हिंदू धर्माच्या अनुयायांनी बौद्ध धर्मात जाण्याची धर्ममार्तंडांना इतकी भीती का वाटते ?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रशांत रुपवते
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी मराठीसाठी
आज बुद्ध पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मीयांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यानिमित्ताने गेल्या महिन्यात प्रकाशित केलेला लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
एप्रिल महिना हा दलित इतिहास महिना किंवा दलित हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मातून इतर धर्मात दलितांनी स्वेच्छेने केलेले धर्मांतर हा देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे आणि इतकंच नाही तर काही ठिकाणी यावरुन दलितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
गुजरात सरकारने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एक पत्रक काढल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. जर एखाद्या व्यक्तीला हिंदू धर्मातून बौद्ध, जैन, शीख किंवा अन्य कुठल्याही धर्मात जायचं असेल तर त्या व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे असं या पत्रकात म्हटलं गेलं होतं. गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्यातील 2003 च्या तरतुदी प्रमाणे ते सक्तीचं आहे, असं या परिपत्रकात म्हटलं होतं.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गुजरात राज्य सरकारच्या गृह विभागाच्या उप-सचिव विजय बधेका यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकावरुन गोंधळ उडाला आहे. हे पत्र घटनाबाह्य आहे असं म्हणण्यास वाव आहे, कारण संविधानाच्या आर्टिकल 25 (2) अन्वये शीख, जैन, बौद्ध हे हिंदूधर्माचा भाग म्हणून नमूद केले आहेत.
वर उल्लेख केलेल्या या सर्व धर्मीयांचे विवाह, पोटगी, घटस्फोट, वारसा, दत्तक विधान कायदे समान आहेत. मात्र, 'गुजरात फ्रीडम ऑफ रिलिजन अॅक्ट 2003 (GFRA)अंतर्गत बौद्ध धर्म हिंदू धर्मा पेक्षा वेगळा आहे, असा अर्थ लावून हे परिपत्रक काढण्यात आले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की 'धर्मांतरांशी संबंधित असलेल्या तरतुदीची चुकीची व्याख्या केली जात आहे. त्यामुळे हिंदू धर्मातून बौद्ध, जैन, शीख या धर्मात जाताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही असा अर्थ अनेक जण काढत आहेत, पण हिंदू धर्मातून कोणत्याही धर्मात जाताना परवानगीची आवश्यकता आहे.'
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
गुजरात सरकारचे परिपत्रक ही स्वतंत्र घटना म्हणून न पाहता त्याला एक प्रतिनिधिक उदाहरण म्हणून घ्यायला हवं. कारण हिंदू धर्म सोडून कुणी इतर धर्मात जाण्याची भीती ही हिंदू धर्ममार्तंडांना नेहमीच असते. याची अनेक उदाहरणं देता येईल.

तेव्हा या भीतीमागे नेमकी कोणती भावना आहे आणि कोणती कारणे आहेत त्याचीच चिकित्सा आपण या लेखातून करणार आहोत.
हिंदू धर्मामध्ये मोठा टक्का हा ओबीसी आणि दलित समूहाचा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या महसुलातून वैदिक तथा हिंदू पुरोहितशाही, मठ, आखाडे, धर्मरक्षण आदी खर्च चालतात. त्यामुळे या समूहांच्या धर्मांतरांची धर्ममार्तंडांना सदोदित भीती वाटत आली आहे. त्यासाठी अशी परिपत्रके, कायदे निर्माण केले जातात.
'बुद्धम शरणमची भीती सनातन !'
वैदिक धर्ममार्तंडांची, हिंदू ओबीसी आणि अस्पृश्यांनी बौध्दधम्म स्वीकारण्याची भिती सनातन आहे. पुष्यमित्र शुंग व्हाया कालडीचे शंकराचार्य व्हाया वाराणसीच्या अखिलभारतीय रामराज्य परिषदचे संस्थापक करपात्री महाराज व्हाया रास्व संघ ते विद्यमान सरकार हे सदोदित या सनातन भीतीचे वाहक ठरले आहेत.
