समुद्रात पसरत जाणारं हे सागरी शेवाळ मोठं आव्हान का ठरत आहे?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, GETTY IMAGES

1492 सालची गोष्ट. अटलांटिक महासागरात प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर अचानक एक मोठं संकट उभं राहिलं, ज्याची त्या दर्यावर्दींनी कल्पनाही केली नव्हती.

त्यांच्या जहाजासमोर मैलोनमैल दूर दाट शेवाळ पसरलं होतं. आपलं जहाज त्यात अडकून बुडणार तर नाही ना, अशी चिंता त्या खलाशांना सतावत होती.

आता पाचशे वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच सरगॅसम नावानं ओळखलं जाणारं लाखो टन सागरी शैवाल जगासमोर मोठं आव्हान म्हणून उभं राहिलं आहे.

मोठ्या प्रमाणात हे सागरी शैवाल कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर पोहोचतंय. त्यामुळे तिथल्या रहिवाशांच्या आरोग्याला आणि अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे.

हे सरगॅसमचं आव्हान काय आहे, याच प्रश्नाचं उत्तर आपण गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत.

महाकाय शैवाल

सरगॅसमबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसीने फ्लोरिडा विद्यापीठातील समुद्रशास्त्राचे प्राध्यापक चौनमिन हू यांच्यासोबत चर्चा केली. 20 वर्षांपासून ते सरगॅसमचा अभ्यास करत आहेत.

चौनमिन हू सांगतात की सरगॅसम ही एकपेशीय वनस्पती पाण्यात उगवणाऱ्या शेवाळासारखी आहे.

ते म्हणतात, “बहुतांश सरगॅसम उत्तर अटलांटिक महासागराचा भाग असलेल्या सरगासो समुद्रात आढळतात. सरगासो समुद्राचं नावंच या शैवालावरून पडलंय. सरगॅसममध्ये बिया नसतात परंतु लहान फांद्या असतात ज्या वाढत जातात, आणि हळूहळू चादरीसरखे समुद्राच्या पृष्ठभागावर पसरत जातात."

समुद्रात तरंगणारी ही सरगॅसमची चादर काही कारणानं तुटते, तेव्हा त्याचे अवशेष समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चौनमिन सांगतात की या शेवाळाची पानं मोठी आणि रंगानं हलकी पिवळी किंवा भुरकट असतात. या शैवालाचा अभ्यास कसा केला जातो, याविषयी चौनमिन माहिती देतात.

चौनमिन हू म्हणाले, “सरगॅसमचा रंग समुद्राच्या पाण्याच्या रंगापेक्षा वेगळा दिसतो. त्यामुळे अवकाशात पृथ्वीभोवती फिरणाऱ्या सॅटेलाईट म्हणजे उपग्रहांद्वारे आम्ही संपूर्ण अटलांटिक महासागरावर लक्ष ठेवतो.

"अटलांटिक महासागराची सॅटेलाईट छायाचित्रे दररोज काढली जातात ज्याच्या आधारे आम्ही तिथे अस्तित्त्वात असलेल्या सरगॅसमवर लक्ष ठेवू शकतो.

"एखाद्या ठिकाणी किती सरगॅसम आहे किंवा अगदी कमी प्रमाणात सरगॅसम असेल, तरी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ते शोधता येतं. आम्ही माहिती जमा करत राहतो आणि दर महिन्याला या डेटाची सरासरी काढतो."

2011 मध्ये सरगॅसमचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं, तेव्हा त्याला ‘ग्रेट सरगॅसम ब्लूम’ असं म्हटलं गेलं.

चौनमिन हू म्हणाले, “आम्हाला असं आढळून आलंय की, पश्चिम आफ्रिकेपासून मेक्सिकोपर्यंत सरगॅसमचा पट्टा पसरत जातो. 2011 पासून दरवर्षी उन्हाळ्यात हे घडताना दिसतं.

