'रोहित वेमुलाच्या जातीवरील चर्चा म्हणजे इतिहासातली भूतं काढण्याचा प्रकार'

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

भारतात लोकसभा निवडणुकीच्या वातावरणामुळं प्रचंड आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यात रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टमुळं वातावरण आणखी तापू लागलं आहे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणात कुणीही दोषी नसल्याचं सांगत सगळ्यांना या माध्यमातून एकप्रकारे क्लीनचीट देण्यात आली आहे. त्याचबरोबर रोहित वेमुला दलित नसल्याचंही या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं यावरून वादाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, पोलिस महासंचालकांनी यासंदर्भात पुन्हा तपास करण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगितलं आहे.

तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर सादर केलेला क्लोजर रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी अचानक चर्चेत आला. मार्च महिन्यात सादर झालेला हा क्लोजर रिपोर्ट ऐन निवडणुकीच्या वातावरणात समोर आल्यानं त्याच्या टायमिंगच्या मुद्द्यावरून काही प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, विश्लेषक आणि तज्ज्ञांना या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि त्यामुळं सुरू झालेल्या चर्चांविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'काँग्रेसला खाली खेचा'

प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतक्रिया देताना काँग्रेसला लक्ष्य करत टीका केल्याचं पाहायला मिळालं.

काँग्रेसचा न्यायाशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"रोहित वेमुला हा दलित नव्हता. त्याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तेलंगणा पोलिसांनी हे स्पष्ट केले आहे. हा काँग्रेसचा रोहित वेमुलासाठी न्याय आहे," असं ते म्हणाले.

त्याचबरोबर आंबेडकरांनी काही प्रश्नही काँग्रेसला विचारले आहेत. "काँग्रेस न्यायाची व्याख्या अशी करते का? तसंच रोहितची आई, बहीण आणि भावासाठी हा तुमचा न्याय आहे का? शैक्षणिक संस्थांमध्ये दर मिनिटाला भेदभाव आणि छळ होत असलेल्या एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी हा तुमचा न्याय आहे का? दलितांसाठी हा तुमचा न्याय आहे का?" असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, VBA

"न्याय शब्दाचा अर्थ काय आहे आणि तो कशासाठी वापरतात हे आपल्याला माहिती नसेल तर 'न्याय' हा शब्द इतक्या सहजपणे वापरणे थांबवा. न्याय ही क्षुल्लक संज्ञा नाही," असा सल्ला त्यांनी काँग्रेसला दिला.

तसंच, काँग्रेस आणि काँग्रेसची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली खेचण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

क्लोजर रिपोर्टमधील निष्कर्ष हास्यास्पद : मधू कांबळे

ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांनी हा क्लोजर रिपोर्ट 'हास्यस्पद' असल्याचं बीबीसीशी बोलताना म्हटलं.

"निवडणुका सुरू असताना एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर हा क्लोजर रिपोर्ट समोर आला आहे. तेलंगणात निवडणुकानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर काँग्रेसची सत्ता आली. तसंच विरोधकांच्या इंडिया आघाडीचाही काँग्रेस महत्त्वाचा घटक आहे. शिवाय संविधानाबाबत भाजपच्या भूमिकेविषयी सुरू असलेली चर्चा, या सर्वाचा विचार करून हा क्लोजर रिपोर्ट समोर आणण्यात आला असावा," अशी शक्यताही मधू कांबळे यांनी व्यक्त केली.

"तेलंगणातील निवडणुकीनंतर काही काळातच हे सर्व समोर आलं. पण हा क्लोजर रिपोर्ट आता समोर आला असला तरी याची सगळी प्रक्रिया आधीच्या सरकारच्या काळातली आहे. काँग्रेस आता दलित, मागासवर्गीय, बहुजन यांच्या बाबत भूमिका घेत आहे. त्यामुळं त्यांना लक्ष्य करण्यासाठी हा रिपोर्ट समोर आणलं आहे," असं ते म्हणाले.

एवढंच नाही तर या क्लोजर रिपोर्टबाबत भरपूर चर्चा होईल याचीही व्यवस्था केली असल्याचं पाहायला मिळत असल्याचंही ते म्हणाले.

क्लोजर रिपोर्टमधील एक भाग
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जातीचा तपास करणं हे पोलिसांचं काम नाही किंवा त्यांचा तो अधिकारही नाही, पोलिसांनी रोहितच्या आत्महत्येचं कारण शोधायला हवं, ही रोहित वेमुलाच्या भावाची प्रतिक्रिया मधू कांबळे यांना योग्य वाटते.

