बिहारमध्ये मुलींना मयताला नाचवण्याची प्रथा का आकार घेत आहे?

रिया ही मूळची दिल्लीची आहे.
फोटो कॅप्शन, रिया ही मूळची दिल्लीची आहे.
    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, बिहार

मी जेव्हा रियाला सकाळी 10 वाजता भेटायला गेले, तेव्हा तिला चालताना बराच त्रास होत होता. तिनं आदल्या रात्री अगदी सकाळपर्यंत बरंच नारळ पाणी पिलं होतं.

खरंतर 24 वर्षीय रिया श्राद्धाच्या एका कार्यक्रमामध्ये नाचून, सकाळी बिहारच्या पटनामधील सिपारा मोहल्ल्यामधील आपल्या भाड्याच्या घरात परतली होती. मात्र, रात्रभर नाचल्याने ती प्रचंड थकली होती.

ती मूळची दिल्लीची रहिवाशी आहे. ती सांगते, "इथे एखाद्याची मयत झाल्यावरही लोक डान्स करायला लावतात. एकीकडे पार्थिव उचललं जात असतं तर दुसरीकडे त्यासोबतच डान्सही केला जात असतो. एवढंच नव्हे तर या नाचण्याच्या कार्यक्रमादरम्यानच लोक असभ्य वर्तनही करत असतात. ते जवळ बोलवून स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. हे फारच विचित्र वाटतं; मात्र, आमचं हेच काम आहे. एखाद्याची मयत झाल्यावरही मुलींना नाचवण्याची हौस इथल्या लोकांची आहे."

रियाने सांगितलेल्या या गोष्टीला दुजोरा देतच तिच्या जवळ बसलेली काजल सिंह सांगते की, "मला पहिल्यांदा दनियावांमध्ये (पाटनाजवळील एक गाव) 'मरनी'साठी (मयत) नाचायला बोलवलं होतं. मी खरं तर धक्क्यात होते की, मेल्यानंतर असं कोण नाचगाणं घडवून आणतं? मात्र, तिथल्या लोकांनी म्हटलं की सगळं काही होतं. मला असं सांगितलं गेलं की, मरणाऱ्याचीच अशी इच्छा होती की, त्याचा मृत्यू झाल्यानंतर नाचणाऱ्या मुलींना बोलवून नाचगाणं केलं जावं."

काजल आणि रिया या दोघीही प्रोफेशनल डान्सर आहेत. त्या लग्न, तिलक (उत्तर भारतातील समारंभ), मुंडन, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा प्रकारच्या समारंभापासून ते आता मयतालाही नाचायला जातात. बिहारमध्ये या प्रकाराला 'बाईजी का नाच' असंही म्हटलं जातं.

मयताचा जल्लोष

मृत्युसारख्या शोकाकूल घटनेवेळी मुलींना नाचवण्याचा प्रकार अनेकांना धक्कादायक वाटू शकतो. मात्र, बिहारच्या काही आतील भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून हा एक नवा पायंडा पडताना दिसतो आहे.

एखाद्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याची शवयात्रा बँड-बाजा वाजवून काढण्याची परंपरा आधीही होतीच; मात्र, त्यामध्ये आता मुलींना आणून नाचवण्याची प्रथा नव्यानेच आकार घेताना दिसत आहे. हा ट्रेंड तुलनेने नवीन आहे; मात्र, त्यात वाढ होताना दिसत आहे.

पाटनामधील कोमल मिश्रा यांनी 15 व्या वर्षीपासूनच लग्नसमारंभामध्ये डान्स करण्यास सुरुवात केली होती. आज त्या 32 वर्षांच्या आहेत. त्या म्हणतात की, गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांना मयतालाही नाचण्यासाठी बोलावलं जात आहे.

कोमल सांगतात की, "मरनी (मयत) असो वा लग्नसमारंभ, सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये एकसारखंच नाचावं लागतं. जर मध्ये कुणी कमीशन खाणारा नसेल तर एका रात्रीसाठी सहा हजार रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकतो. रात्री आठ-नऊ वाजता नाचण्यास सुरुवात होते, तर पहाटे चार-पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरुच राहतो. आधी हिंदी गाणी वाजतात. सामान्यत: रात्री बारा वाजताची वेळ ओलांडल्यानंतर भोजपुरी गाणी वाजू लागतात."