“सरगॅसमची ही पट्टी अखंड तरी असते किंवा काही ठिकाणी या विशाल चादरीचे मोठे तुकडे तयार होताना दिसतात. हे लक्षणीय आहे, कारण याआधी सरगॅसम फक्त सरगॅसो समुद्रात आढळत असे. आता ते अटलांटिकच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातही आढळून येतंय. ”

शेवाळ

फोटो स्रोत, GETTY IMAGES

2011 नंतर सरगॅसम शैवाल नवीन ठिकाणी का पसरू लागलंय, याची कारणं अद्याप कळू शकलेली नाहीत.

चौनमिन हू यांच्या मते, 2010 साली हवामानात झालेले काही बदल हे याचं एक कारण असू शकतात. तेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे जोराचे वारे आणि समुद्राच्या पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत होता. वारा आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहांमुळे सरगॅसो समुद्रातलं सरगॅसम अटलांटिकच्या उष्णकटिबंधीय प्रदेशाकडे ढकललं गेलं.

मग 2011 मध्ये या शैवालास सूर्याकडून पुरेशी उष्णता आणि पोषण मिळालं आणि त्याची वेगाने वाढू होऊ लागली. चौनमिन हू आणि त्यांच्या टीमला त्यांच्या सरगॅसमच्या अभ्यासादरम्यान त्यामध्ये आर्सेनिक धातूचे अंश असल्याचं आढळून आलंय.

चौनमिन हू म्हणाले, “आमच्याकडे सरगॅसमचे पुरेसे नमुने नाहीत, ज्याच्या आधारे काही ठोस निष्कर्ष काढता येईल. पण किनाऱ्याजवळील सरगॅसममध्ये प्रदूषणकारी घटकांचं प्रमाण जास्त असतं तर समुद्रात आतमध्ये असलेल्या शैवालात ते कमी होतं.

"अनेक ठिकाणी सरगॅसममध्ये आर्सेनिकचे प्रमाण सुरक्षित पातळीपेक्षा जास्त होतं. गेल्या पाच वर्षांत सरगॅसमचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त वाढलंय. पुढील वर्षी त्यात आणखी वाढ होईल की नाही हे सांगणं कठीण आहे. पण येत्या पाच-दहा वर्षांत त्यात वाढ होईल, असा अंदाज आहे.

शैवालचे काही फायदे

द सरगासो सी कमिशनचे कार्यकारी सचिव डेव्हिड फ्रीस्टोन यांना खात्री वाटते की सागरी जैवविविधतेसाठी सरगॅसम अत्यंत फायद्याचं आहे.

ते सांगतात, "सरगासो समुद्र नेमका कुठे आहे? तो अटलांटिकमधील बर्म्युडा बेटांभोवती पसरलेला आहे.

"लोकांना वाटतं की बर्म्युडा हा कॅरिबियन बेटांचा भाग आहे, परंतु प्रत्यक्षात तो अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनाला समांतर आहे. या सरगासो समुद्राला आम्ही ‘सीमा नसलेला सागर’ असंही म्हणतो.

"बर्म्युडाच्या सभोवतालचं पाणी अंदाजे चार हजार मीटर खोल आहे. सरगॅसम शैवाल पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असल्याने त्याच्या खाली विविध प्रकारचे लहान-मोठे मासे राहतात, कासव आणि इतर सागरी जीव वाढतात.

"सरगॅसोची सागरी कासवं नामशेष होण्याच्या मार्गावर असून जी काही वाचली आहेत ती केवळ सरगॅसममुळे वाचली आहेत. सरगॅसममुळे ही संपूर्ण जैवविविधता भरभराटीला येते.

शेवाळ

फोटो स्रोत, Getty Images

पण मानवी हस्तक्षेपांमुळे सरगॅसमला धोका निर्माण होतो आहे.

