एक छत आणि चार भिंतींच्या आत ढासळणारी धर्माची भिंत

- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, बनारस
समाजाच्या मानसकितेचा राजकारणावर आणि राजकारणाचा समाजावर परिणाम होत असतो. देशातील धार्मिक राजकारणाचा हिंदू आणि मुस्लीम समाजावर खोलवर परिणाम होतो आहे. अशा परिस्थितीत दोन्ही धर्मातील तरुण-तरुणी याच्याशी कसं जुळवून घेत आहेत, त्यातून कसा मार्ग काढत आहेत, त्याचं हृदयस्पर्शी विश्लेषण...
धर्माच्या राजकारणामुळे होणाऱ्या ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू आणि मुस्लीम एकाच खोलीत कसे राहत आहेत? त्यांच्यात आपापसात अविश्वास आहे का? धार्मिक तणावाच्या स्थितीत एकमेकांच्या नात्यातील अविश्वासाला ते कसा दूर करतात ?
काव्याची एखाद्या मुस्लीम तरुणीशी मैत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या दोघी बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) रुममेट आहेत आणि तिथेच त्यांची मैत्री झाली.
काव्याच्या मते नूर फातिमा खान शी मैत्री इतक्या लवकर होण्यामागचं कारण म्हणजे जेवण.
दोघींचीही आवड एकच आहे. दोघीही मांसाहार करतात. काव्या सांगते, "जेव्हा जेवण आणि संगीताची आवड सारखीच असते तेव्हा नातं निभावणं सोपं होतं."

काव्या तामिळनाडूतील आहे हे जेव्हा नूर फातिमा खानला कळलं, तेव्हा तिला वाटलं की दोघींमध्ये संवाद कसा होणार? नूर विचार करू लागली की इंग्रजीतून बोलावं लागेल. मात्र काव्यानं नूरशी हिंदीत बोलण्यास सुरूवात केल्यावर दोघींनी सुटकेचा निश्वास सोडला.
काव्या बऱ्याच वर्षांपासून उत्तर भारतात राहते आहे. त्यामुळे तिला हिंदी चागलं बोलता येतं. नूर म्हणते, "आम्हा दोघींच्या जेवणाच्या आवडी-निवडी सारख्याच आहेत. एकत्र राहताना हे देखील कळालं की आम्हाला एकाच प्रकारची गाणी आवडतात."
उत्तर प्रदेशातील नूर आणि तामिळनाडूतील काव्या या योगायोगानेच बीएचयूच्या कॅम्पसमध्ये रुममेट झाल्या. काव्याला जी खोली मिळाली होती ती तिला आवडत नव्हती. खोल्यांच्या वाटपानंतर शेवटी काव्या आणि नूर या दोघीच राहिल्या होत्या.
दोघींनाही आवडीची खोली मिळाली आणि त्या दोघी रुममेट झाल्या. दोघीजणी बीएचयूमध्ये फाइन आर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

नूर सांगते की एकत्र राहण्यास सुरूवात करून एक किंवा दोनच दिवस झाले असतील, काव्या आपल्या आईशी फोनवर तामिळ भाषेत बोलत होती. बोलताना ती वारंवार 'नूर' असा उल्लेख करत होती. काव्याच्या बोलण्यात आपलं नाव ऐकून नूर सावध झाली होती.
नूर ला असं वाटलं की आता तर दोनच दिवस झाले आहेत आणि काव्या आपल्या आईजवळ माझी तक्रार करते आहे. नूरला राहवलं गेलं नाही आणि तिनं काव्याला विचारलं की, "तू आपल्या आईशी बोलताना वारंवार माझं नाव का घेत होती?"
यावर काव्या जोरजोरात हसायला लागली आणि काही वेळ हसतच राहिली. त्यामुळे नूर खूपच चिडली होती.
मग काव्यानं तिला सांगितलं की तामिळ भाषेत नूर शब्दाचा अर्थ शंभर किंवा शे असा होतो. काव्यानं सांगितलं की ती आपल्या आईकडे पैशांबाबत बोलत होती. आज पाचशे रुपये खर्च झाले, परवा तीनशे खर्च झाले. जिथं-जिथं ‘शे’ येत होतं तिथं-तिथं काव्या 'नूर' शब्द वापरत होती.
आता नूर हसू लागली, हसतच राहिली आणि मग दोघींनी हसायला लागल्या.
दोघींच्या मैत्रीची सुरुवात अशी हसण्यातून झाली. मात्र दोघींच्या नात्यात रडणं देखील आहे, नाराजी देखील आहे आणि राग देखील आहे.
त्याविषयी सांगण्याआधी तुम्हाला मोहम्मद शाहिद आणि मनीष यांच्या खोलीत घेऊन जातो.