पुढे कोमल सांगतात, "लहंग्यातून शॉर्ट्समध्ये यावं, अशी लोकांची मागणी असते. लोक पैसे दाखवून खाली बोलवतात आणि मग त्यांच्या कडेवर अथवा मांडीवर बसून पैसे घ्यावे लागतात. हे लग्न समारंभाप्रमाणेच मयताच्या कार्यक्रमातही होतं. या दोन्हीमध्ये काहीही फरक असत नाही."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

फक्त नाचणंच नाही तर फायरिंगही...

बिहारमधील भोजपूर, औरंगाबाद, बांका, रोहताससहित अनेक जागी मयताला डान्स करण्याचं हे चलन सातत्याने वाढतच चाललं आहे. यामध्ये, शवयात्रेच्या दरम्यान श्राद्ध कर्म सुरु असताना लोक नाचण्याचाही कार्यक्रम आयोजित करतात.

आता तर या श्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये, लग्न समारंभामध्ये अथवा इतर कोणत्याही आनंदादायी कार्यक्रमांमध्ये जल्लोष म्हणून फायरिंगचे प्रकारही घडतात.

अलीकडेच नालंदा जिल्ह्यातील आशीर्वाद कुमार यांचा मृत्यू अशाच एका मयताच्या कार्यक्रमामध्ये मुलींना नाचवताना झाला होता. जल्लोष म्हणून फायरिंग करताना त्यांना 'चुकून' गोळी लागली होती.

त्यांचे वडिल प्रमोद प्रसाद यांनी म्हटलं की, "आम्ही जानकी देवी यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाला नाचण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी दोन नोव्हेंबरला गेलो होतो. रात्री बारा वाजता तीन डान्सर पिस्तूल घेऊन नाचत होत्या. माझा मुलगादेखील स्टेजवर चढून नाचत होता. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या डोक्याला गोळी लागली. आम्ही त्याला घेऊन दवाखान्यात गेलो पण तो वाचला नाही."

श्राद्ध विधीत आयोजित 'बाईजी के नाच' अर्थात मुली नाचवण्याच्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये आशीर्वाद कुमारचा मृत्यू झाला.
फोटो कॅप्शन, श्राद्ध विधीत आयोजित 'बाईजी के नाच' अर्थात मुली नाचवण्याच्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये आशीर्वाद कुमारचा मृत्यू झाला.

श्राद्धाच्या कार्यक्रमाला आयोजित केलेल्या या डान्स प्रोग्राममध्ये हातात बंदूक घेऊन नाचणाऱ्या डान्सर्सचे अनेक व्हीडिओदेखील व्हायरल झाले आहेत.

डान्सर कोमल सांगतात की, "आधी भीती वाटायची, मात्र, आता अजिबात भीती वाटत नाही. उलट आता असं वाटतं की, माझ्या प्रोग्राममध्ये जर फायरिंग होत नसेल तर वाटतं की माझ्या डान्सला काही अर्थच नाहीये."

अशा प्रकारे फायरिंग करणं याकडे सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पाहिलं जातं.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे माजी प्राध्यापक पुष्पेंद्र सांगतात की, "ज्या प्रकारे सरकारकडून एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मृत्यूनंतर फायरिंग करुन सन्मान दाखवला जातो, अगदी त्याच प्रकारे हे लोकदेखील आपल्या स्वकियांच्या मृत्यूनंतर सन्मान आणि ताकदीचं प्रदर्शन अशा दोन्ही गोष्टींसाठी फायरिंग करत असावेत, असं मला वाटतं. हे एक प्रकारे सरकारची नक्कल केल्यासारखं आहे."

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

असं करणं परंपरेचा भाग आहे का?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लोकसंस्कृतीचा अभ्यास केल्यास मृत्युप्रसंगी आणि त्यानंतर होणाऱ्या विधींमध्ये गायनाची परंपरा राहिलेली आहे. मात्र, मृत्यू झाल्यानंतर होणाऱ्या विधींमध्ये नृत्य करणं, जल्लोष व्यक्त करण्याचीही परंपरा राहिलेली आहे का?

