तिने घटस्फोटाची पोस्ट टिकटॉकवर टाकली, अन् नवऱ्याने तिचा खून केला

जून 2021 मध्ये सानियाचं लग्न झालं होतं

फोटो स्रोत, Sania Khan

फोटो कॅप्शन, जून 2021 मध्ये सानियाचं लग्न झालं होतं
    • Author, सॅम कब्राल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सानियाच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे ती एकटीच राहत होती. शिकागोमधल्या दक्षिण आशियाई मुस्लीम समुदायात एकटं वाटत होतं, लोक तिला 'आयुष्यात काहीही न करू शकलेली बाई' अशा नजरेने पाहात होते.

तिला आधार मिळाला तो टिकटॉकवरच्या लोकांचा. पण तिच्या नवऱ्याने यामुळे तिचा खून केला.

या लेखातल्या काही काही वाचकांसाठी त्रासदायक ठरू शकतात.

सानियाने आपलं सामानसुमान बांधलं होतं, ती नवऱ्याचं घर सोडून मुक्त व्हायला पाहात होती. 21 जुलै - तारीखही ठरली होती. या दिवशी ती आपल्या तुटलेल्या नात्याचे सल मागे ठेवून नव्याने आयुष्य जगायला सुरूवात करणार होती.

पण तिच्या माहेरी आला तो शवपेटीतला तिचा मृतदेह.

ज्या दिवशी ती माहेरी परतणार होती त्याच्या तीन दिवस आधी पोलिसांना तिच्या शिकागोतल्या राहत्या घराबाहेर ती पडलेली आढळली. ती काहीच प्रतिसाद देत नव्हती.

या घरात ती आणि तिचा नवरा राहील अहमद राहात होते. 29-वर्षीय सानियाला मृत घोषित करण्यात आलं.

पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा अमहदने स्वतःवर बंदूक रोखून गोळी झाडली. त्याने आत्महत्या केली होती.

पोलिसांनी शिकागोतलं वृत्तपत्र शिकागो सन टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार हे दांपत्य घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होतं.

दोघे वेगळे झाले होते आणि अहमद वेगळ्या राज्यात राहायला गेला होता. पण घटना घडली त्या दिवशी 'आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी' तो सानियाला भेटायला आला होता.

सानिया

फोटो स्रोत, Sania Khan

सानिया खान स्वतः एक फोटोग्राफर होती. पाकिस्तानी वंशाची सानिया अमेरिकन नागरिक होती आणि टिकटॉक या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली होती. लग्न मोडल्याच्या त्रासातून आणि घटस्फोटानंतर समाजाकडून हीन वागणूक मिळणाऱ्या महिलांचा ती आवाज बनली होती, त्यांच्यासाठी लढत होती.

तिच्या नवऱ्याने तिचा खून केला आणि स्वतः आत्महत्या केली. तिच्या मृत्यूमुळे तिच्या मित्रमैत्रिणींना धक्का बसला आहे. तिच्या ऑनलाईन फॉलोअर्सलाही धक्का बसला आहे.

अमेरिकेत राहाणाऱ्या दक्षिण आशिया भागातून आलेल्या महिलांना पितृसत्ताक विचारांमुळे, इज्जतीच्या खोट्या कल्पनांमुळे नको असलेल्या नात्यातही राहावं लागतं, त्यांच्यावर तसा दबाव टाकला जातो असं काहींनी म्हटलं.

तिच्या मैत्रिंणीसाठी सानिया म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा, निरपेक्ष प्रेमाचा झारा होती. सानियाची सगळ्यात जवळची मैत्रीण मेहरू शेख म्हणते, "ती दुसऱ्याला मदत करायला कायम तत्पर असायची."

"तिच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले असले तरी ती स्वतःहून तुम्हाला फोन करून विचारायची की तुम्ही कसे आहात."

सानियाने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये लिहिलं होतं, "मी कॅमेऱ्यासमोर लोकांना स्वतःच्या आणि एकमेकांच्या प्रेमात पडायला मदत करते."

