टपरवेअर कंपनीनं जाहीर केली दिवाळखोरी; वाचा, या प्रसिद्ध कंपनीचं नक्की काय चुकलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिआन सेडन, मायकल रेस
- Role, बीबीसी न्यूज
टपरवेअर सर्वांच्या इतक्या सवयीचं झालं होतं की अन्नासाठी कुठलं प्लास्टिक वापरायचं असं विचारताच अनेकांच्या तोंडून टप्परवेअरचं नाव निघायचं. पण, आता टपरवेअरची विक्री कमी झाली असून उद्योग डबघाईला आला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या 78 वर्ष जुन्या कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे.
फूड स्टोरेज कंटेनर फर्मनं सांगितलं की ते व्यवसायाची विक्री सुरू करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागणार आहेत.
अलिकडच्या काळात कंपनीने आपल्या प्रोडक्टमध्ये नवीन बदल करून तरुण ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही.
गेल्या वर्षी कंपनीनं दिवाळखोरीचा इशाराही दिला होता. त्वरीत निधी उभारला नाहीतर कंपनीत दिवाळखोरीत निघेल, असं कंपनीनं म्हटलं होतं. आता दिवाळखोरीची बातमी येताच या आठवड्यात कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.
कोरोनाच्या काळात टप्परवेअरच्या मागणीत थोडी वाढ झाली होती. पण, कोरोनानंतर अनेकांनी घरातल्या जेवणाला पसंती देत घऱीच बनवायला सुरुवात केली. तेव्हापासून टपरवेअरच्या मागणीत घट होत असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, वाढलेली मजुरी आणि वाहतुकीचा खर्च यामुळे नफ्यात घट झाली आहे.
टप्परवेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी अन गोल्डमन यांनी गुंतवणूकदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या अनेक वर्षांपासून आव्हानात्मक मॅक्रो इकॉनॉमिक वातावरणामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे.
अर्ल टपर यांनी 1946 मध्ये टपरवेअरची स्थापना केली होती. त्यांना “फ्लेक्झिबल एअरटाईट सील”चं पेटंट सुद्धा मिळालं होतं. रेफ्रिजरेटर हे अनेक कुटुंबांना परवडणारं नव्हतं. त्या काळात अन्न अधिक काळ ताजं ठेवण्यासाठी टपरवेअरचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. पण, या उद्योगातही लगेच यश मिळालं नाही. ब्राऊनी वाईज या सेल्सवुमनने या ब्रँडला घराघरात पोहोचवलं. टपरवेअरची विक्री करणाऱ्या या महिला होत्या ज्या घराघरात जाऊन महिलांना टप्परवेअर विकायच्या. त्याला टपरवेअर पार्टीज म्हणून ओळखलं जायचं.
कंपनीनुसार, टपरवेअर सध्या 70 देशांमध्ये विकला जातोय.
पण, आता ग्राहकांनी अन्न साठवण्यासाठी प्लास्टीक सोडून पर्यावरणपूरक कंटेनरचा वापर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे टपवेअरसाठी पार्टी आता संपली आहे, असं हरग्रीव्स लॅन्सडाउन येथील मनी आणि मार्केटचे प्रमुख म्हणाले.
बीबीसी मराठीने यापूर्वी प्रसिद्ध केलेला लेख यानिमित्त पुन्हा एकदा प्रसिद्ध करत आहोत.
टपरवेअर हे नाव आता सर्वतोमुखी झालेलं आहे. घरातले खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही प्लॅस्टिक डब्यांना टपरवेअर असा समानार्थी शब्दच तयार झाला आहे.
एकेकाळी हवाबंद डब्यांच्या क्षेत्रात क्रांती करणाऱ्या या 77वर्षं जुन्या अमेरिकन कंपनीमध्ये आता मात्र सगळं काही ठीक नाहीये. वाढतं कर्ज, घसरलेला खप यामुळे या कंपनीसमोर आपली गुंतवणूक नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत कंपनीने आपल्या उत्पादनांना नवं रुप देण्याचा प्रयत्न केला तसेच तरुण ग्राहकांमध्ये स्थान निर्माण करायचाही प्रयत्न केला मात्र यामुळे खपाची घसरण काही रोखता आलेली नाही.
1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये टपरवेअर पार्टीज नी ग्राहकांमध्ये क्रांती निर्माण केली. हवाबंद आणि द्रवपदार्थ सांडू न देणाऱ्या या उत्पादनांनी बाजारात वेगानं स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.
त्यांचा मुख्यत्वे व्यवसाय स्वतःच्या घरामधूनच उत्पादनं विकणाऱ्यांवर अवलंबून होता. मात्र हा प्रकार आता काहीसा मागे पडला असून युनायटेड किंग्डममध्ये तर 2003 पासूनच असं वितरण बंद झालं आहे.
आता नव्या गुंतवणुकीशिवाय बाजारात टिकून राहणं कठीण आहे असं कंपनीच्या वरिष्ठांना वाटतं.
रिटेल अॅनालिसिस फर्म सॅव्ही मार्केटिंगच्या संस्थापक कॅथरीन शटलवर्थ म्हणतात, जेव्हा ही उत्पादनं बाजारात आली तेव्हा ती चमत्कारासारखीच वाटली होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यापेक्षा स्वस्त उत्पादनांनी बाजार भरुन गेले आहेत.
कोव्हिडच्या साथीच्या काळात टपरवेअरची स्थिती थोडीशी सुधारली होती कारण तेव्हा लोकांनी घरातच बेकिंग आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. यामुळे टपरवेअरच्य़ा शेअरची घसरणी थांबली पण वाढ थोडाच काळ टिकली.
