भाजीची गाडी जाणार आणि लाल दिवा येणार, सोलापूरच्या स्वाती राठोडचं UPSC मध्ये यश

स्वाती राठोड
    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या दहा वर्षांपासून रोज हातगाडीवर भाजी विकणारे मोहन राठोड आजपासून हे काम करणार नाहीत. सोलापूरच्या विजापूर रोड परिसरातल्या त्यांच्या घरात आता ही हातगाडी कायमची थांबेल कारण आता त्यांच्या घरासमोर लवकरच लाल दिव्याची गाडी उभी राहणार आहे.

मोहन आणि ललिता राठोड यांची मुलगी स्वाती युपीएससीची परीक्षा पास झाली आहे. कठोर मेहनत आणि तयारीच्या बळावर सोलापूरच्या स्वाती राठोडने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 492वा रँक मिळवलाय.

16 एप्रिलला युपीएससीचा निकाल लागला आणि तेंव्हापासून मोहन राठोड यांच्या घरी लोकांची रीघच लागली.

युपीएससीत यश मिळवलेल्या स्वातीचं कौतुक करण्यासाठी कुणी पुष्पगुच्छ घेऊन येत होतं तर कुणी हार-फेटे घेऊन येत होतं.

हातगाडीवर भाजीचा व्यवसाय करणाऱ्याच्या घरात आता त्यांची मुलगी स्वाती लाल दिव्याची गाडी घेऊन येणार होती आणि याचा आनंद त्या परिसरात राहणाऱ्या प्रत्येकालाच झाला होता.

भटक्या विमुक्त समाजात जन्माला आलेल्या स्वातीच्या घरी एकूण सहा लोक राहतात. स्वाती, स्वातीच्या दोन बहिणी, आई वडील आणि एक धाकटा भाऊ.

स्वातीच्या आईवडिलांनी काबाडकष्ट करून स्वातीला शिकवलं, कधी भाजी विकून, कधी मोलमजुरी करून स्वातीच्या शिक्षणाला त्यांनी मदत केली आणि त्यांच्या या कष्टाची जाणीव ठेवत स्वाती राठोडने पाचव्या प्रयत्नात युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे.

आजपासून माझे वडील भाजी विकणार नाही

मोहन राठोड हे मूळचे कर्नाटकचे पण कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि तिथे मोलमजुरी करून जगायला सुरुवात केली.

मोहन राठोड यांच्या पत्नी ललिता राठोड सांगतात की, "मुंबईत होतो त्यावेळी तिथल्या मजूर अड्ड्यावर जाऊन उभं राहावं लागायचं. त्यातून मिळणाऱ्या पैश्यातून मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत पाठवलं. पण मोठ्या शहरातला खर्चही मोठा. मुंबईत राहणं परवडत नव्हतं म्हणून मग माझ्या माहेरी सोलापूरला आलो."

"इथे आल्यावर मिळेल ते काम केलं आणि हळूहळू भाजीचा व्यवसाय सुरु केला. पहाटे साडेतीनला मार्केटला जायचं, तिथून शेतकऱ्यांकडून ताजी भाजी खरेदी करायची आणि दारोदारी भटकून माझ्या नवऱ्याने ती भाजी विकायची. हा असा दिनक्रम आम्ही मागची दहा वर्षं जगत आहोत."

"मला तीन मुली आणि एक मुलगा आहे. खरंतर तिन्ही मुलींना शिकवायचं होतं पण परिस्थितीमुळे ते काही जमलं नाही. मोठ्या मुलींना चांगली स्थळं आली म्हणून त्यांची लग्न लावून दिली. स्वातीने मात्र मला सांगितलं होतं की मला शिकायचं आहे, मला अधिकारी व्हायचं आहे."

स्वाती राठोड आणि तिचे आई-वडील

"मी तिला एवढंच म्हणाले, की माझ्याने पडेल ते काम करिन पण तुला काही कमी पडू देणार नाही. भाजीच्या कामात, घरातल्या कामात आमची मुलंही वेळ पडल्यावर मदत करायची.

पण स्वाती अभ्यासासाठी पुण्याला गेली आणि आम्ही इथून तिला जसे जमेल तसे पैसे पाठवत गेलो. माझ्या लेकीनेही आईबापाच्या कष्टाची जाण ठेवली आणि आज ती युपीएससीत पास झालीय."

युपीएससीचा निकाल लागल्यानंतरही मोहन राठोड म्हणतात की, "आज आम्ही जे काही कमावलंय ते या गाड्यामुळं कमावलं. त्यामुळे मी माझा व्यवसाय सोडणार नाही."

पण स्वाती म्हणते की, "मी माझ्या आई-वडिलांना आता भाजी विकू देणार नाही. माझा निकाल लागला तो त्यांचा बाजारात जाण्याचा शेवटचा दिवस होता."

'आमच्या समाजात मुलींना जास्त शिकवत नव्हते पण आता परिस्थिती बदलतेय'

शुभेच्छा देणाऱ्यांच्या गराड्यात भारावून गेलेली स्वाती म्हणते की, "माझा समाज पितृसत्ताक आहे. त्यामुळे मुलींचं शिक्षण कमी आहे. लहान वयात त्यांची लग्ने केली जातात.

मुली आपल्यासाठी फक्त जबाबदारीचं ओझं असते, असं समजलं जातं. आमच्या समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. आधी तर मुलगी जन्माला आली की अनेकांना दुःख व्हायचं.