अब्रॅहमिक तथा सेमेटिक धर्मांनी पृथ्वीचा दोनतृतीयांश भाग व्यापला आहे. मात्र या एकेश्वरवादी धर्मांपेक्षा वेदप्रामाण्य धुडकावून देणारे या भूमितील चार्वाक, जैन, बुद्धिझम वैदिकांना जास्त धोकादायक वाटत आले आहे.
कारण वैदिक धर्माचे शोषणाचे मुख्य अस्त्र मनुस्मृती आणि जातिव्यवस्था बुद्धिझमवर वापरणं शक्य नाही. याची जाणीव या धर्ममार्तंडांना आहे.
त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी त्यांच्या 'बंच ऑफ थॉटस' या पुस्तकामध्ये आदिपुरुष संकल्पना आणि पुरुषसूक्तातातील वर्णनाद्वारे स्पष्ट केले आहे की जे लोक चातुर्वर्ण्य व्यवस्था मानतात तेच हिंदू वंशाचे लोक आहेत!
स्थलांतर आणि धर्मांतर
अर्थात सेमेटिक धर्माच्या आगमनामुळे धर्म ही केवळ देवाब्राह्मणांची गोष्ट नाही तर भौतिक आणि सामाजिकही गोष्ट आहे याचे भान या एकेश्वरी धर्मामुळे आले हे खरं. त्यामुळे या देशात धर्मांतर हा प्रश्न व्यापक आणि गंभीर बनला.
केवळ हे धर्म परकीय आहेत म्हणून नव्हे, तर मुख्य म्हणजे या दोन्ही धर्मांमध्ये असलेले समतेचे मूलभूत तत्त्वज्ञान असल्यामुळे या धर्मव्यवस्थेला वैदिक चातुर्वर्ण्य जातव्यवस्थेअंतर्गत आणणे वा अंकित करणे असंभव आहे, ही खरी अडचण आहे.
हिंदु धर्मामध्ये 'आऊट गोईंग' सदोदित सुरू असतं. मात्र इनकमिंग अजिबात नाही. तशी तरतूदच या धर्मव्यवस्थेत नाही. त्यामुळे आहे ती संख्या टिकवणं हे महत्त्वाचंच. बर ही इनकमिंगची तरतूद नसणे हे इतरही 'सनातन' धर्मात आहे. म्हणजे, यहुदी, पारसी, शिंटो, ताओ, जैन, बौद्ध आदी धर्मातही ही तरतूद नाही. यामुळे या धर्मांच्या प्रसार, प्रचाराला मर्यादा आहेत. त्याकारणे हे संख्यात्मकदृष्टया आक्रसले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सेमेटिक धर्मातील ख्रिश्चन आणि इस्लाम तुलनेत नविन धर्म असल्याने, त्यांनी प्रसार, प्रचाराला प्राधान्य देणं नैसर्गिकच. परंतु 'धर्मविकासा'बाबत या दोहोंचा दृष्टीकोनही सनातनीच असल्याने यांच्या प्रसारास खीळ बसली. त्यासाठी या दोन्ही धर्मांमध्ये 'बॅप्टिझम'ची तरतूद आली आहे.
परंतु याचा दुरुपयोग केल्याने हे धर्म तलवारीने आणि प्रलोभनाने प्रसार पावल्याचा ठपका ठेवला गेला. हिंदुस्थान सारख्या देशात हे आरोप पूर्णतः सत्य ठरत नाहीत. हे आपण स्वामी विवेकानंद यांच्या, ‘या भूमीतली धर्मांतरे विशेषतः कनिष्ठ समूहाची धर्मांतरे ही पुरोहितशाही, संरजामशाही आणि जातव्यवस्थेच्या शोषण, अन्यायामुळे झाली आहेत.’ या प्रतिपादनावरुन म्हणू शकतो.
