डॉ. नेहा राजपूत, वृषाली कांबळे; UPSC टॉपर्सनी सांगितले आपल्या यशाचे रहस्य

- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा म्हणजेच युपीएससीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असते ती युपीएससी-एमपीएससी निकालाची. तुम्ही यावेळी परीक्षा दिलेली असो वा नसो पण या वेळी नेमकं कोण कोण यादीत आलं हे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी पाहतातच.
आणखी एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी त्यांच्या यशाबद्दल काय म्हणताय, स्पर्धा परीक्षा पास होण्याचं कुठलं गुपित जाहीर करताय. हा देखील एक चर्चेचा विषय असतो. यावेळची यादी आणखी एका गोष्टीसाठी विशेष आहे ते म्हणजे यशस्वी उमेदवारांच्या यादीतील मुलींची संख्या.
बीबीसी मराठीने युपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या दोन मुलींशी बातचीत केली आणि त्यांनी कशी तयारी केली हे जाणून घेतलं.
दरवर्षी देशातले लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. 2023मध्ये 1016 उमेदवारांना या परीक्षेत यश मिळालं आहे. या उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 25 मुली आहेत.
महाराष्ट्रातील एकूण 87 उमेदवारांचा या यादीत समावेश आहे आणि त्यापैकी 25 मुली आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या या मुली कोण आहेत? त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा राहिलाय? हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
महाराष्ट्रातून मुलींमधून पहिला क्रमांक पटकवलेल्या डॉ. नेहा राजपूत
सध्या मुंबईत राहणाऱ्या पण मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सागवण येथील असणाऱ्या डॉ. नेहा राजपूत यांनी एमबीबीएसचं शिक्षण झाल्यानंतर युपीएससीत यश मिळवलं आहे. त्या मुलींमधून महाराष्ट्रात पहिल्या असून देशातून त्यांनी 51वा क्रमांक पटकावला आहे.
डॉ. नेहा यांचे वडील उद्धवसिंग हे जळगाव येथे समाज कल्याण विभागामध्ये नोकरीवर कार्यरत होते. ते आता सेवानिवृत्त आहेत.
नेहा यांचे शिक्षण जळगावमध्ये झालं आणि त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठलं. मुंबईच्या केईएम रुग्णालयात इंटर्नशिप करत असताना त्यांना अनेक अनुभव आले.

याबाबत बोलताना डॉ. नेहा यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "कोरोनाकाळात जे काही घडत होतं ते मी पाहिलं आणि ते बघून प्रशासनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात काहीतरी भरीव काम करता येईल असं मला वाटलं आणि मी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी युपीएससीची माहिती मिळवली आणि तयारी सुरू केली.
एमबीबीएस केल्यानंतर सगळे एमडी करतात, मलाही मोठा सर्जन व्हायचं होतं, पण हळू हळू मला वाटलं की मी अधिकारी व्हायला पाहिजे.
कोणतीही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर ती परीक्षा घेणाऱ्यांना काय अपेक्षित आहे ते पाहिलं पाहिजे. युपीएससीच्या प्रत्येक टप्प्यासाठी वेगळी तयारी करावी लागते.
युपीएससीचा अभ्यासक्रम मोठा आहे त्यामुळे मी त्यात बसणारा अभ्यास केला. मुलाखतींसाठी मी खूप वरिष्ठांशी बोलले, मुलाखतीत आपल्या गावाबद्दल, एकूण परिस्थितीबद्दल सखोल अभ्यास असला पाहिजे.
माझ्या वडिलांनी आजवर मला खूप साथ दिली आहे. त्यांचा पहिला मुद्दा हाच होता की तुला असं वाटतंय की तू करू शकते तर केलंच पाहिजे. आईचाही खूप पाठिंबा मिळाला."
"मुलाखत दिल्यानंतरच्या भावना सांगताना डॉ. नेहा म्हणाल्या की, "मला असं वाटत होतं की आणखीन चांगली मुलाखत होऊ शकली असती. 51वा रँक मी अपेक्षित केला नव्हता.
"मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर चांगलं काम करायचं आहे तर हे केवळ एक माध्यम आहे. लोकसेवा करणाऱ्यांसाठी अनेक पर्याय आहेत त्यामुळे निराश न होता जे उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी वेगवेगळे मार्ग आजमावले पाहिजेत. मला शिक्षण आणि आरोग्यावर काम करून 2047मध्ये भारताला अमृतकाळात घेऊन जायचं आहे."
हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून 24व्या वर्षी युपीएससी झालेल्या वृषाली कांबळे
मुंबईच्या नेरुळ परिसरात राहणाऱ्या वृषाली कांबळे यांनी वयाच्या 24व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. वृषाली यांनी देशातून 310वा क्रमांक पटकावलाय.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या शिष्यवृत्तीमुळे त्या दिल्लीत जाऊन युपीएससीची तयारी करू शकल्या आणि अखेर दोन प्रयत्नानंतर त्यांना या परीक्षेत यश मिळालं आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना वृषाली म्हणाल्या की, "माझ्या आईची प्रेरणा होती म्हणून मी अगदी लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.
माझ्या आईला किरण बेदी फार आवडायच्या आणि त्यातूनच प्रेरित होऊन मी आज युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे."

