'सौदी अरेबियामध्ये मूर्तीपूजेला थारा नाही, तरी मुस्लीम मित्रांनी माझ्यासाठी खोलीत मंदिर बनवलं'

हिंदू-मुस्लीम
    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रामेश्वर साव बिहारच्या औरंगाबादमधील अशा गावात राहतात ज्याठिकाणी एकही मुस्लीम कुटुंब नाही. त्यांच्या आजूबाजूच्या गावातही मुस्लीम नाहीत. शालेय शिक्षणादरम्यानही ते कधी मुस्लिमांना भेटले नाही. कमी वयात लग्न झालं आणि जबाबदारी वाढल्यानं त्यांच्यासमोर रोजगाराचं संकट निर्माण झालं. त्यामुळे रामेश्वर यांना 2015 मध्ये रोजगाराच्या शोधात सौदी अरब गाठावं लागलं.

हिंदूबहुल गाव, समाज आणि देशात राहणारे रामेश्वर साव यांच्या दृष्टीनं मुस्लीम देश असलेल्या सौदी अरबला जाणं ही जीवनातील महत्त्वाची घटना होती.

पण लवकरच काही मुस्लीम त्यांचे रूममेट बनले. त्यापैकी काही भारतातील होते तर काही पाकिस्तानातील.

रामेश्वर यांच्या मनात पाकिस्तानबाबत एक प्रतिमा निर्माण झालेली होती. ती म्हणजे त्याठिकाणचे लोक कट्टर आणि दहशतवादी असतात अशी. मुस्लिमांबाबतही त्यांच्या मनात अशीच प्रतिमा होती.

याबाबत रामेश्वर साव म्हणाले की, "मुस्लीम आणि पाकिस्तानी नागरिकांबरोबर राहिल्यानं माझ्या मनातील अनेक ग्रह दूर झाले. मला आधी वाटायचं की, मुस्लीम हिंदूंचा द्वेष करतात. पण खरं म्हणजे, माझ्याच मनात मुस्लिमांप्रती द्वेष होता. माझ्या मनात मुस्लिमांप्रती असलेला द्वेष दूर झालाच. त्याचसोबत अशी मैत्री जडली की, पाकिस्तानी माझ्या अडचणीच्या काळात मला मदत करायचे. त्यांना काही गरज असली, तर मी मदत करायचो. आम्ही जेवणही एकत्र करू लागलो."

व्यक्तिमत्त्वामध्ये झालेला हा बदल अत्यंत महत्त्वाचा असल्याचं रामेश्वर यांचं मत आहे. सौदी अरबला गेलो नसतं तर, अनेक सत्यं समजलीच नसती, असं ते म्हणतात.

बाहेर सौहार्द, देशात मतभेद

बिहारच्या सिवानमधील चांदपाली मौजा गावात मुस्लिमांची मोठी जास्त लोकसंख्या आहे. इथं हिंदूंची अवघी 10-12 घरं आहेत. या गावातील प्रत्येक घरातील एक किंवा दोन पुरुष आखातातील मुस्लीम देशांत नोकरी करतात. गावातील 500 हून अधिक लोक आखाती देशांमध्ये राहतात. आखाती देशांतून होणाऱ्या कमाईचा चांगला परिणामही या गावात अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतो.

याच गावातील राजन शर्मा हे बेरोजगार होते. सिवानमध्ये रोज 100 रुपये कमावणंही प्रचंड कठीण होतं, असं राजन म्हणाले. एक दिवस गावातील सोहराब अली यांनी त्यांना कामासाठी कतारला जाणार का? अशी विचारणा केली. राजन यांनीही लगेचच होकार दिला. सोहराब यांनी त्यांना व्हिसा मिळवून देण्याचीही सोय केली.

राजन शर्मा गेल्या नऊ वर्षांपासून कतारमध्ये राहत आहेत. दर महिन्याला ते किमान 30 हजार रुपयांची बचत करतात. कतारच्या कमाईवरच राजन यांनी गावात तीनमजली घर बांधलं आहे. राजन भावाच्या लग्नासाठी गावात आले आहेत. पण गावात आल्यानंतर मात्र ते निराश झाले.

