मुलगी जन्मताच तिला मारून टाकणाऱ्या सुइणीच झाल्या त्यांच्या तारणहार

सीरो देवी आणि मोनिका थत्ते
फोटो कॅप्शन, सीरो देवी आणि मोनिका थत्ते
    • Author, अमिताभ पाराशर
    • Role, बीबीसी आय इनव्हेस्टिगेशन

एके काळी सुईण म्हणून काम करणाऱ्या सीरो देवींनी मोनिका थत्तेला घट्ट मिठी मारली, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. आता वयाच्या विशीत असलेली मोनिका पहिल्यांदाच तिच्या जन्मस्थळाला भेट द्यायला परतली होती. उत्तर भारतातल्या एका खेडेगावात. इथेच सीरो देवींनी अनेक बाळंतपणं केलेली होती.

आपण सुईण म्हणून जन्म दिलेल्या बाळाला एवढ्या वर्षांनी पाहताना होतो त्या आनंदाने सीरो देवी अश्रू ढाळत नव्हत्या. तर मोनिकाच्या रूपाने ‘ते’ भयंकर दिवस आठवून अनेक भावना त्यांच्या डोळ्यात दाटून आल्या असाव्यात.

सीरो देवी आणि त्यांच्यासारख्या अनेक सुइणींना त्या काळी अशा ‘नकोशा’ झालेल्या अनेक मुलींची जन्मतःच हत्या करावी लागली होती.

नोंदी आणि तपशिलावरून हे म्हणायला पुरता वाव आहे की, मोनिकासुद्धा त्यापैकी एक ‘नकोशी’ होती. पण तिला मारण्याऐवजी सीरो देवींनी जीवदान दिलं होतं.

1996 साली मी बिहारमध्ये सीरो देवी आणि इतर चार सुइणींची मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हापासून म्हणजे गेली 30 वर्षं मी सीरो देवींच्या बातमीचा पाठपुरावा करत आहे.

बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील नवजात मुलींच्या हत्येमागे या सुइणींचा हात असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने मिळवली होती.

नवजात अर्भक मुलीचं असेल तर तिला जन्मतःच संपवून टाकण्यासाठी तिच्या पालकांचा या सुइणींवर दबाव असायचा. या दबावाखाली सुइणी या तान्ह्या मुलांना केमिकल खायला घालून किंवा थेट मान मुरगळून, गळा दाबून मारून टाकत असत.

मी मुलाखत घेतलेल्या सुइणींपैकी वयाने सर्वांत मोठ्या हाकिया देवी होत्या. त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं होतं की, त्यांनी 12 किंवा 13 बाळांना मारलं होतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

धर्मी देवी या आणखी एक सुईण. त्यांनी त्याहून अधिक बाळांना म्हणजे किमान 15 ते 20 बाळांना मारल्याचं कबूल केलं.

ज्या प्रकारे ही माहिती गोळा केली गेली ते पाहता, त्यांनी नेमकी किती बाळं मारली असतील, हे निश्चित सांगणंही अशक्य आहे.

परंतु, 1995 मध्ये एका स्वयंसेवी संस्थेनं 30 सुइणींच्या मुलाखतीवर आधारित एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालातील आकडेवारी खळबळजनक होती.

अहवालातील अंदाज अचूक मानल्यास एका जिल्ह्यात केवळ 35 सुइणींनी वर्षभरात एक हजाराहून अधिक तान्ह्या मुलींची हत्या केली होती.

याच अहवालानुसार, बिहारमध्ये त्यावेळी पाच लाखांहून अधिक सुइणी कार्यरत होत्या होत्या आणि स्त्री भ्रूणहत्या काही फक्त बिहारपुरती मर्यादित नव्हती.

हाकिया सांगतात की, “मालकाने दिलेली आज्ञा नाकारण्याचा पर्याय सुईण म्हणून आमच्याकडे कधीच नव्हता. ज्या खोलीत बाळंतपणाला जायचे, त्या खोलीला ते कुटुंब कुलूप लावून घ्यायचे आणि काम होईपर्यंत आमच्यामागे लाठ्या घेऊन उभे राहायचे.”