शाहिद आणि मनीष यांच्या खोलीत पाय ठेवताच अनेक चित्रांकडं लक्ष जातं. या खोलीकडे पाहिल्यावर असं वाटलं की दोघांनी आपलं दु:ख, राग, आनंद आणि स्वप्नांना कॅनव्हासचं रूप दिलं आहे.
फाइन आर्टचे विद्यार्थी असलेले हे दोघं शिल्पंदेखील बनवतात. शाहिदचे वडील गवंडी आहेत आणि मनीषचे वडील शिंपी आहेत. शाहिद आणि मनीष यांनी कठीण काळात मजुरीदेखील केली आहे. मात्र आता त्यांच्या हाती नवीन कौशल्य आलं आहे.
त्यात इतके रंग आणि आकृत्या आहेत की मूर्त आणि अमूर्त यामधील भेद नष्ट झाला आहे.
कुराण आणि देवी सरस्वती एकत्र
या दोघांच्या खोलीतील बुक शेल्फनं अचानक लक्ष वेधून घेतलं. बुक शेल्फच्या एका कोपऱ्यात कुराण आणि नमाज पढण्यासाठीची टोपी ठेवलेली आहे. तर त्याच्याबरोबर वर देवी सरस्वतीची मूर्ती आणि एक फोटो ठेवलेला आहे.

शाहिद सांगतो की तो या खोलीत नमाज पढतो आणि मनीष पूजा करतो. शाहिद कुराण आणि सरस्वतीची मूर्ती दाखवत सांगतो, "सर, भारत तर असाच असायला हवा ना?" शाहिदच्या बोलण्यावरून हे समजणं अवघड होतं की हा त्याचा प्रश्न आहे की त्याची इच्छा.
काव्या आणि नूर, शाहिद आणि मनीष, या तरुणांच्या आयुष्यात अनेक प्रश्न, अनेक स्वप्नं आणि अनेक अडचणी आहेत. मैत्रीच्या या दोन्ही जोड्यांच्या कॅनव्हासवरील रंगांच्या प्रवाहातील अडचणीदेखील एकसारख्याच आहेत.
भारतातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळं दोन्ही रुममेट्सच्या मैत्रीच्या कॅनव्हासवर अविश्वासाचे ढग दाटून आले, मात्र इतक्या लहान वयात देखील त्यांनी आपल्या नात्यांचा विसर पडू दिला नाही.

मी काव्या आणि नूर यांना विचारलं की उत्तर प्रदेशात जेव्हा केव्हा धार्मिक विद्वेषाच्या घटना होतात, तेव्हा त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होतो?
काव्या सांगते, "आम्ही दोघी यावर चर्चा करतो. एकदा नूरनं मला म्हणाली की ती मुस्लिम असल्यामुळं वाराणसीत तिला भाड्यानं खोली मिळत नाही.
“नूरनं असं सांगितल्यावर मी काही वेळ गप्प बसले आणि विचार करू लागले की तिच्यामध्ये हीन भावना निर्माण होऊ नये म्हणून मी तिला काय उत्तर देऊ. मी तिला समजावलं की मलासुद्धा दिल्लीत खोली मिळत नव्हती कारण मी मांसाहारी आहे. दक्षिण भारतातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू मांसाहारी आहेत.
“मी नूरला समजावलं की इथं फक्त धर्माच्याच आधारावर भेदभाव केला जात नाही तर जेवणाच्या आधारावर देखील भेदभाव केला जातो. या भेदभावाचा फटका हिंदूंना देखील बसतो.”
नूरच्या अपेक्षाभंग आणि निराशेच्या स्थितीत काव्या भक्कमपणे तिच्या पाठीशी उभी राहिली. शाहिदला मात्र आपल्या रुममेटशीच संघर्ष करावा लागला.
शाहिद सांगतो, “माझ्या गावात, शहरात आणि आसपासच्या लोकांकडून मुस्लीम असल्याबद्दल मला जे सहन करावं लागलं त्याची काही मोजदादच नाही. मात्र मनीषचा दृष्टीकोन देखील तसाच होता. आताचा मनीष आणि एक वर्षापूर्वीचा मनीष यामध्ये खूप फरक आहे."
शाहिदच्या मताशी मनीष सहमत आहे.