हिंदू-मुस्लीम
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राजन सांगतात की, "अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी आमच्या गावाजवळून एक मिरवणूक गेली. त्यावेळी मुद्दाम मुस्लिमांना चिडवण्यासाठी त्यांच्या भागात जाण्याचा प्रयत्न करत होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रकरण शांत झालं. नसता, प्रचंड तणाव वाढला असता."

"मला हे पाहून फार वाईट वाटलं. मी आईला म्हटलं की, आपले राम तर असे नव्हते. ते राजासारखे राहायचे आणि प्रजेची काळजी करायचे. रामाच्या नावावर लोकांना फसवलं जात आहे. गेल्या 10 वर्षांत असे प्रकार वाढले आहेत," असं राजन म्हणाले.

राजन कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये चांदपालीमधलेच रूममेट मोहम्मद वसीमबरोबर राहतात. वसीम यांच्याशिवाय आणखी दोघे सोबत राहतात. त्यां सर्वांमध्ये राजन एकटेच हिंदू आहेत. राजन यांच्यासाठी मुस्लिम मित्रांनी खोलीत एका कोपऱ्यात एक छोटंसं मंदिरही तयार करून दिलं आहे. राजन त्याच खोलीत पूजा करतात आणि त्यांचे मुस्लीम मित्रही त्याच खोलीत नमाज पठण करतात.

"कतारमध्ये माझी तब्येत खूप बिघडली होती. अंथरुणावरून उठताही येत नव्हतं. त्यावेळी वसीमभाई माझे कपडेही धुवायचे," असं राजन यांनी सांगितलं.

धर्मनिरपेक्ष असून काय फायदा?

चांदपालीमधलेच मोहम्मद नसीम हेही सौदी अरबमध्ये राहतात. सुट्यांसाठी ते गावी आले आहेत. मोहम्मद नसीम जून महिन्यात सौदी अरबला परतणार आहेत.

भारतातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाबाबत त्यांना चिंता वाटते.

"सौदी अरब मुस्लीम देश आहे. त्याठिकाणी राजेशाही असून एकाच कुटुंबाची सत्ता आहे. मुस्लीम असल्यानं आम्ही तिथं गेल्यानंतर धार्मिक बहुसंख्याक ठरतो. पण त्याचा आम्हाला काही विशेषाधिकार मिळत नाही. त्याठिकाणी कायदा सर्वांसाठी समान आहे. तिथं गुंडाला गुंड म्हणूनच पाहिलं जातं. त्याचं मुस्लीम गुंड किंवा हिंदू गुंड असं वर्गीकरण केलं जात नाही."

मंदिर

मोहम्मद नसीम म्हणाले की, "भारतातील मुस्लीमही याच मातीतले आहेत. भारताच्या निर्मितीत आमच्या पूर्वजांनीही रक्त आणि घाम गाळला आहे. पण धर्माच्या आधारे आम्हाला दुय्यम नागरिक असा दर्जा दिला जात आहे. हे पाहून दुःख वाटतं. विदेशात हिंदू-मुस्लीम एकोप्यानं राहतात. पण देशात येतात मतभेदाच्या भिंती उभ्या राहतात. धर्मनिरपेक्ष देशात असा भेदभाव व्हायला नको. पण सगळं काही उलटं घडत आहे."

मोहम्मद नसीम यांच्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरवेशपूरमधील उपेंद्र राम त्यांचे रुममेट आहेत. नसीम सांगतात की, "उपेंद्र यांच्यासाठी मुस्लिमांनी खोलीत प्लायबोर्डचं एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे. सौदी अरबमध्ये मूर्तीपूजेला थारा नाही. तरीही, हिंदू बांधवासाठी आम्ही त्याचा विचारही केला नाही."