हाकिया देवी पुढे सांगतात, “ते म्हणायचे, आम्हाला आधीच चार-पाच मुली आहेत. त्या आमचा पैसा संपवून टाकतील. आता या मुलींसाठी हुंडा दिला की, आमच्यावर उपाशी मरण्याची पाळी येईल. त्यातून ही आणखी एक मुलगी झाली. काय करणार? मारून टाक तिला.”

“आता अशा परिस्थितीत आम्ही कुणाकडे तक्रार करायची होती? आम्ही घाबरायचो. आम्ही पोलिसांकडे गेलो तर अडचणीत येण्याची भीती असे. आम्ही बोललो तर लोक आम्हालाच धमक्या देत,” असं हाकिया यांनी मला सांगितलं.

अमिताभ पाराशर
फोटो कॅप्शन, पत्रकार अमिताभ पाराशर

ग्रामीण भारतातील सुइणींची भूमिका परंपरेत रुजलेली आहे. गरिबी आणि जातीच्या कठोर वास्तवाने दबलेली आहे.

मी ज्या सुइणींची मुलाखत घेतली, त्या भारतातील जातीय उतरंडीत सगळ्यात खालच्या जातीतील होत्या. सुइणीचं काम हा पिढीजात व्यवसाय होता आणि त्यांना त्यांच्या आई–आजीकडून हा वारसा मिळाला होता. त्या अशा जगात राहत होत्या, जिथे शक्तिशाली, उच्चवर्णीय कुटुंबांचे आदेश नाकारणे कल्पनेपलीकडचे होते.

तान्हुलीला मारण्याच्या कामासाठी सुइणीला साडी, धान्याचं पोतं किंवा थोडेसे पैसे देण्याचं कबूल केलं जाई. कधी-कधी तेही दिलं जात नव्हतं. मुलाचा जन्म झाला तर सुइणीला एक हजार रुपयांचं बक्षीस मिळे. मुलगी जन्मली तर कमाई निम्म्याने कमी होई.

या असमतोलाचं, भेदभावाचं कारण हुंडा देण्याच्या प्रथेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. जरी 1961 मध्ये ही प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली होती, तरीही ती 90 च्या दशकापर्यंत सर्रासपणे सुरू होती आणि खरं तर आजही चालू आहे.

हुंडा म्हणजे त्यात काहीही असू शकतं – रोख रक्कम, दागिने, भांडी. पण श्रीमंत असो की गरीब, अनेक कुटुंबांसाठी ती मुलीच्या लग्नाची अट असते आणि म्हणूनच अजूनही अनेकांसाठी मुलाचा जन्म आनंदाचं कारण आणि मुलीचा जन्म म्हणजे आर्थिक भाराची चिंता बनते.

मी ज्यांची मुलाखत घेतली, त्यांच्यापैकी एकमेव सुईण सीरो देवी हयात आहेत. त्या या विषमतेचं रूप स्पष्ट करण्यासाठी जळजळीत वास्तव सांगतात.

सीरो देवी म्हणतात, "मुलगा जमिनीच्या वर आहे, म्हणजे उच्चस्थानी, तर मुलगी खाली, म्हणजे तळाला. मुलगा त्याच्या आई-वडिलांची काळजी घेवो, त्यांना सांभाळो वा न सांभाळो, आजही सर्वांना मुलगाच हवा आहे.”

सीरो देवी
फोटो कॅप्शन, सीरो देवी

‘मुलगाच हवा’ हे विषमतेचं वास्तव भारताच्या राष्ट्रीय जनगणनेच्या आकडेवारीतूनही दिसून येतं. सगळ्यात ताजी जनगणनेची आकडेवारी 2011 साली प्रसिद्ध झाली. त्यानुसार स्त्री-पुरुष प्रमाण 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया एवढं नोंदवलं गेलं. तरीही ही आकडेवारी त्याआधीच्या दशकापेक्षा सुधारलेली म्हणावी लागेल. कारण 1991 च्या जनगणनेत हे प्रमाण 1000 पुरुषांमागे 926 स्त्रिया एवढं कमी होतं.

