बाळासाहेबांचे विरोधक ते उद्धव ठाकरे यांचे समर्थक, मुस्लीम मतांचा ठाकरेंना कितपत फायदा होऊ शकेल?

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"ज्या दिवशी बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी बाबरी पडली असं सांगितलं. लगेच फोन आला तेव्हा संजय राऊतचा फोन होता. बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, असं ते म्हणाले. ज्यांच्याकडे शौर्य नसतं तेव्हा त्यांच्याकडे ते दाखवावं लागतं. बाबरी प्रकरणानंतर मुंबईत दंगली झाल्या. त्यानंतर जी मुंबई वाचली ती शिवसैनिकांनी वाचवली. तो एक लढा होता तो देशद्रोह्यांच्या विरुद्ध होता." असं वक्तव्य एप्रिल 2023 रोजी उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत केलं होतं.
असं असलं तरी दुसर्या बाजूला उद्धव ठाकरे आता राज्यभरात मुस्लीम मतदारांना सोबत येण्याचं आवाहन करतानाही दिसत आहेत. त्यांच्या सभांना, त्यांच्या भेटींसाठी मुस्लीम समाजातील मतदारांची लक्षणीय उपस्थिती सुद्धा दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आताच्या घडीला 14 आमदार आणि सहा खासदार आहेत. यात एकही मुस्लीम आमदार किंवा खासदार आत्ता ठाकरे गटात नाही. परंतु शिवसेनेकडून अब्दुल सत्तार हे सिल्लोड मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत जे आता शिंदे गटात आहेत. दरम्यान, आताच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून एकही मुस्लीम उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं नाही.
आताच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना या नवीन राजकीय प्रयोगाचा कितपत फायदा होईल? आणि काँग्रेसची ही पारंपरिक व्होट बँक उद्धव ठाकरे यांच्याकडे वळताना दिसत आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी माहीम दर्ग्याच्या काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
"जैसे हमारी दुश्मनी मशहूर थी, वैसे हमारी दोस्ती भी मशहूर होगी," असं सांगत उद्धव ठाकरे यांनी आपल्याला संविधान वाचवायचं आहे अशी साद मुस्लीम समुदायाला घालण्याचा प्रयत्न केला. माहीम दर्ग्याचे ट्रस्टी शेहनवाज खान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
2019 नंतर म्हणजे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका अशा मतदारवर्गाला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले जी आजपर्यंत कधीही प्रामुख्यानं शिवसेनेसोबत दिसली नाही.
शिवसेना हा आतापर्यंत कायम कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा पुरस्कर्ता असलेला पक्ष म्हणून ओळखला जात होता. विधानसभेचे काही मोजके मतदारसंघ सोडले तर मुस्लीम मतं मोठ्या संख्येने शिवसेनेला मिळत नव्हती.
परंतु आताच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. याची नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊया.
मुस्लीम समुदायाला उद्धव ठाकरेंचं आवाहन
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदान सुरू झाल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. जिल्ह्याजिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे प्रत्येक समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
(लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेल्या विविध गोष्टींचा, आरोप प्रत्यारोपांचा आणि वाद-प्रतिवादाचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा- लोकसभा निवडणूक 2024)
विशेषतः शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचा एक गट भाजपसोबत तर दुसरा गट काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याने शिवसेनेच्या मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे राज्यातील विविध भागात मुस्लीम मतदारांशी संवाद साधत आहेत.
यापूर्वी राज्यात विशेषत: मुंबई आणि मराठवाड्यात जिथे शिवसेनेचा विस्तार कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेवर झाला. त्यानुसार शिवसेनेची मराठीसोबतच हिंदुत्ववादी व्होट बँक तयार झाली तिथे आता मुस्लीम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहेत.
मुंबईत माहीमचा दर्गा प्रसिद्ध आहे. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाचा हा भाग आहे. तर शिवसेनेचं सेना भवन हे कार्यालय सुद्धा याच भागात आहे. काही दिवसांपूर्वी सेना भवनात उद्धव ठाकरे यांनी माहिममधील काही मुस्लीम मतदारांशी संवाद साधला.