मात्र ‘इंडिया मूव्हिंगः अ हिस्ट्री ऑफ मायग्रेशन’या ग्रंथाचे लेखक चिन्मय तुंबे धर्मांतराला नवीन आयाम देतात. व्यक्ती वा समूहाला विकास साधायचा असेल तर स्थलांतर हा एक उत्तम मार्ग असतो. मात्र भारतीय जातव्यवस्थेने व्यक्तीसमष्टीच्या विकासाच्या संधी मर्यादित केल्या आहेत.
याकारणाने केवळ स्थलांतर नव्हे तर धर्मांतर हा त्यासाठीचा एक प्रभावी मार्ग असल्याचे जगाला दाखवून दिले. याचे वानगीदाखल उदाहरणे म्हणजे, एक मोहम्मद अली जिना यांचे वडिल 'पुंजाजी जिना' त्याचप्रमाणे कॉंग्रेसचे दिवगंत नेते एन. के. पी साळवे वा त्यांचे पुत्र लंडनस्थित प्रसिद्ध भारतीय कायदेतज्ज्ञ अॅड. हरिश साळवे यांचे आजोबा प्रसादराव साळवे यांनी 20 व्या शतकातच स्थलांतर आणि धर्मांतर दोन्ही केले होते.
वैदिक काळातील शोषण व्यवस्था
अशा या वैदिक शोषण व्यवस्थेला बुद्धांनी प्रथम आव्हान दिले. धम्म तत्त्वज्ञान हा जीवनमार्ग म्हणून अनेकांनी स्वीकारला. सम्राट अशोकाच्या काळात धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. लोकांचा धम्माकडे वाढता ओढा तत्कालीन वैदिक धर्ममार्तंडांना, त्यांच्या शोषण व्यवस्थेला, त्यांच्या संस्कृतीला धोक्याचा इशारा वाटला.
या धोक्यामुळेच सम्राट अशोकाचा नातू बृहदरथ आणि त्याच्या सैनिकांचे सेनापती पृष्यमित्र शुंग याने हत्याकांड घडविले. (संदर्भ - पॉलिटिकल व्हॉयलन्स इन अॅन्सियन्ट इंडिया, लेखिका - उपिंदर सिंग)
त्यानंतर बौद्ध धम्माला थेट आव्हान आठव्या शतकात दिले गेले, ते केरळच्या कालडी गावचे शंकर आचार्य तथा आद्य शंकराचार्य (इ.स. 788 - 820) तथा ‘प्रच्छन बुद्ध’यांनी.
त्यांनी चार दिशांना चार वैदिक पीठे स्थापन केली. केवळ 32 वर्षांचे आयुर्मान लाभलेल्या शंकराचार्य यांनी बौध्द धम्माला आव्हान देत लयाला चाललेल्या हिंदू धर्माला संजीवनी दिली. त्याला पुनर्जिवित करत संघठत केले. हा अध्याय प्रतिक्रांती म्हणून ओळखला जातो. येथूनच हिंदू धर्मव्यवस्थेमध्ये प्रथमच 'घरवापसी' या संकल्पनेचा उदय झाला.

फोटो स्रोत, Getty Images
वैदिकांच्या आशा सततच्या प्रयत्नातून शाकाहाराचा, अहिंसेचा पुरस्कर्ता असलेल्या बौद्ध धर्माची भारतात पीछेहाट झाली. परंतु तो संपूर्ण जगभरात पसरला. आणि सद्यस्थितीत येथल्या वैदिक तथा हिंदू राजकीय, धार्मिक, प्रशासकीय अगदी व्यावसायिक, कार्पोरेट आदी व्यक्तीना आंतराष्ट्रीय पातळीवर बुद्धांच्या देशातून आलोय हे सांगण्याची संधी मिळते, असो.