2021 च्या सर्वेक्षणात हे प्रमाण आणखी थोडंसं सुधारण्याची शक्यता आहे. पण कार्यकर्ते सांगतात की, ही आकडेवारी फारशी विश्वासार्ह वाटत नाही.

1996 मध्ये मी या सुइणींनी कॅमेऱ्यासमोर दिलेली कबुली नोंदवून संपवली, तेव्हाच हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाला होता. ज्या सुइणींनी त्यांना मिळालेल्या आज्ञेप्रमाणे बाळं मारली होती, त्यांनी हत्येला विरोध करायला सुरुवात केला.

हा बदल अनिला कुमारी या सामाजिक कार्यकर्तीच्या प्रेरणेने झाला. अनिला यांनी कटिहारच्या आसपासच्या खेड्यांमध्ये महिलांसाठीची एक सामाजिक संस्था चालवली होती. ही संस्था या नवजात अर्भकांच्या हत्यांमागची मूळ कारणं शोधण्यासाठी प्रयत्न करत होती.

अनिला यांचा दृष्टिकोन साधा होता. त्या सुईणांना विचारत, "तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीशी असं वागाल का?"

या प्रश्नाने गरीब स्त्रियांची नस बरोबर पकडली आणि अनेक वर्षांच्या नकार न देण्याच्या सवयीलाही छेद दिला. सुइणींना कम्युनिटी ग्रुप्समधून थोडी आर्थिक मदत मिळाली आणि हळूहळू अर्भक हिंसाचाराचं चक्र खंडित झालं.

अनिला कुमारी (डावीकडून दुसऱ्या)
फोटो कॅप्शन, अनिला कुमारी (डावीकडून दुसऱ्या)

सीरो देवींनी 2007 मध्ये माझ्याशी बोलताना हा बदल स्पष्ट सांगितला होता.

त्या म्हणाल्या होत्या, “आता जो कोणी मला बाळ मारायला सांगेल, मी त्यांना सांगते, बघा, मला मूल द्या आणि मी तिला अनिला मॅडमकडे घेऊन जाईन.”

या सुइणींनी 1995 ते 1996 दरम्यान किमान पाच नवजात मुलींचा जीव वाचवला. या मुलींच्या कुटुंबांना त्यांना जन्मतःच मारायचं होतं किंवा टाकून द्यायचं होतं.

या बचावकार्यात एका बाळाचा मृत्यू झाला, परंतु अनिला यांनी इतर चार बाळांची बिहारची राजधानी पाटणा येथे एका स्वयंसेवी संस्थेकडे पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्या संस्थेमार्फत या बाळांना दत्तक घेण्याची सोय केली गेली.

खरंतर ही बातमी इथेच संपू शकली असती. पण मला हे जाणून घ्यायचं होतं की, ज्या मुलींना या सुइणींनी वाचवलं, त्यांचं पुढे काय झालं? त्या दत्तक दिल्या गेल्या का? आयुष्य त्यांना कुठे घेऊन गेलं?

अनिला यांच्याकडच्या नोंदी अत्यंत बारकाईने लिहिलेल्या, काटेकोर होत्या. परंतु, दत्तक घेतल्यानंतरचे तपशील अगदी कमी होते.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या टीमसोबत काम करत असताना मी मेधा शेखर नावाच्या एका महिलेशी संपर्क साधला. 90 च्या दशकात बिहारमध्ये भ्रूणहत्येवर त्या संशोधन करत होत्या, जेव्हा अनिला आणि सुइणींनी वाचवलेली बाळं त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमध्ये येऊ लागली होती.

विशेष म्हणजे, मेधा अजूनही त्यातल्या दत्तक गेलेल्या एका तरुणीच्या संपर्कात होत्या. सुइणींमार्फत जीव वाचलेल्या बाळांपैकी एक ती तरुणी असल्याचा मेधा यांचा विश्वास होता.