ते पुढे म्हणतात, "सुप्रीम कोर्टाच्या कोर्टाच्या एका खटल्यात मागासवर्गीय आईनं उच्चवर्णीयाशी लग्न केलं म्हणजे तिचं सामाजित स्थान बदलत नाही, असं म्हटलेलं आहे. त्यामुळं मुळात असा तांत्रिक मुद्दा काढून तो दलित नव्हताच असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. असा सोयीचा अर्थ काढून काही घडलंच नव्हतं, तो जातीयवादाचा बळी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे."

"रोहित वेमुला कोणत्या जातीचा होता, हा मुद्दाच नाही. त्याठिकाणी एक वैचारिक संघर्ष होता. त्या संघर्षात आंबेडकरवादी भूमिका घेणारा तो विद्यार्थी कार्यकर्ता होता. त्यामुळं तो दलित असेल किंवा नसेल तरीही त्याच्यावर दबाव तंत्राचा वापर केल्यानं कदाचित त्याच्यावर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली असेल, याची चौकशी व्हायला हवी होती," असं ते म्हणाले.

हैदराबाद विद्यापीठात उजवा आणि पुरोगामी असा संघर्ष होता. उजव्या विचाराच्या लोकांची सत्ता होती, हे सर्वकाही उघड होतं. त्यादृष्टीनंही याचा विचार करावा लागेल. त्यामुळं तो दलित जातीचा नव्हता आणि जात उघड होईल म्हणून टोकाचं पाऊल उचललं हा हास्यास्पद रिपोर्ट आहे, असंही मधू कांबळे यांनी म्हटलं.

संपूर्ण तपासच खोटा : रावसाहेब कसबे

रोहित वेमुलाच्या आत्महत्येसंदर्भातील सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्याच्या जातीच्या मुद्द्यावरून प्रचंड चर्चा होऊ लागली आहे. पण भारतामध्ये जोपर्यंत जातीव्यवस्था आहे, तोपर्यंत अशाप्रकारे जातींच्या संदर्भात चर्चा करून त्याचं राजकारण करण्याचे प्रकार सुरुच राहणार असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत राबसाहेब कसबे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

एखाद्या विशिष्ट जातीच्या बाजुनं किंवा विरुद्ध बाजुनं तसंच कोणाला तरी फायदा किंवा नुकसान पोहोचवण्यासाठी अशाप्रकारच्या घटना घडवून त्याची चर्चा होतच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

"रोहितच्या मृत्यूनंतर तेव्हाच्या सरकारनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं केला. किंवा हा तपासच खोटा होता. पण आता तेलंगणाच्या सध्याच्या सरकारनं याचा पुन्हा एकदा याचा तपास करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं या निर्णयाचं आपण स्वागत करायला हवं," असंही कसबे म्हणाले.

'आत्महत्या नव्हे व्यवस्थेचा बळी'

रोहित वेमुलानं आत्महत्या केली असली तरीही, ती व्यवस्थेमुळं झालेली संस्थात्मक हत्या असल्याचं परखड मत लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केलं. पण ते सिद्ध करणं सोपं नव्हतं. कारण व्यवस्थेकडं त्यांची खोटी भूमिका रेटून नेण्यासाठीची सगळी संसाधनं असतात, असंही त्यांनी म्हटलं.

"सरकारनं सुरुवातीपासून अंग झटकण्याचा प्रयत्न करून जबाबदारी टाळली. तथ्यांशी छेडछाड करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांच्याकडं असलेल्या सर्व साधनांचा वापर केला. त्या माध्यमातून चौकशीचा फक्त फार्स करण्यात आला. त्यामुळं आता समोर आलेला क्लोजर रिपोर्ट हा त्याचाच एक भाग होता, असं सरळ दिसत आहे," असं त्यांनी म्हटलं.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

तेलंगणा सरकारनं चौकशीची घोषणा केली आहे, त्याचं स्वागतच आहे. पण किमान ही चौकशी न्याय्य होऊन रोहित वेमुलाच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तर दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांनी या सगळ्या चर्चा फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

"हा रिपोर्ट अद्याप जाहीरपणे समोर आलेला नाही. त्यामुळं त्यावर अशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होत आहे. सरकारने तो जाहीरपणे समोर आणावा हवं तर सोशल मीडियावर हा रिपोर्ट टाकावा आणि त्यावर चर्चा होऊ द्यावी," असं त्यांनी म्हटलं.

इतिहासातली भूतं काढण्याचा प्रकार : उत्तम कांबळे

या सगळ्या चर्चा मतं मिळवण्यासाठी किंवा कुणाला तरी अडचणीत आणण्यासाठीच्या राजकारणातील चर्चा आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केलं.

