पर्यावरण : मासे प्रेमी असाल तर हे वाचून तुम्ही पाण्याची बाटली विकत घेताना हजारदा विचार कराल

प्लास्टिक बॉटल

फोटो स्रोत, Getty Images

ऑगस्ट 1997 मधली ही गोष्ट. कॅप्टन चार्ल्स मूअर त्यांच्या सर्वांत प्रिय ठिकाणी होते.... पॅसिफिक समुद्राच्या मधोमध. लहानपणापासूनच त्यांना सेलिंग आणि सर्फिंगची आवड होती, त्यामुळे ते नेहमीच अशी ठिकाणं शोधत जिथे मानव कधीच पोहोचला नसावा.

पण त्या दिवशी बोटीच्या डेकवरून त्यांना जे दिसलं, त्यामुळे ते निराशच झाले... अथांग निळ्या, निर्मळ समुद्राऐवजी नुसता प्लास्टिकचा कचरा.

आपण वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट आणि चिप्सचे पाकीट, बॉटल कॅप्स आणि इतर तुकड्यांनी भरलेला हा पट्टा सागरात बऱ्याच काळापासून तरंगत होता, असं दिसलं.

याला आज द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच म्हटलं जातं. आणि हेच आपण निर्माण केलेल्या प्लास्टिक समस्येचं प्रतीक बनलंय.

या गार्बेज पॅचमध्येही मोठ्या प्रमाणावर होत्या त्या प्लास्टिकच्या बाटल्या, ज्या आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी वापरल्या आहेत आणि वापरून फेकल्यात.

एका अभ्यासानुसार 2050पर्यंत जगातल्या समुद्रात माशांऐवजी प्लास्टिकच जास्त असेल. मग आपण किमान प्लास्टिकचा अनावश्यक वापर का नाही टाळू शकत?

यंदा, पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत, की आपण प्लास्टिक बॉटल्सचा वापर बंद करू शकतो का? किंवा यावर बंदी घालणं शक्य आहे का?

ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्टचा संपूर्ण एपिसोड इथे -

ऑडिओ कॅप्शन, ऐका विशेष पॉडकास्ट: प्लास्टिक बॉटलचा वापर आपण बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची

द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच

1997 मध्ये कॅप्टन चार्ल्स मूअर यांना जेव्हा पहिल्यांदा द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच दिसला, तेव्हा त्यात काय काय होतं? ते सांगतात की त्यात दूरदूरवर नुसतं प्लास्टिकच दिसत होतं. यात सागरी डायवर्सचे कपडे आणि उपकरणं, कचरा गोळा करायची जाळी आणि एक मोठी घंटीसुद्धा होती.

हे संकट किती गंभीर आहे, याची जाणीव झाल्यावर त्यांचं मन विचलित झालं. अखेर त्यांनी समुद्रात त्याच ठिकाणी परत जायचं ठरवलं, आणि त्या प्लास्टिक तुकड्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली.

मग त्यांना तिथे इतका कचरा सापडू लागला की हे सगळं धक्कादायकच होतं. किनाऱ्यापासून इतक्या दूर समुद्रात सागरी जीवांपेक्षा जास्त प्लास्टिकच होतं, असं ते सांगतात.

हे पाहून त्यांनी यावरच संशोधन करायचं ठरवलं. तेव्हापासून त्यांनी त्या पॅचला अनेकदा भेट दिलीय, आणि प्रत्येक वेळी तो एका असुरासारखा मोठा झालेला दिसला.

कॅप्टन चार्ल्स मूअर

फोटो स्रोत, ALGALITA

"मला हे सांगायलाही वाईट वाटतंय पण एक शास्त्रज्ञ म्हणून मी सांगायलाच हवं, की 1999 पेक्षा आज तो पॅच 60 पट मोठा आहे. कधीकधी हेही सांगणं अवघड असतं की मी कुठे बंदराशेजारी आहे की पसिफिक समुद्राच्या मधोमध," असं ते सांगतात.

हा कचऱ्याचा मोठा पट्टा कॅलिफोर्निया ते हवाई या दरम्यानच्या समुद्रात सगळीकडे आहे. पण यातला कचरा जगभरातून इथे आलेलाय, समुद्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहांमुळे. म्हणजे चीन किंवा इंडोनेशियामध्ये वापरून फेकलेली बॉटलसुद्धा या पॅचपर्यंत वाहून आलेली असू शकते.