मोनिका आणि तिला वयाच्या तिसऱ्या वर्षी दत्तक घेणारे तिचे वडील
फोटो कॅप्शन, मोनिका आणि तिला वयाच्या तिसऱ्या वर्षी दत्तक घेणारे तिचे वडील

अनिला यांनी मला सांगितलं होतं की, सुइणींनी वाचवलेल्या सर्व मुलींना नावं देताना त्यांच्या नावाआधी ‘कोसी’ हे नाव लिहिलं जायचं. बिहारमधील कोसी नदीची आठवण म्हणून हे मुलींच्या नावातील कोसी होतं. मेधाला आठवलं की दत्तक घेण्यापूर्वी मोनिकाचं नावंही या ‘कोसी’ शब्दावरूनच पुढे ठेवलेलं होतं.

दत्तक देणारी संस्था आम्हाला मोनिकासंदर्भातील नोंदी पाहू देणार नाही, त्यामुळे आपण अशा ठोस पुराव्यांनिशी बोलू शकत नाही. पण मोनिकाला पाटण्यातून दत्तक घेणं, तिची अंदाजे जन्मतारीख आणि कोसीपासून सुरू होणारं तिचं संस्थेतलं नाव हे सर्व एकाच निष्कर्षाकडे निर्देश करतात – मोनिका ही अनिला आणि सुइणींनी वाचवलेल्या पाच बाळांपैकी एक आहे.

मी तिला बिहारपासून सुमारे दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या पुण्यात तिच्या पालकांच्या घरी भेटायला गेलो होतो, तेव्हा तिचं बालपण सुखात, आनंदात गेल्याचं तिच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं.

मोनिका म्हणाली, “मी भाग्यवान होते की, मला एक चांगलं कुटुंब मिळालं. माझ्या लेखी जी एका आनंदी, सुखी आयुष्याची व्याख्या आहे, तेच मी आज जगत आहे.”

मोनिकाला तिला बिहारमधून दत्तक घेतल्याची कल्पना होती. परंतु आम्ही तिला नेमक्या कुठल्या परिस्थितीत दत्तक देण्यात आलं, याची थोडी सविस्तर कल्पना देऊ शकलो.

या वर्षाच्या सुरुवातीला मोनिका अनिला आणि सीरो देवींना भेटण्यासाठी बिहारला आली होती. अनिला आणि सुइणींच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ म्हणून त्या आपल्याकडे पाहणार, याची मोनिकाला कल्पना होती आणि तशी तिची तयारी होती.

“एखादी व्यक्ती परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी खूप तयारी करते. तसे त्यांनी कठोर परिश्रम केलेत आणि आता ते माझ्या रूपात रिजल्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे निश्चितपणे, मला त्यांना भेटायला आवडेल.”

मोनिका थत्ते आणि अनिला कुमारी
फोटो कॅप्शन, मोनिका थत्ते आणि अनिला कुमारी

मोनिकाला भेटल्यावर अनिला यांना आनंदाने अश्रू अनावर झाले. पण सीरो देवींचा प्रतिसाद वेगळा वाटला.

त्या मोनिकाला जवळ धरून हमसून हमसून रडत होत्या आणि बराच वेळ तिच्या केसांमधून हात फिरवत राहिल्या.

“मी तुझा जीव वाचवण्यासाठी तुला (अनाथाश्रमात) घेऊन गेले. माझ्या आत्म्याला आता खरी शांती मिळतेय,” असं सीरो देवी म्हणाल्या.

मोनिकाच्या भेटीनंतर काही दिवसांनी मी सीरो देवींना त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल अधिक विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी विषय टाळला. तसंच, आणखी काही विचारण्यासही नकार दिला.

त्या एवढंच म्हणाल्या की, “जे घडायचं होतं, ते घडून गेलं आहे. तो भूतकाळ झाला.

पण मुलगी झाल्यानंतरचे पूर्वग्रह आजही तेच आहेत. तो मात्र अजूनही भूतकाळ होत नाहीय.