मनीष म्हणतो, "जर मला शाहिद भेटला नसता तर मी एक चांगला माणूस बनू शकलो नसतो. माझ्या मनात मुस्लिमांबद्दल अनेक प्रकारच्या धारणा होत्या. या तुम्ही द्वेष देखील म्हणू शकता.
“मला वाटायचं की या देशात मुस्लीम का आहेत? त्यांच्यासाठी तर पाकिस्तानची निर्मिती झाली आहे ना. पाकिस्तान वेगळा झाला तेव्हाच भारतातून सर्व मुस्लिमांना पळवून लावायला पाहिजे होतं. भारतात जेव्हा दहशतवादी हल्ला व्हायचा तेव्हा माझ्या मनात मुस्लिमांबद्दल कमालीचा द्वेष निर्माण व्हायचा."
कुठून आला हा द्वेष?
मनीषच्या मनात इतका द्वेष कुठून आला? या प्रश्नाचं उत्तर मनीष आणि शाहिद दोघेही देतात.
शाहिद सांगतो, "मनीष अभ्यासापेक्षा जास्त वेळ मोबाइलवर मुस्लिमविरोधी माहिती पाहण्यात घालवायचा. मुस्लिमांमध्ये तो कधीही मिसळलाच नाही. मुस्लिमांबद्दल उलटसुलट सांगणारा व्हिडिओ पाहताना मी अनेकवेळा त्याला पाहिलं.
“मग मी विचार केला की याच्याशी बोललं पाहिजे. मनीषच्या घरची आर्थिक परिस्थिती गरीबीची आहे. तो एका दलित कुटुंबातील आहे. त्याचे वडील कसंबसं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शिक्षण सोडून काम करण्याचा दबाव मनीषवर नेहमी असतो. भाडं देण्यासाठी अनेकदा मनीष कडे पैसे नसतात."

शाहिद सांगतो, "मी मनीषला पेंटिंगची काही कामं मिळवून दिली. त्यातून त्याला पैसे मिळू लागले. मग खोलीच्या भाड्याचे आणि जेवणा-खाणाचे पैसे द्यायची त्याची चिंता दूर झाली.
“मी त्याला माझ्या घरी घेऊन गेलो. तिथं तो राहिला आणि माझ्या कुटुंबियांना भेटला. हळूहळू त्याला जाणीव झाली की मुस्लिमांबद्दल त्याच्या मनात जो द्वेष आहे तो असत्यावर आधारित आहे."
मनीष सांगतो, "मी शाहिदच्या घरी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. त्याच्या घरात मला मुलाप्रमाणं प्रेम मिळालं. शाहिदने देखील मला जाणीव करून दिली की मैत्री आणि प्रेमाच्या आड धर्म येत नाही.
“मी दलित आहे. दलितांशी होणारा भेदभाव माझ्या कुटुंबानं सहन केला आहे. मात्र एवढा द्वेष माझ्या मनात सवर्णांबद्दल सुद्धा नाही. मुस्लिमांनी तर आमच्याशी असा भेदभाव केलेला नाही. मग माझ्या मनात त्यांच्याबद्दल इतका द्वेष कुठून आला?"

काव्या आणि नूरच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. नूरला जेव्हा असं वाटतं की मुस्लीम असल्यामुळं त्यांना भेदभाव सहन करावा लागतो, तेव्हा काव्या तिला समजावते.
काव्या सांगते, "नूर अनेकदा रागाच्या भरात खोलीतील एखादी वस्तू फेकून देते. मग मी तिला विचारते की रागवायला काय झालं? मग कळतं की कोणत्या तरी गोष्टीमुळं ती दु:खी आहे. मुस्लिम असल्याबद्दल तिला टोमणे सहन करावे लागतात. मग मी नूरला सांगते की बघ मी सुद्धा हिंदू आहे आणि तुझ्याबरोबर किती प्रेमानं राहते."