मोहम्मद नसीम म्हणाले की, उपेंद्र जातीनं चांभार आहेत. पण आम्ही कधी त्यांना अस्पृश्य समजलं नाही. त्याउलट सवर्ण हिंदू आजही त्यांच्यासोबत जेवण करणं टाळतात.

'मुस्लिमांबाबतचे मत बदलले'

बिहारमधील औरंगाबादच्या इला शर्मा यांचे पती श्याम दुबईच एल-अँड-टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. त्या अनेक वर्षांपासून दुबईत राहत आहेत. त्यांचे पती आता दोहामध्ये गेले आहेत. त्यामुळे व्हिसा येईपर्यंत त्या औरंगाबादला आल्या आहेत.

दुबईत राहताना कधीही मुस्लीम देशात राहत असल्याचं जाणवलं नाही असं इला शर्मा सांगतात.

"मी दुबईत होळी, दिवाळी आणि छठ पूजा असे उत्सव अगदी उत्साहात साजरे केले. मला कधीही अडचण आली नाही. आपण धार्मिक अल्पसंख्यात असल्याचं कधीही जाणवलं नाही. सुरक्षिततेच्या बाबतीत तर इथं भारतापेक्षा अधिक चांगली स्थिती आहे. दुबईत महिला एकट्या फिरू शकतात," असंही त्या म्हणाल्या.

आखाती मुस्लीम देशांत राहणाऱ्या हिंदूंना भेटल्यानंतर ते मुस्लिमांबाबत आधी जसा विचार करायचे तसा आता करत नसल्याचं मान्य करतात. या देशांतील नोकरीमुळे केवळ त्यांच्या जीवनात आर्थिक बदल झाला असं नाही. तर त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारसरणीतही बदल झाला असल्याचं ते म्हणतात.

BBC/संग्रहित फोटो
दुबईत राहताना कधीही मुस्लीम देशात राहत असल्याचं जाणवलं नाही. मी दुबईत होळी, दिवाळी आणि छठ पूजा असे उत्सव अगदी उत्साहात साजरे केले. मला कधीही अडचण आली नाही.
इला शर्मा

पाटण्यातील विभागीय पासपोर्ट अधिकारी ताविशी बहल पांडे यांनी या बदलाबाबत चर्चा केली.

"एकाच ठिकाणी राहिल्याने अनेक प्रकारची मतं रूढ होत असतात. पण आपण इतर देशांत जातो, वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांना भेटतो त्यावेळी ही मतं बदलतात. आपल्याला नंतर लक्षात येतं की, आपण आधीपासूनच जो विचार मनात रूढ केला होता, ते पूर्ण सत्य नव्हतं. सर्वांबरोबरच असं घडतं. मला वाटतं की, आपली स्वीकार्यताही वाढते आणि आपले विचारही अधिक चांगले होतात," असं त्या म्हणाल्या.

आखाती देशांत राहणाऱ्या जेवढ्या बिहारी हिंदूंशी आम्ही बोललो, त्या सर्वांनी मुस्लिमांबाबतचं मत बदलल्याचं सांगितलं. सिवानचे रवी कुमार सौदी अरबमध्ये नऊ वर्षे राहिले. आता ते सिवानमध्ये स्वतःचं घर बांधत आहेत.

रवी म्हणाले की, "सौदी अरबला जाण्यापूर्वी माझं मुस्लिमांबाबत जे मत होतं, त्यात आपलेपणा किंवा प्रेम अगदी नसल्यासारखंच होतं. त्यांच्याबद्दल अनेकप्रकारचे गैरसमज होते. पण सौदी अरबला गेल्यानंतर ती मतं बदलली. सौदी अरब मुस्लीम देश असला तरी, भारतातील मुस्लिमांना तिथं काही वेगळा फायदा मिळत नाही. तसंच हिंदूंबरोबर तिथं काहीही भेदभावही होत नाही. पण भारतात येताच आपण हिंदू-मुस्लीम यात अडकलो, असं वाटू लागतं."