नवजात बालकांच्या हत्या आजही नोंदवल्या जात आहेत. फक्त जन्माला येण्याअगोदरच भ्रूणावस्थेतच मुलींचा गळा घोटण्याचं प्रमाण वाढलं आहे हा फरक. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कठोर नियम करून खूप प्रयत्न करत आहे, तरीही या हत्या थांबलेल्या नाहीत.

झुडुपात टाकून दिलेलं नवजात बालक
फोटो कॅप्शन, झुडुपात टाकून दिलेलं नवजात बालक

1994 मध्ये गर्भलिंगनिदान कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला. पण सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, आजही लिंगाधारित गर्भपात बेकायदेशीरपणे सुरुच आहेत.

उत्तर भारतातील काही भागांमध्ये बाळाच्या जन्मावेळी गायली जाणारी पारंपारिक लोकगीते - सोहर ऐकल्यास पुरुषाच्या जन्मासाठीच आनंद राखून ठेवला जातो हे स्पष्ट होतं. आज 2024 मध्येही स्थानिक गायकांना पारंपरिक गाण्याचे बोल बदलण्याचा आग्रह प्रयत्नपूर्वक करावा लागतो, जेणेकरून गाण्यातून मुलीच्या जन्माचाही उत्सव साजरा केला जाईल.

आम्ही आमच्या या माहितीपटाचं चित्रीकरण करत असताना, कटिहारमध्ये दोन तान्हुल्यांना बेवारस अवस्थेत सोडून दिलेलं आढळलं.

एक झुडपात सापडली तर दुसरी रस्त्याच्या कडेला जी अवघ्या काही तासांपूर्वी जन्माला आलेली होती. दोघींपैकी एकीचा मृत्यू झाला, दुसरी दत्तक घेण्यासाठी संस्थेत पाठवण्यात आली.

एधा
फोटो कॅप्शन, एधा तिच्या आई-वडिलांसोबत

मोनिका बिहारमध्ये होती, तेव्हा गाव सोडण्यापूर्वी तिने कटिहारमधील विशेष दत्तक केंद्रात या बाळाची भेट घेतली.

स्त्रीभ्रूणहत्या किंवा नवजात बालिकांची हत्या कमी झाली असली, तरी नकोशा मुलींना अशा प्रकारे फेकून देण्याचे प्रकार सुरूच आहेत, या जाणिवेने मोनिकाला अस्वस्थ केलं.

त्या बाळाकडे पाहत मोनिका म्हणाली, “हे एक चक्र आहे… काही वर्षांपूर्वी मी स्वतः तिथे होते आणि आता पुन्हा माझ्यासारखीच ही मुलगी आहे.”

पण चांगली गोष्ट म्हणजे, या चक्रात काही सुखकर योगायोगही होते. ईशान्येकडील आसामच्या एका जोडप्याने हे नवजात बाळ दत्तक घेतलं आहे. त्यांनी तिचं नाव ‘एधा’ असं ठेवलं आहे. एधा म्हणजे आनंद!

एधाचे दत्तक वडील गौरव म्हणाले, "आम्ही तिचा फोटो पाहिला आणि आम्ही लगेच ठरवलं की, एकदा सोडून दिलेलं बाळ दुसऱ्यांना बेवारसपणे सोडता येऊ शकत नाही."

गौरव भारतीय हवाई दलातील अधिकारी आहेत.

दर काही आठवड्यांनी गौरव मला छोट्या एधाच्या नवनवीन करामतींचे व्हीडिओ पाठवतात. मी कधीकधी त्यातले काही मोनिकाशी शेअर करतो.

मागे वळून पाहताना जाणवतं की, या बातमीवर घालवलेली 30 वर्षं केवळ भूतकाळ ठरली नव्हती. काही अस्वस्थ करणाऱ्या सत्यांचा सामना करण्याबद्दल जाणीव होती. भूतकाळात मागे जाता येत नाही, हे खरं. परंतु, तो बदलला जाऊ शकतो.

आणि त्या परिवर्तनात दुर्दम्य आशावाद आहे!

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)