कॅम्पसमधील एका घटनेबद्दल नूर सांगते, "मी कॅम्पसमधील मंदिरात अभ्यास करत होते. तेव्हा काही लोक आले आणि त्यांनी सांगितलं की हिजाब घालून मंदिरात येऊ शकत नाही. मी त्यांना म्हटलं की हिजाब घालून जाता येत नाही असा काही नियम नाही.
“मग त्यांनी मला मंदिराच्या भिंतीवर लिहिलेली एक सूचना दाखवली. त्यात म्हटलं होतं की बुरखा घालून मंदिरात येण्यास मनाई आहे. मी गपचूप बाहेर निघून गेले. मात्र माझ्या हिंदू मित्रांनी तिथं मला साथ दिली आणि हिजाब घालून कोणी मंदिरात का येऊ शकत नाही, या गोष्टीचा उघडपणे विरोध केला. माझ्या हिंदू मित्रांनी मला साथ दिली ही गोष्ट मला आवडली."
धार्मिक द्वेषाचा आपापसातील नात्यांवर परिणाम
जेव्हा देशात धार्मिक ताणतणाव निर्माण होतो, तेव्हा नूर आणि काव्याच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होतो?
काव्या सांगते, "आमच्या घरून फोन येऊ लागतात. आई-वडील विचारू लागतात की तुम्ही दोन्ही व्यवस्थित राहा. बाहेर जाऊ नका. माझी आई सांगते की नूरची काळजी घे. तिला स्वत:सोबत ठेव. नूरची आईसुद्धा फोनवर सांगते की बाहेर जाऊ नका.
“आमच्या घरच्यांना खूप भीती वाटू लागते. मुलींच्या स्वातंत्र्यामध्ये ही भीती खूप मोठा अडसर आहे. जेव्हा सेक्युलर विचार असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तेव्हाच मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकेल."

कठीण काळात काव्या आणि नूर फातिमा खान यांची मैत्री अधिक घट्ट झाली आहे. दोघींनाही सायकल चालवता येत नव्हती. मात्र दोघींनी एकमेकींना सायकल चालवण्यास शिकवलं.
दोघींना वाटतं की त्या एकमेकींना भेटल्या नसत्या तर त्यांना माणुसकी काय असते, ते नीट समजलंच नसतं. नूरला धार्मिक भेदभावाला तोंड द्यावं लागलं की काव्या तिला सावरते आणि काव्या जेव्हा निराश होते तेव्हा नूर तिला सावरते.

मात्र आयुष्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत असं नाही. शाहिद सांगतो, "मी गाझीपूर जिल्ह्यातील गहमर गावचा आहे. या गावात ठाकूर बहुसंख्य आहेत. इथले शेकडो लोक सैन्यात आहेत.
“एक दिवस आम्ही आमच्या हिंदू मित्रांबरोबर बसलो होतो. त्याच वेळेस आमच्या एका मित्राचे वडील आले. ते सैन्यात होते. त्यांनी रागानं माझ्याकडं बोट करत आपल्या मुलाला सांगितलं की यांच्याबरोबर तू काय करतो आहेस? हे तर काहीही करून पोट भरतील. यांच्याकडे भरपूर काम आहे. पंक्चर काढायचं दुकान काढतील."
शाहिद सांगतो, "पंक्चर काढण्याच्या गोष्टीचा मला राग आला. मी म्हटलं की आमच्या घरातदेखील लोक शिकत आहेत आणि मलादेखील बीएचयूमध्ये प्रवेश मिळाला आहे. यावर त्यांनी जोरात माझ्या कानशिलात लगावली.
“माझा खूप अपमान झाला. मी सर्व घटना वडलांना सांगितल्यावर ते म्हणाले की शिक्षण घेऊन याला उत्तर दे आणि अपमानाचा बदला घ्यायची गोष्ट देवावर सोड. त्याचवेळेस मी ठरवलं की मला खूप जिद्दीनं शिक्षण घ्यायचं आहे. माझं शिक्षण खूप व्यवस्थित सुरू आहे. याच्याच माध्यमातून उत्तर द्यायचं आहे."