डेव्हिड फ्रीस्टोन माहिती देतात की सरगासो समुद्राच्या एका बाजूला युरोप आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका आहे. हा एक प्रमुख जलमार्ग आहे. बोटींमुळे सरगासो समुद्रातील सरगॅसमच्या मोठ्या चादरी कापल्या गेल्या आहेत. बोटींच्या दळणवळणाचा त्यांच्यावर विपरित परिणाम होतोय.

सरगॅसमचं नुकसान होण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे मत्स्य उद्योग.

फ्रीस्टोन सांगतात, “आम्ही 2010 मध्ये आम्ही हा प्रकल्प सुरू केला तेव्हा या भागात फारच कमी मासेमारी केली जात असे. गेल्या पाच वर्षांत त्यात मोठी वाढ झाली आहे.

"अनेक सागरी प्राणी माकुल म्हणजे स्क्विड वर अवलंबून असतात. चीनने पूर्व दिशेला सरगासो समुद्रात स्क्विड पकडण्याचा उद्योग तिप्पटीने वाढवलाय. त्यामुळे सरगॅसो समुद्रातल्या परिसंस्थेवर वाईट परिणाम होतो आहे. ”

खोल समुद्राच्या पाण्यातलं वास्तव हे असं आहे. पण सरगॅसम जेव्हा किनाऱ्यावर येतं तेव्हा मात्र परिस्थिती अतिशय वेगळी असते.

शैवालमुळे होणारं नुकसान

डॉ. मेरी लुई फेलिक्स या सेंट लुसियामध्ये सर आर्थर लुईस कम्युनिटी कॉलेजमध्ये सागरी जीवशास्त्रज्ञ आहेत आणि पर्यावरण विज्ञानाच्या प्राध्यापक आहेत.

त्या सांगतात, की लहानपणापासूनच त्या सेंट लुसियाच्या किनाऱ्यावर सरगॅसम पाहत आल्या आहेत पण आता त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय.

त्या म्हणतात, “ही एक वेगळी प्रजाती आहे. गेल्या 12-13 वर्षांपासून सेंट लुसियामध्ये सरगॅसमची समस्या आहे. पण जून ते नोव्हेंबर दरम्यान सरगॅसमचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं."

डॉक्टर फेलिक्स यांना असं वाटतं की, 2023 पेक्षा दोन-तीन वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच वाईट होती. दोन वर्षांपूर्वी सागरी किनार्‍यापासून तीस फूट अंतरापर्यंत सरगॅसमचा दाट थर पसरला होता.

सरगॅसम कुजू लागतं, तेव्हा त्यातून हायड्रोजन सल्फाइड वायूचं उत्सर्जन होतं ज्याचा वास कुजलेल्या अंड्यांसारखा येतो.

एवढंच नव्हे तर डोळे जळजळणे, चक्कर येणे, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पोट खराब होणे असे त्रास होऊ शकतात. लहान मासे या सरगॅसममध्ये अडकतात आणि सडू लागतात.

शेवाळ

फोटो स्रोत, GETTY IMAGES

डॉ. मेरी लुई फेलिक्स म्हणाल्या, “किना-यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर सरगॅसम जमा होतं की त्याची जणू कित्येक फूट लांब जाड भिंत तयार होते. अनेक छोटे मासे आणि इतर छोटे सागरी जीव त्यात अडकतात आणि सडायला लागतात.

"तुम्ही कल्पना करू शकता की यानं किती घाण वास येत असेल. मग त्याचा किनार्‍यावरील जीवनावर किती गंभीर परिणाम होतो. "

हायड्रोजन सल्फाइड हवेत विरघळतं आणि पाण्याच्या छोट्या थेंबात रूपांतरित होतं, ज्यामुळे अनेक महागडी घरगुती उपकरणं गंजू लागतात किंवा खराब होतात.

डॉ. मेरी लुई फेलिक्स म्हणाल्या, “तीन वर्षांपूर्वी मी एक सर्वेक्षण केलं होतं. तेव्हा अनेकांनी सांगितलं की त्यांचा फ्रीज, टीव्ही, कुलर आणि म्युझिक सिस्टीम यांसारखी इलेक्ट्रिक उपकरणं खराब होत आहेत. इथे राहणारे बहुतांश लोक गरीब आहेत, त्यांचं यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं.

