आठ वर्षांनी फुलणारी कारवी आणि सह्याद्रीत रमलेल्या स्पॅनिश संशोधकाची गोष्ट

फोटो स्रोत, BNHS
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी
सह्याद्रीत आठ वर्षांच्या अवकाशानंतर फुलणारी कारवी हा जितका कुतूहलाचा विषय आहे तितकाच ती अभ्यासाचा देखील विषय आहे. सध्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये कारवी फुलली आहे. ऑक्टोबरपर्यंत ही कारवी अजून दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सने कारवीच्या रानात प्रवेश केला त्यामुळे कारवीचे नुकसान झाले अशी खंत वनस्पतीशास्त्रज्ञांनी मांडली होती. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने आणि जैवविविधतेच्या दृष्टीने कारवी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कारवीच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात आले होते.
केवळ भारतीयच नाही तर परराष्ट्रीय अभ्यासकांनाही कारवीची भुरळ पडल्याची उदाहरणे आहेत. त्यांच्याविषयी आपण या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.
एक स्पॅनिश धर्मगुरू स्वातंत्र्यपूर्व काळात वनस्पतींचा अभ्यास करायला येतो काय आणि पश्चिम घाटातील तेही महाराष्ट्राच्या खंडाळा आणि पुरंदरच्या फुलांवर पुस्तकं लिहितो काय? विस्मयकारक वाटणाऱ्या या कुतूहलाचं आणि वनस्पतीशास्त्रात पाय रोवून उभ्या राहिलेल्या त्या असामींचं नाव होतं फादर हर्मनगिल्ड सांतापाऊ.
वनस्पतीशास्त्रातील योगदानासाठी त्यांचा 1967 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सांतापाऊ यांनी अखेरपर्यंत भारतालाच आपली कर्मभूमी मानली. 1970 मध्ये त्यांनी भारतात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं नाव ज्या वनस्पतीशी जोडलं गेलं ती पश्चिम घाटातली देखणी ‘कारवी’, याच कारवीची ही गोष्ट.
सांतापाऊ आपल्या ‘फ्लोरा ऑफ खंडाळा’ या पुस्तकात लिहितात- ‘1943-1945 सालच्या दरम्यान Carvia callosa Bremek (कारवीचं जुनं शास्त्रीय नाव) या समूहाने फुललेल्या पावसाळ्यातल्या एका वनस्पतीने माझं लक्ष वेधून घेतलं. खंडाळ्याच्या चढांवरती, अवतीभवती ही फुलं आच्छादून गेली होती. टेकड्यांवर रंगाची उधळण झाली होती.’

फोटो स्रोत, Getty Images
खंडाळ्याच्या 10 वर्षांतील निरीक्षणाच्या नोंदी या पुस्तकात केल्या गेल्या, तसंच या काळात त्यांनी खंडाळ्यातील 16 हजार वनस्पतींची माहिती गोळा केली होती.
त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी लिहिलेल्या एका संशोधनपर लेखात ते कारवीबद्दल लिहितात- ‘ही फुलं सहा-आठ वर्षांनी टप्प्या-टप्प्याने फुलतात. नियमितपणे येतात. पण या फुलांना इतक्या वर्षांनी पुन्हा बहरण्यासाठी नेमकी अशी कोणती परिस्थिती उद्भवते याचं मला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही’
पण सांतापाऊ यांनी कारवीसारख्या अनेक वनस्पतींच्या नमुन्यांची पद्धतशीरपणे नोंद करुन ठेवली होती.
आज 80 वर्षांनंतर महाराष्ट्रातल्या अनेक वनस्पतीतज्ज्ञांनी कारवीवरचं संशोधन अनेक अंशानी पुढे नेलंय. निळी कारवी आठ वर्षांतून एकदा फुलते यावर वनस्पती संशोधकांमध्ये एकमत झालेलं आहे.
‘रानात नीळ आली आहे’
कारवीचा बहर पाहण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीने (BNHS) यंदा मुंबईजवळच्या जंगलात शिस्तबद्ध पद्धतीने एका खास भटकंतीचं आयोजन केलं होतं. जवळपास दोन महिने हौशी, अभ्यासक, फोटोग्राफर या भटकंतीला हजेरी लावत होते.
एकही फुल न तोडता, पायाखाली झाडं न तुडवता कारवीचे फोटो काढले जात होते, निरीक्षण केलं जात होतं. पण या कारवीत असं काय विशेष आहे की पाहणारे हरखून जातात?

