बिहारमध्ये एकाच दिवसात 37 लहान मुलांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Vibhash Jha
- Author, विभाष झा
- Role, बीबीसी हिंदी
बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात दरवर्षी जितिया उत्सव साजरा केला जातो.
जितियाचा उपवास केल्यानं अपत्यं दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे. त्यासाठीच महिला मोठ्या श्रद्धेने जितियाचे व्रत करतात.
दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा हा उत्सव यावेळी मात्र, बिहारच्या अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर बनून कोसळला.
25 सप्टेंबर रोजी जितिया उत्सवादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी 37 मुलांचा बुडून मृत्यू झाला.
बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जितिया उत्सवादरम्यान स्नान करत असताना राज्यभरात 46 जणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये 37 बालके, 7 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.
घटनेवर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केलं. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. तर बिहार सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री, "एकाच दिवशी एवढ्या मोठ्या दुर्घटना घडणं हा योगायोग आहे," असं म्हणाले.
दुर्घटना आणि मदतीची घोषणा झाली असली तरी एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू कसा झाला व अशा दुर्घटना थांबविण्यासाठी सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.
इतक्या जणांचा मृत्यू कसा झाला?
मृतांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 9 मुलींसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद व्यतिरिक्त पश्चिम चंपारण, नालंदा, कैमूर, बक्सर, सीवान, रोहतास, सारण, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गोपालगंज आणि अरवल जिल्ह्यातूनही अशा घटना समोर आल्या आहे.
औरंगाबदच्या कुशहा गावात राहणारे वीरेंद्र यादव यांचं दुकान आहे.
25 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे ते बाजारातून आपल्या घरी परतत होते. त्याचवेळी कुणीतरी त्यांना गावातील एका बंधाऱ्यात बुडून अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
त्यावेळी मृतांमध्ये आपली मुलगीही असेल याची कल्पनाही वीरेंद्र यांना नव्हती.
ते घरी पोहोचले तेव्हा घरात सुरू असलेला आक्रोश ऐकून त्यांना त्यांची लेक सोनाली आता या जगात नसल्याचं समजलं. तिचं पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचं त्यांना समजलं.

फोटो स्रोत, Vibhash Jha
याच गावातील अंकज कुमार, नीलम कुमारी आणि राखी कुमारी यांचाही बुडून मृत्यू झाला. ही सर्व मुलं 15 वर्षांखालील होती. अंकजचे वडील उपेंद्र यादव त्या दुर्घटनेवेळी आपल्या घरापासून फक्त 400 मीटर अंतरावरील धरमेंदर यांच्या घरी मजुरी करत होते.
मुलं बुडाल्याचा आरडा-ओरडा गावात सुरू झाला तेव्हा ते धावतच बंधाऱ्या किनारी पोहोचले. तोपर्यंत त्यांच्या अंकजचा मृत्यू झाला होता.
चितरंजन या दुर्घटनेबाबत अंदाज व्यक्त करत म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी दीड किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या तळ्याचं 5 फूट खोलीकरण करण्यात आलं होतं.
त्यानंतर, काही दिवसांपूर्वी पुन्हा तळ्याच्या मध्यभागी 10 फूट खोल खोलीकरण करण्यात आले, याबाबत मात्र, लोकांना माहिती नव्हती.
म्हणजेच, तळ्याच्या किनाऱ्याजवळील भाग 5 फूट खोल आहे, मात्र थोडं पुढे गेल्यावर तो थेट 15 फूट खोल होतो. तळ्यात उतरताना पाण्याचा अंदाज न आल्यानेच बालकांचा बुडून मृत्यू झाला असण्याचा दावा चितरंजन यांनी केला.


मृतांच्या कुटुंबीयांनी या दुर्घटनेसाठी जलसंपदा विभागाला जबाबदार धरलं आहे.
ते म्हणतात, "आम्ही आधीच या विभागाच्या अभियंत्यांना बंधाऱ्याचे गेट बंद करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमचं ऐकलं नाही. या बंधाऱ्यामुळे जवळपास 250 एकरवरील शेती सिंचनाखाली आली आहे. आजूबाजूच्या टेकड्या, गावाचे पाणी आणि राष्ट्रीय महामार्गाचे पाणी या बंधाऱ्यात जमा होते.
आरोपांवर स्पष्टीकरण देताना विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक कुमार यांनी बंधाऱ्याच्या खोलीबाबतचा दावा फेटाळून लावला.
ते म्हणाले, "याची खोली अंदाजे 5 ते 6 फूट आहे. सिंचनासाठी पाणी साठवण्याची ती सोय आहे. खोली जास्त असल्याचा स्थानिकांचा आरोप चुकीचा आहे. दररोज मोठ्या संख्येत मुलं इथं अंघोळीसाठी जातात. मुलं झाडावरून उड्या मारून पोहतात. पालकांनी मुलांवर लक्ष द्यायला हवं."