"मासेमारी करणाऱ्या बोटींची इंजिनं शेवाळामुळे बिघडतात आणि ते समुद्रात जाऊ शकत नाहीत.

"आमची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. नौका आणि आलिशान जहाजंही इथे येतात आणि बहुतांश हॉटेल्स समुद्रकिनारी बांधलेली आहेत. सरगॅसमच्या दुर्गंधीमुळे लोकं हॉटेलमध्ये राहण्यास नकार देतात. पर्यटनावर याचा नकारात्मक परिणाम झालाय "

पर्यटनावर परिणाम झाल्यामुळे संबंधित रोजगारावरही परिणाम झालाय. सरगॅसम काढून टाकण्यासाठी तीन गोष्टी करता येतात, पण त्या सरगॅसमच्या प्रमाणावर अवलंबून आहेत.

शेवाळ

फोटो स्रोत, GETTY IMAGES

सरगॅसम कमी प्रमाणात जमा होत असेल तर ते तिथेच सोडून देता येईल. पण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सरगॅसम साचत असेल, तर ते काढण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागेल. त्यासाठी हजारो डॉलर्स खर्च होतील आणि सामान्य लोकांनाही साफसफाईमध्ये सहभागी व्हावं लागेल. हा खर्च उचलणं सरकारला परवडणार नाही.

सरगॅसममध्ये भरपूर मीठ असतं, त्यामुळे ते जमिनीवर टाकता येत नाही, कारण त्यानं शेतजमिनीची गुणवत्ता खालावते. कॅरिबियन प्रदेशात फ्रान्सची अनेक बेटं आहेत, त्यामुळे हा देश सरगॅसमच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पैसे गुंतवत आहेत. अमेरिकेतही या विषयावर बरंच संशोधन सुरू आहे.

मेरी लुई फेलिक्स सांगतात की, "सरगॅसम कशासाठी वापरता येईल का यावरही बरंच संशोधन सुरू आहे. त्याचा वापर खत किंवा बायोगॅस बनवण्यासाठी करता येईल का? ते स्वच्छ करून पशुखाद्य म्हणून वापरलं जाऊ शकतं का? ही प्रादेशिक समस्या असून अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठे त्यावर संशोधन करत आहेत. "

हे झाले सरगॅसम किना-यावर पोहोचल्यावर करायचे उपाय. पण हे शैवाल समुद्रकिनाऱ्यावर पोहोचणार नाही, यासाठी काय करायचं?

महासागरातल्या थेंबासारखं यश

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लेमोंट डोहोर्टी अर्थ ऑब्झर्व्हेटरीमध्ये काम करणारे सागरी जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक अजित सुब्रमण्यम म्हणतात, सरगॅसमला किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याची गरज आहे.

ते सांगतात की रोबोटिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने पाण्यावर तरंगणारं सरगॅसम किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच गोळा करून समुद्राच्या तळाशी टाकता येऊ शकतं.

“रोबोटिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपल्याला दररोज 100 टन सरगॅसम समुद्राच्या तळाशी टाकता येईल. आम्हाला वाटतं की त्यानं ही समस्या सोडवता येऊ शकते.

"आम्ही याविषयी थोडंफार काम केलं आहे आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की समुद्रात सरगॅसम किती प्रमाणात आणि किती खोलवर टाकता येईल आणि सरगॅसमचं गॅस मोड्यूल फुटणार नाही."

शेवाळ

फोटो स्रोत, Getty Images

गॅस मोड्यूल फुटल्यामुळे बाहेर पडणाऱ्या वायूमुळे सरगॅसम पाण्यावर तरंगत राहतं. गॅस मोड्यूल फुटू न देता सरगॅसमला खोल समुद्रात नेलं, तर पाण्याचा दाब सरगॅसमला खाली ढकलू शकतो. हे करण्यासाठी सरगॅसमचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे.