फोटो स्रोत, Shaheed Shaikh
त्याचं कारण सांगताना वनस्पती अभ्यासक सांगतात- “कारवीची झुडूपं एकाच वेळी सलग समुहाने फुलतात. म्हणूनच हा बहर पाहण्यासाठी लोक डोंगरदऱ्या पालथ्या घालतात.”
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी म्हणजेच BNHSच्या कारवी ट्रेलला किरण थुम्मा मार्गदर्शन करतात. BNHSच्या कन्झर्व्हेशन सेंटरमध्ये त्या एज्युकेशन ऑफिसर आणि वनस्पतीतज्ज्ञ आहेत.
त्या सांगत होत्या, “सेंटर जवळच्या दीड-दोड किलोमीटर असलेल्या नेचर ट्रेलच्या पट्ट्यात कारवी फुलून जाते. दर 8 वर्षांनी असे ट्रेल आयोजित केले जातात.”
निळी कारवी या वनस्पतीचं शास्त्रीय नाव Strobilanthes callosa असं आहे. या जातकुळीतील इतरही प्रजाती भारतात पश्चिम घाटात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या नावांनी आढळतात.
महाराष्ट्र, गोवा, दक्षिण गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर कर्नाटकात कारवी पाहायला मिळते. पावसाळा ओसरताना ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या अखेरीस कारवीमुळे सह्याद्रीचे अनेक डोंगरउतार निळ्या-जांभळ्या छटांनी बहरुन जातात.
कोकणातल्या डोंगरमाथ्यावर, पठारांवर कारवी फुलते तेव्हा गावकरी म्हणतात- ‘रानात नीळ आली आहे’.
“महाराष्ट्रात प्रामुख्याने निळी कारवी (Strobilanthes callosa) आणि टोपली कारवी (Strobilanthes sessilis) या दोन प्रकारच्या कारवी पाहायला मिळतात,” किरण थुम्मा सांगतात.

फोटो स्रोत, Shaheed Shaikh
“कारवीला बी रुजून वाढण्यासाठी सात वर्षं लागतात आणि आठव्या वर्षी फुलं लागतात. ही फुलं अनेक पॉलिनेटर्सना आकर्षित करतात. त्यानंतर बिया फुटून प्रसरण पावतात.
तेव्हा कारवीचं झाड मरुन जातं. आणि जमिनीवर पडलेली बीजं रुजून यावी म्हणून त्यांना सूर्यप्रकाश मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा होतो.
पाणी आणि पोषक द्रव्य प्राधान्याने नव्या बिजांना मिळतं. बीजं अंकुरतात पण सात वर्षं सुप्तावस्थेत (vegetative state) असतात.”
कारवी समुहाने बहरते, यालाच इंग्रजीत gregarious flowering असं म्हणतात.
पण या वनस्पतीला एकाच वेळी मोठा बहर का येतो? याविषयी सांगताना किरण सांगतात, “क्रॉस पॉलिनेशनची एक थेअरी आहे. संपूर्ण भागावर स्वतःचं वर्चस्व करण्यासाठी हा बहर असतो आणि दुसरा असाही एक प्रवाद आहे- काही बीजे कीटकांनी खाऊन जरी टाकली तरी मोठ्या संख्येने असल्याने राहिलेली बीजं रुजतातच. त्यामुळे पिढ्यांची साखळी चालू राहण्यासाठी असा बहर येत असावा.”
पश्चिम घाटातील कारवीसारख्या वनस्पतींवरचं संशोधन जैवविविधता समजून घेण्यासाठी अतिशय गरजेचं असल्याचं किरण यांच्यासारखे अनेक वनस्पतीतज्ज्ञ सांगतात.
धर्मशास्त्र ते वनस्पतीशास्त्र...
वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार, सांतापाऊ यांच्या योगदानाविषयी बोलताना म्हणतात, “त्यांच्या निमित्ताने आपल्याकडची ही जैवविविधता नोंदवली गेली. एकट्या महाराष्ट्रात वनस्पतीच्या 4,500 प्रजाती आहेत. या हजारो जातींच्या वर्गीकरणाचा पाया सांतापाऊ यांनी घातला. ते काम पुढे नेण्यासाठी वनस्पतीतज्ज्ञांना उपयोग झाला.”
डॉ. दातार हे पुणेस्थित आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि गेली वीस वर्षं वनस्पती वर्गीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
“खरंतर सांतापाऊ पीएचडी करायला भारतात आले होते. पण सह्याद्रीच्या रांगामधली वनस्पतींच्या विविधतेमुळे इथेच थांबले. तेव्हा भारतात पुण्याचं बॉटोनिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि सेंट झेव्हिअर्स कॉलेजचं ब्लॅटर हर्बेरिअम ही दोन मुख्य सेंटर्स होती. याच सेंट झेव्हिअर्समधून त्यांनी करिअर सुरू केलं.”
सांतापाऊ यांचा जन्म 5 डिसेंबर 1903 मध्ये स्पेनच्या टारागोनातील ला गलेरा इथला. वयाच्या सोळाव्या वर्षी ते कॅथलिक धार्मिक संस्थेत सहभागी झाले होते. भाषा, साहित्याची आवड असलेल्या सांतापाऊ यांनी स्पेन आणि लंडनमध्ये जाऊन त्यावर अभ्यास केला. तर फिलोसॉफीत पीएचडी करण्यासाठी रोम गाठलं.