शाहिद सांगतो, "सर, मुस्लिम असू तर सहन करावं लागेल. मुस्लिमांमध्ये एक समज निर्माण झाली आहे की त्यांच्या आक्रमकतेवर प्रतिक्रिया देऊ नका. मवाळपणेच वागा आणि बाकीचा न्याय परमेश्वरावर सोडा."
समजूतदारपणा की अत्यंत अविश्वास
शाहिद इतक्या लहान वयात इतक्या प्रगल्भपणे बोलतो. एकप्रकारे तो वयाआधीच तो प्रगल्भ झाला आहे.
बीएचयूमध्ये हिंदी साहित्याचे प्राध्यापक असलेले आशीष त्रिपाठी सांगतात की हा निराशेतून निर्माण झालेला समजूतदारपणा आहे. याबाबत आपण निर्धास्त होण्याऐवजी चिंताग्रस्त झालं पाहिजे.

प्रोफेसर आशिष त्रिपाठी सांगतात, "उत्तर भारतातील हिंदू आपल्या धर्माबद्दल सार्वजनिक स्वरूपात खूप आक्रमक झाला आहे. म्हणजे तो आपल्या धार्मिक प्रतीकांचा आणि चिन्हांचा अधिक जास्त वापर करतो आहे.
“हिंदू करत असलेल्या या सार्वजनिक वर्तणुकीतून त्यांची मन:स्थितीदेखील बदलली आहे. तुम्ही कपडे बदलले म्हणजे तुमच्या चारित्र्यावर काहीही परिणाम होत नाही असं नसतं. आधी वाटत होतं की हा बाह्य स्वरूपाचा बदल आहे. मात्र अंतरंगातदेखील बदल होतो आहे."
प्रोफेसर त्रिपाठी म्हणतात, "दुसरीकडं उत्तर भारतातील मुस्लीम आपल्या अंतरंगात अधिक मुस्लीम झाला आहे. म्हणजेच मागील 150 वर्षांमध्ये स्वातंत्र्य चळवळ आणि आधुनिकीकरणाच्या प्रभावाखाली मुस्लिमांमध्ये जो आधुनिक समाज तयार होत होता, त्यामध्ये कुठंतरी कमतरता आली आहे. हा समाज आत्मकेंद्री होत चालला आहे.
“म्हणजेच हिंदू सार्वजनिकरित्या जास्त हिंदू झाले आहेत आणि मुस्लीम आंतरिक पातळीवर अधिक मुस्लीम झाले आहेत. आता दोन्ही समाजांमध्ये ती पारंपारिक आत्मीयता दिसत नाही. हा बदल फक्त राजकारणाच्या पातळीवर नाही तर सामाजिक पातळीवर सुद्धा झाला आहे."
प्रोफेसर आशीष त्रिपाठी सांगतात की शाहिदचा समजूतदारपणा याच आंतरिक बदलाच्या प्रक्रियेचा भाग आहे.
ते सांगतात, "आधी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच दंगली व्हायच्या. या घटना अविश्वास आणि द्वेषामुळे व्हायच्या हे उघड आहे. मात्र यामध्ये एक प्रकारची सहजता होती. दोन्ही समाजाचे लोक एकमेकांवर राग काढायचे.
“मात्र आता मुस्लिमांमध्ये रागातून निर्माण होणारी सहज-स्वाभाविक प्रतिक्रिया संपली आहे. त्याची जागा आता नियोजनबद्ध मौनानं घेतली आहे. सर्वांत मोठ्या धार्मिक लोकसंख्येबद्दलचा (हिंदू) दुसऱ्या सर्वांत मोठ्या धार्मिक लोकसंख्येचा (मुस्लीम) विश्वास संपत चालला आहे."
प्रोफेसर त्रिपाठी यांच्या मताचं वेगळं महत्त्व आहे. मात्र नूर-काव्या आणि शाहिद-मनीष यांची मैत्री पाहिल्यावर वाटतं की सहजरित्या एकमेकांसोबत राहण्याची, सहजीवनाची शक्यता अद्याप बाकी आहे.











