‘मी कशी दिसते हे लोकांनी लक्षात आणून दिलं’; बोर्डात टॉप केलं, पण चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोलिंग

- Author, नीतू सिंह
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, सीतापूर (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेश बोर्डाच्या निकालाचा पाचवा दिवस होता. सकाळी 7.30 वाजता 9 ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात गर्दी केली होती.
विद्यार्थी सकाळच्या असेंब्लीसाठी रांगेत उभे होते. हे सर्व चित्र ज्या शाळेतील होतं, त्या शाळेतील प्राची निगम ही विद्यार्थिनी जवळपास 55 लाख विद्यार्थ्यांमधून उत्तर प्रदेश बोर्डात पहिली आली होती.
काही वेळानंतर आमचं लक्ष पांढरा सलवार कुर्ता आणि लाल ओढणी घेतलेल्या प्राची निगमवर गेलं. आम्ही बऱ्याच वेळापासून तिला शोधत होतो.
प्राचीने शाळेच्या प्रांगणात प्रवेश केल्याबरोबर तिला पाहून तिच्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर हास्य उमवटलं. कारण या सर्वांना कल्पना होती की आजदेखील प्राचीची मुलाखत घेतली जाणार होती. मागील काही दिवसांपासून मुलाखतींचं सत्र सुरू होतं.
मागील एक आठवड्यापासून उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद परिसरातील सीता इंटर कॉलेजमध्ये जणूकाही उत्सवी वातावरण आहे.
यामागचं कारण आहेत या शाळेतील प्राची निगम आणि शुभम वर्मा सहीत 19 विद्यार्थी-विद्यार्थिनी. या विद्यार्थ्यांनी हायस्कूल आणि इंटर-मीडिएट (12वी) मध्ये यूपी बोर्डात राज्यात टॉप 10 मध्ये विशेष स्थान पटकावलं आहे.
प्रत्येकालाच या टॉपर्सचा अभिमान वाटतो आहे. मात्र प्राची निगमला काही लोकांनी केलेल्या ट्रोलिंगला तोंड द्यावं लागलं.
ट्रोलिंग मागचं कारण काय?
तर जैविक कारणांमुळे वरच्या ओठांवर आलेले छोटे-छोटे केस.

फोटो स्रोत, BBC HINDI
'पहिली आले नसते तर लक्ष गेलं नसतं'
प्राची म्हणते, "ही ट्रोलिंग आणि गर्दी पाहून वाटतं की मला एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरं झालं असतं. मी पहिली आली नसती तर लोकांचं लक्ष माझ्या चेहऱ्यावर गेलं नसतं. माझ्या चेहऱ्यावरील लांब केसांची जाणीव पहिल्यांदा मला हायस्कूल बोर्डात पहिली आल्यावर ट्रोलिंग करणाऱ्यांनीच करून दिली."
9व्या इयत्तेपासून प्राचीच्या चेहऱ्यावर केसांची वाढ जास्त झाली होती.
प्राचीच्या या शारीरिक ठेवणीवर घर आणि शाळेतदेखील कधीही कोणीही कॉमेंट्स केल्या नाहीत. प्राचीला आपल्या चेहऱ्यावरील वाढत्या केसांची जाणीवदेखील झाली नाही.
प्राची निगमने या वेळेस हायस्कूलमध्ये 591 गुण मिळवले आहेत.

दोन बहिणी आणि एक भावात प्राची सगळ्यात थोरली आहे. तिला इंजिनीअर बनायचं आहे. स्मित करत प्राची म्हणते, "जर मी पहिली आली नसते तर मला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती. सोशल मीडियामुळे तर मी खूपच प्रसिद्ध झाली आहे. सगळीकडून मला फोन येत असतात. दिवसभर घरात गर्दी असते."
सतत येणारे फोन कॉल आणि प्रसारमाध्यमांना सतत द्याव्या लागणाऱ्या मुलाखती यामुळे प्राची कंटाळून गेली आहे.