बौद्ध धम्माचा जगभरात प्रसार होत असताना या मातीतला जैन, वैदिक, हिंदू धर्म मात्र आक्रसत होते. नवव्या शतकानंतर वैष्णव पंथाची पकड घट्ट होत गेली तसतसे धर्म, वर्ण, जात आदी व्यवस्था अधिक बळकट होत गेल्या. आणि या जातिव्यवस्थेने आंतराष्ट्रीय पातळीवर आपलं काय चित्र उभं केलं हे सांगणे न लागे.
अर्थात सद्यस्थितीमध्ये या दोन्ही सेमेटिक धर्माकडे जनतेचा ओढा पहिल्यासारखा राहिला नाही. ढोबळपणे त्याची कारणं, या दोन्ही धर्माच्या संस्थाकडे धर्मप्रसारासाठीच्या निधीचा ओघ आटला आहे. जागतिक पातळीवर वाढलेले शिक्षण, लोकशाहीकरण या कारणाने धर्मांतरांना मर्यादा आल्या आहेत.
त्याचप्रमाणे ओद्योगिकिकरण, जागतिकिकरण, विज्ञान प्रसार, रेनेसान्स युग याचाही नकारात्मक परिणाम धर्मांतरास बसला आहे. असो. दुसरं म्हणजे हिंदू धर्मामध्ये सुमारे 250 वर्षापूर्वी ब्रम्हो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज यांच्याद्वारे प्रबोधन युगाने आणलेली धर्मचिकित्सा, धर्मसुधारणा आणि त्याचा कासवगतीने होणारा अंमल, अर्थात उत्तर भारतातील भाग सोडून आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतर आलेले कायद्याचे राज्य, संविधानाचे राज्य!
'घरवापसी'चे कार्यक्रम
महात्मा गांधी आणि गोळवलकर यांनी, आदर्श व्यवस्था म्हणून चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन किंवा वैदिक संस्कृतीच्या चारित्र्याला साजेसा, श्रमाचे विभाजनाचा दांभिक मुलामा दिला गेला तरी त्यास मर्यादा येतात. विशेषतः ब्रिटिशांच्या धर्मनिहाय जनगणना नोंदणी मुळे या मर्यादा उघड्या पडल्या.
तेव्हापासून आपल्या धर्माची लोकसंख्या म्हणून शूद्रातिशूद्रांना, आदिवासींना विशेषतः जननक्षम गर्भाशयांची संख्या कमी होऊ नये म्हणून स्त्रियांना महत्त्व देणाऱ्या संघटना आणि पक्ष यांच्याकडून शूद्रातिशूद्रांना (उच्चवर्णियांना नव्हे) जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन वारंवार केले जाते.
ही संख्यात्मक वाढ दिसावी म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर घरवापसीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित करण्यात येतात.

सद्यस्थितीत तर त्यांना अगदी 'इव्हेंट'चे स्वरुप देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळेनासा झाला. कारण मुळात हिंदूधर्मव्यवस्थेत इनकमिंग ही संकल्पना नाहीच. आणि या धर्मव्यवस्थेचे मुख्य तत्त्व चातुर्वर्ण्य आणि त्यातून आलेली जातव्यवस्था ही घरवापसी कार्यक्रमामध्ये सर्वात मोठी धोंड आहे.
92 साली पुण्यामध्ये झालेल्या घरवापसी कार्यक्रमात तत्कालीन शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, 'घरवापसी करणाऱ्या व्यक्तीची पूर्वाश्रमीची जी जात असेल तीच घरवापसीनंतर कायम राहील!'
याची पुढची पायरी आशा पक्ष – संघटनाना ‘त्यांच्या’लोकसंख्येचा बागुलबोवाचे भ्रमित पसरवले जाते. भारताचा विद्यमान जननदर 2.5 टक्के आहे. गणितसूत्रानुसार ‘त्यांना’ इथली लोकसंख्या ओलांडायला काही शतके लागतील.
