सुपरफूड म्हणून ओळख असलेल्या मखान्याची शेती कशी करतात? यामुळे वाढू लागले आहे उत्पादन

फोटो स्रोत, Phool dev Shahni
- Author, प्रीती गुप्ता
- Role, टेक्नॉलॉजी रिपोर्टर
"मी दिवसातले काही तास 7 ते 8 फूट खोलपर्यंतच्या चिखलाच्या तलावात असतो. दर 8-10 मिनिटांनी श्वास घ्यायला पाण्याच्या पृष्ठभागावर येतो."
वडील आणि आजोबांप्रमाणे दररोज 8 फूट खोल चिखलाच्या तलावात काम करत उदरनिर्वाह चालवणारे देव साहनी बीबीसीसोबत बोलत होते.
फुलदेव साहनी त्या गढूळ आणि चिखलाच्या पाण्यातून युरियाल फेरॉक्स नावाच्या वॉटर लिलीच्या बिया काढतात. त्याला मखाना, फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
यात अनेक पौष्टिक मूल्यं असून, ब जीवनसत्व, प्रथिनं आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं याला 'सुपरफूड' म्हणूनही ओळखलं जातं. स्नॅक्स म्हणून मखान्याचा वापर केला जातोच; पण, दुधाच्या खीरमध्येही मखाने वापरले जातात.
उत्तर भारतातल्या बिहारमध्ये जिथं साहनी राहतात त्याच ठिकाणी जगातलं 90 टक्के मखान्याचं उत्पादन होतं.
वॉटर लिलीची पानं मोठी आणि गोलाकार असतात. तसेच ही पान तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसतात. पण, त्याच्या बिया तळाशी पाण्यामध्ये तयार होतात आणि त्यांना चिखलातून बाहेर काढणं हे काम अवघड असतं.
याच बिया काढताना काय त्रास होतो हे साहनी सविस्तर समजावून सांगतात. ते म्हणतात, “आम्ही बिया काढण्यासाठी चिखलात उतरतो तेव्हा कान, नाक, डोळे आणि तोंडात चिखल जातो. त्यामुळं आमच्यापैकी अनेकांना तत्वेचेचे आजार होतात. तसेच या वनस्पतीभोवती काटे असतात. त्यामुळे बिया काढताना हे काटे शरिरामध्ये रुततात.”

फोटो स्रोत, Madhubani Makhana
पण अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी लागवड प्रक्रियेत बदल केला असून वॉटर लिलीचे उत्पादन आता शेतात किंवा जिथं जास्त उथळ पाणी असतं तिथं घेतलं जातं. त्यामुळं एक फूट पाण्यातून या बिया काढणं सोपं झालं असून साहनी त्यामधून दिवसाला दुप्पट पैसा कमावू शकतात.
पण, मखाने काढणे अजूनही कठीण काम आहे. मला माझ्या परंपरागत व्यवसायाचा अभिमान आहे. मला तीन मुलं आहेत. मी खात्रीनं सांगतो की, माझा एक तरी मुलगा या मखान्याच्या शेतीचा वारसा पुढे चालू ठेवणार आहे, असंही ते म्हणाले.
मखाना लागवडीत बदल करण्यामागं एक प्रमुख नाव म्हणजे डॉ. मनोज कुमार. गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांच्या लक्षात आलं की, चिखल असलेल्या खोल पाण्यात मखान्याचं उत्पादन घेणं अवघड आहे. त्यानंतर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर मखाना (NRCM) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी त्यांना उथळ पाण्यात लिलीची लागवड करण्यास मदत केली. त्यांनी गेल्या चार ते पाच वर्षांपासून या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली.


या नव्या तंत्रज्ञानामुळे शेतातल्या उत्पादनाप्रमाणे मखान्याचं उत्पादन घेणं सोपं झालं आहे. यासाठी फक्त एक फूट पाण्याची गरज असते. त्यामुळं आता मजुरांना तासनतास खोल चिखलात काम करायची गरज राहत नाही, असं मनोज कुमार सांगतात.
त्यांच्या केंद्रानं अनेक वेगवेगळे प्रयोग केले. त्यात त्यांना अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाचा शोध लागला. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न तिप्पट झालं आहे.
तसंच, या मखान्याच्या शेतीमुळं शेतकऱ्यांना अवेळी येणारा पाऊस आणि पुराच्या संकटांना तोंड देता येतंय, असं डॉ. कुमार सांगतात.
सध्या NRCM अशा एका यंत्रावर काम करत आहे जे चिखलातून बिया काढू शकेल. नवनवीन तंत्रज्ञानामुळं जास्तीत जास्त शेतकरी या मखान्याच्या शेतीकडं आकर्षित होत आहेत. 2022 मध्ये फॉक्स नट किंवा मखान्याची शेती 35,224 हेक्टवर केली जात होती. पण, गेल्या 10 वर्षांत हे क्षेत्र जवळपास तिपट्ट झालं आहे.