सानिया खान

फोटो स्रोत, Sania Khan

ती लग्न, मॅटर्निटी, डोहाळेजेवण आणि अशा अनेक समारंभांमध्ये फोटोशूट करायची. तिचे अनेक श्रीमंत ग्राहक होते पण मैत्रिणींसाठीही ती अनेकदा फोटोशूट करायची.

मेहरू म्हणते, "लोकांना आपलंसं करण्याचा तिचा स्वभाव होता. ती कॅमेऱ्यासमोरही लोकांना कंफर्टेबल करायची. तिच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये ती खऱ्याखुऱ्या भावनांचं चित्रण करायची."

जून 2021 मध्ये तिने अहमदशी लग्न केलं. त्याआधी ते पाच वर्षं एकमेकांना ओळखत होते, पण त्यांनी फारच कमी काळ सोबत घालवला होता.

तिच्या एका लहानपणीच्या मैत्रिणीने सांगितलं की, "तिचं लग्न अगदी भव्य, पाकिस्तानी पद्धतीने झालं. पण ते लग्न खोटेपणाच्या पायावर उभं होतं."

सानियाच्या या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार अहमदला मानसिक आजार होते. गेल्या डिसेंबर महिन्यात सानियाने तिच्या या मैत्रिणीला सांगितलं की तिला घरात, अहमदसोबत सुरक्षित वाटत नाहीये.

अहमदच्या कुटुंबापर्यंत बीबीसी पोहचू शकलं नाही तर सानियाच्या कुटुंबाने याबद्दल काहीही बोलायला नकार दिला.

अमेरिकेत दर आठवड्याला 10-15 खून करून आत्महत्या करण्याच्या केसेस घडत असतात. यापैकी दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये जवळच्या पार्टनरनेच खून केलेला असतो असं अमेरिकेतलं व्हायलन्स पॉलिसी सेंटर म्हणतं.

मानसिक आजार किंवा मतभेद यामुळे महिलांना त्यांच्या पार्टनरकडून हिंसा सहन करावी लागते. घरगुती हिंसाचाराला तोंड देणाऱ्या अनेक महिलांचा त्यांच्याच पार्टनरकडून खून होण्याचा धोका असतो, विशेषतः, जेव्हा या महिला नात्यातून बाहेर पडण्याच्या गोष्टी करतात.

सानियाने तिला नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मैत्रिणींना सांगितलं. त्यांच्या मते अहमद रात्री झोपत नव्हता, विचित्र वागायचा, आणि सानियाने कितीही विनंती केली तर मानसोपचार तज्ज्ञाकडे जात नव्हता. त्याचं मानसिक अनारोग्य तिच्यावर भार ठरत होतं.

पण तिला तिच्या घरचे लग्न मोडू देत नव्हते असाही काही मैत्रिणींनी दावा केला.

विल्यम्स नावाच्या एका मुलीने सांगितलं तरी सानिया आणि ती गेल्या मे महिन्यात भेटल्या तेव्हा सानिया हमसून हमसून रडली.

बीबीसीशी बोलताना विल्यम्स म्हणाली की, "तिच्या समाजात घटस्फोट ही अपमानास्पद गोष्ट समजली जाते आणि तिला खूप एकटं वाटत होतं. 'लोक काय म्हणतील' हे वाक्य तिला सतत ऐकवलं जात होतं."

सानियाच्या आईवडिलांचाही घटस्फोट झाला होता आणि त्यामुळे अमेरिकेतल्या दक्षिण आशियायी (भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका अशा देशांमधल्या) घटस्फोटित महिलांकडे त्यांचाच समाज किती तुच्छतेने बघतो हे तिने जवळून पाहिलं होतं.

नेहा गिल शिकागोतल्या अपना घर या संस्थेच्या संचालिका आहेत. ही संस्था दक्षिण आशियायी महिलांना घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये मदत करते.

