अन्न आणि पाण्यामधील प्लास्टिकचे कण किती धोकादायक आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
पिण्याचं स्वच्छ पाणी ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.
जेव्हा आपण प्रवासात असतो किंवा अशा ठिकाणी असतो, जिथे स्वच्छ पाणी उपलब्ध नसतं तिथे आपण शक्यतो बाटलीबंद पाणी विकत घेतो.
हे पाणी अस्वच्छ नाहीये याची आपल्याला खात्री असते. पण या पाण्यात मायक्रो-प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकचे असंख्य सूक्ष्म कण असू शकतात.
बीबीसी फ्यूचरवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ आणि रटगर विद्यापीठाच्या संशोधकांना असं आढळून आलंय की बाटलीबंद पाण्यात अंदाजापेक्षा 100 पट जास्त मायक्रोप्लास्टिक असू शकते.
सोबतच एक लिटर पाण्यात सुमारे 2.5 लाख नॅनोप्लास्टिक कण असल्याचं त्यांना आढळून आलं आहे.
या संशोधकांनी तीन ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची तपासणी केली असता त्यांना एका लिटरमध्ये एक लाख दहा हजार ते चार लाख नॅनोप्लास्टिक कण आढळून आले.
संशोधकांच्या मते, पाण्यात सापडलेले प्लास्टिकचे कण त्याचं बाटलीतून मिसळले होते.
भारतातही सुरू आहे मायक्रोप्लास्टिकचं प्रदूषण
आपण आपल्या सभोवार नजर टाकली तर अनेक प्लास्टिकच्या वस्तू दिसतील.
जेव्हा या वस्तूंचे अगदी बारीक तुकडे होतात तेव्हा त्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात.
साधारणपणे पाच मिलिमीटरपेक्षा लहान तुकड्यांना मायक्रो प्लास्टिक म्हणतात. काही तुकडे यापेक्षाही लहान असतात ज्याला फक्त नॅनो स्केलमध्ये मोजता येतं. त्यांना नॅनो प्लास्टिक म्हणतात.
हे दोन्ही प्रकार डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत. नद्यांचं पाणी असो, समुद्राचा तळ असो किंवा अंटार्क्टिकमधील गोठलेला बर्फ असो, आज ते जगाच्या प्रत्येक भागात अस्तित्वात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
आयआयटी पटनाच्या एका संशोधनात पावसाच्या पाण्यातही मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आलेत.
त्याचप्रमाणे भारतातील गोड्या पाण्याच्या नद्या आणि तलावांमध्येही मायक्रोप्लास्टिक आढळून आल्याचं आणखी एका संशोधनातून समोर आलं आहे. यामध्ये फायबर, लहान तुकडे आणि फोम यांचा समावेश होतो.
या संशोधनानुसार कारखान्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी, शहरी भागातून बाहेर पडणारा प्लास्टिक कचरा अशा अनेक कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
मायक्रोप्लास्टिकचे तोटे काय आहेत?
समस्या अशी आहे की पिण्याच्या पाण्यातही मायक्रोप्लास्टिक दिसू लागलंय. पण याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे अद्याप निश्चितपणे माहित नाही.
2019 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने एक आढावा घेतला होता आणि मायक्रोप्लास्टिक मानवी शरीरात गेल्यास काय धोके निर्माण होऊ शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु मर्यादित संशोधनामुळे जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नाही. तरीही प्लास्टिकचे प्रदूषण कमी करावे, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटरचे वरिष्ठ डॉक्टर मनीष सिंह यांनी बीबीसीचे सहकारी आदर्श राठौर यांना सांगितलं की, मायक्रोप्लास्टिकच्या धोक्यांविषयी फारशी माहिती नाही, त्यामुळे या विषयावर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
ते म्हणाले, "मायक्रोप्लास्टिकच्या धोक्यांबाबत मर्यादित संशोधन झालं आहे. काही संशोधनातून असं आढळून आलंय की, यामुळे आपल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या (संप्रेरक निर्मिती ग्रंथी) कार्यामध्ये समस्या निर्माण होतात. मायक्रोप्लास्टिकमुळे खूप गंभीर हानी होणार की नाही हे भविष्यात कळेलच, त्यामुळे आतापासूनच सतर्क राहण्याची गरज आहे."
सर्वत्र मायक्रोप्लास्टिक
ज्या जमिनीवर शेती केली जाते त्या ठिकाणी पाण्याशिवाय मायक्रोप्लास्टिकही मुबलक प्रमाणात आढळते.
2022 मध्ये अमेरिकेत एक चाचणी करण्यात आली होती. त्यानुसार, पिकांसाठी खत म्हणून वापरल्या जाणार्या गाळात मायक्रोप्लास्टिक आढळल्याने 80 हजार चौरस किलोमीटर शेतीयोग्य जमीन दूषित झाली आहे.