तिला कुटुंबावरचा भार समजला जायचा. पण आता माझा निकाल लागल्यावर समाजातील अनेक लोक माझ्या घरी येऊन म्हणाले की आम्हीही आमच्या मुलींना चांगलं शिकवणार, अधिकारी बनवणार."

स्वातीच्या संघर्षात तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तिच्या आईचे विचार मात्र ठाम आहेत. मुलींच्या शिकण्याबाबत त्या म्हणतात की, "मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. लग्नानंतर कशा कुटुंबात तुम्ही जाल हे सांगता येत नाही त्यामुळे पुन्हा दुःख न करता शिकलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत आणि स्वतःच आयुष्य स्वतःला जगता आलं पाहिजे."

'पहिल्या चार प्रयत्नांमध्ये यश मिळालं नाही पण अखेर UPSC क्रॅक केलीच'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्वतःच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना स्वाती म्हणते की, " माझं प्राथमिक शिक्षण नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथे असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. तिथे आधी सातवीपर्यंतच शाळा होती. पण योगायोग असा झाला की मी सातवी पास झाले आणि तिथे आठवी ते दहावीपर्यंतची शाळा सुरु झाली.

ती शाळा सुरु झाली नसती तर मी सातवीपर्यंतच शिकले असते. पुढे ना पदवी मिळवली असती, ना आज युपीएससी उत्तीर्ण झाले असते. पदवीनंतर मी अधिकारी व्हायचं निश्चित केलं आणि तयारीला लागले.

पहिल्या दोन प्रयत्नात वाटायचं की हे मला झेपणारच नाही. घरात परिसरात कुणी मार्गदर्शन करायलाही नव्हतं. पण शेवटी अभ्यासासाठी घर सोडायचा निर्णय घेतला आणि पुण्याला गेले.

तिथे गेल्यावर मन लावून तयारी केली आणि आता युपीएससी क्रॅक केली. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नातच बेस्ट दिलं पाहिजे, कठोर अभ्यास केला पाहिजे.

आपली मेहनत करायची तयारी असेल तर यशस्वी होता येतं. चौथ्या-पाचव्या प्रयत्नानंतर तुम्ही स्वावलंबी व्हायला पाहिजे. जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने इतर कोणताही ताण अभ्यास करताना तुमच्यावर राहणार नाही."

 स्वातीला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी आलेले लोक

स्वाती राठोडची ही गोष्ट अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. पुणे, मुंबई, दिल्ली या शहरांच्या तुलनेत सोलापूरमध्ये स्पर्धा परीक्षांचं वातावरण तसं कमीच आहे. त्यात मार्गदर्शन करायला कुणी नाही, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आणि पहिल्या चार प्रयत्नांमध्ये आलेलं अपयश पचवून अखेर युपीएससी सारख्या परीक्षेत ती यशस्वी झाल्यामुळे सर्वांचं लक्ष तिनं वेधून घेतलं आहे.

याबाबत बोलताना स्वाती म्हणते की, "प्रामाणिकपणे कष्ट केले तर नक्कीच यश मिळतं. आजकाल सगळीकडे माहिती उपलब्ध आहे. युट्युबवर दरवर्षीचे टॉपर्स ते अभ्यास कसे करायचे हे सांगत असतात. वेगवेगळे कोचिंग क्लासेस आहेत त्यामुळे स्वतःची किंवा इतरांची फसवणूक न करता कष्ट करून, अभ्यास करून परीक्षा दिली तर यश मिळतंच."

UPSC यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातील मुली :

युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 3 उमेदवार आहेत.

समीर प्रकाश खोडे यांनी महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला असून ते देशभरातून 42 वे आले आहेत. डॉ. नेहा राजपूत यांनी देशातून 51वा क्रमांक मिळवत महाराष्ट्रात मुलींमधून पहिली येण्याचा मान मिळवला आहे.

1016 पैकी महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे.

  • डॉ. नेहा राजपूत (रँक 51)
  • जान्हवी बाळासाहेब शेखर (रँक 145)
  • तन्मयी सुहास देसाई (रँक 190)
  • मनीषा धारवे, (रँक 257)
  • शामल कल्याणराव भगत (रँक 258)
  • समीक्षा म्हेत्रे (रँक 302)
  • वृषाली कांबळे (रँक 310)
  • आदिती संजय चौगुले (रँक 433)
  • स्वाती मोहन राठोड (रँक 492)
  • मानसी नानाभाऊ साकोरे (रँक 531)
  • नेहा नंदकुमार पाटील (रँक 533)
  • प्रियांका सुरेश मोहिते (रँक 595)
  • राजश्री शांताराम देशमुख (रँक 622)
  • नम्रता दामोदर घोरपडे (रँक 675)
  • जिज्ञासा सहारे (रँक 681)
  • श्रुती कोकाटे (रँक 685)
  • श्वेता गाडे (रँक 711),
  • गौरी शंकर देवरे (रँक 759)
  • प्रांजली खांडेकर (रँक 761)
  • मयुरी माधवराव महल्ले (रँक 794)
  • प्रांजली प्रमोद नवले (रँक 815)
  • ऐश्वर्या दादाराव उके (रँक 943)
  • स्नेहल ज्ञानोबा वाघमारे (रँक 945)
  • शिवानी वासेकर (रँक 971)
  • श्रुती उत्तम श्रोते (रँक 981)