फोटो स्रोत, Shaheed Shaikh/Getty Images
1927 नंतर ते धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी युरोपातून भारतात आले खरे. पण भारतात आल्यावर त्यांना वनस्पतीशास्त्राची आवड निर्माण झाली. म्हणूनच इंग्लंडला जाऊन त्यांनी वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली.
स्पेन आणि फ्रान्सच्या सीमेवरील पिरेनिज पर्वत, तसंच इटालियन आल्प्स पर्वतरांगेतून त्यांनी 1934-38 च्या दरम्यान वनस्पती संग्रहित केल्या.
यानंतर सांतापाऊ यांची भारतातील कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरू झाली. 1940 साली मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. पुढे अध्यापनाचं काम करता करता त्यांनी संशोधनही सुरू ठेवलं. संशोधन करत पीएचडीही मिळवली.
वनस्पती संशोधनासाठी त्यांनी 1 लाखाहून अधिक नमुने गोळा केले होते. त्यांचे 216 संशोधनपर प्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.


50-60 च्या दशकांमध्ये बलुचिस्तान, काठियावाड, डांगचं जंगल, गोवा, आंध्र प्रदेश करत सांतापाऊ यांनी पश्चिम आणि पूर्वेकडील पर्वतरांगाच नाही तर आसाम, दार्जिलिंग, देहरादून, मसूरी, पूर्व हिमालयाच्या पर्वतरांगाही पालथ्या घातल्या.
याच काळात वर्षभर त्यांनी बोटोनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची चीफ बोटोनिस्ट म्हणून धुरा सांभाळली. नंतर संचालकपदी 1961ला त्यांची नियुक्ती झाली. बोटानिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक म्हणून रिटायर्ड झाले.
सांतापाऊ यांचं संशोधनात्मक काम प्रकाशित झालेलं आहे. पश्चिम घाटातील फुलांच्या प्रजाती, मुंबईच्या अॅकॅन्थेसी, अॅस्क्लीपिडेसी, पेरीप्लोकेसी आणि ऑर्किड या प्रजातींवर त्यांचं संशोधन नावाजलं गेलंय.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या (BNHS) जर्नलचे संपादक म्हणून तर संस्थेच्या उपाध्यक्षपदीही त्यांनी काही काळ काम पाहिलं.
कारवी सह्याद्रीतच का फुलते?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी भारताचं नागरिकत्व घेतलं होतं.
‘फ्लोरा ऑफ खंडाळा’ आणि ‘फ्लोरा ऑफ पुरंदर’ या दोन पुस्तकांचा उल्लेख डॉ. दातार करतात. या अभ्यासासाठी सांतापाऊ मराठी शिकले. ‘फ्लोरा ऑफ खंडाळा’मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने वनस्पती कशा शोधल्या याचा उल्लेख सांतापाऊ यांनी केला आहे. तेव्हा खंडाळा हे बॉम्बे प्रेसिडंसीचा भाग होतं.
कारवीविषयी स्थानिक लोकांना माहिती होती, पण त्याचं नामकरण करण्याचं श्रेय ‘नीस’ या शास्त्रज्ञाला जातं, डॉ. दातार नमूद करतात.
“स्वातंत्र्यपूर्व भारतात युरोपातून अनेक संशोधक, शास्त्रज्ञ येत होते. 1753 मध्ये कार्ल लिनायुस नामक स्वीडिश शास्त्रज्ञाने जगभरातल्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी लॅटिन पद्धती आणली. त्याला binomial nomenclature system म्हणजेच दोन नावं असलेली शास्त्रीय वर्गीकरण पद्धती, असं म्हणतात. वनस्पतींची ठिकाणांनुसार स्थानिक नाव बदलतं म्हणून युरोपातून आलेल्या शास्त्रज्ञांनी अशी लॅटीन नाव द्यायला सुरूवात केली. नीस या संशोधकाने प्रथम कारवी असं नाव नोंदवलं.”
त्याच कारवीची सविस्तर नोंद सांतापाऊ यांनी केली.