कल्पना करा की समुद्राची किनारपट्टी एका बाथटबच्या काठासारखी आहे. समुद्रातल्या लाटा या किनाऱ्याला धडकून माघारी येतात, आणि हे असं सगळ्या बाजूंनी होतं, त्यामुळे हा प्रवाह मधोमध सारंकाही वाहून आणतो.

कॅप्टन मूअर सांगतात की पॅसिफिकचा पॅच जगातला एकमेव पॅच नाहीय. ते सांगतात की असाच एक वेस्टर्न गारबेज पॅच आहे. जपानजवळ, साऊथ पॅसिफिक गारबेज पॅच ही इतकाच भयंकर आहे. असेच बाकीचेही आहेत, दक्षिण अटलांटिक, उत्तर अटलांटिक आणि अगदी हिंदी महासागरातही. आज जगभरातल्या 40 टक्के समुद्रांमध्ये प्लास्टिकचे असे पट्टे पाहायला मिळतात.

समुद्रात असे प्लास्टिकचे पाच ट्रिलियन तुकडे तरंगत आहेत.

फोटो स्रोत, ALGALITA

समुद्रात असे प्लास्टिकचे पाच ट्रिलियन तुकडे तरंगत आहेत. आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. यामुळे सहाजिकच सागरी जीवनावर परिणाम होतोय.

मासे, कासव आणि इतर सागरी जीव एकतर या प्लास्टिकच्या जाळ्यांमध्ये, बाटल्यांच्या झाकणात आणि विविध पॅकेजिंगच्या कव्हरमध्ये अडकून मरतात किंवा याचे बारीकसारीक रंगीबेरंगी तुकडे गिळून. दररोज शेकडो जीव आपण यामुळे गमावतोय.

"आपण त्यांना एकप्रकारे विष देतोय आणि ते आता आपल्यापर्यंत परतही येतंय. युरोपात मासे आणि खेकडे खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पोटात वर्षाला सरासरी 11 हजार प्लास्टिक कण जातात," असं कॅप्टन मूअर सांगतात.

प्लास्टिकचे हे कण आपल्या शरीरावर कसा परिणाम करतात, यावर संशोधन आजही सुरूय. पण यामुळे संप्रेरकांचं असंतुलन आणि वंध्यत्वासारख्या समस्या उद्भवू शकतात, असा एक अंदाज आहे.

कॅप्टन मूअर सांगतात की या सागरी कचऱ्यात एक वस्तू जी सर्वांत जास्त आढळते ती म्हणजे प्लास्टिक बॉटल्स. हो, त्याच बॉटल्स ज्यातून आपण कोल्ड ड्रिंक्स आणि पाणी पीत असतो. यांचं झाकण लागलं असेल तर या बाटल्या तरंगतात आणि जर झाकण नसेल तर त्या खाली तळाशी जातात.

समुद्रतळाशी बाटल्यांचे वेगळे गार्बेज पॅचेस आहेत, जे मोठेच होत जाणार आहेत, असं कॅप्टन मूअर सांगतात. पण आपल्या जगात प्लास्टिकच्या एवढ्या बाटल्या आल्या तरी कुठून?

बाटलीबंद पाण्याचा उगम

कॅलिफोर्नियात राहणारे पीटर ग्लिक एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरवर Bottled and Sold- The story of our obsession with Bottled Water हे पुस्तक लिहिलंय. ते सांगतात की, "आत्ता मी तुम्हाला हे नक्कीच सांगू शकतो की तुम्हाला पाण्याची बॉटल कुठे विकत मिळेल, पण जवळचं प्याऊ कुठे आहे, मलासुद्धा माहिती नाही."

पण बाटलीबंद पाण्याचा जन्म कुठे झाला? आणि याची गरज का भासली? पीटर ग्लिक सांगतात की जवळजवळ 100 वर्षांपूर्वी असं मिनरल वॉटर स्पामध्ये एका आरोग्यदायी पेय म्हणून विकलं जायचं. पण असं पाणी कमर्शियल पातळीवर विकण्याचा विचार अगदी 70च्या दशकापर्यंत रुळला नव्हताच.

आणि ही बाटलीबंद पाण्याची फॅशन आणली कुणी? तर फॅशनचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या फ्रान्सनेच. "सत्तरच्या दशकात ऑरसन वेल्स यांच्या भारदस्त आवाजात पेरिए (Perrier) या कंपनीने बाटलीबंद पाणी विकायला सुरुवात केली. जणुकाही हे आरोग्यासाठी अमृततुल्य असं पाणी थेट धरणीच्या पोटातूनच आणण्यात आलंय."