"पण या विषयाचं राजकारण करू नये, कारण त्यामुळं मूळ विषय बाजूला पडतो. स्वतःचं कर्तृत्व सांगायला जेव्हा मर्यादा येतात आणि पायाखालची वाळू सरकायला लागते, तेव्हा अशाप्रकारे इतिहासातली भूतं बाहेर काढली जातात," असं त्यांनी म्हटलं.

उत्तम कांबळे सांगतात, "मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीत रोहितनं त्याच्या मनात व्यवस्थेविषयी असलेला रोष व्यक्त केला आहे. ही व्यवस्था कशी आहे? शिक्षण क्षेत्रात किंवा बुद्धीजीवींमध्ये ही व्यवस्था कशी काम करते? किंवा इतर ठिकाणी ही व्यवस्था कशी काम करते हे त्यानं डायरीत मांडलं आहे.

"डायरीतले सगले मुद्दे हे एकप्रकारे त्याच्या मृत्यूची कारणं आहेत, असं आपण समजायला हवं. ही प्रस्थापितांविरोधातली किंवा व्यवस्थेविरोधातली कारणं आहेत. पुरोगामी, वेगळ्या विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्याची एक विशिष्ट विचारसरणी तयार झाली आणि त्यानंतर त्यानं ती डायरी लिहिली."

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

मृत्यूनंतर एवढ्या वर्षांनी आईची जात लावली की, वडिलांची जात लावली यावर चर्चा केली जात आहे, पण त्याला अर्थ नाही. त्यातून काय सिद्ध केलं जाणार आहे. उलट त्याचा जो रोष आहे, त्यावर मात्र बोललं जात नाही. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न यातून केला जातो, असंही त्यांनी म्हटलं.

हे प्रकरण नेमकं निवडणुकीच्या काळात समोर आलं आहे. तसंच राज्यात काँग्रेसचं सरकार असताना रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यावर अशाप्रकारे चर्चा करायला सुरुवात झाली आहे. पण आपली पापं झाकण्यासाठी हा विषय दुसरीकडं वळवायचा प्रकार आहे, असं त्यांनी म्हटलं.

"शहाण्या माणसाने असे विषय राजकारणात आणू नये. कारण याचा वापर करून मतं मागणं हे अनैतिक राजकारण आहे. रोहितचा मृत्यू झाला तेव्हा आता बोलणाऱ्यांची भूमिका काय होती. अशाप्रकारे जेव्हा व्यवस्थेमुळं कुणाचा तरी बळी जातो, तेव्हा या व्यवस्थेविरोधात भाजप कधीही भूमिका घेत नाही," असा आरोप त्यांनी केला.

'रोहित म्हणजे फक्त हिमनगाचे टोक'

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सदस्य अभय टाकसाळ यांनी यासाठी 'मनुवादी भूमिका' कारणीभूत असल्याचा आरोप बीबीसीशी बोलताना केला.

ते म्हणाले की, "रोहित वेमुलाच्या प्रकरणाबरोबरच, जेएनयूचं प्रकरण, तमिळनाडूच्या आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर आणलेली बंदी, मणिपूरचं प्रकरण या सगळ्यामध्ये भाजपची भूमिका मनुवादी असल्याचं सगळ्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळं त्याला बगल देण्यासाठी म्हणून, ते अशा क्लुपत्या शोधत असतात."

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, GETTY IMAGES

रोहितच्या आईने बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळं त्याच्या जात प्रमाणपत्राशी आम्हाला काही देणंघेणं नाही, याबाबतच्या चर्चा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं.

क्लीनचीटच्या मुद्द्यावरूनही टाकसाळ यांनी टीका केली. ते म्हणाले, "साक्षीदारही त्यांचे आणि जजही त्यांचा अशी परिस्थिती असेल तर त्यांच्याकडून तटस्थतेची अपेक्षा कशी करता येईल. इतर पक्षांच्या भ्रष्ट नेत्यांना जे वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करतात ते स्वतःला कसे स्वच्छ करणार नाही. पण हे डाग साधे नाहीत. या संपूर्ण प्रकारामुळं लोकांच्या मनावर ओरखडा निर्माण झाला आहे. त्यामुळं हे डाग सहजासहजी मिटणार नाहीत."

तसंच, "रोहित हे फक्त हिमनगाचं एक टोक होतं. त्याच्याखाली असंख्य मागासवर्गीय मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीची ही व्यवस्था आहे. आज जीवंत असलेल्या अनेकांना शैक्षणिक व्यवस्थेत त्रास दिला जात आहे, हे सगळं मुलं विसरू शकत नाहीत," असंही ते म्हणाले.