असल्याचं मला वाटतं. त्यांनी याचा अहिंसक पद्धतीने मुकाबला करावा, अशीही माझी कामना आहे. मात्र, योग्य आणि अयोग्य याची जी सर्वमान्य व्याख्या आहे त्या दृष्टीकोनातून बघितल्यास मोठ्या प्रतिकूल परिस्थितीतही अरबांनी ज्या मार्गाने प्रतिकार केला त्यावर तुम्ही टीका कशी कराल? त्यामुळे ज्या जाती श्रेष्ठतेचा दावा ते करतात तो अहिंसक पद्धतीने जगासमोर सिद्ध करून दाखवावा, ही आता ज्यूंची जबाबदारी आहे."

महात्मा गांधी

फोटो स्रोत, KEYSTONE-FRANCE/GAMMA-KEYSTONE VIA GETTY IMAGES

जेव्हा गांधींचा जर्मनीत बराच विरोध झाला…

गांधींनी जे मत मांडलं त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जर्मनीत गांधींविरोधात वातावरण तापलं.

गांधी पुन्हा म्हणाले, "जर्मनीत ज्यूंना मिळणाऱ्या वागणुकीविषयी मी लिहिलेल्या लेखावर ज्या द्वेषपूर्ण प्रतिक्रिया आल्या त्याची मला अपेक्षा होतीच. युरोपच्या राजकारणाविषयी माझं अज्ञान मी आधीच मान्य केलं होतं. मात्र, ज्यूंच्या आजारावर इलाज सांगण्यासाठी मला युरोपच्या राजकारणाचा जाणकार असण्याची गरजच नव्हती. त्यांच्यावर होणारा अन्याय वादातीत आहे. माझ्या लेखावर असलेला त्यांचा राग जेव्हा कमी होईल आणि त्यांची मनस्थिती थोडी शांत होईल त्यावेळी माझा सर्वाधिक राग आलेल्या जर्मन व्यक्तीलाही हे कळेल की मी जे काही लिहिलं त्यात जर्मनांविषयीचा तिरस्कार नाही तर मित्रत्वाचाच झरा वाहतोय."

"हे म्हणणं की माझ्या लेखामुळे ना माझं, ना माझ्या आंदोलनाचं, ना भारत-जर्मनी संबंधाचं भलं झालं, हा मला योग्य युक्तिवाद वाटत नाही. उलट यात धमकीवजा काहीतरी दडलं आहे, असं जाणवतं. शिवाय, स्वतःचं, माझ्या देशाचं किंवा भारत-जर्मनी संबंधांचं नुकसान होईल, या भीतीमुळे माझ्या मनाला शंभर टक्के पटणारा सल्ला दिला नाही तर मी स्वतःला भ्याड समजेन."

"बर्लिनच्या त्या लेखकाने तर कमालीचा सिद्धांत मांडला की जर्मनीबाहेरच्या कुणीही अगदी मैत्रीच्या नात्यानेही जर्मनीच्या कुठल्याच निर्णयावर टीका करू नये. मी स्वतःपुरतं तरी हे नक्कीच म्हणू शकतो की जर्मनी किंवा कुठल्याही देशाचा कुणीही नागरिक भारतावर टीका करण्यासाठी दूरवरचा एखादा विषय हुडकून काढत असेल तर मी त्याचं स्वागत करेन."

महात्मा गांधी

फोटो स्रोत, RAZA FOUNDATION

फोटो कॅप्शन, महात्मा गांधी

1946 च्या मध्यात गांधी त्यांच्या आवडत्या पाचगणीला गेले होते. तिथे 14 जुलै 1946 रोजी त्यांनी 'यहूदी और फलस्तीन' नावाने एक अग्रलेख लिहिला होता.

त्यात ते लिहितात, "ज्यू आणि अरब यांच्यातल्या वादावर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देण्यापासून मी आतापर्यंत स्वतःला दूर ठेवलं होतं. यामागे कारणंही आहेत. मला या विषयात रस नाही, हे कारण नव्हे. तर याविषयाची मला पुरेशी माहिती नाही, हे त्यामागचं कारण आहे. अशाच कारणामुळे मी अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरही मत देत नाही. तसाही माझा व्याप खूप मोठा आहे. मात्र, एका वृत्तपत्रात छापून आलेल्या चार ओळींमुळे मला माझं मौन सोडण्यास भाग पाडलं आणि तेही एका मित्राने त्या बातमीचं कात्रण मला पाठवून माझं लक्ष त्याकडे वळवलं."

"जगाने ज्यू लोकांवर क्रूर अत्याचार केले, हे मलाही मान्य आहे. माझ्या माहितीनुसार युरोपातील बऱ्याचशा भागात ज्यू वस्त्यांना 'घेटो' म्हणतात. त्यांना जी निर्दयी वागणूक मिळाली ती मिळाली नसती तर पॅलिस्टाईन प्रदेशात परतण्याचा प्रश्नही कधी निर्माण झाला नसता. स्वतःची विशेष प्रतिभा आणि दैवी देणगीमुळे संपूर्ण जगच त्यांचं घर असतं."