प्राची म्हणते, "प्रत्येक मुलाखतीत ट्रोलिंगवर जास्त चर्चा होते आहे. मी कशी दिसते ही बाब मागील एक आठवड्यापासून लोकांनी प्रश्न विचारून लक्षात आणून दिली आहे. मला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा मी यावर उपचार घेईन. मात्र आता मला माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं आहे."
प्राचीने सोशल मीडिया पाहणं बंद केलं होतं
निकाल लागल्यानंतरच्या सुरूवातीच्या दोन दिवसांनंतरच प्राचीने सोशल मीडिया पाहणं बंद केलं आहे. ट्रोल्स वाचून तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून ती असं करते आहे.
मात्र त्याचबरोबर इतक्या लहान वयात सोशल मीडियामुळे तिला इतकी प्रसिद्धी दिल्याबद्दल तिनं ट्रोलर्सला धन्यवाद दिले आहेत.
ती म्हणते जर तिच्या चेहऱ्यावर मोठे केस नसते तर तिला ट्रोल केलं गेलं नसतं आणि जर ट्रोलिंग झालं नसतं तर लोकांची इतकी गर्दी झाली नसती.
प्राचीला आता आपल्या पुढील शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण तिला आयआयटी जेईईची परीक्षा उत्तीर्ण होऊन इंजिनीअर व्हायचं आहे.

प्राचीवर होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल सीता इंटर कॉलेजचे मुख्याध्यापक रमेश वाजपेयी म्हणतात, "मी खात्रीपूर्वक सांगतो की कोणत्याही ट्रोलरची प्राचीशी दोन मिनिटं बोलण्याची हिंमत नाही. या सगळ्या प्रकारामुळं परिणाम होत नाही असं नाही, परिणाम तर होतोच. आम्ही लोकांनी तिला धैर्य दिलं आहे. तिचं मनोधैर्य खचलेलं नाही आणि खचणार देखील नाही. जे लोक सौंदर्याला सर्वोच्च स्थान देत आहेत ते खूप घाणेरड्या भावना असणारे लोक आहेत. आता उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी प्राचीवर मोफत उपचार करण्याबद्दल सांगितलं आहे."
'माझी लेक जशी आहे, तशीच माझी लाडकी आहे'
बोलत असताना प्राचीने सातत्याने या गोष्टीचा उल्लेख केला की तिच्या कॉलेजमधील मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांनी तिच्या शारीरिक ठेवणीवर कधीही कोणतीही कॉमेंट केलेली नाही.
काही महिन्यांआधी तिची आई असं नक्की म्हणत होती की 10 वीच्या परीक्षेनंतर त्या प्राचीवर उपचार करणार आहेत.
प्राचीच्या आई ममता निगम म्हणतात की, "आमच्या मुलीच्या वरच्या ओठांवर केस आले आहेत, या गोष्टीकडे आम्ही फारसं लक्ष दिलं नाही. माझी मुलगी मला अशीच आवडते. पार्लरमध्ये जाण्याचा देखील विचार कधी आला नाही. आम्ही असा विचार नक्की केला होता की तिच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ वेगाने होते आहे तर परीक्षा झाल्यानंतर तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. मात्र त्याआधीच लोकांनी चर्चा सुरू केली."