फोटो स्रोत, Vibhash Jha
बीबीसी हिंदीबरोबर बोलताना बिहारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री संतोष सुमन म्हणाले, "बंधाऱ्याची खोली जास्त असल्यामुळं मुलांचा बुडून मृत्यू झाला असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे."
पूर्व चंपारणच्या मोतिहारी येथील लक्ष्मीपूर साउ टोला बंधाऱ्यात आंघोळ करताना तीन मुलींचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये रीमा कुमारी, रंजू कुमारी आणि मंजू कुमारी यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. सर्वांचे वय अंदाजे 13 ते 17 वर्षांदरम्यान होते.
रीमा कुमारीचे वडील परमानंद बैठांनी सांगितले, "जितिया उत्सवादरम्यान गावातील महिलांसोबत ती बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेली होती. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून मृत्यू झाला."
त्यांच्या मते, पावसामुळे बंधाऱ्यात जास्त पाणी जमा झाल्याने ही दुर्घटना घडली.
प्रशासन-मंत्री काय म्हणतात ?
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकदम अशी दुर्घटना का घडली आणि सरकार यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काय प्रयत्न करत आहे? या प्रश्नावर बीबीसी हिंदीसोबत बोलताना आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा विभागाचे मंत्री सतोष कुमार सुमन म्हणाले, "अशा घटना रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जातात."
अशी घटना घडू नये यासाठी बिहार सरकारद्वारे लोकांमध्ये जनजागृती केली जाते. लोकांनाही कळायला हवं की निदान पाऊस सुरू असताना किंवा पूर आलेला असतना आपल्या लहान लहान मुलांना तलाव किंवा नदीवर आंघोळीसाठी पाठवू नये. सरकारच्या वतीने जेवढे बंधारे बांधण्यात आले आहेत, तेथे यासंबंधीत बोर्ड लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.", असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Vibhash Jha
बिहार सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ओएसडी अविनाश कुमार यांच्या मते, "पूर येतो तेव्हा नदी, तलाव आणि बंधाऱ्यातील पाणीपातळी प्रचंड प्रमाणात वाढते. अशावेळी काय सावधपणा बाळगावा याबाबतचे अनेक प्रकारचे निर्देश वर्तमानपत्रातही प्रसिद्ध केले जातात.
सोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात असतात. सर्वप्रथम लोकांनी सावध असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटाशी दोन हात करताना सर्वप्रथम संबधित विभागाच्या नियमावलीचे पालन करावे लागेल."
सत्ताधारी जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी बीबीसी हिंदीसोबत बोलताना या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली सोबतच पालकांनाही आवाहन केले.

फोटो स्रोत, ANI
नीरज कुमार म्हणाले, "सरकारद्वारे महापूर आणि पावसावेळी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग आणि सूचनांद्वारे लोकांना सतर्क केले जाते. मात्र कुणीच शासकीय नियमांचे पालन करत नसल्याचं दिसून येतं. यामुळे अशा घटना घडतात. पालकांनाही आवाहन आहे, की त्यांनी आपल्या मुलांना एकट्याने नदी किंवा तलावात अंघोळीसाठी पाठवू नये."
दरम्यान, सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीव्यतिरिक्त इतर आकडे सांगतात की, बिहारमध्ये दरवर्षी शेकडो लोकांचा बुडून मृत्यू होतो.
बिहार राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार जून ते डिसेंबर 2018 दरम्यान राज्यात 205 जणांचा मृत्यू झाला.
2019 मध्ये मृतांचा आकडा वाढून तो 630, 2020 मध्ये 1060 आणि 2021 च्या 18 नोव्हेंबरपर्यंत हा आकडा 1206 पर्यंत पोहोचला.
एकूणच 2018 ते 2021 दरम्यान बुडून मृत्यू होणाच्या आकडेवारीत अनेक पटींनी वाढ झाली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