पासपोर्ट कार्यालय

अब्दुल बारी सिद्दीकी राष्ट्रीय जनता दलचे जुने आणि मोठे नेते आहेत. आखाती देशांत जाणाऱ्या हिंदुंच्या मनात मुस्लिमांबाबतचे मत बदलत आहे, याकडं कसं पाहता? असं आम्ही त्यांना विचारलं.

त्यावर सिद्दीकी म्हणाले की, "गेल्या काही वर्षांमद्ये मुस्लिमांच्या विरोधातील द्वेषाचं प्रमाण वाढलं आहे. पण ते बहुसंख्याक हिंदूंमध्ये नाही. बहुसंख्य हिंदूंना अजूनही सर्वसमावेशक समाज हवा आहे, असं माझं मत आहे. इस्लामबाबत ज्या कारणामुळं द्वेष आहे, त्याला काहीही ठोस आधार नसल्याचं आखाती देशांत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येत असेल. भेटीगाठींनी रूढ झालेली मतं बदलत असतात," असंही ते म्हणाले.

“मी कायस्थ कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलीशी विवाह केला आहे. पण हे लग्न जमवण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी हिंदूंनी मदत केली होती. त्यावेळी कर्पूरी ठाकुर बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेक दिवस आम्हाला त्यांच्या घरी ठेवलं. पण आता राजकारणात द्वेषाला अधिक स्थान मिळत आहे. पण द्वेषाचंही एक ठरावीक वय असतं," असं सिद्दीकी म्हणाले.

बिहारमधून जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक

गेल्या काही वर्षांमध्ये गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल (जीसीसी) मधील सहा सदस्य देश म्हणजे, सौदी अरब, यूएई, कुवैत, बहरीन, ओमान आणि कतार मध्ये भारताच्या मजुरांच्या जाण्याचा ट्रेंड पूर्णपणे बदलला आहे.

यूएईतील एका अभ्यासानुसार, आधी या देशांमध्ये केरळमधून ब्लू कॉलर कामगार मोठ्या संख्येनं जायचे. पण त्यात 90 टक्के घट झाली आहे. पण आता ही घट युपी-बिहारचे कामगार भरुन काढत आहेत. 2023 च्या पहिल्यात सात महिन्यांत या जीसीसी देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय मजुरांचं प्रमाण 50 टक्के वाढलं आहे. त्यात युपी बिहारचे सर्वाधिक आहेत.

हिंदू-मुस्लीम

ताविशी बहल पांडे यांच्या मते, "पाटणा प्रादेशिक कार्यालयाकडून दरवर्षी जवळपास तीन ते चार लाख पासपोर्ट जारी केले जातात. बहुतांश लोकांनी आखाती देशांत काम करण्यासाठी पासपोर्ट काढले आहेत. बिहारमधून खाडीत जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. आधी हे स्थलांतर देशांतर्गत जास्त प्रमाणात होतं. बिहारच्या सिवान आणि गोपालगंजमधील गल्फमद्ये सर्वाधिक लोक राहतात. तसंच रेमिटेन्समध्येही (देशात पैसे पाठवण्याचे प्रमाण) या दोन जिल्ह्यांचं योगदान सर्वात जास्त आहे."

आखाती मुस्लीम देशांत सुमारे 90 लाख भारतीय राहतात. त्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या 2022च्या आकडेवारीनुसार, यूएईमध्ये सर्वाधिक 35 लाख आणि त्यानंतर सौदी अरबमद्ये 22 लाख भारतीय राहतात. 2023 मध्ये भारतीयांनी विदेशांतून कमाई करून भारतात 125 अब्ज डॉलर पाठवले होते. त्यात सर्वाधिक वाटा गल्फमधील भारतीयांचा होता. 125 अब्ज डॉलरमध्ये फक्त यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांचं प्रमाण 18 टक्के आहे.