राम नारायण तिवारी उत्तर प्रदेशमधील पीजी गाजीपूर कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवतात.

त्यांनी 'भोजपुरी श्रम लोकगीतों में जंतसार' यांसारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते सांगतात की, "मृत्यूप्रसंगी तीन प्रकारची गीते परंपरेत आहेत. पहिलं मृत्यू गीत, दुसरं निर्गुण आणि तिसरं श्री नारायणी. बाकी मृत्युवेळी ज्या महिला काही म्हणत म्हणत रडतात, त्याला 'रुदन गीत' म्हटलं जातं. मात्र, नृत्य करण्यास मनाई असते."

पुढे ते सांगतात की, "मृत्यूशी निगडीत पारंपरिक गायनामध्ये ग्लानी, करुणा आणि करुण रस असतो. मात्र, आता जी गाणी वाजवली जातात तसेच ज्या प्रकारे महिलांना बोलवून नाचवलं जातं, त्यामध्ये लपलेली विलासी भावना आणि आपल्या जात श्रेष्ठत्वाचं प्रदर्शन आहे. जे भारतीय समाजाचा महत्त्वाचा पाया असलेल्या 'सहकाराची परंपरा' मोडून काढण्याचे आणि 'एकाकी' होण्याचे लक्षण आहे."

काजल सिंग एक प्रोफेशनल डान्सर आहे.
फोटो कॅप्शन, काजल सिंग एक प्रोफेशनल डान्सर आहे.

पल्लवी बिस्वास या पाटलीपुत्र युनिव्हर्सिटीमध्ये संगीत शिक्षक आहेत.

त्या सांगतात की, "मृत्यूनंतर जे सोडून निघून गेले आणि जे इथेच राहिले, त्या दोघांसाठीचा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी ऋचागान व्हायचं. पुढे सामान्य लोकांच्या बोलीभाषेतील निर्गुण आले. निर्गुणानंतर मृत्यूवर 'दुगोला' गायला जाऊ लागला. ('दुगोला' या प्रकारात दोन गट आपापसात गाण्याची स्पर्धा करतात आणि खाली बसलेले लोक आपापल्या गटाला प्रोत्साहन देत या कार्यक्रमाची मजा घेतात.) पण नंतर दुगोल्यामध्ये महिलांना नाचवण्याची प्रथा सुरु झाली. आता तर भोजपुरी गाण्यांवर एक्स्क्लूझिव्ह डान्सर्सना बोलवून बटबटीत आणि काहीसा अश्लिल डान्स केला जातो. "

"आपल्या परंपरेमध्ये जन्म आणि मृत्यू दोन्हींशी निगडीत गाणी आहेत. मात्र, दोन्ही वेळच्या गाण्यांमध्ये फरक आहे. हा फरक तसाच राहू दिला पाहिजे."

आपल्या जातीच्या ताकदीचं प्रदर्शन

मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे दुगोला या प्रकारामध्ये शीघ्र कवींचे दोन अथवा त्याहून अधिक समूह असतात. हे शीघ्र कवी हजरजबाबीपणे काव्य रचून गातात आणि प्रतिस्पर्धी गटाला काव्यातूनच उत्तर देतात.

आधी दुगोलांमध्ये सवाल-जवाब चालायचा. त्यामध्ये धार्मिक विषय गायले जायचे, पण आता त्यात जातीवादी टोमणे अधिक असतात.

कोमल मिश्राने वयाच्या 15 व्या वर्षी लग्नात डान्स करायला सुरुवात केली होती.
फोटो कॅप्शन, कोमल मिश्राने वयाच्या 15 व्या वर्षी लग्नात डान्स करायला सुरुवात केली होती.

वरिष्ठ पत्रकार आणि बिहारच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक निराला बिदेसिया सांगतात की, "गेल्या 30 वर्षांपासून मृत्युनंतरच्या कार्यक्रमांमध्येही दुगोला गायला जाऊ लागला. आणि यूट्यूबवर त्यांची रेकॉर्डिंग पाहिली तर मागे नियमित श्राद्ध विधीचे पोस्टर आणि समोर अश्लील गाण्यांवर नाचत असल्याचं चित्र दिसेल."