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

"मात्र, त्यांची घोडचूक ही झाली की त्यांनी स्वतःला पॅलेस्टाईन प्रदेशावर बळजबरी थोपलं. सुरुवातीला अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने आणि आता नग्न दहशतवादाच्या बळावर. त्यांच्या वैश्विक नागरिकतेमुळे ते जगातील कुठल्याही देशाचे सन्माननीय नागरिक होऊ शकले असते. त्यांचं कौशल्य, त्यांची बहुमुखी प्रतिभा आणि विचारपूर्वक काम करण्याची त्यांची महान क्षमता, यांचं स्वागत कोण करत नाही? ख्रिश्चन समाजाच्या माथ्यावर हा काळा डाग आहे की त्यांनी 'न्यू टेस्टामेंटचं' चुकीचं आकलन आणि चुकीची व्याख्या करून एका ज्यूने चूक केली तर संपूर्ण समाजाला गुन्हेगार मानलं जाईल, असं म्हणत ज्यू समाजाला लक्ष्य केलं. आईन्स्टाईनसारखा एखादा ज्यू जर महान शोध लावत असेल किंवा एखाद्या संगीतकाराने कर्णमधूर संगीत रचलं तर त्याचं श्रेय संपूर्ण समाजाला नव्हे तर त्या एका व्यक्तीला दिलं जाईल."

"ज्यू समाजाला ज्या वेदनादायी परिस्थितीत लोटण्यात आलं त्यामुळे माझी सहानुभूती त्यांच्यासोबत आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतून शांततेची शिकवण मिळते, असंही मला वाटतं. जिथे त्यांचं सहज स्वागत होत नाही, अशा ठिकाणी जाणं आणि तिथल्या लोकांवर अमेरिकीची दौलत आणि ब्रिटीश शस्त्रास्त्र यांच्या बळावर थोपवण्याची गरजच काय होती? पॅलेस्टाईनच्या धर्तीवर स्वतःच्या बळजबरीने लादलेल्या उपस्थितीला भक्कम करण्यासाठी दहशतवादी उपायांची मदत घेणं ज्यू समाजाला का पटावं?"

गांधींनी व्यक्त केली होती शंका

5 मे 1947 रोजी रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे दिल्लीतील प्रतिनिधी डून कॅम्पबेल यांनी गांधींचं लक्ष पुन्हा या विषयाकडे वळवत तुमच्या मते पॅलेस्टाईन समस्येवर तोडगा काय, असा प्रश्न विचारला.

त्यावेळी गांधी म्हणाले होते, "ही एक अशी समस्या बनली आहे की ज्यावर जवळ-जवळ काहीच तोडगा नाही. मी ज्यू असतो तर त्यांना म्हटलं असतं, 'दहशतवादाचा मार्ग स्वीकारण्याचा मूर्खपणा करू नका. असं करून जो मुद्दा केवळ न्यायाचा आहे तो तुम्ही बिघडवून टाकाल.' पण, ही केवळ राजकीय आदळ-आपट असेल तर मी म्हणेन या सर्वाला काही अर्थ नाही. ज्यू समाजाने पुढाकार घेत अरबांशी मैत्री करायला हवी आणि ब्रिटीश असू देत किंवा अमेरिका कुणाचीही मदत न घेता यहोवाच्या उत्तराधिकाऱ्यांना त्यांच्याकडून मिळालेली शिकवण आणि त्यांचा वारसा सांभाळायला हवा."

मात्र, कुणालाच कुणाचा वारसा सांभाळायचा नव्हता. सगळ्यांना हाकायचा होता राजशकट.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

गांधींना सत्तेची ही भूक दिसत होती आणि म्हणूनच कॅम्पबेल यांच्याशी बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले, "ही एक अशी समस्या बनली आहे ज्यावर जवळ-जवळ कुठलाच तोडगा नाही."

14 मे 1948 साली इस्रायलची स्थापना झाली. त्याच्या तीन महिन्यांपूर्वीच गांधींची हत्या करण्यात आली होती. मात्र, गांधींनी जी शंका व्यक्त केली होती त्याला 75 वर्ष पूर्ण होत आली. युद्ध आणि युद्धबंदी यांच्यात भरडले जात असलेले पॅलेस्टिनी आणि इस्रायली अजूनही कुठल्याच तोडग्यापर्यंत पोहोचलेले नाही. जगातील महासत्ता आणि दोन्ही बाजूंचे सत्ताधीश यांनी माघार घेतली तर जेरुसलेमचे लोक त्यांचा मार्ग स्वतः शोधतील. पण, त्यांना कुणी असं करू देईल?

(लेखातील विचार लेखकाचे स्वतःचे आहेत. लेखक गांधी शांती प्रतिष्ठानचे प्रमुख आहेत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)