यावेळी त्या चर्चेसाठी उपस्थित असलेले माहीममधील वकील अकील अहमद यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुस्लीम मतदार हा धर्मनिरपेक्ष पक्षाला कायम मतदान करत आला आहे. आजही मुस्लीम मतदार त्यालाच मतदान करणार जो सर्वांच्या हिताची गोष्ट करेल आणि ना की धर्माचं राजकारण. आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो. आमच्या भागात महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. मुस्लीम मतं विभाजीत होऊ नये हा आमचा प्रयत्न राहणार आहे. मागच्या गोष्टींपेक्षा आताच्या परिस्थितीकडे आमचं लक्ष आहे. आमचा आवाज संसदेत उचलू शकेल असा प्रतिनिधी आम्हाला हवाय." असं ते सांगतात.

माहीम दर्ग्यातील काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माहीम दर्ग्याचे ट्रस्टी शाहनवाज खान सांगतात," शिवसेनेची आताची भूमिका ही आधीपेक्षा नरमाईची आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करत सांगितलं की ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. आमचं हिंदुत्व लोकांना जोडणारं आहे असंही ते म्हणाले आहेत. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्याच्या तयारीत आहोत. संविधानाला वाचवायचं आहे असंही ते म्हणाले."
आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते असंही म्हणाले की,
"जैसे हमारी दुश्मनी बहोत मशहूर रही, वैसे हमारी दोस्ती मशहूर होगी. विश्वास ठेवा सर्वांसाठी काम होईल." असा विश्वासही त्यांनी आम्हाला दिला असंही शाहनवाज खान सांगतात.
यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेतलं कुराण मुस्लीम समुदायाकडून भेट देण्यात आलं होतं.
यावेळी बोलताना ते म्हणाले होते की,"मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व आहे. त्यामुळे आमच्या हिंदुत्वावर कोणीही शंका घेऊ नये."
तसंच फेब्रुवारीतच मुंबईतील धारावीत शिवसेनेच्या शाखेला भेट देत असताना तिथे मुस्लीम समाजाची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसली होती. याची चर्चाही झाली. कारण धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी संजय राऊत यांनी, आमच्या पक्षाच्या मागे मुस्लीम समाज मोठ्या संख्येनं असल्याचं नमूद केलं होतं.
मुस्लीम मतदारांचं ठाकरे कुटुंबाला आणि पर्यायाने त्यांच्या शिवसेनेला समर्थन हे समीकरण पहिल्यांदाच दिसून येत आहे. हा बदल नेमका कसा घडला किंवा घडतोय हे पाहणं यात महत्त्वाचं आहे. शिवाय, हा पाठिंबा प्रत्यक्षात मतांमध्ये परावर्तित होणार का? हा यातला कळीचा मुद्दा आहे.
हिंदुत्वाची व्याख्या बदलली का?
2022 सालच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले, "माझा त्यांना प्रश्न आहे. तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? इतर सर्व धर्मीय हे देशद्रोही, असं तुमचं हिंदुत्व आहे की देशप्रेमी कोणीही असला तरी तो माझा आहे, हे तुमचं हिंदुत्व आहे?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
तर आमचं हिंदुत्व शेंडी, जानव्याचं हिंदुत्व नाही असंही उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलंय. इतकच नाही तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान, धर्माच आणि राजकारणाशी सांगड घालून चूक केली असं विधान केलं होतं. यामुळे 2019 मध्ये मविआचा प्रयोग हा केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित राहीला नाही तर शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी अनेक वेगळे राजकीय प्रयोग करण्यास सुरुवात केली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र कायम आपल्या भाषणांमधून कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडली. शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावर 1987 मध्ये जी मुंबईत विलेपार्ल्याची पोटनिवडणूक झाली होती, तेव्हा बाळासाहेबांच्या अशाच एका वक्तव्यांवरुन वाद झाला होता.
एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं, "आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लीम मतांची पर्वा नाहीये. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार."

फोटो स्रोत, Getty Images
या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रमेश प्रभू निवडून आले पण प्रक्षोभक वक्तव्यांमुळे ते विजयी झाले असं सांगत हे प्रकरण न्यायालयात गेलं. मुंबई उच्च न्यायालयानं त्यासाठी बाळासाहेब आणि रमेश प्रभू दोघांनाही दोषी ठरवलं, निकाल रद्द केला.