प्रोफेसर अजित सुब्रमण्यम म्हणाले, “सरगॅसम समुद्राच्या तळाशी दोन हजार मीटर खोलवर गाडल्यास त्याचं काय होतं हे संशोधनाद्वारे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.

"तिथे सडून त्याचं विघटन होण्यास किती वेळ लागतो, ते किती ऑक्सिजन शोषून घेतं आणि त्याचा समुद्रतळाच्या वातावरणावर काय परिणाम होतो. सरगॅसममधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूचा काय परिणाम होईल?

"मला वाटतं की, समुद्राच्या तळाशी पाण्याच्या प्रवाहांमुळे सरगॅसममधून बाहेर पडणारे विषारी घटक पातळ होतील, म्हणजेच त्यांची तीव्रता कमी होईल. आणि हे समुद्रकिना-यावर मोठ्या प्रमाणात सरगॅसम गोळा होण्यापेक्षा कमी हानिकार ठरेल असं मला वाटतं.

"परंतु असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची ठोस उत्तरं अद्याप आमच्याकडे नाहीत. ”

शेवाळ

फोटो स्रोत, GETTY IMAGES

चौनमिन हू यांचं संशोधन सांगतं की, अटलांटिकच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील सरगॅसममध्ये सुमारे साडेतीन लाख टन कार्बन अस्तित्वात आहे.

मग हे शैवाल पाण्याच्या पृष्ठभागावरून काढून समुद्राच्या तळाशी टाकल्याने पर्यावरणावर त्याचे विपरित परिणाम होतील का? शास्त्रज्ञांसमोर असाही प्रश्न आहे की, पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास ते उपयुक्त ठरू शकेल का?

प्राध्यापक अजित सुब्रमण्यम म्हणाले, “ेहे इतके महत्त्वाचे प्रश्न आहेत की त्यांची उत्तरं आपल्याला शोधायला हवीत.

"सरगॅसम शंभर-दोनशे वर्षे समुद्रतळाशी राहिल्यास त्याचे काय परिणाम होतील हे समजून घेतलं पाहिजे. त्यातून किती वेळात कार्बन उत्सर्जित होईल? हे आपण गांभीर्याने समजून घेतलं पाहिजे.

"आपण समुद्रात एकाच ठिकाणी दहा लाख टन सरगॅसम टाकू शकत नाही. बार्बाडोस, अँटिग्वा आणि पोर्तो रिको, यांसारख्या ठिकाणांहून ते गोळा करून त्याचं लहान भागांमध्ये वितरण करून ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकावं लागेल.

"साहजिकच याचा परिणाम हळूहळू समुद्रतळावर होईल. पण त्याचा किनारपट्टीवर किती मोठा परिणाम होतोय हे आपल्याला माहित्येय. आपल्याला दोन्हीची तुलना करून कमी नुकसान करणारा पर्याय निवडावा लागेल.”

मग सागरी शैवाल-सरगॅसमचा प्रश्न कसा मिटवायचा?

पाण्यात तरंगणाऱ्या सरगॅसमवर अनेक सागरी जीव अवलंबून असतात, पण मासेमारी उद्योग आणि बोटींच्या हालचालीमुळे हे शैवाल धोक्यात आलंय.

तसंच ज्या देशांमध्ये शेकडो टन सरगॅसम वाहून येऊन किनाऱ्यावर जमा होतं, तिथल्या समुदायांच्या आरोग्यावरच नाही तर अर्थव्यवस्थेवरही त्याचा वाईट परिणाम होतोय.

सरगॅसमची समस्या सोडवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ आणि संस्था संशोधन करतायत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, परिस्थिती हाताबाहेर जाते आहे आणि त्यावर लवकरच तोडगा काढण्याची गरज आहे.