प्लास्टिक बॉटल

फोटो स्रोत, Getty Images

पण पेरिएच्या या बाटल्या काचेच्या होत्या, वजनदार होत्या आणि त्या सहज फुटतील अशा. पण त्याच दरम्यान, 70च्या दशकात एका क्रांतिकारी बॉटलचा जन्म झाला. ती ती आपली आजची पाण्याची PET बॉटल असते. हे PET म्हणजे Polyethylene Terephthalate.

ग्लिक सांगतात की "हे कमालीचं प्लास्टिक होतं, कारण यामुळे ना अन्नाला कुठली चव यायची, ना कुठलं केमिकल रिॲक्शन. हे स्वस्त होतं, हाताळायला सोपं होतं आणि पाण्यासाठी एकदम परफेक्ट!"

प्रगत देशांमध्ये बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांपुढे एक आव्हान होतं - तिथे आजही पालिकेच्या नळाला येणारं पाणी पिण्याजोगं आहे.

ठिकठिकाणी सार्वजनिक प्याऊ किंवा फाउंटेन आहेत, आणि घरोघरी नळाची लाईन जाते. मग लोक बाटलीबंद पाणी का विकत घेणार? इथेच कामी येतं ॲडव्हर्टायझिंग.

जाहिरातबाजी करून कंपन्या लोकांना हे सांगू लागले की तुम्ही हे पाणी पिऊन जास्त लोकप्रिय, निरोगी, कूल आणि सेक्सी होऊ शकता.

तुम्हाला फ्रेंड्स या प्रसिद्ध अमेरिकन सीरिजमधली रेचल आठवते? हो, तीच जेनिफर ॲनिस्टन हे पाणी विकतेय. पीटर ग्लिक सांगतात की "तिच्या ॲडमध्ये नेहमी तिच्या सौंदर्याचा उल्लेख केला जातो, तिच्या सेक्स अपीलचा उल्लेख केला जातो. जणुकाही हे पाणी पिऊनच तिने हे सगळं कमावलंय, असं सांगण्याचा प्रयत्न असतो."

पण जर हेही तितकं आकर्षक वाटत नसेल तर अनेकदा ही मिनरल वॉटरची ॲड हिमालय किंवा कुठल्या बर्फाळ प्रदेशातून सुरू होते. असं दाखवलं जातं की एखादी व्यक्ती हिमनग तोडून त्याला वितळवून थेट बाटलीत बंद करून आणतेय. कितीही काही करा, तरी पाणी ते पाणीच असतं.

आणि एवढं सांगूनही खपत नसेल तर तुम्हाला भीती दाखवली जाते. ग्लिक सांगतात की त्यांनी एक ॲड पाहिली होती जे सांगत होती की, "तुमच्या नळाला येणारं पाणी किती सुरक्षित आहे, माहितीय?"

अर्थात तुम्ही तेच पाणी पीत असता, पण तरीही तुमच्या मनात एक संशय आणि भीती निर्माण करून बाटलीबंद पाणी विकायचाही प्रयत्न केला जातो. पण जर माझ्या किचनमधल्या नळाला येणारं पाणी सुरक्षित नाहीय तर त्याचं सोल्युशन बॉटल्ड वॉटर नाहीय. ते पाणी स्वच्छ करणं गरजेचं आहे.

आणि जरी तसं झालं तरी आपण मिनरल वॉटरच्या बाटल्यांवर बंदी आणू शकतो का?

सॅन फ्रान्सिस्कोची बंदी

आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला, तरी कधी ना कधी पाणी प्लास्टिकच्या बाटलीनेच प्यावं लागतं, असं डेव्हिड च्यू यांच्या अनुभवातून आपल्या लक्षात येतं.

ते सॅक्रमेंटोमध्ये कॅलिफोर्नियाच्या विधानसभेचे सदस्य होते. 2017 मध्ये त्यांनी एक कायदा आणला ज्यानुसार सॅन फ्रान्सिस्कोमध्ये टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बॉटलचा वापर संपवला जाणार आहे.

2013 साली सॅक्रमेंटोमध्ये एक स्थानिक नेते म्हणून ते याच प्लास्टिकच्या कचऱ्याने चिंतेत पडले होते.