फोटो स्रोत, VRUSHALI KAMBLE
वृषाली यांनी दहावीनंतर वाणिज्य शाखा निवडली होती. अकरावी बारावी कॉमर्स केल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्रात बीएची पदवी मिळवली आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
याबाबत बोलताना वृषाली यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "मुंबईत या परीक्षेला पोषक वातावरण नव्हतं तरीही मी सेंट झेविअर्स कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर या परीक्षेची तयारी सुरू केली.
त्यावेळी मला मार्गदर्शन करायला कुणीही नव्हतं. आमचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं होतं. माझी आई कुटुंब चालवण्यासाठी लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची.
2021आणि 2022मध्ये मी ही परीक्षा दिली पण प्रिलिम्समध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर मला बार्टी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिष्यवृत्तीबाबत माहिती मिळाली.

मी ती शिष्यवृत्ती मिळवून युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. तिथल्या श्रीराम इन्स्टिट्यूटमध्ये तयारी केली आणि आज युपीएससी उत्तीर्ण झाले.
खरंतर बार्टीसारख्या संस्थेची मदत मिळाली नसती तर मी दिल्लीला जाऊच शकले नसते कारण आमच्या कुटुंबाची परिस्थिती तशी नव्हती. आता ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यांनतर मी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाले आहे."
युपीएससीत यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातील मुली कोण आहेत?
युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 3 उमेदवार आहेत.
समीर प्रकाश खोडे यांनी महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला असून ते देशभरातून 42 वे आले आहेत. डॉ. नेहा राजपूत यांनी देशातून 51वा क्रमांक मिळवत महाराष्ट्रात मुलींमधून पहिली येण्याचा मान मिळवला आहे.
1016 पैकी महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे.
डॉ. नेहा राजपूत (रँक 51), जान्हवी बाळासाहेब शेखर (रँक 145), तन्मयी सुहास देसाई (रँक 190), मनीषा धारवे, (रँक 257), शामल कल्याणराव भगत (रँक 258), समीक्षा म्हेत्रे (रँक 302), वृषाली कांबळे (रँक 310), आदिती संजय चौगुले (रँक 433), स्वाती मोहन राठोड (रँक 492), मानसी नानाभाऊ साकोरे (रँक 531), नेहा नंदकुमार पाटील (रँक 533), प्रियांका सुरेश मोहिते (रँक 595), राजश्री शांताराम देशमुख (रँक 622), नम्रता दामोदर घोरपडे (रँक 675), जिज्ञासा सहारे (रँक 681), श्रुती कोकाटे (रँक 685), श्वेता गाडे (रँक 711),
गौरी शंकर देवरे (रँक 759), प्रांजली खांडेकर (रँक 761), मयुरी माधवराव महल्ले (रँक 794), प्रांजली प्रमोद नवले (रँक 815), ऐश्वर्या दादाराव उके (रँक 943), स्नेहल ज्ञानोबा वाघमारे (रँक 945), शिवानी वासेकर (रँक 971), श्रुती उत्तम श्रोते (रँक 981).
महाराष्ट्रातील मुलींनी मिळवलेल्या या यशाची सध्या राज्यभर चर्चा होत आहे.











