केरळ नरबळी : एका पीडितेच्या शरीराचे 56 तुकडे केले, दुसऱ्या पीडितेची कवटी फोडली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बी. सुधाकर
- Role, बीबीसी तामिळसाठी
या बातमीतल्या काही बाबी तुम्हाला विचलित करू शकतात.
केरळमधल्या नरबळी प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. केरळमध्ये दोन बायकांचा काही दिवसांपूर्वी नरबळी दिला होता. इलनथूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. तिथल्या लोकांना असं वाटतंय की शाफी नावाच्या आरोपीने आणखी अनेकांची हत्या केली आहे.
बीबीसीने घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
भागवल सिंह या मुख्य आरोपीच्या घराजवळ आम्ही एका महिलेला भेटलो. नाव न सांगण्याच्या अटीवर ती म्हणाली की ती शाफीच्या भूलथापांना बळी पडणार होती. मात्र शेवटच्या क्षणी तिने माघार घेतली आणि ती बचावली.
"शफीबरोबर त्या दिवशी खरंतर मी जाणार होते. त्याने मला एक लाख रुपये देण्याचं प्रलोभन दिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी मी माघार घेतली आणि मी त्याच्याबरोबर येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे शफी रोसलीला घेऊन गेला," त्या सांगत होता.
शाफीने असं काही केलं असेल यावर माझा विश्वास नाही असं शाफीच्या बायकोचं म्हणणं आहे.
शरीराचे 56 तुकडे, डोक्याचे पाच तुकडे
भागवल सिंग यांच्या घराच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांना शरीराचे 61 तुकडे सापडले आहेत. पोलिसांच्या मते धारदार शस्त्रांनी शरीराचे अगदी रीतसर तुकडे करण्यात आले आहेत.
त्यातील 56 भाग पद्माच्या शरीराचे आणि 5 तुकडे रोसलीच्या शरीराचे आहेत. यातील 35 तुकडे पोस्टमार्टमला आणि रासायनिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

26 तुकडे गुरुवारी तपासणीसाठी पाठवले आहेत. हे तुकडे ओळखण्याच्या पलीकडे आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी बोलावलं आहे.
स्थानिक लोक काळजीत
इलानथूर येथील शाजी म्हणतात, "या रक्तरपाताची माहिती मिळाल्यावर आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. आम्ही हलून गेलो आहोत. सध्या सगळा समाज इतका सुशिक्षित झालेला असताना अशा प्रकारच्या घटना चिंतेत टाकणाऱ्या आहेत आणि भीतीदायक आहेत.
पैसा कमविण्यासाठी नरबळी देण्यात आला आहे. हे कुडाथाई येथे झालेल्या घटनेपेक्षा विदारक आहेत. तिथे एका बाईने त्यांच्या कुटुंबातील सहा लोकांना जेवणात सायनाईड घालून मारलं होतं," ते सांगतात.
तिथले दुकानदार जॉस गेल्या दोन वर्षांपासून भागवल सिंह यांच्या घराजवळ राहतात. त्यांची भागवल सिंह यांच्याशी फक्त तोंडओळख होती. ते फक्त येता जाता एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करायचे असं ते म्हणाले.

