कॅलिफोर्नियाच्या समुद्रामध्ये तेल सांडलं आणि वसुंधरा दिनाची सुरुवात झाली

फोटो स्रोत, Getty Images
दरवर्षी जगभरातले कोट्यावधी लोक 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन (Earth Day) साजरा करतात.
पर्यावरण संरक्षणासाठीची जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी 1970 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत हा दिवस साजरा झाला आणि आता जगभरात साजरा केला जातो.
वसुंधरा दिनाची सुरुवात कशी झाली?
दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिन म्हणजेच वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो.
अमेरिकेतले पर्यावरणवादी आणि खासदार म्हणजेच सिनेटर गेलॉर्ड नेल्सन आणि हार्वड विद्यापीठात शिकणाऱ्या डेनिस हेन्स यांनी मिळून 1970 मध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिन साजरा केला.

फोटो स्रोत, Getty Images
1969 मध्ये कॅलिफोर्नियाच्या सँटा बार्बरामध्ये ऑईल स्पिल म्हणजे समुद्रामध्ये तेल सांडल्याने पर्यावरणाची मोठी हानी झाली होती.
या आणि अशा विविध घटनांमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान लोकांपर्यंत पोहोचावं आणि पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्याला राष्ट्रीय महत्त्वं मिळावं या हेतूने हा पहिला पृथ्वी दिन आयोजित करण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेत त्यावेळी जवळपास 2 कोटी लोक रस्त्यांवर उतरले.
1990 पासून हा एक ग्लोबल इव्हेंट झाला. दर वर्षी जवळपास 200 देशांमधले कोट्यवधी लोक वसुंधरा दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.
Earthday.orgच्या अध्यक्ष कॅथलिन रॉजर्स सांगतात, "अनेक जणांसाठी वसुंधरा दिन साजरा करणारा कार्यक्रम हे त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी उचललेलं पहिलं पाऊल असतं."
वसुंधरा दिन 2024 ची थीम काय?
2024 साठीच्या वसुंधरा दिनासाठीची थीम आहे - Planet vs. Plastics.
प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण हे मानवाच्या आणि आपल्या पृथ्वी ग्रहाच्या आरोग्यासाठी किती घातक आहे, याविषयीची जागृती निर्माण करणं हे यावेळच्या पृथ्वी दिनाचं उद्दिष्टं आहे.
क्लायमेट चेंज, क्लीन एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा, विविध प्रजातींचं संरक्षण, वृक्षारोपणाचे फायदे अशा पर्यावरणासंबंध विविध मुद्द्यांवरच्या थीम्स यापूर्वी घेण्यात आल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळच्या वसुंधरा दिनाची थीम ही संयुक्त राष्ट्रसंघामध्ये होऊ घातलेल्या एका महत्त्वाच्या ठरावाला पूरक आहे.
UN मध्ये Global Plastic Treaty म्हणजे प्लास्टिकचा वापर आणि त्यामुळे होणारं प्रदूषण याबद्दलचा एक महत्त्वाचा ठराव 2024 वर्ष अखेरपर्यंत संमत होणार आहे. भारतासह 50 पेक्षा अधिक देशांनी यासाठी होकार दिलेला आहे. 2040 पर्यंत प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण संपुष्टात आणण्यात यावं हे उद्दिष्टं याद्वारे ठेवलं जाणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पण पृथ्वी दिनाचे संयोजक याहीपेक्षा व्यापक उद्दिष्टं ठेवण्याची मागणी करतायत. 2040 पर्यंत एकूण प्लास्टिक उत्पादन 60%नी कमी करण्यात यावं असी त्यांची मागणी आहे.
वसुंधरा दिनाच्या या दिवशी लोकांनी एखाद्या क्लीन अप इव्हेंटमध्ये सहभागी व्हावं किंवा प्लास्टिक प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल अधिक जाणून घ्यावं असं आवाहन करण्यात आलंय.
भारतामध्ये The Earth Day Network India Trust 2010 पासून दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतो.