"एका अंदाजानुसार एकट्या अमेरिकेत टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटलांनी तुम्ही पृथ्वीची दोनवेळा प्रदक्षिणा घालू शकता. दुसऱ्या एका सर्फरने आमच्या किनारपट्टीवर या बाटल्या पाहिल्या आहेत. मग जेव्हा आमच्या काही कॉलेज आणि विद्यापीठांच्या कॅपसमधून बाटलीबंद पाणी हद्दपार करण्यात आलं, तेव्हा मी म्हटलं, आपल्या शहराने हे का करू नये?"

मग च्यू एक निर्णय घेतला - की सर्व नगर पालिकेच्या सार्वजनिक ठिकाणी, म्हणजे उद्यानं, कार्यालयं आणि इतर ठिकाणी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालावी.

अगदी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, कॉन्सर्ट्स आणि इव्हेंट्समध्येही पाण्याच्या बाटल्या विकण्यावर बंदी घालण्यात आली आणि लोकांना बाटलीबंद पाणी पिण्यापासून परावृत्त करण्यात आलं.

प्लास्टिक बॉटल

असा कुठला निर्णय घेणारं सॅन फ्रॅन्सिस्को पहिलं मोठं शहर होतं. पण हो, सुपरमार्केट्स आणि इतर ठिकाणी मिनरल वॉटरच्या बाटल्या अजूनही उपलब्ध होत्याच.

"प्लास्टिक बॉटल्सवर संपूर्ण बंदी घालणं, तेसुद्धा इतक्या तडकाफडकी, शक्य नव्हतं. आम्हाला अनेक महिने लागले याच्या नियमांमधली संधिग्धता दूर करायला आणि लोकांना त्यांच्यापुढचे पर्याय समजावून सांगायला," असं ते सांगतात.

पर्याय जसे की, लोकांना स्वतःच्या स्टीलच्या बाटल्या वापरलाय प्रोत्साहित करणं, शहरात जागोजागी प्याऊ आणि पेयजलाचे फाउंटेन उभारायला गुंतवणूक करणं.

शहरात कुठल्याही कार्यक्रमादरम्यान मोठे पाण्याचे टँक लावले गेले. पण हे एवढं करूनही हे साधं पाणी जाहिरातबाजीपुढे टिकाव धरणारं नव्हतं. त्यामुळे सॅन फ्रॅन्सिस्कोने स्वतःची एक मोहीम हाती घेतली.

डेव्हिड च्यू सांगतात, "आम्ही एक मोहीम आखली - आमच्या शहरात येणारं पाणी हेचहेची नावाच्या उत्तर कॅलिफोर्नियातील एका हिमपर्वतातून येतंय. तिथलीच हिमनदी वितळून जर इथवर हे पाणी येत असेल तर आम्ही विचार केला, याचं आम्ही ब्रँडिंग का नाही करावं? आता हे हेचहेची पाणी म्हणूनच ओळखलं जातं."

पण सर्वच लोकांना हे काही पटलं नव्हतं. पण असं असलं तरी या मिनरल वॉटर बंदीचा काही परिणाम झाला का? च्यू सांगतात की त्यांच्या शहरात आता कोणताही मोठा इव्हेंट असतो, कॉन्सर्ट किंवा राजकीय सभा असते, तेव्हा तो कार्यकम संपल्यावर आम्हाला तिथून प्लास्टिक बाटल्या नाही उचल्याव्या लागत.

हा खरोखरंच एक मोठा इम्पॅक्ट आहे, असं त्यांना वाटतं, पण याबद्दलचा नेमका डेटा डेव्हिड चू यांच्याकडे उपलब्ध नव्हता. पण ते सांगतात त्याप्रमाणे जरी मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा खप कमी झाला असेल तर एक शंका हीसुद्धा असू शकते की लोक पर्यायी बाटल्या घेत असतील, जसं की कोल्डड्रिंक्स किंवा फ्रूट ज्यूस.

"आमच्या तरी असं लक्षात नाही आलंय की लोक पर्यायी ड्रिंक्स घेऊ लागले असतील, पण आम्ही त्याही आकडेवारीवर लक्ष ठेवू."

या कोल्डड्रिंक्सच्या बाटल्यांवर बंदी घालणं सहज शक्य नाहीय. कारण त्यांना पर्याय सहज उपलब्ध नाहीत. म्हणूनच डेव्हिड सांगतात की ते लोकांपर्यंत हा संदेश स्पष्टपणे पोहोचवायचा प्रयत्न करत आहेत की त्यांच्या नळांतून येणारं पाणी किती स्वच्छ आहे.

हे तर झालं एका शहराचं. आपण अशीच सगळीकडे पाण्याच्या बाटल्यांवर बंदी आणू शकतो का?