या प्रकरणावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जगदीश सरन वर्मा यांनी प्रभू आणि बाळासाहेब ठाकरे यांची 29 नोव्हेंबर, 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर 1987 रोजीची भाषणं तपासली. त्यात शिक्षा म्हणून 1995 ते 2001 पर्यंत बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता.
तर छत्रपती संभाजी नगरमध्ये कायम प्रत्येक निवडणुकीत 'खान हवा की बाण हवा', हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य राहिलं आहे. यावरच संभाजीनगरसह मराठवाड्यात काही ठिकाणी शिवसेनेने आपलं वर्चस्व कायम राखलं.
शिवसेनेचे ठाकरे गटातील दक्षिण मुंबईचे नेते पांडुरंग सकपाळ याविषयी बोलताना सांगतात की, "बाळासाहेब ठाकरे मुस्लीम द्वेष करणारे नव्हते. बाळासाहेब म्हणायचे आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात ते आमचे आहेत. मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम जोडप्याला नमाज पढण्याची परवानगी दिली होती. शेवटी मानवता हा धर्म महत्त्वाचा आहे,".
उद्धव ठाकरे यांनीही आपली हीच भूमिका 2019 पर्यंत कायम ठेवली. परंतु 30 वर्षं भाजपसोबत युतीत राहिलेल्या शिवसेनेने युती तोडली आणि काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडला अशी तीव्र टीकाही भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
इतकच काय तर शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी पक्षात बंड करताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले असं सांगितलं. आणि यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण हिंदुत्ववाद सोडला नाही पण आमची आणि भाजपची हिंदुत्वाची व्याख्या वेगळी असल्याचं नॅरेटिव्ह मांडण्यास सुरुवात केली.
याविषयी बोलताना 'जय महाराष्ट्र' हे शिवसेनेचं चरित्र लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात की उद्धव ठाकरे एक नवीन हिंदुत्ववाद मांडत आहेत.
"आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली ही आमची चूक झाली' अशी जाहीर कबुली उद्धव ठाकरेंनी दिली होती," असंही अकोलकर सांगतात.

फोटो स्रोत, FACEBOOK
2022 सालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपलं हिंदुत्व कोणत्या एका धर्माचा द्वेष करणारं नाही हे पटवून देण्यासाठी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, "काश्मीरमध्ये औरंगजेब नावाचा एक सैनिक लष्करामध्ये होता. दोन चार वर्षांपूर्वी घरी जात असतांना त्याचं अपहरण करण्यात आलं आणि काही दिवसांनी त्याचं शव सैन्याला मिळालं. हालहाल करून मारलं आहे हे स्पष्ट दिसत होतं. कोणी मारलं होतं? अतिरेक्यांनी. धर्मानं कोण होता? मुसलमान. पळवणारे अतिरेकी कोण होते? मुसलमान. पण तरीदेखील त्याला मारलं. कारण तो भारताकडून अतिरेक्यांना टिपत होता. मुसलमान असला तरी सोडलं नाही. तो औरंगजेब मुसलमान असला तरीही आमचा भाऊ आहे, हे हिंदुत्व उघड आहे. हे जाऊन कोणाला सांगायचं त्यांना सांगा. नंतर मी ऐकलं की त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ सैन्यात जाणार होता. त्याचे वडील भाजपात जाणार होते. त्यांना काय तुम्ही नाकारणार आहात ते मुसलमान आहेत म्हणून?,"
शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या बदलत्या व्याख्येबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात,"मोदी हे हिंदुत्वाच्या आधारावर दुसरा नेता किंवा पक्ष मोठा होऊ देणार नाहीत किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर इतर कोणाला मतं मिळू देणार नाहीत हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं. हिंदुत्व मतांमध्ये भाजपला आता वाटेकरी नकोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची व्याख्या बदलली. कट्टर हिंदुत्वापेक्षा वेगळं हिंदुत्व त्यांनी लोकांसमोर आणलं."
मग उद्धव ठाकरे यांची ही भूमिका बाळासाहेबांपेक्षा वेगळी आणि विसंगत आहे का?
