इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष : हमासकडे 4 हजार रॉकेट्स आले कुठून?

गाझा रॉकेट हल्ला

फोटो स्रोत, Reuters

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी गट हमास यांच्यातील संघर्षाला 11 दिवसांनंतरच्या शस्त्रसंधीमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

मात्र ही प्रस्थापित झालेली शांतता आता दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

इजिप्तची एक टीम शनिवारी (22 मे) इस्रायलमध्ये उपस्थित होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकनही पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करू शकतात.

इस्रायल आणि गाझावर नियंत्रण असलेली पॅलेस्टिनी कट्टरवादी संघटना हमास आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. गाझात या संघर्षामुळे 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी (21 मे) शस्त्रसंधी लागू झाल्यामुळे इस्रायली पंतप्रधान बिज्यामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की, हमासची लष्करी ताकद आमच्या हवाई हल्ल्यांनी नष्ट करणं हे एक अतुलनीय यश होतं.

त्यांनी म्हटलं होतं, "आम्ही रॉकेटचा थोडाफार वर्षाव सहन करू असं जर हमासला वाटत असेल तर ते चुकीचा विचार करत आहेत."

दुसरीकडे हमासने आपल्या विजयाचा दावा करत म्हटलं की, या संघर्षांने नवीन अध्याय सुरू केला आहे, ज्यामध्ये बरेच विजय मिळतील.

साध्या गोष्टींपासून बनविण्यात आलेले रॉकेट

या संघर्षात दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत, मात्र यामध्ये सर्वाधिक मनुष्य आणि वित्तहानी गाझा पट्टीत झाल्याचं जगजाहीर आहे.

गाझा रॉकेट हल्ला

फोटो स्रोत, Reuters

या संघर्षात एकीकडे इस्रायलची आयर्न डोम मिसाईल सिस्टीम त्यांच्यासाठी संरक्षणात्मक हत्यार म्हणून उपयुक्त ठरली. या आयर्न डोम मिसाईल सिस्टीमने हमासचे हजारो रॉकेटांचे हल्ले निष्प्रभ केले. मात्र हमासनं इस्रायलवर 4 हजारांहून अधिक रॉकेटनं हल्ला कसा केला? सीमेवर इस्रायल आणि इजिप्तचा कडेकोट पहारा असताना हमासजवळ इतकी हत्यारं कशी पोहोचली?

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं विश्लेषक आणि अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, गाझामध्ये पॅलेस्टिनींकडून वापरातल्या वस्तूंचा वापर करून इराणच्या मदतीने 'घरगुती' रॉकेट बनवले आहेत.

हे रॉकेट बनविण्यासाठी पाइप आणि काँक्रिटची आवश्यकता लागते. गाझामध्ये पुनर्निर्माणाचं काम सुरू करण्यासाठी या वस्तू लागतील आणि त्यांच्या उपलब्धतेवर कोणतेही निर्बंध लावता येऊ शकत नाहीत. इस्रायल आणि आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हे एक मोठं आव्हान आहे.

रॉयटर्सच्या मते 2014 मध्ये इस्रायल आणि गाझा दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर हमास आणि त्यांची सहयोगी कट्टरपंथी संघटना पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादने आपल्या रॉकेट्सची गुणवत्ता आणि संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे.

इराणवरील आरोप

एका ज्येष्ठ युरोपियन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटलं, "यावेळी हमासची क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे. त्यांच्याकडे लांब पल्ल्याचे रॉकेट आहेत, जे त्यांच्याकडे पहिल्यांदा नव्हते. हे इराणमुळे शक्य झालं आहे."

गाझा रॉकेट हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

हमास, इस्लामिक जिहाद आणि इतर कट्टरपंथी समुहांनी संघर्षादरम्यान 4,360 रॉकेट्सचा इस्रायलच्या दिशेने मारा केला. त्यांपैकी 680 रॉकेट्स गाझा पट्टीत कोसळले.

विश्लेषकांच्या मते यामधील बरेचसे रॉकेट्सही कमी अंतरावरून मारा करणारे, घरगुती गोष्टींचा वापर करून वाईट पद्धतीने बनविण्यात आलेले होते.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयातील माजी अधिकारी डॅनियल बेंजामिन म्हणतात की, हे रॉकेट्स बनणं खूप सोपं आहे आणि त्यासाठी लोखंडी ट्यूब किंवा पाइपचा वापर केला जातो. तुमचा विश्वास बसणार नाही, पण यामध्ये अनेकदा इस्रायलनं डागलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुकड्यांचाही वापर होतो."

वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राशी बोलताना इस्रायलचे एक निवृत्त ब्रिग्रेडियर जनरल एफरेम सनेह यांनी म्हटलं की, डिझाइन इराणच्या शस्त्रास्त्रांसारखं आहे, मात्र त्याचं उत्पादन स्थानिक पातळीवरचं आहे.

वृत्तपत्रानं लिहिलं आहे की, इराण हमासची वेगळ्या पद्धतीनं मदत करत आहे. इराणकडून त्यांना डिझाइन दिली जाते आणि मग रोजच्या वापरातील पाइप, एरंडेल आणि इस्रायलच्या हत्यारांचे तुकडे वापरून रॉकेट बनवली जातात.

गुरूवारी (20 मे) इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणवर गाझामधल्या कट्टरपंथीयांचं समर्थन करत असल्याचा आरोप केला आणि म्हटलं, "जर इराणचा पाठिंबा मिळाला नाही तर या सर्व संघटना दोन आठवड्यांत कोसळून पडतील."