"तो आयुर्वेदिक उपचार द्यायचा त्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे यायचे. तो आणि त्याची बायको लैला शेजाऱ्यांबरोबर मिळून मिसळून असायचे. त्यांना अटक झाली तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते तर किती साध्या स्वभावाचे होते असं वाटून गेलं. जेव्हा त्यांचं कृत्य उजेडात आलं तेव्हा आम्हाला प्रचंड धक्का बसला," जॉस म्हणाले.
तिथल्या लोकांना अशा प्रकारच्या अनेक हत्या झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस तपास
भागवल सिंह यांच्याशी शेजाऱ्यांशी किती ओळख आहे हे तपासण्यासाठी कडवंथारा पोलीस तपास करत आहेत. भागवल सिंहला ओळखता का आणि तो प्रसिद्ध होता का अशा प्रकारचे प्रश्न पोलीस विचारत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
'शरीराचे भाग नीट कापले'
जेव्हा या कापलेल्या भागांची नीट तपासणी करण्यात आली तेव्हा सरपंच सल्ली लालू शासकीय साक्षीदार म्हणून तिथे उपस्थित होत्या. त्यांनी बीबीसीशी संवाद साधला.
"आरोपींनी घराच्या मागच्या बाजूला हे भाग लपवलेले असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तातडीने तिथे उत्खनन सुरू केलं. मी त्याची साक्षीदार होते. जमिनीतून कंदमुळं काढताहेत की काय असं मला वाटलं. शरीराचे तुकडे अगदी व्यवस्थित कापले होते. पाऊस असल्यामुळे ते शरीराचे तुकडे चिखलाने माखले होते. जेव्हा ते बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती," त्या पुढे म्हणाल्या.
जेव्हा ते तुकडे बाहेर काढण्यात आले तेव्हा त्यांची स्थिती शब्दात मांडण्यासारखी नाही, असं त्या म्हणाल्या.
शरीरातले तुकडे काढण्याची प्रक्रिया दुपारी सुरू झाली आणि 10 वाजेपर्यंत सुरू होती. ज्या बाईने खून केला तिचं लिपस्टिक, पर्स सुद्धा या भागात सापडलं आहे.
"आधी आम्हाला शीर सापडलं, मग हात सापडले. त्यानंतर आरोपींनी इतर जागा दाखवल्या. मग आम्ही इतर जागा खोदायला सुरुवात केली आणि शरीराचे इतर भाग मिळाले. इतर काही नरबळी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत," असं लालू म्हणाल्या.

फोटो स्रोत, BBC Sport
मंजू वर्गिस ही रोसली यांची मुलगी आहे. त्या सुद्धा घटनास्थळी होती. तिनेही बीबीसीशी संवाद साधला. त्या उत्तर प्रदेशमध्ये 2015 ते 2022 पर्यंत शिक्षिका होत्या. त्या केरळमध्ये जानेवारीत आल्या. फेब्रुवारीपर्यंत त्या आईबरोबर होत्या.
"माझ्या आईने लॉटरीचं तिकीट विकलं."
मंजू यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांची आई 6 जून पासून बेपत्ता आहे. त्यानंतर त्यांनी 15 ऑगस्टला रीतसर तक्रार नोंदवली.
"या तिघांच्या अटकेची बातमी मला कळली," त्या म्हणाल्या.
मंजू म्हणाल्या की त्यांची आई कालाडी येथे राहत होत्या. त्यांचा भाऊ इडुक्की येथे राहत होता आणि त्या स्वत: वडाकंचरी येथे राहत होत्या.
मंजू यांनी त्यांच्या आईला उत्तर भारतात राहण्याची विनंती केली मात्र सगळं सामान कसं आणणार या भीतीने त्यांनी तिथे येण्यास नकार दिला.
प्रसारमाध्यमांनी रोसली या लॉटरी तिकीट विक्रेत्या असल्याचं भासवलं आहे. मात्र प्रत्यक्षात तसं नाही. ती आयुर्वेदिक उत्पादनं विकायची. आईची ओळख पटवण्यासाठी त्यांनी काही सौंदर्यप्रसाधनं, छत्री आणि एक बॅग दाखवली.
डीएनए चाचणी
रोसली यांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक विभागाने मंजूच्या डीएनएचे नमुने त्रिवेंद्रम वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहेत.
जेव्हा शाफीबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
गुरुवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार एर्नाकुलम कोर्टाने शाफी, भागवल सिंह आणि लैला यांच्या चौकशीसाठी 12 दिवसांची मुदत दिली आहे.
मात्र तामिळनाडूच्या धर्मापुरी येथे राहणाऱ्या आर. सेत्तू यांना पद्मा यांच्या शरीराचे तुकडे मिळवण्याची मागणी केली आहे आणि त्याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