वसुंधरा दिन साजरा करून काय साध्य होतं?
अमेरिकेत 1970मध्ये पहिल्यांदा असा दिव साजरा करण्यात आला आणि त्यानंतर काही वर्षांतच अमेरिकेमध्ये US Environmental Protection Agency पर्यावरण संवर्धनाचं काम करणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली, पर्यावरण विषयक कायदे करण्यात आले.
आता जगभरातल्या देशांनी असे पर्यावरण विषयक कायदे केलेयत, वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात, शेतकऱ्यांना शेतीमध्ये पर्यावरण पूरक पद्धती अवलंबण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि हवामान बदल आणि त्याचे परिणाम याविषयीची जागरूकता आणि असे हवामान बदल ज्यामुळे घडतात, त्या गोष्टी रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अशाप्रकारे वसुंधरा दिन साजरा केल्याने पर्यावरणासंबंधीच्या समस्यांकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधलं गेल्याचंं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी प्रमुख युवो द बॉर (Yvo de Boer) सांगतात, "इतर अशा अनेक समस्या आहेत ज्यामुळे पर्यावरणाविषयीच्या समस्यांना समाजाकडून प्राधान्य दिलं जात नाही. वसुंधरा दिनासारखे इव्हेंट्स हे आपल्या फक्त आता पुरत्या विचार करण्याच्या सवयीचे दीर्घकालीन परिणाम दाखवून देतात."
2016 साली पृथ्वी दिनाचं निमित्त साधून महत्त्वाच्या Paris Climate Accord म्हणजेच पॅरिस हवामान करारावर सह्या करण्यात आल्या. 2015 च्या उत्तरार्धात हा मंजूर करण्यात आला होता. ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच जगातल्या विविध देशांनी एकत्र येत या कराराद्वारे काही उद्दिष्टं नक्की केली आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
वसुंधरा दिनाबद्दल टीकाकारांचं म्हणणं काय आहे?
पण अशा प्रकारच्या करारांना Achievement मानल्याने प्रगतीचं एक भ्रामक चित्र उभं राहत असल्याचं काही टीकाकारांचं म्हणणं आहे.
माणसाच्या अनेक कृत्यांमुळे जगाच्या तापमानापासून ते अनेक प्रजाती नामशेष होण्यापर्यंतच्या गोष्टी घडत आहेत आणि असं होऊ नये किंवा या गोष्टींचा वेग कमी व्हावा यासाठी प्रयत्न अपुरे पडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
सोबतच पृथ्वी दिनाचा वापर हा काही व्यक्ती आणि कंपन्या पर्यावरणाबाबतीत आपण किती जागरूक आहोत याविषयीचं चुकीचं चित्र उभं करण्यासाठी वापरत असून प्रत्यक्षात ठोस बदल घडवण्यासाठी त्यांनी काही केलं नसल्याचेही आरोप होतायत. याला Greenwashing असं म्हणतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने 2022मध्ये ट्वीट केलं होतं, "वसुंधरा दिन हा एकीकडे अत्यंत वेगाने या ग्रहाचं नुकसान करणाऱ्या, हाती सत्ता असलेल्या लोकांसाठी त्यांचं पृथ्वीवरचं 'प्रेम' दाखवण्यासाठी दिवस बनलाय."
Earthday.orgच्या अध्यक्ष कॅथलिन रॉजर्स सांगतात, "ग्रीनवॉशिंग घडतंय हे आपल्या सगळ्यांनाच माहितेय आणि हे प्रचंड चीड आणणारं आहे. हा मुद्दा आमच्यामुळे निर्माण झालेला नाही पण आम्हाला हे माहित आहे की वसुंधरा दिनाचा वापर काही उद्योगपती पर्यावरणपूरकतेच्या तत्त्वांचा (गैर)फायदा घेत स्वतःचा फायदा करून घेतात. ग्राहकांशी खोटं बोलणारे उद्योग वा इंडस्ट्रींवर सरकारांनी कडक पावलं उचलायला हवीत."