प्लास्टिक कुठे टाकायचं?

"जेव्हा मी अशा देशांमध्ये प्रवास करते, जिथे कचऱ्याचं नियोजन योग्यरीत्या होतंय, याची मला खात्री नसते, तेव्हा मी माझा सगळा प्लास्टिक कचरा माझ्या बॅगेतच घेऊन फिरते आणि मायदेशी नेदरलँडला परतल्यावरच त्याची विल्हेवाट लावते," असं पर्यावरण शास्त्रज्ञ लिलियाना रॉडिचविएस्मा सांगतात.

प्लास्टिक प्रश्नावर त्या त्यांच्यापुरतं हे कचऱ्याचं ओझं वाहून नेतात. पण पृथ्वीसाठी काय? प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालावी का?

"प्लास्टिक बॉटलवर संपूर्ण बंदी आपल्या प्रश्नाच्या उत्तराचा एक भाग असू शकतो, पण आपलं संपूर्ण उत्तर नाही. याला इतर पर्यायांची जोड द्यावी लागेल, ज्यामुळे प्लास्टिक बॉटलची लोकांची आवश्यकता पूर्ण होईल," असं त्या सांगतात.

प्लास्टिक बॉटलचा कचरा

फोटो स्रोत, Getty Images

लिलियाना यांच्यानुसार, पाण्याच्या बाटलीवर बंदी घालता येईल, पण कोल्डड्रिंक्स किंवा ज्यूसच्या बाटल्यांवर बंदी घातली तर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण होईल, कारण त्यांना दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नाही. मग यासाठी काय करायला हवं?

"आपण पर्यायांचा विचार करण्यापासून सुरुवात करू शकतो. आपल्या इंजिनिअर्सनी सर्वच गोष्टींना पर्याय शोधून काढलेत, तर मग याचा का नाही? पण सध्या आपण हा विचार करण्यापासूनही खूप दूर आहोत," असं त्यांना वाटतं.

आज जगभरात दर मिनिटाला 10 लाखांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्या विकल्या जातात, वर्षाला किमान 400 अब्ज. मग याचा विचार करायला आपण कुठून सुरुवात करू शकतो?

"आत्ताच्या घडीचा कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंग खूप महत्त्वाची भूमिका बजावतायत. प्लास्टिक बाटल्यांचा कचरा योग्य त्या घनकचरा नियोजन प्रणालीमध्येच जाईल, कुठे उघड्यावर किंवा नदी-समुद्रात जाणार नाही, याची खात्री करणं खूप आवश्यक आहे," त्या सांगतात.

प्लास्टिक बॉटलचा कचरा

फोटो स्रोत, Getty Images

इथेच मोठी तफावत जगभरात पाहायला मिळते. युके, जर्मनी, अमेरिकेसारख्या देशांमध्ये ही यंत्रणा सुयोग्य आहे, पण समुद्रात बहुतांश प्लास्टिक कचरा हा प्रगतिशील देशांमधून येतो, जसं की चीन, इंडोनेशिया आणि फिलीपीन्समधून. लिलियाना सांगतात की या देशांमध्ये पायाभूत सोयीसुविधा अजूनही अपुऱ्या आहेत, त्यासोबतच घनकचरा व्यवस्थापनही तिथे नीट होत नाही.

तर आता चार तज्ज्ञांशी चर्चा केल्यावर आपण, आपल्या आजच्या प्रश्नावर पुन्हा एकदा विचार करू या... की आपण खरंच प्लास्टिकच्या बॉटलवर बंदी आणू शकतो का?

आपण किती प्लास्टिक कचरा जनरेट करतो, हे आपल्या तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलंय. प्लास्टिक बाटल्यांवर काही प्रमाणात बंदी आणून एका शहरात काय फरक पडला हेही आपण पाहिलं.

पण हो, यावर संपूर्ण बंदी आणून काही अर्थ नाही, कारण पर्याय शोधले नाहीत तर गोंधळ उडेल. यासाठी आवश्यक आहे की घनकचरा व्यवस्थापन नीट व्हावं आणि प्रयत्न करावा की हा कचरा समुद्रात जाणार नाही. नाहीतर खरोखरंच आपल्या समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असेल आणि त्या माशांच्या पोटातही प्लास्टिक असेल.

ऑडिओ कॅप्शन, ऐका विशेष पॉडकास्ट: प्लास्टिक बॉटलचा वापर आपण बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)