'मेलेली' बाई कोर्टात हजर झाली तेव्हा...

फोटो स्रोत, Seetu Tiwari/BBC
बिहारमध्ये सिवान नावाचं शहर आहे. या शहराच्या कसेरा टोळीच्या गल्लीत स्टील आणि सोन्याचांदीच्या दुकानाच्यांमध्ये एक निमुळती गल्ली आहे. त्या गल्लीच्या तोंडावर एक घर आहे. या घराबद्दल बोलायला लोक कचरतात.
घराचा मुख्य दरवाजा जुन्या पद्धतीचा लाकडी दरवाजा आहे. त्यातून आत गेल्यावर तुम्हाला हिरव्या रंगाने रंगवलेले मोठे मोठे गोलाकार खांब दिसतील. संपूर्ण घरात अत्यंत दमट वातावरण आहे. त्यामुळे घरात जाणंही कठीण होतं.
घराच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निमुळता जिना आहे. तिथे अंधार आहे. मोबाईलच्या उजेडात तिथे जाणं हे एक महाकठीण आहे आहे. तिथे गेल्यावर एक छोटा बल्ब आहे. त्यात कोणाचाच चेहरा स्पष्ट दिसत नाही.
अशा अतिसामान्य घरात कोणत्याही संदर्भाशिवाय जाणं अंमळ कठीणच आहे. खरंतर दोन खोल्यांच्या या घरात एक वृद्ध महिला राहते. ती हार्ट पेशंट असल्याचं लोकांना सांगते आणि एखादी वस्तू पकडूनच चालते.
बदामी देवी कोण आहेत?
ही म्हातारी बाई आहे बदामीदेवी. तिचं वय 84 वर्षं आहे आणि सध्या ती बातम्यांमध्ये असते. त्याचं कारण असं की सीबीआयने या महिलेला गेल्या 24 मेला मृत घोषित केलं होतं. त्यानंतर बदामीदेवी सदेह मुजफ्फर सत्र न्यायालयात पोहोचल्या आणि न्यायाधीशांच्या समोर उभं राहून सांगितलं, "साहेब मी जिवंत आहे."
बदामीदेवी बिहारच्या सिवान जिल्ह्यातील पत्रकार राजदेव रंजन हत्याकांडात साक्षीदार आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात साक्षीदार नंबर 35 म्हणून बदामी देवीचे पती सत्यदेव प्रसाद यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांचं कपड्यांचं दुकान होतं. 1998 मध्ये त्यांचं निधन झालं. बादामी आणि सत्यदेव यांना मुलबाळ नव्हतं.
बदामीदेवी यांच्या निकटवर्तीयांच्या मते त्यांचं स्वत:चं मूल नसलं तरी त्यांनी सपनादेवी नावाच्या एका मुलीचं संगोपन केलं होतं. नंतर तिचं लग्न झालं. त्यांची मुलगी आरती साहा हिने सिवानच्याच विजय गुप्ता यांच्याशी लग्न केलं होतं. विजय गुप्ता हे राजदेव रंजन हत्याकांडात आरोपी होते. बादामीदेवी यांची हीच नात आता त्यांचा सांभाळ करते.

फोटो स्रोत, Seetu Tiwari/BBC
मात्र इतक्या म्हाताऱ्या बाईचा या हत्याकांडाशी काय संबंध आहे हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्याचं उत्तर बादामीदेवीच्या वादग्रस्त घरात आहे.
घराचा वाद आणि राजदेव रंजन
हे घर 600 चौ फुटाचं असून चार मजली आहे. बदामी देवी आणि वीरेंद्र पांडेय यांच्यात हा वाद आहे. ही जमीन भर बाजारात आहे आणि घर अगदी कोपऱ्यावर आहे. साहजिकच या घराला आणि जमिनीला चांगली किंमत आहे. 1998 मध्ये वीरेंद्र पांडेय या घरात भाडेकरू म्हणून राहायला आले.
एलआयसी आणि पोस्टात ते एजंट म्हणून काम करतात आणि ते तळमजल्यावर राहतात.
ते सांगतात, "मला बदामीदेवींनी वटमुखत्यारपत्र दिलं होतं. त्यानुसार 2010 मध्ये आठ लाख रुपये देऊन माझी पत्नी बेबीच्या नावावर घर केलं. बदामीदेवी जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्या या घरात राहतील. त्यानंतर या घरावर कोणताही अधिकार राहणार नाही असं आमचं आपसात ठरलं होतं."
मात्र बदामीदेवी याचा इन्कार करतात, "मला अंधारात ठेवून हे माझ्याकडून लिहून घेतलं होतं. मला माझं घर परत हवं आहे. वीरेंद्र पांडेय सीबीआयच्या साथीने माझ्या हत्येचा कट रचताहेत."
घराच्या या वादावर अवर न्यायाधीश संतोष कुमार उपाध्याय यांनी 2018 मध्ये वीरेंद्र पांडेय यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर बादामी देवी यांच्यातर्फे अपिल दाखल करण्यात आलं होतं. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