डान्सर कोमल सांगतात की, "श्राद्ध असो वा लग्नाची गाणी, ती जातीनुसारच निश्चित होतात. आपापल्या जातीच्या हिशेबाने आपापल्या जातीच्या कलाकारांची गाणी वाजवली अथवा गायली जातात."

'लोकांच्या दबावामुळे बोलावले डान्सर'

हल्ली लोक आपल्या जवळच्या लोकांच्या दबावामुळे या डान्सर्सना बोलवत आहेत. नालंदामधील गोविंदपूरमध्ये राहणाऱ्या अजय यादव यांनीही आपले वडिल बोधी यादव यांच्या मृत्युनंतर डान्सर्सना बोलवलं होतं.

अजय सांगतात की, "आमच्या इथे मांडव घालण्यात आला होता. समाजातील लोकांनी असा आग्रह लावून धरला की नाच-गाण्याचा प्रोग्राम करण्यात यावा. आम्ही पावापुरीमधून नाचणाऱ्या सहा मुलींना बोलवलं होतं."

"पहिल्यांदा निर्गुण झालं. रात्री भोजपुरी गाणी झाली आणि त्यावर मुलीही नाचल्या. माझ्या आईला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. दु:खी झालेली माझी आई काही दिवस नाराजी व्यक्त करत राहिली."

डान्सर असलेली कोमल म्हणाली की, गाणी जातीनुसार ठरवली जातात.
फोटो कॅप्शन, डान्सर असलेली कोमल म्हणाली की, गाणी जातीनुसार ठरवली जातात.

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सान्यसेसचे माजी प्राध्यापक पुष्पेंद्र सांगतात की, "पूर्वीच्या लोकांचं आयुष्य कमी होतं. त्यामुळे, जर कुणी फार काळ जगलं तर त्यांच्या निकटवर्तीयांकडून ही बाब साजरी केली जायची. त्यामुळेच, शवयात्रेसोबत बँड-बाजा, हत्ती, घोडे, उंट, पैसे उडवणे, फुलांचा वर्षाव करणे, यांसारकख्या गोष्टी केल्या जात होत्या. आताही ही परंपरा दिसतेच."

मात्र, बँड-बाजासोबतच आता डान्सर्सनाही बोलवलं जात आहे. आणि लोकांकडे या बाबीचं समर्थन करण्यासाठी कारणेही आहेत. पाटनापासून जवळच असलेल्या फतुहामध्ये राहणाऱ्या जनता देवी यांच्या दिराच्या मृत्युवेळीही असाच नाचण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जनता देवी सांगतात की, "दीराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सासरच्या मंडळींनी डान्सर्सना बोलवण्याचं नियोजन केलं. ते म्हणाले की, मरण पावलेल्या व्यक्तीला नृत्याचा कार्यक्रम आयोजित करून अंतिम निरोप देण्यात यावा. त्यांच्याकडे पैसे होते त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम केला. आम्ही हे कसे करु शकतो?"

'हे समाजासाठी योग्य नाही'

अशा प्रकारचं चलन हे समाजासाठी अत्यंत अयोग्य असल्याचं समाजशास्त्रज्ञ मानतात. प्राध्यापक पुष्पेंद्र म्हणतात की, "हे अलीकडचं नवं मास कल्चर आहे. यामध्ये लोक संगीताच्या संस्कृतीसोबतच अलीकडचं नवं फॅडदेखील मिसळत आहे."

सरतेशेवटी, या सगळ्याचा परिणाम काय होईल, या प्रश्नावर पुष्पेंद्र म्हणतात की, "जर आपण मृत्यू आणि जीवन यातील फरक पुसून टाकत राहिलो तर आपण पश्चात्ताप, हिंसेबद्दल द्वेष आणि मृत्यूनंतर सौम्य आणि संयत वागणूक ही मूल्येच आपण गमावून बसू. यामुळे, समाज अधिकाधिक हिंसक होईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)