पाटण्याच्या विभागीय कार्यालयाच्या बाहेर सध्या रोज शेकडोच्या संख्येनं लोकांच्या रांगा असतात. त्यात बहुतांश तरुण आहेत. त्या तरुणांशी बोललं असता बिहारबाबत त्यांच्यात नैराश्याची भावना दिसते. हे तरुण पदवीधर किंवा 12वी पास आहेत. गल्फ देशांत जाण्यासाठी भारतीय मुस्लीम अधिक उत्साही असतात असं वाटतं, पण तसं नाही. पासपोर्ट ऑफिसच्या बाहेर लागलेल्या रांगांवरून मुस्लिमांपेक्षा हिंदूंचं जाण्याचं प्रमाण अधिक असल्याचं स्पष्ट होतं.

आरामधील अमन तिवारी ओमानला जाण्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी आले आहेत. ते 12वी पास आहेत. त्यांना आम्ही भारतात रोजगार मिळणं कठिण आहे का? असं विचारलं.

पासपोर्ट काढण्यासाठी आलेले नागरीक

त्याचं उत्तर देताना अमन तिवारी म्हणाले की, "ओमानला जाऊनही मजुरीच करायची आहे. पण तिथं पैसे तरी चांगले मिळतील. भारतात याच कामाचे पैसेही कमी मिळतील आणि खाण्या-पिण्याचे किंवा राहण्याचेही हाल होतील. भारतात घरी महिन्याला 20 हजार रुपये पाठवायचे असतील तर किमान 30 हजार रुपये पगार असायला हवा. दिल्ली-मुंबईत तर 30 हजार पगार असला तरी 10 हजार वाचवणंही कठिण आहे. भारतात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही मजुराला 30 हजार पगार नाही. त्यामुळंच आम्ही वृद्ध आई वडिलांना सोडून विदेशात जायला तयार आहोत."

अमन यांच्या सहकारी सरोज पांडे यांच्या मते, बिहारमध्ये 20 वर्षांपासून नितीश कुमारांची सत्ता आहे. पण शिक्षण आणि रोजगाराची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक बिकट बनली आहे. "पूर्वी शेतीवर उदरनिर्वाह चालायचा. पण आता शेतीही तोट्याचा व्यवसाय बनला आहे," असं सरोज म्हणाल्या.

धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा परिणाम

बिहारमधील प्रसिद्ध इतिहासकार इम्तियाज अहमद यांच्या मते, “गल्फमध्ये राहणारे भारतीय भारतातील द्वेष आणि हिंसाचारानं आनंदी तर नसतीलच. अरब देशांत ते एकोप्यानं राहतात कारण अरबी लोक त्यांना मजुरा व्यतिरिक्त काहीही समजत नाहीत. मग ते भारतातील मुस्लीम असो वा हिंदू. त्यामुळं सुख, दुःखाच्या काळात एकमेकांची मदत करता यावी म्हणून भारतीय एकोप्यानं राहतात. भारतात धर्माच्या आधारे होणारा हिंसाचार किंवा द्वेषाच्या बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळं अरब देशांच्या शासकांसमोर भारताची प्रतिमा मलिन होते, तसंच सामान्य नागरिकांतही योग्य संदेश जात नाही."

सौदी अरबमध्ये राहताना आपल्याच देशातील मुस्लिमांशी भारताच्या राजकारणावरून वादविवाद झाले का? असा प्रश्न आम्ही रामेश्वर साव यांना विचारला.

त्यावर रामेश्वर साव म्हणाले की, "भारतीय मुस्लिमांना भाजप आवडत नाही. आखाती देशांतील मुस्लीमही भाजपबाबत निराश असून ते टीकाही करतात. मला वाटतं की, विदेशांत त्यांनी आपल्या देशाबाबत वाईट बोलू नये. पाकिस्तानातील मुस्लीम तसं करत नाहीत."

पण, भाजपवर टीका म्हणजे देशाबद्दल वाईट बोलणं कसं ठरेल? याचं उत्तर देताना रामेश्वर म्हणाले की, "भाजप भारतातीलच पक्ष आहे. सत्ताही त्यांचीच आहे. अशा परिस्थितीत पक्ष आणि देश यांना वेगळं करू शकत नाही."