बरं वर्चस्वासाठी लोकसंख्या हे गणित पूर्णतः खरं नाही. हिंदुस्थानची लोकसंख्या ३० कोटी असताना मूठभर इंग्रजांनी या भूमीवर 150 वर्षे राज्य केले ना ! आणि त्यापेक्षाही चिमूटभर असलेल्या जातवर्गाने इथल्या 85 टक्के जनतेवर हजारो वर्षं वर्चस्व गाजवलंच की! असो.
याउपरही हिंदू धर्मातील 'आऊट गोइंग' मात्र थांबलेले नाही. बुद्धिझमकडे मागसवर्गीय, दलित, भटक्या – विमुक्तांचा ओढा वाढतोच आहे. वानगी दाखल उदाहरणं, 1 डिसेंबर 2022 लोकसत्ता, देवेश गोंडाणे यांचे वृत्त – यंदा 26,000 हजार नागरिकांडून धम्मदीक्षा, 4 जानेवारी 2023 लोकसत्ता, बापू राऊत यांचा लेख – बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची प्रेरणा काय?
2013 साली नवता प्रकाशनचा ‘पडघम सांस्कृतिक निष्ठांतरांचे’ हा ग्रंथ, दिवंगत हनुमंत उपरे यांचे,‘ओबीसी, चलो बुद्ध की ओर’ अभियान, दिल्लीतील राजेंद्र पाल गौतम यांनी धम्मदिक्षा कार्यक्रमामुळे मंत्री पदाला मारलेली लाथ असेल की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यात सालाबादाप्रमाणे होणारे सामूहिक धम्मदिक्षेचे कार्यक्रम असतील यामधून हेच प्रतित होते.
धर्ममार्तंडांना बुद्धिझमची भीती का वाटते?
मुख्य मुद्दा, बुद्धिझमची वैदिक धर्ममार्तंडांना 'सनातन' भीती का वाटते हे आपण पाहिले. आता हिंदू धर्मातील लोक धर्मांतर करतात याची यांना का भिती वाटते. महत्त्वाची तीन कारणे आपण पाहणार आहोत.
पहिलं कारण आर्थिक आहे. हिंदू धर्मामध्ये मोठा टक्का हा मागासवर्ग आणि दलितांचा आहे. त्यामुळे हिंदू धर्माला येणाऱ्या महसुलाचा मोठा टक्काही या वर्गाकडून येतो. या महसूलातूनच वैदिक धर्माचे मठ, आखाडे, पुरोहितशाही या अनुत्पादक बाबी पोसल्या जातात.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ कायदे इतिहासात (केस लॉ) प्रसिद्ध असलेल्या केशवानंद भारती प्रकरणातून याबाबतचा अंदाज येऊ शकतो. भारती हे शंकराचार्य होते. त्यांच्या मठाच्या संपत्तीवरुन सदर प्रकरण घडले.
त्याचप्रमाणे जवाहरलाला नेहरू युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. महेंद्र प्रताप राणा त्यांच्या बहुजन स्वराज अभियानाच्या घोषणापत्रामध्ये यासंबंधीच्या आर्थिकबाबींचे सविस्तर विवेचन करतात. सदर नऊशे पानांचा दस्तएवज माहिती अधिकार कायदयाच्या अंतर्गत प्राप्त माहितीचे संकलन आहे.
त्यामध्ये अनेक विविध विषयांवरील माहितीचे संकलन केले आहे. त्यामध्ये देशामध्ये 31 लाख 30 हजार 136 मंदिरे असून त्यामध्ये 3 कोटी 71 लाखापेक्षा जास्त पुजारी आहेत आणि ते सर्व उच्चजातीय आहेत. या मंदिरांचे प्रतिदिन उत्पन्न – 17 अब्ज 89 कोटी 20 लाख रुपये (अंदाजे 510 अब्ज उत्पन्न प्रतिमहिना) असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये नोंदणीकृत तीन हजारांहून जास्त देवस्थाने आहेत. या देवस्थांनांची उलाढाल किती असू शकते? आणि या वर्गाने हिंदू धर्मातून धर्मांतर केले तर हा सर्व महसूल आटणार आहे. या व्यवस्थेला सर्व पैसा याच समूहाकडून येतो.