या गाळात मायक्रोप्लास्टिक व्यतिरिक्त काही रसायने देखील आढळली होती जी कधीही विघटित होत नाहीत म्हणजेच त्याच अवस्थेत राहतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच वेळी, ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील संशोधकांना असं आढळून आलंय की, युरोपमधील लागवडीखालील जमिनीत दरवर्षी मायक्रोप्लास्टिकचे ट्रिलियन कण सापडतात, जे अन्नसोबत लोकांच्या शरीरात पोहोचत आहेत.
बीबीसी फ्यूचरसाठी लिहिणाऱ्या इसाबेल गेरेटसेन यांनी लिहिलंय की, काही वनस्पती अशा आहेत ज्यात इतरांपेक्षा जास्त मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे.
काही संशोधनांतून असं दिसून आलंय की जमिनीखालील भाज्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण जास्त आढळतं. याचा अर्थ पालेभाज्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक कमी असण्याची शक्यता आहे तर मुळा आणि गाजर यांसारख्या भाज्यांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असेल.
मायक्रोप्लास्टिकपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल?
डॉ. मनिष सिंह म्हणतात की, भारतात बहुतांश ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे नद्या आणि शेतजमिनीमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे.
ते म्हणाले, "असंख्य खाद्यपदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक केलेले असतात. लोक घरी वापरतात त्या प्लेट्स आणि चॉपिंग बोर्डही प्लास्टिकचेच असतात. हे टाळलं पाहिजे. शिवाय सरकारनेही याकडे लक्ष दिलं पाहिजे."
प्लास्टिक आणि संबंधित उत्पादनांचा वापर कमी करण्यासाठी, भारत सरकारने 1 जुलै 2022 पासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली होती.
या प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. जगातील अनेक देशांनी यापूर्वी अशी पावलं उचलली आहेत.
पण वैज्ञानिक म्हणतात की, बायोडिग्रेडेबल पर्यायामुळे परिस्थिती आणखीन चिघळते आहे. ब्रिटनच्या प्लायमाउथ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की बायोडिग्रेडेबल म्हणून लेबल लावलेल्या पिशव्या विघटित होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात.
एवढंच नाही तर ते लहान लहान तुकड्यांमध्ये विघटित होऊन प्रदूषण वाढत आहे.
अन्नपदार्थांमध्ये मायक्रोप्लास्टिक येऊ नये यासाठी, काचेच्या बाटल्या वापरण्याचा सल्ला दिला जातो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पण बीबीसी फ्युचरच्या इसाबेल गेरेटसेन लिहितात की, काचेच्या बाटल्यांचा अनेक वेळा पुनर्वापर करता येत असला तरी काच बनवण्यासाठी सिलिका (वाळू) वापरली जाते. अशा परिस्थितीत त्याच्या प्रक्रियेतही पर्यावरणाची हानी होते.
समस्या केवळ मायक्रोप्लास्टिकचीच नाही तर मायक्रोफायबरची देखील आहे. मायक्रोफायबर पाणी, समुद्रातील मीठ आणि बिअरमध्ये देखील आढळलं आहे. आणि याचा मोठा भाग कपड्यांमधून येतो.
मग प्रदूषण कसं कमी करता येईल?
बीबीसी फ्युचरवर प्रकाशित झालेल्या लेखानुसार, मायक्रोप्लास्टिकचे धोके कमी करण्याच्या उद्देशाने आशेचा एक किरण दिसला आहे.
संशोधकांनी अशी बुरशी आणि जीवाणू शोधले आहे जे प्लास्टिकचं विघटन करण्यास मदत करतात.
त्याचप्रमाणे, बीटल लार्वा ही अळी पॉलिस्टीरिन (प्लॅस्टिकचा एक प्रकार) विघटित करू शकते.
याशिवाय एका खास प्रकारच्या फिल्टर आणि रासायनिक प्रक्रियांद्वारे पाणी शुद्ध करता येते.
पण डॉ.मनिष सिंह सांगतात की, या उपायांपेक्षा सरकारने प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी धोरणे आखली पाहिजेत आणि दुसरीकडे लोकांनीही प्लास्टिकवरील आपलं अवलंबित्व कमी केलं पाहिजे.
ते म्हणतात, "जसं की, ज्यूट किंवा कापडी पिशव्यांचा वापर करा. कपडे खरेदी करतानाही सिंथेटिक फायबर कपड्यांऐवजी कॉटनच्या कपड्यांना प्राधान्य द्या. प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर कमी करा.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