फोटो स्रोत, Dhirendra Kumar
“आम्ही शेतकरी म्हणून नेहमी गहू, मसूर आणि मोहरीचं उत्पादन घेतलं. पण, प्रत्येकवेळी पुरामुळे पिकांचं नुकसान झालं. खूप पैसा वाया गेला.” असं धीरेंद्र कुमार सांगत होते.
धीरेंद्र कुमार यांनी पारंपरिक शेतीची वाट सोडून नुकतीच मखान्याची शेती करायला सुरुवात केली आहे. पीएचडीचा अभ्यास करताना त्यांची मखान्याच्या लागवडीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसोबत ओळख झाली. त्यामुळे धीरेंद्र यांनी माहिती घेऊन स्वतःच्या शेतात प्रयोग करायचं ठरवलं.
पहिल्याच वर्षी भरघोस उत्पादन झालं आणि त्यांना जवळपास 35 ते 40 हजार रुपयांचा नफा झाला. आता मी लिलीचं लागवड क्षेत्र वाढवून सध्या 17 एकरमध्ये लिलीचं उत्पादन घेतात.
स्वप्नातही वाटलं नव्हतं की, मी कधी मखान्यांची शेती करेन. कारण, हे फार मेहनीचं काम असून ते शक्यतो मच्छीमारच करतात, असं धीरेंद्र सांगतात.
धीरेंद्र कुमार यांनी पीकामध्ये बदल केल्यानंतर महिलांनाही रोजगार मिळायला लागला आहे. त्यांनी बिया लागवडीसाठी जवळपास 200 स्थानिक महिलांना रोजगार दिला. शक्य तितक्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं स्वप्न असल्याचं ते म्हणतात.
इथं फक्त शेतातच नवनवीन प्रयोग केले असं नाही. इथं मखाना, मधुबनी मखाना याचं तर उत्पादन घेतलं जातं. तसेच त्यावर प्रक्रिया करून जगभरात निर्यातही केले जातात.
एकदा मखान्यांची कापणी झाल्यानंतर त्याला धुवून, भाजून घेतात. तसेच त्याला हातोडीसारख्या साधनानं फोडून मग मखाना तयार केला जातो.

फोटो स्रोत, Madhubani Makhana
ही पद्धत घाण आणि धोकादायक आहे. तसेच त्याला अतिशय मेहनत लागत असून हे काम वेळखाऊ सुद्धा आहे. अनेकदा दुखापत होऊ शकते किंवा कुठं भाजू देखील शकतं, असं मधुबनी मखान्याचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंभू प्रसाद सांगतात.
त्यांच्या कंपनीनं NRCM च्या मदतीनं वॉटर लिलीच्या बिया भाजून बिया फोडून मखाना तयार करण्यासाठी एक मशीन तयार केलं आहे. यामुळं मखान्याची गुणवत्ता आणि उत्पादन वाढल्याचं प्रसाद सागंतात.
त्यांच्या मधुबनी प्लांटमध्ये अशा तीन मशिन्सचा वापर केला जातो. पण, नवनवीन प्रयोग करून मखान्याची शेती आणि उत्पादन वाढलं असलं तरी किंमती कमी होतील असं वाटत नाही. जागतिक स्तरावर मखान्याची मागणी लक्षात घेता किंमती कमी करायच्या असतील तर मागणीच्या तुलनेत तितकं उत्पादनही व्हायला हवं, असंही ते म्हणतात.
मखाना लागवडीचे बिहारवर दूरगामी परिणाम होतील. सध्या ही सुरुवात आहे. पण, यामुळे भविष्यात राज्याचं चित्र बदलेल असं धीरेंद्र कुमार यांना वाटतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