अल जझीरावर प्रसारित झालेल्या एका वृत्तात या आठवड्यात इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख हुसैन सलामी यांनी म्हटलं होतं की, "इस्रायल विरोधातल्या लढाईत इराण पॅलेस्टाईनचं समर्थन करत आहे आणि त्यांच्या समर्थनामुळेच पॅलेस्टाईन क्षेपणास्त्र सज्ज बनला आहे."

इराण आणि हमासमधील संबंध

इराण आणि पॅलेस्टिनी कट्टरवादी समूह हमास तसंच पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या संघटनांमधले संबंध लपून राहिलेले नाहीत.

गेल्या आठवडयात इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून इराणमधल्या एलीट कुर्दस फोर्सचे जनरल इस्माइल कानी यांनी हमासचा नेता इस्माइल हनियेहला नैतिक पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं.

हमास

फोटो स्रोत, Getty Images

पॅलेस्टिनी संघटना आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर तयार केल्या गेलेल्या वस्तूंचाच वापर करतात.

वॉल स्ट्रीट जर्नलनं एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं लिहिलं की, गाझामधील कट्टरवादी फायबर ग्लासपासून ड्रोन, लोखंडी पाइपपासून रॉकेट आणि मीठ-एरंडेल तेलापासून रॉकेटचं इंधन बनवत आहेत. हमास सध्या तरी अगदीच मूलभूत पद्धतीचेच रॉकेट्स बनवत आहे. गाइडन्स सिस्टिमच्या मदतीनं हल्ला करणारी हत्यारं त्यांनी अजूनही बनवलेली नाहीयेत. त्यासाठी गाझामधील कट्टरवाद्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाची गरज आहे.

नुकताच हमासने दावा केला होता की त्यांनी शेहाब नावाचं एक ड्रोन तयार केलं आहे. त्याचा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावरून हमासनं हे ड्रोन बनविण्यासाठी व्यावसायिक पार्ट्सचा वापर केल्याचं दिसत आहे. त्यामध्ये चिनी बनावटीचं इंजिन आणि 50 डॉलर्सची जीपीएस सिस्टीमही बसविण्यात आली आहे.

हमासचं हे ड्रोन इस्रायलच्या आर्यन डोम सिस्टीमसमोर टिकू शकलं नाही

फोर्ब्समधील एका रिपोर्टनुसार या ड्रोनचं डिझाइन येमेनमध्ये इराणी समर्थक असलेल्या हुती बंडखोरांनी वापरलेल्या ड्रोनसारखंच होतं.

इराण इंटरनॅशनलनेही नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये पॅलेस्टिनी ड्रोन जुन्या इराणी मॉडेलच्या आधारावर बनविण्यात आले असतील असं म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

रॉकेट हेच एकमेव हत्यार

पॅलेस्टिनी कट्टरवादी समूह इस्रायलवर हल्ल्यासाठी अनेक वर्षांपासून रॉकेटचाच वापर करत आहेत. 2005 मध्ये गाझामधून इस्रायलच्या जाण्याआधी गाझामध्ये इस्रायली वसाहतींवर पॅलेस्टिनी अरब वस्त्यांमधू मोर्टार आणि रॉकेट डागण्यात यायचे.

इस्रायलनं गाझाची चारी बाजूंनी केलेली नाकाबंदी आणि 2003 मध्ये वेस्ट बँकवर मिळविलेल्या ताब्यानंतर हमासकडे रॉकेट हेच एकमेव हत्यार उरलं होतं.

इजिप्तमध्ये पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी 2013 मध्ये सत्तेतून बेदखल झाले. तोपर्यंत हमास आणि इस्लामिक जिहादला इजिप्तमधल्या सिनाई बेटांवरील फॅक्ट्रीतून हत्यारं मिळत होती.

गाझा शहरातील हल्ल्यादरम्यानची दृश्यं

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, गाझा शहरातील हल्ल्यादरम्यानची दृश्यं

मात्र इजिप्तचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतह अल सीसी सत्तेवर आल्यानंतर गाझामधील भुयारं नष्ट झाली आणि त्यांच्यापर्यंत हत्यारं पोहोचणं बंद झालं.

रॉयटर्सनं एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्यानं लिहिलं आहे की, इजिप्तकडून अशी कारवाई झाल्यानंतर हमासला इराणची मदत घेऊन स्थानिक पातळीवरच रॉकेट बनवणं भाग पडलं. त्यासाठी इराणी गाझामध्ये आले आणि गाझातले लोक परदेशात गेले.

इस्रायली आणि पॅलेस्टिनी सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सनं लिहिलं आहे की, छुपं युद्ध करणारे इराणी पैसे आणि माहितीच्या आधारावर गाझामध्येच 200 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले रॉकेट्स बनवत आहेत. त्यामध्ये काही 100 किलो वजनाचेही आहेत, ज्यात टीएनटी आणि स्फोटकं भरलेली असतात.

हमासकडे गाझामध्ये रॉकेट बनविण्याचे किमान तीन भूमिगत कारखाने आहेत, असं इराणमधील एका सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं.

संघर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत इस्लामिक जिहादचा नेता जाएद एल-नखालाने संघटनेकडे असलेल्या हत्यारांच्या गुणवत्तेवर टीका केली होती.

त्यांनी म्हटलं होतं की, मौन धारण केलेल्या जगानं आमच्या हत्यारांबाबत जाणून घ्यायला हवं. आम्ही अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक हत्यारांचा सामना करत आहोत. आमची शस्त्रं म्हणजे पाण्याचे पाइप्स आहेत, इंजिनिअर्सनी त्याचा वापर करून रॉकेट्स बनवले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)