प्राच्यविदया अभ्यासक शरद पाटील त्यांच्या ‘दास शूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात नमूद करतात की, हिदू धर्मात 365 दिवसांमध्ये दोन हजारापेक्षा जास्त कर्मकांडे (म्हणजे महसुलाची साधनं) आहेत. धर्मांतराला मुख्य आडथळा हा या अर्थकारणाचा आहे.
मनुष्यबळाची आवश्यकता म्हणून ?
दुसरा महत्वाचा मुद्दा, यावर्गाकडून येणाऱ्या मनुष्यबळाचा. हिंदुराष्ट्र उभारणीसाठी वा हिंदू संस्कृतिरक्षणासाठी, आघाडीच्या मनुष्यबळाचा, फूटसोल्जर तथा भारवाहकांचा पुरवठा या वर्गाकडून होतो.
मग लव्ह जिहाद, कथिक गोवंशहत्या विरोधातील आंदोलने, आरक्षण, अगदी मंडल आयोगाविरोधात आंदोलने ते संस्कृतिरक्षणासाठी आपले सणवार उन्मादात साजरे करण्यासाठीचे मनुष्यबळ या वर्गातून येते. दहीहंडी, गणेश विसर्जन, कावड यात्रा वगैरे धार्मिक कार्यक्रमात प्रत्येक वर्षी दुर्घटना घडतात.
काही तरुण जखमी होतात. तर काहींचा बळी जातो दहीहंडी उत्सव 2022 वर्षी तीन बळी गेले...त्यांची नावे पहा (या अगोदरच्या पाच...दहा..पंधरा किंवा त्या अगोदरचेही. नावे पहा ...नावे बदललेली दिसतील पण वर्ग एकच दिसेल, शूद्र आणि अतिशूद्र.)

फोटो स्रोत, Getty Images
किंवा विविध धार्मिक कारणासाठी झालेली आंदोलने, दंगली त्यातील आरोपींचे नावे पहा. सर्व ओबीसी, दलित समाजातील दिसतील. चुकूनही त्रैवर्णिकांची नावे दिसणार नाहीत. धर्मांतरामुळे हा भारवाही पायदळाचा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून धर्मांतरास अडथळा.
धर्म कोणताही असो धर्म, संस्कृती रक्षणासाठी कनिष्ठ समूहाचा वापर केला जातो. आपल्या इथे तो समूह इतर मागासवर्ग आहे. तसा समूह पाकिस्तानमध्येही आहेच. पाकिस्तानने 80 दशकामध्ये इस्लामीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला.
(भारताच्या काही संघटनांनी तो आता हाती घेतला.) तो राबवण्यासाठी अध्यक्ष झिया उल हक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मुल्ला मौदुदी यांनी, इस्लामीकरणाची मोहिम पुढे न्यायची तर त्यासाठी जे ‘फूट सोल्जर’ (भारवाहक) लागतील ते समाजाच्या तळागाळातून तथा कनिष्ठ समूहातून येतील असे स्पष्ट केले.
(संदर्भः पाकिस्तानच्या शिक्षणतज्ज्ञ आयेशा सिद्दिकी यांचा ‘टेरर्स ट्रेनिंग ग्राऊंड’ हा लेख न्यूज लाईन – सप्टेंबर 2009) झिया – मौदुदी गेल्यानंतरही, 2010 सालापर्यंत तळागाळातली किमान दहा लाख पाकिस्तानी मुले 20 हजारहून अधिक मदरशातून शिकत होती. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार अजमल कसाब हाही त्याचाच प्रॉडक्ट!
स्पर्धेत येऊ नये म्हणून ?