त्या म्हणतात, "या महिलांवर घरातून खूप दबाव असतो. लोक काय म्हणतील सतत याचाच विचार केला जातो."

अमेरिकेतल्या दक्षिण आशियायी समुदायांवर पितृसत्ताक विचारांचा चांगलाच पगडा आहे. इथे अजूनही महिलांना समान वागणूक दिली जात नाही. "कुटुंबाच्या इज्जतीला त्या महिलेच्या सुरक्षेपेक्षा किंवा आनंदापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं," असं नेहा म्हणतात.

सानिया तिच्या मैत्रिणींसोबत

फोटो स्रोत, Sania Khan

फोटो कॅप्शन, सानिया तिच्या मैत्रिणींसोबत

पण तरीही आपल्या मैत्रिणींच्या मदतीने सानियाने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि तिला ऑगस्ट महिन्याची तारीखही मिळाली होती.

तिने आपल्या घराची कुलूपं बदलून टाकली आणि नवऱ्याने आपल्या आसपास भटकू नये, त्याला मनाई असावी म्हणून कोर्टातून ऑर्डरही आणली.

मग तिने आपली कहाणी टिकटॉकवरून जगाला सांगितली. तिच्या समुदायात तिला कोणी मान देत नाही हेही सांगितलं.

तिच्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, "अमेरिकेत राहाणारी दक्षिण आशियायी महिलेकडे, जिचा घटस्फोट होतोय, तुच्छतेने पाहिलं जातं. तिने आयुष्यात काहीच केलं नाही अशी भावना तिच्याप्रति लोकांची असते."

दुसऱ्या एका पोस्टमध्ये ती म्हणते, "माझ्या कुटुंबाने मला सांगितलं की मी जर घटस्फोट घेतला तर सैतानाचा विजय होईल. मी वेश्येसारखे कपडे घालते आणि मी जर परत माहेरी गेले तर ते आत्महत्या करतील."

सानियाची आणखी एक कॉलेजमधली मैत्रीण नॅटी म्हणते की, "तिच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. तिने मला सांगितलं की तिला हेच करायचं होतं. नवऱ्याकडून किंवा पार्टनरकडून त्रास सहन करणाऱ्या तरीही काही न बोलणाऱ्या महिलांसाठी तिला आवाज उठवायचा होता. स्वतःची कहाणी जगाला सांगून इतर महिलांना प्रेरणा द्यायची होती."

पण तिच्यावर अशा पोस्ट केल्याबद्दल टीकाही होत होती. तिच्या मृत्यूच्या वेळी सानियाला टिकटॉकवर 20,000 फॉलोअर्स होते.

पाकिस्तानी वंशाची अमेरिकन महिला बिस्मा परवेज त्यापैकी एक होती.

ती म्हणते, "मी तिचा व्हीडिओ पहिल्यांदा पाहिला तेव्हा तिच्यासाठी प्रार्थना केली होती. अशावेळी महिलांना सांगितलं जातं की संयम ठेवा पण घरगुती हिंसाचाराला संयम हे उत्तर असू शकत नाही."

सानिया खानच्या मृत्यूनंतर या प्रकरणावर सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. तिच्या नावाने तिच्या शाळेत स्कॉलरशिप सुरू केलीये तर अपना घर तिच्या मृत्यूला जेव्हा एक महिना होईल त्यानिमित्ताने एक चर्चासत्र आयोजित करणार आहे.

"खरंतर या प्रकरणावर तिच्या घरातले बोलत नाहीये, तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी परिस्थिती आहे. पण सोशल मीडियामुळे लोकांना खरं समजतंय. हा जागतिक स्तरावरचा प्रश्न आहे."

"आपण नेहमी मुलींना, महिलांना सांगतो की स्वतःची काळजी घ्या, पण आपल्याला मुलांनाही लहानपणापासून शिकवावं लागेल की महिलांचा आदर कसा करायचा. याची सुरुवात घरापासूनच होते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)