त्यानंतर विक्री घसरलेलीच आहे. याचं मुख्य कारण कंपनीनं गेल्या 10 ते 20 वर्षांमध्ये नवीन असं बाजारात काहीच आणलं नाही असं शटलवर्थ सांगतात.
नव्या बदलांचा अभाव ही ओरड या कंपनीच्या बाबतीत आधीपासूनच आहे.
ही कंपनी 1946 साली अर्ल टपर यांनी स्थापन केली होती मात्र समाजात या कंपनीचा चेहरा म्हणून ब्राऊनी वाईज होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
टपरची उत्पादनं ही एक मोठीच गोष्ट होती. ते अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकावेत यासाठी तसेच फ्रिजमध्ये ठेवता यावे यासाठी नवं प्लॅस्टिक वापरुन ही उत्पादनं तयार झाली होती. परंतु अनेकांसाठी ती महागडी होती. वाईज यांचा कंपनीत प्रवेश होईपर्यंत ती उत्पादनं विकली जात नव्हती.
त्यांनी डबे विकले जावेत यासाठी त्यांनी गृहिणी आणि घरातल्या मातांच्या भेटी घ्यायला सुरु केलं. त्यांचे मेळावे घेतले, ही उत्पादनं त्यांच्यापर्यंत जावीत, व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न केले.
त्यांची विपणनाची वेगळी पद्धत आणि त्यांच्या विक्रीचे आकडे पाहून टपरचे डोळे उघडले. त्यांची वरिष्ठ पदांवर नियुक्ती झाली. त्या काळात इतक्या वरिष्ठ पदांवर महिलांची नेमणूक होत नसे.
वाईज आणि टपरवेअर यांच्या प्रभावावर आजही चर्चा सुरूअसते. परंतु या दोन्हींनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात महिलांचा मनुष्यबळात समाविष्ट करण्यासाठी महत्त्वाचा वाटा उचलला तसेच जगभऱातील महिलांना स्वतःचं उत्पन्न सुरू होण्यासाठी मदत केली.
अॅलिसन क्लार्क या व्हिएन्नाच्या युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड आर्ट्समध्ये प्राध्यापिका आहेत. त्यांनी 'टपरवेअर, द प्रॉमिस ऑफ प्लॅस्टिक' इन 1950 अमेरिका असं पुस्तक लिहिलं आहे.
त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, ज्या महिलांना उत्पन्नासाठी लवचिक पद्धतीचं काम करता येत नव्हतं अशा महिलांना ते मिळवून देण्याचं काम या कंपनीनं केलं होतं.
सुरुवातीला जेव्हा अमेरिकेत ते पार्ट्यांमध्ये विकलं जात होतं तेव्हा अनेक महिला आपल्या कुटुंबांपासून वेगळ्या उपनगरांत राहात होत्या.
टपरवेअरने घरात कंटाळवाणं वाटणाऱ्या कामाला एकप्रकारचा उत्साही रंग दिला. कोणीतरी विकणारं ओळखीचं असेल तरच तुम्ही ते विकत घेऊ शकत असायचा. ही पद्धतच वेगळी होती.
त्या सांगतात, मला वाटायचं ही महिलांविरोधातली शोषण करणारी भांडवलवादी व्यवस्था आहे, परंतु जेव्हा या महिलांना भेटलो तेव्हा ही गोष्ट त्यांना कशाप्रकारे बळ देतो होती आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य कसं चांगलं हे मला समजलं.
बाहेर जरी महिला या कंपनीचा चेहरा बनल्या असल्या तरी निर्णयप्रक्रियेत त्या होत्या असं नाही, असं क्लार्क सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
उत्पादनं चांगल्या पद्धतीनं तयार करण्यात आली होती आणि ती अक्षरशः जादुई पद्धतीनं विकली जात होती पण आजच्या डिजिटल युगात समोर जाऊन विकण्याची पद्धत फारशी संयुक्तिक नाही.
ग्लोबल डेटाचे कार्यकारी संचालक नील सॉंडर्स सांगतात, बदल करण्याच्या बाबतीत टपरवेअरने अनेकदा संधी गमावली आहे. उत्पादनं, वितरण याबाबतीत फक्त पार्ट्यांमधून विक्री करणं यातून ते दिसून आलं आहे. हे सगळं तरुण आणि जुन्या ग्राहकांना जोडून घेण्यावर परिणाम करणारं ठरतं.
नव्या ग्राहकांनी पर्यावरणपूरक उत्पादनं आवडतात, बीसवॅक्स पेपरसारख्या पदार्थ ताजे ठेवणाऱ्या गोष्टी त्यांना आवडतात.
रिटेल अनालिस्ट रिचर्ड हायमन सांगतात, टपरवेअरच्या उत्पादनांचं अनुकरण करणं अवघड होतं, त्यामुळे कंपनीला फार फायदा झाला होता.
कंपनीने आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अमेरिकेत रिटेल साखळीत आपलं टारगेट पूर्ण करण्यासाठी धोरण आखले आहे तसेच स्वयंपाकासाठीची वेगवेगळी उत्पादनं आणली आहेत.
गेल्या दहा वर्षांपूर्नी टपरवेअरसमोर अनेक आव्हानं होती. कदाचित कंपनी आता वेगळ्या स्थितीक असू शकेल.
परंतु आता काही चमत्कार घडू शकेल असा विचार करण्याची संधी कंपनीच्या वरिष्ठांकडे नाही. मोठ्या निधीच्या अभावी कंपनीचा डोलारा कोसळूही शकतो.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