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात,"बाळासाहेबांची भूमिका वेगळी होती. मुस्लीम मतदार आणि त्यांच्यात काही संवादच नव्हता. हे स्वतः नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं की धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून चूक केली. त्यामुळे 2019 मध्येच बाळासाहेबांच्या विसंगत भूमिका त्यांनी घेतली होती. मोदींनी 2014 मध्ये एकहाती बहुमत मिळवलं तेव्हाच भाजपच्या लक्षात आलं की आपल्याला महाराष्ट्रात हिंदूहदयसम्राटाची गरज नाही. आणि हे उद्धव ठाकरे यांनी ओळखलं होतं,"
मुस्लीम मतदारांचा कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने?
महाराष्ट्रात साधारण 12 टक्के मुस्लीम मतदार आहेत. तर मुंबई शहरात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 22 टक्के आहे.
उद्धव ठाकरे मुस्लीम मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असले तरी आपले पारंपरिक 'हिंदू व्होट' आपल्याकडे कायम राहील आणि भाजपशी युती तोडल्यानंतर जी मतं कमी होतील ती स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांना करावा लागणार आहे आणि हीच त्यांच्यासाठी कसोटी आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात.
मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वायव्य मुंबई आणि ईशान्य मुंबईत मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यात दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. आतापर्यंत शिवसेना भाजप युतीला या मतदारसंघात मतं मिळत होती. परंतु आता भाजप सोबत नसल्याने आणि त्यातही शिवसेनेचे दोन गट झाल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर आघाडीतील मित्रपक्षांची मतं आपल्याकडे वळवण्याचं आव्हान आहे. हीच परिस्थिती मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्येही आहे.
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार समर खडस सांगतात, "गेल्या दहा वर्षात ज्याप्रकारे केंद्र सरकार चाललेलं आहे. केंद्र सरकारची ध्येय, धोरणं काय होती हा मुद्दा वेगळा आहे. परंतु गेल्या काही काळात सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग, बीफ प्रकरणांवरून झालेली माॉब लिंचिंग असेल तसंच बुल्डोझरनीती असेल, दबाव किंवा धमकीचं वातावरण हे प्रकार घडत होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मुस्लीम समाजाला एक दिलासा मिळाला. मुस्लीम समाजाला त्रास असलेली उदाहरणं दिसली नाही."

परंतु यापूर्वी शिवसेनेला मुस्लीम मतं मिळतच नव्हती असंही नव्हतं. मुंबईतील बेहरामपाडा बागातून श्रीकांत सरमळकर हे शिवसेनेचे नगरसेवक निवडून यायचे. तर खेड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांनाही मुस्लीम मतं मिळायची.
भायखळ्यातून यशवंत जाधव आणि त्यानंतर आमदार यामिनी जाधव यांनाही मुस्लीम मतं मिळाली. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेचं जे नेटवर्क आहे, काम आहे तिथे मुस्लीम मतं शिवसेनेला मिळताना दिसली आहेत असंही समर खडस सांगतात.
ते पुढे सांगतात, "आताच्या परिस्थितीत मुस्लीम मतदारांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मशाल चिन्हाकडे जास्त कल दिसेल असं चित्र आहे. कारण भाजप विरोधात आक्रमक राजकीय लढाई लढणारा एक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. काँग्रेसमध्ये राज्यात निर्णायक चेहरा नाही, नेतृत्त्व राहीलेलं नाही हे सुद्धा त्यामागचे एक कारण आहे. शरद पवार यांचा पक्ष फुटल्याने ते पक्षांतर्गत अधिक लक्ष देताना दिसतायत अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आक्रमक लढतायत आणि दररोज लढताना दिसत आहेत. जाहीरपणे भाजप आणि मोदींना आव्हान देताना दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी सध्या हिरो आहेत,"
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना ठाकरे गट हे भाजप विरोधात निवडणूक लढवत असताना या तीन पक्षांमध्ये तुलनेने उद्धव ठाकरे यांची आक्रमकता ठळकपणे दिसून येते आणि हेच कारण आहे की भाजपविरोधी ज्यांना मतदान करायचं आहे ते उद्धव ठाकरे यांना समर्थन देताना दिसतात, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर सांगतात.