त्या म्हणतात, "मला या गोष्टीचं वाईट वाटतं की लोकांनी आमच्या मुलीच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावरील केसांवर जास्त लक्ष दिलं. ट्रोलिंग झाल्यानंतर लगेचच आम्ही आमच्या मुलीला समजावलं की या सर्व गोष्टींचा तू स्वत:वर कोणताही परिणाम अजिबात होऊ देऊ नकोस. सध्या आमच्या घरात कोणीही सोशल मीडिया बघत नाही, कारण आमच्याकडे वेळच नाही."
प्राचीचे वडील नगरपालिकेत कर्मचारी आहेत
प्राचीचे वडील चंद्र प्रकाश निगम म्हणतात, "खरं सांगायचं तर मला ट्रोलर्सला फारसं काही सांगावं लागलेलं नाही. अनेकजण प्राचीच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. मी त्या सर्वांचे आभार मानतो. मला वाईट वाटलं नाही असं नाही. खूप त्रास झाला, रागदेखील आला. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नसाल तर त्यावर कॉमेंट कसं काय करू शकता. मात्र अशा लोकांनी कोणाच्याही भावना दुखावू नयेत यासाठी त्यांच्यावर काही कारवाई नक्कीच झाली पाहिजे."
प्राची म्हणाली, "पहिली आल्यानंतर थोडा दबाव आल्यासारखं वाटतं आहे. कारण आता सर्व लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आता खूप मेहनत करावी लागेल. ट्रोल्स वाचण्याचा वेळ माझ्याकडे नाही. ज्या मुलींची शारीरिक ठेवण थोडी वेगळ्या स्वरुपाची आहे अशा मुलींनादेखील मी सांगू इच्छिते की त्यांनी अजिबात त्रास करून घेऊ नये.
ट्रोलिंग वगैरे गोष्टी तर तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत. सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा, तेव्हाच प्रगती करता येईल."
प्राचीच्या क्लासमेट्सने ट्रोलिंगविरोधात सुरू केलं कॅम्पेन
प्राचीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तिच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर #डोंटट्रोलप्राची असं कॅम्पेन सुरू केलं आहे. प्राचीच्या वर्गातील हेमंत वर्माने माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तर प्रदेशात नववा क्रमांक पटकावला आहे.
हेमंत म्हणतो, "मी इन्स्टाग्रामचा वापर करतो. प्राचीसाठी करण्यात आलेल्या बहुतांश पोस्टवर मी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी मलादेखील शिव्या दिल्या आहेत. घाणेरड्या शब्दांचा वापर केला आहे. मात्र आम्ही सर्व सातत्याने प्राचीच्या बाजूने लिहित आहोत आणि सर्वांना सांगत आहोत की त्यांनी प्राचीला ट्रोल करू नये. तिला अजून बरंच काही साध्य करायचं आहे."
प्राचीच्याच वर्गातील आणखी विद्यार्थी ज्ञानेंद्र वर्मा म्हणतो, "सोशल मीडियावर लोक जेव्हा प्राचीला ट्रोल करत होते तेव्हाच आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे कॅम्पेन सुरू केलं होतं. घरात बसून एखाद्या विषयी काहीही माहित नसताना ट्रोल करणं खूप सोपं आहे. कोणताही ट्रोलर प्राची इतके गुण मिळवू शकत नाही."
ज्ञानेंद्र पुढे म्हणतो, "आता गावात प्रत्येक घरात फोन आहे. सर्व लोकांनी हे ट्रोल्स पाहिले असतील. जैविक कारणांमुळे ज्या मुलींची शारीरिक ठेवण थोडीशी वेगळी आहे, त्यांचे आई-वडील आपल्या मुलींना शिक्षण कसं देणार? ते असाच विचार करतील की शिक्षण घेतल्यामुळे काय फायदा होणार. जर मुलीनं चांगले गुण मिळवले तर तिला ट्रोलिंगला तोंड द्यावं लागेल."
समुपदेशक काय म्हणतात?
लखनौमध्ये 18 वर्षांपासून समुपदेशन करणाऱ्या ज्येष्ठ मनोवैज्ञानिक डॉ. नेहा आनंद म्हणतात, "व्हिडिओमधून मी जितकं प्राची आणि तिच्या आई-वडीलांना ऐकलं आहे, त्याच्या आधारावर सांगू शकते की तिचे शिक्षक आणि आई-वडीलांनी तिच्या या शारीरिक ठेवणीसह तिचा खूपच सहजतेने स्वीकार केला आहे. यामुळेच प्राचीचं या गोष्टीकडे कधीही लक्ष गेलं नाही आणि ती अधिक एकाग्रतेने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकली. त्यामुळेच ती पहिली आली."

डॉ. नेहा पुढे सांगतात, "सध्याच्या काळात बॉडी शेमिंगचा मुलांवर खूप खोलवर परिणाम होतो आहे. यामुळे अनेक मुलांना नैराश्यं येतं. त्यांच्या न्यूनगंड निर्माण होतो. ते स्वत:लाच अपाय करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत शिक्षक आणि आई-वडील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे."
त्या म्हणतात, "आपल्या आजूबाजूला असं वातावरण तयार करा की त्यातून मुलं आपल्या क्षमतांवर आणि शक्तीस्थानावर लक्ष केंद्रित करू शकतील. मुलांना प्रेरणा द्या. बाह्य सौंदर्याकडे दुर्लक्ष करा."
महत्त्वाची माहिती
मानसिक आजारांवर औषध आणि थेरेपीद्वारे उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मनोविकारतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. यासाठी तुम्ही या हेल्पलाइनवरदेखील संपर्क करू शकता,
सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाची हेल्पलाइन - 1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमनबिहेवियर अॅंड अलाईड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
हितगुज हेल्पलाइन, मुंबई - 022-24131212
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅंड न्यूरोसायन्स - 080-26995000