फोटो स्रोत, Getty Images
कारवीबद्दल डॉ. दातार पुढे सांगतात, “कारवी ही प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. सह्याद्रीला, पश्चिम घाटाला जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ म्हटलं जातं. त्यासाठीची जी मानकं आहेत त्यात प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या जातींची संख्या जास्त असणं आवश्यक असतं. सांतापाऊ यांच्या निमित्ताने अशा प्रदेशनिष्ठ वनस्पतींची माहिती आपल्याकडे डॉक्युमेंट झाली आणि आपल्याकडे नेमका मोलाचा ठेवा काय आहे हे आपल्याला कळलं होतं”.
प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणजे काय हे शास्त्रज्ञ अधिक स्पष्ट करुन सांगतात.
“एखाद्या प्रदेशात स्थानिक पण स्थानबद्ध असणाऱ्या म्हणून त्या प्रदेशनिष्ठ वनस्पती. त्या भागातलं वातावरण, तिथली माती, पाऊस हा भवताल पाहून वनस्पती उगवतात, उत्क्रांत होतात आणि टिकून राहतात. अशा प्रदेशनिष्ठ वनस्पती, प्राणी, जीव असल्यामुळे त्या भागाचं एक खास महत्त्व असतं.
"सह्याद्री पर्वतरांगा तापी नदीपासून कन्याकुमारीपर्यंत असल्या तरी महाराष्ट्र आणि गोव्यातील सह्याद्रीचा भाग पूर्णपणे वेगळा आहे. आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट याविषयीच्या संशोधनावर जोर देते. जगात इतरत्र कुठेही नसलेल्या पण उत्तर सह्याद्रीत अस्तित्वात असलेल्या 181 प्रदेशनिष्ठ वनस्पतींची आम्ही नोंद केली आहे," असं दातार सांगतात.
कारवी जगणं महत्त्वाचं
कारवीची भूमिका जैवविविधतेत कशी महत्त्वाची आहे याविषयी सांगताना डॉ. मंदार दातार अधोरेखित करतात की- सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उभे चढ दिसतात, तिथे माती टिकून राहणं अशक्य असतं. त्या भागात प्रामुख्याने कारवी वाढते. तिथल्या जमिनीची धूप रोखण्याचं काम ही वनस्पती करते.
कारवीला मोनोकॉर्पिक (Monocarpic) असं म्हटलं जातं. “मराठीत आम्ही एकप्रसवा असा शब्द वापरतो, का तर त्या वनस्पतीच्या आयुष्यात एकदाच फुलं येतात. फुलांमधून असंख्य बिया तयार होतात आणि पडतात. तिथे पुन्हा वनस्पती उगवून येते. असं झाल्याने तो भाग कधीच उजाड राहात नाही.
"कारवीमुळे ही माती सह्याद्रीच्या डोंगरांवर टिकून राहाते. याशिवाय कारवीच्या सोबतीने इतरही वनस्पती वाढतात. त्या वनस्पतींच्या संरक्षणाची भूमिकाही कारवी बजावते. प्रदेशनिष्ठ असली तरी त्याचा विस्तार करोडोच्या संख्येने असतो," असं दातार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
“नैसर्गिक साखळीतही या वनस्पतीचं स्थान आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पुढल्या वर्षी जो मध गोळा केला जाईल तो बऱ्याच अंशी कारवीच्या फुलांमधील असेल. मधातल्या परागकणांवरुन कारवीचा मध ओळखता येतो.
"कारवी फुलते त्यावर्षी खूप मकरंद असल्याने मोठ्या संख्येने मधमाशा, भुंगा, फुलपाखरं येतात, परागीकरणाला मदत करतात. म्हणूनच तिथली सृष्टी जगवण्यासाठी कारवी आवश्यक घटक आहे," दातार सांगतात.
सह्याद्रीमधला कारवीचा बहर यंदा सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. कारवीची झाडं पायी तुडवत फोटो काढणारे, फुलं तोडून गुच्छ भेट देणारे, कारव्हीचं फुल केसात माळणारे पर्यटक कारवीवरचं अतिरेकी प्रेम व्यक्त करत होते.
डॉ. मंदार दातार अशा घटनांना धोक्याची घंटा म्हणतात. “मॉलमध्ये जाऊन उपभोगाची वस्तू घेतो तसं आपण जंगलाकडे पाहायला लागलोय. अशा प्रकारे मजा लुटण्याची निसर्ग ही जागा नाही. असे प्रकार जैवविधिधतेचं संवर्धन करण्याच्या आड येणारे आहेत.
"जेवढी फुलं तुम्ही तोडाल तितक्या कमी बिया तयार होतील, जमिनीवरचा कमी भाग आच्छादला जाईल. पावसाने जेव्हा उतारावरचा गाळ वाहून जाईल, शेवटी त्याचा धोका काही वर्षांनी माणसांनाच होणार आहे," अशी भीती दातार व्यक्त करतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