फोटो स्रोत, ANI
ते म्हणाले, "आताच्या घडीला मोदींच्या विरोधात महाराष्ट्रात ठामपणे उभा राहणारा माणूस उद्धव ठाकरे आहे. मोदींच्या कारवायांना घाबरून अनेक बडे नेते पक्षांतर करत आहे. पण ठाकरे आणि पवार त्यांच्याविरोधात ठामपणे उभे आहेत. मुस्लीम मतदार भाजपविरोधी मतदान करतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे. उद्धव ठाकरे भाजप विरोधातील ही स्पेस आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतके वर्षं मुस्लीम मतदारांनी काँग्रेसला समर्थन दिलं. पण काँग्रेसच महाराष्ट्रात डळमळीत आणि कच्च्या पायावर उभी आहे असं दिसतंय. यामुळे मोदी शहांना शिंगावर घेणारा माणूस म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातंय."
शिवसेनेला यापूर्वी 12 ते 14 विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदान होत होतं, त्यामुळे ही पहिलीच वेळ नाही जेव्हा उद्धव ठाकरेंना ही मतं मिळतील परंतु उद्धव ठाकरे नवीन व्होट बँक कल्टीवेट करायचा प्रयत्न करत आहे हे नक्की असं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी मांडतात.
ते म्हणाले, "मुस्लीम मतदारांना ज्यांच्या विरोधात मतदान करायचं आहे तसं मतदान कोणाला करायचं हे ते ठरवतात. उद्धव ठाकरे हे पोटतिडकीने भाजपवर टीका करताना त्यांना दिसतात. त्यात उद्धव ठाकरे यांनी शेंडी, जानव्याचं हिंदुत्व आमचं नाही हे पटवून देण्यास सुरुवात केली होती याचा रिझल्ट त्यांना आता काही प्रमाणात मिळताना दिसतोय."
ते पुढे सांगतात,"भाजपचा आक्रमक वर्चस्ववाद आहे त्याविरोधात उभं राहीलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. एक वर्ग पुरोगामी विचारांचा आज ठाकरेंच्या मागे उभा राहील आणि याचं मतांमध्ये परिवर्तन होईल असंही दिसतंय."
मग प्रश्न निर्माण होतो की काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक ही ठाकरेंकडे गेल्यास याचा फटका काँग्रेसला बसेल का? यावर बोलताना प्रधान सांगतात,"याचा काँग्रेसला फटका बसेल हे स्पष्ट आहे. पण तसंही काँग्रेस राज्यात दुबळी झालीय. जी व्होट बँक कधी शिवसेनेकडे येईल याचा कधी विचारही केला नव्हता. आता ती व्होट बँक आपल्याकडे वळवून त्याचं मतांमध्ये उद्धव ठाकरे कसं परिवर्तन करतात हे कौशल्य ठरणार आहे."
मुस्लीम मतदार शिवसेनेकडे किंवा ठाकरे कुटुंबाला कधी एवढ्या मोठ्या संख्येने समर्थन देतील असं कधीही वाटलं नव्हतं. पण तसं सध्यातरी दिसतंय असं ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना वाटतं.
त्या म्हणाल्या," मुस्लीम मतं खूप स्ट्रॅटेजिक असतात. जिंकणाऱ्या घोड्यावर ते स्वार होताना दिसतात. मोदी अल्पसंख्यांकांचे मित्र नाहीत असं त्यांना वाटतं. त्यात मविआ सरकार तयार करून उद्धव ठाकरे यांनी मोदींना यशस्वीरित्या आव्हान दिलंय असंही मुस्लीम मतदारांना वाटतं. शिवाय, काँग्रेस ही महाराष्ट्रातील दुबळी पार्टी झालीय. काँग्रेस ही जिंकणारी तल्लख पार्टी आहे असं मुस्लीम मतदारांना वाटत नसावं त्यामुळे उद्धव ठाकरे हे त्यांच्यासाठी पर्याय म्हणून समोर आलेत शिवाय त्यांची आघाडी सुद्धा आहे."
कोव्हिड काळात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर होते. उद्धव ठाकरे यांनी या काळात अनेक वेळेला समाज माध्यमातून लोकांशी संवाद साधला आणि 'कुटुंब प्रमुख' अशी ओळख मिळवली होती. या निवडणुकीत या ओळखीचे रूपांतर सत्ता मिळवण्यात होते की नाही याचा कौल मतदानातूनच मिळेल.