फोटो स्रोत, Seetu Tiwari/BBC
आता या घराचा राजदेव रंजन हत्याकांडांशी काय संबंध आहे? राजदेव रंजन हत्याकांडात बचाव पक्षाचे वकील शरद सिन्हा याचं उत्तर देतात, "सीबीआयचं असं मत आहे की वीरेंद्र पांडेयच्या ताब्यातून घर मुक्त करण्याच्या बदल्यात अजहरुद्दीन बेग उर्फ लडड्न मियांने विजय कुमार गुप्ता यांच्यासह पाच लोकांनी राजदेव रंजन यांची हत्या केली. त्यासाठी बादामीदेवी यांची साक्ष महत्त्वाची आहे."
अजहरुद्दीन हा दिवंगत राजकीय नेते शहाबुद्दीन यांचा विश्वासू सहकारी होता आणि विजय कुमार गुप्ता हे बदामी देवी यांचा नातजावई आहेत. आता बदामीदेवी आणि वीरेंद्र पांडेय दोघंही राजदेव रंजन यांना ओळखत होते का या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही.
या खटल्याचे साक्षीदार वीरेंद्र पांडेय आणि बादामी देवीची नात आरती साहा या दोघांनीही बीबीसीला सांगितलं, "आमच्या दुकानाचा राजदेव रंजन खटल्याशी काय संबंध आहे हे आम्हाला अद्यापही कळलेलं नाही."
राजदेव रंजन हत्याकांड
बिहारच्या सिवान जिल्ह्यातील पत्रकार राजदेव रंजन दैनिक हिंदुस्तानमध्ये काम करायचे. त्यांच्याकडे क्राईम बीट होतं. 13 मे 2016 ला त्यांची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात सात आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यात विजय गुप्ता, अझहरुद्दीन बेग यांचंही नाव या आरोपपत्रात होतं.
17 मे 2016 ला या हत्येची चौकशी सीबीआयने करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सीबीआयने 15 सप्टेंबर 2016 ला खटला दाखल केला.

फोटो स्रोत, Seetu tiwari/BBC
सीबीआयने 2018 मध्ये आरोपपत्र दाखल केलं. या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं त्यात शहाबुद्दीन यांचं नाव होतं.
राजदेव रंजन सतत मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याविरोधात बातम्या देत असत. 'सिवान तुरुंगातून जारी झालेल्या हिटलिस्टमुळे हत्या' या बातमीमुळे त्यांची हत्या झाली. या प्रकरणात आणखी 98 साक्षीदारांची उलटतपासणी व्हायची आहे. यापैकी आतापर्यंत 28 जणांचीच साक्ष झाली आहे
बदामीदेवी उर्फ मृत साक्षीदार
बदामीदेवी आणि सकलदेव सिंह नावाच्या एका वेगळ्या साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी गेल्या मे महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने सीबीआयला समन्स दिला होता. मात्र सीबीआयने मुजफ्फरनगरला एडीजी-1 यांच्यासह विशेष न्यायाधीश पुनीत कुमार गर्ग यांच्यासमोर बदामीदेवी यांचं डेथ वेरिफिकेशन रिपोर्ट ठेवला.
बदामदेवी आणि त्यांची नात यांना जेव्हा हे कळलं तेव्हा या प्रकरणाची सुनावणी 3 जूनला झाली तेव्हा त्यांना सदेह सादर करण्यात आलं. कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी लिहिलं, "सीबीआयच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी कधीही संपर्क केला नाही आणि मला मृत घोषित केलं. हे षड्यंत्र आहे."
कोर्टाने सीबीआयला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 20 जूनला होणाऱ्या सुनावणीच्या आधी उत्तर द्यायला सांगितलं आहे. कोर्टाच्या या नोटिशीनंतर बादामीदेवी आणि शेजाऱ्यांच्या घरी सीबीआयने चौकशी केली आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. "या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि ज्यांना मृत घोषित करण्यात आली आहे त्यांच्याशी चर्चा झाली आहे."
बचाव पक्षाचे वकील शरद सिन्हा म्हणाले, "देशाच्या सर्वोच्च संस्थेचा हा बेफिकीरपणा आहे. नवरुणा खटल्यात सुद्धा अशीच बेफिकीरी दिसून आली आहे."
2016 मध्ये झालेल्या राजदेव रंजन हत्याकांडाला सहा वर्षं झाली आहेत. या हत्याकांडातले एक आरोपी मोहम्मद शहाबुद्दीन यांचा कोव्हिडने मृत्यू झाला आहे. इतर आरोपी तुरुंगात आहे.
राजदेव रंजन यांची पत्नी आशा रंजन म्हणतात, "आतापर्यंत 30 लोकांची साक्ष राहिली आहे. या हिशोबाने तर माझ्या मृत्यूनंतरही साक्ष चालूच राहतील. न्याय प्रक्रियेत वेळेचं महत्त्व असतं. जर न्याय मिळायला वेळ लागला तर त्याचं महत्त्व कमी होतं. सीबीआय गंभीर असतं तर त्यांनी अशी चूक केली नसती आणि बादामीदेवींना मृत घोषित केलं असतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