तिसरे कारण, या वर्गाला मुख्य प्रवाहात येऊ न देणे. स्पर्धेत येऊ न देण्यासाठी संस्कृती, धर्मरक्षणाच्या नावाखाली कर्मकांडात गुंतवणे. मुख्य प्रवाहात येण्यापासून त्यास रोखणे. अन्यथा प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र होऊन मूठभरांच्या वर्चस्वाला बाधा निर्माण होईल.
त्यामुळे या समूहाला कर्मकांड, संस्कृतीरक्षण, कधी खतरे में तर कधी गर्व से कहो च्या भ्रमात गुंतवणे. त्यासाठी धर्मकथा, पुराणे, पावित्र्य – अपावित्र्य यांची मूल्यरचना, दैववादाचे अवडंबर माजवून अभासी विश्वात, वास्तवाच्या आकलनापासून दूर नेले जाते.उदाहरणार्थ ही 2015-16 मधील घटना.
बीड जिल्हयातील कोठहबन, बरगवाडी आणि फुंदेटाकळी या तीन गावांतील रहिवाशांनी भजन – कीर्तनासाठी 'नारळी सप्ताह' आयोजित करत तब्बल 90 लाख रुपयांची वर्गणी गोळा केली. ही गावे दुष्काळी आणि बीड जिल्हा ऊसतोड कामगार प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर दुसरी घटना बरगवाडीतील नागरिकांनी लोकप्रतिनिधी तथा जलसंधारणमंत्री महोदयांकडे गावाची जलयुक्त शिवार योजनेमध्ये निवड करुन बंधारे बांधावेत अशी मागणी केली, मात्र बंधाऱ्याच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष करत नारायणगडाच्या विकासासाठी 51 लाख रुपायांचा निधी देण्याची घोषणा केली.
या सर्वामुळे मागास, दलित, शोषित त्यांच्यातील विचार करण्याच्या उपजत प्रवृत्तीचे दमन केले जाते. कीर्तने –प्रवचने, यात्रा, पदयात्रा, महायात्रा यांच्या फेऱ्यात अडकवून विद्रोहविहिन केले जाते. ज्ञानबंदी, व्यवसायबंदी, शस्त्रबंदी, रोटी–बेटीबंदी यासाठीच्या संस्थात्मक रचना आज पूर्वीसारख्या नाहीत. पण बौद्धिक उत्पादन साधनांवर मालकी व नियंत्रण मात्र वैदिक व्यवस्थेचेच आहे.
त्यासाठी या व्यवस्थेतून बाहेर पडणे हाच पर्याय आहे. नेमक्या याच पर्यायासमोर ही तरतूद धोंड ठेवून बहुजनांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु या अल्प समज धोरणकर्त्यांना बुद्धिझमचे वैशिष्ठ्य माहीत नाही, बुद्धिस्ट होण्यासाठी बौद्धधर्मात धर्मांतरित होण्याची आवश्यकता नाही. कारण त्यास धर्म मानलं जात नाही तर ती एक जीवन जगण्याची पद्धती आहे.
जागतिक पातळीवर त्याची ओळख एक तत्त्वज्ञान म्हणून आहे. त्यापेक्षाही दलाई लामा जे म्हणतात ते महत्त्वाचे, तुम्ही बुध्दीझमचा वापर चांगला बुध्दिस्ट बनण्यासाठी करु नका. तर तुम्ही मुळात जसे आहात त्यापेक्षा चांगले (स्वतःची चांगली आवृत्ती best version of yourself) बनण्याचा प्रयत्न करा.
म्हणजे तुम्ही मुस्लिम असाल तर अधिक चांगले मुस्लिम बनण्याचा प्रयत्न करा, जर तुम्ही हिंदु, ज्यू, ख्रिश्चन, जैन असाल तर त्याची आधिक चांगली आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुम्ही चांगले माणूस बनू शकता. त्यासाठी धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही.
( लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत )











