मेळघाट पाणी टंचाई: विहिरीतून काढलेल्या दोन हंड्यांनी तहान भागत नाही... मग सुरू होते जीवघेणी पायपीट

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
अमरावती जिल्ह्यातलं मेळघाट परिसरातील खडीमल गाव पाणीटंचाईने त्रस्त आहे. इथल्या महिला पाण्यासाठी जे भोगतायत ते आपल्या कल्पनेच्याही पलीीकडलं आहे. अख्खा दिवस पाण्याचा पाठलाग करत निघून जावा आणि जेमतेम दोन हंडे पाणी पदरात पडावं, अशी भीषण परिस्थिती. ही कहाणी इथेच संपत नाही. महिलांच्या जगण्यातली अगतिकता दिवसेंदिवस खोल होत जाते..
पहाटेपासून खडीमल गावातल्या महिला टँकरची वाट बघत बसल्यायत. टँकर आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते. टँकरवरच्या पाण्यावरून धक्काबुक्की होते म्हणून टँकर विहिरीत रिकामा केला जातो. आणि हे पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे, डबे विहिराची तळ गाठतात. तासाभरात जीवाची बाजी लावून गावकरी पाणी उपसत राहतात.
खडीमलमधलं हे रोजचं चित्र. दिवसातून दोन किंवा तीनवेळा याच क्रमाने टँकर येतो आणि जातो. दिवसातून 5000 लीटरचे दोन टँकर गावात येतात. पण 1500 लोकसंख्या असलेल्या खडीमलची तहान कशी भागणार?
खडीमलच्या विहिरीवरचा तो व्हीडिओ व्हायरल झाला आणि अमरावतीपासून 135 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम आदिवासी गावाकडे बीबीसी मराठीची टीम निघाली.

अमरावती ते सिमाडोहपर्यंत डांबरीकरण झालेला पक्का रस्ता. तिथून खडीमल गाव 26 किलोमीटर अंतरावर. पण गावात पोहोचताना 100 किलोमीटरच अंतर पार केल्यासारखं जाणवत होतं. कारण दगड-धोंड्याने भरलेल्या रस्त्यावर डांबर तर सोडाच काँक्रिटही दिसून येत नव्हतं.
खडीमलची अजब प्रथा
अमरावतीहून सकाळी 5 वाजता आम्ही खडीमल गावाकडचा रस्ता धरला. आम्हाला गावात पोहचायला दुपार उजाडली.
गावात काही लोक धान्य गोळा करत होती. एका गावकऱ्याने सांगितलं इथे एक प्रथा चालत आलीये.
खरीप हंगामापूर्वी गावातील वरिष्ठ पंचाना प्रत्येकाने सहा शेर अन्नधान्य देण्याची प्रथा पाळली जाते. या प्रथेमुळे गावातील संकट दूर करून, पीकपाणी चांगलं होईल अशी गावकऱ्यांची समजूत आहे. गावातील महिला या पंचांना धान्य आणून देत होती, तर काही महिला हातात हंडा घेऊन टँकरची वाट बघत बसल्या होत्या.

टँकर आला... धक्काबुक्की होईल म्हणून संगीता खंडे विहिरीवर गेल्या नाहीत. त्या 8 महिन्याच्या गरोदर आहेत. गरोदरपणात जास्त वजन उचलू नका असं डॉक्टरांनी त्यांना अनेकदा सांगितलंय. शिवाय शुद्ध पाणी प्यायचाही सल्ला दिलाय. पण पाणी भरण्यासाठी त्या पार खोऱ्यात पायपीट करतात. "पाणी भरून संपूर्ण अंग दुखतं. ताप येतो अधून-मधून." तरीही पाणी भरण्यासाठी त्या 2-3 किलोमीटर दूर पायपीट करतात.
गावातल्या प्रत्येकाच्या बोलण्यातून शुद्ध पाण्यासाठी असलेली तळमळ स्पष्ट दिसत होती. विहिरीवर आणि झऱ्यावरही पाणी आणायला जाताना गाळणी घेऊन महिला जातात. गढूळ, दूषित पाण्याने भरलेले हंडे डोक्यावरून आणताना हे एवढसं पाणी पुरणार कसं... याची चिंता त्यांना असते.
'चालून चालून उल्टी येते'
सकाळी रिकामा झालेला टँकर पुन्हा भरून सायंकाळी 4 ते 5 या दरम्यान येतो. पाणी संपलं की पुन्हा पाण्याच्या शोधात दऱ्या खोऱ्यातून पायवाट काढत किलोमीटर दूर नदीच्या पात्रात असलेल्या झऱ्यातून पाणी आणण्याची कसरत सुरू होते.
नमाये दहिकार पाण्याच्या शोधात डोंगर पार करून त्या झऱ्यावर पोहचतात. दोन हंडे भरल्यानंतर काही वेळ थांबलं की पाणी जमा होतं. नमाये यांचा हंडा भरला की एकावर एक दोन हंडे घेऊन सहकाऱ्यांसोबत त्या गावाच्या दिशेने निघतात.
त्या म्हणतात "पाणी भरण्यात माझं वय निघून गेलं. गावात आली तेव्हापासून पाण्याचं दृष्टचक्र संपलं नाही. सत्तर वर्ष झाली, गावाकडे कुणाचं लक्ष नाही, नळ देण्याचं आश्वासन देतात पण नळ कनेक्शन मिळत नाही.
"तुम्हीच विचार करा... दोन हंडे पाण्यात प्यायचं, आंघोळ करायची, खाणं बनवायचं की घर शिंपायचं? आम्हाला घरकुलासाठी एक लाख दिले जातात, त्याचा काय उपयोग? इकडे घर शेणाने लिंपण्यासाठी सुद्धा पाणी नाही मिळत." संतापाने नमाये दहिकार सांगत होत्या.

"रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर पाणी कुठे मिळेल याचाच विचार. पाणी उपसून आणि खोऱ्यातून लांबून आणताना हात-पाय दुखतात, कंबर भरून येते. कधी कधी तर वाटेत थकल्याने उल्टीसारखं वाटतं.
अनेक महिलांना आरोग्याच्या समस्यांनी बेजार केलंय.
गावामध्ये रुग्णवाहिका अत्यावश्यक असल्याचं ठुगे दहिकार या महिलेला वाटतं. "दूषित पाण्यामुळे उलटी, हगवण, तापाने कोणीना कोणी आजारी असतं. रुग्णालयात जाण्यासाठीही फारशी व्यवस्था नसते."
टँकर टँकर पाणी दे...
मेळघाटातल्या या भागात बाल मृत्यू आणि कुपोषित बालकं जन्माला येण्यामागे अशुद्ध पाणी आणि गरोदर महिलांमधील अशक्तपणा हे महत्त्वाचं कारण असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"खडीमल गावामध्ये पाण्यामुळेच अनेक आजार डोकं वर काढतात. टायफॉइड, काविळीचे रुग्ण अधिक आहेत. ब्लिचिंग केल्याशिवाय पाणी पिण्याजोगं नसतं. त्यात खडिमल गावात टँकरचं पाणी थेट विहिरीत सोडलं जातं. आधीच विहिरीत गाळ असल्यामुळे ते आणखी दुषित होतं. शुद्ध केल्यानंतरच पाणी प्यायला परवानगी द्यायला हवी. पण तसं होत नाही. त्यामुळं कमी वजनाचं बाळ, बालमृत्यू, मातामृत्यू आणि कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं दिसतं," असं रणमले म्हणाले.
गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचं गावाचे सरपंच तुलसी कासदेकर यांचं मत आहे. त्या म्हणाल्या "आम्हाला गावात धरण किंवा मोठा तलाव बांधून देण्याची मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय. त्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा देखील केला. पण समस्या सुटता सुटत नाही. गावाला दिवसातून किमान 10 टँकरची आवश्यकता आहे. पण त्याची पूर्तता होत नाही" सरपंच म्हणाल्या.
"मतदानाच्या वेळी सगळे आमच्यापर्यंत पोहचतात, पण निवडणुका संपल्या की गावाकडे ढुंकूनही कुणी बघत नाही" सरकारविषयी असलेली अनास्था महिलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

जिल्हा परिषदेने गावात टँकरच्या दोन वेळा निश्चित केल्या आहेत. पण अलीकडच्या गावात टँकर पूर्णपणे भरल्याशिवाय तो खडीमल गावात पोहचत नाही. गावापर्यंत टँकर पोहचवण्याची जबाबदारी गुणवंत मोरले यांच्यावर आहे.
टँकरच्या प्रत्येक फेरीमागे त्यांना 500 रुपये मिळतात. ते अत्यल्प असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात- "टँकर विहिरीत रिकामा करावा अशी गावकऱ्यांची मागणी असते. त्यामुळं आपसात भांडण, तंटे होत नाही. नागरिकांनी आधीच विहिरीत सोडलेल्या बकेट टँकर मधून पाणी सोडण्याची वाट बघत असतात.
विहिरीवर महिलांची झुंबड बघून वाईट घटना कधीही होऊ शकते, अशी भीती सतत मनात असते. पण या गावात पाण्याचं भीषण वास्तव आहे." मोरले म्हणाले
पाणी नाही तर शौचालय कुठे?
खडीमल गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावात पोहचणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. बस सेवाही पोहचत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या दुर्गम भागातल्या रस्त्यांचीही वानवा आहे.
चिखलदऱ्यात दरड कोसळली की खडीमलचा जगाशी असलेला संपर्क तुटतो.
खडीमल गावात कोरकू जमातीचे आदिवासी राहतात. बहुतांश अल्पभूधारक म्हणजे अडिच एकर पेक्षा कमी शेती असलेले. स्थानिक कोरकू भाषेसह त्यांनी हिंदीही बोलता येते. पण मराठी भाषेसोबत त्यांची फारशी जवळीक नाही. मराठी भाषेतल्या शाळा असल्याने गावात शिक्षणाचाही अभाव असल्याचं गावकरी सांगतात.
गावात मुख्य पीकं धान (भाताचा एक प्रकार) आणि ज्वारी. पावसाच्या पाण्यावरची कोरडवाहू शेती करत असल्याने गावकरी दसरा-दिवाळीनंतर रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करतात. बहुतांश लोक वीट भट्टीच्या कामावर जातात.
गावामध्ये पाण्याविना अनेक योजनांना खीळ बसली आहे. घरोघरी शौचालयाचं उदिष्ट पूर्ण झालंय. पण पाण्याविना ते बांधकाम कुचकामी ठरलंय. गावकऱ्यांना शौचासाठी उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नाही.
"मेळघाटच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची इच्छा प्रशासनामध्ये दिसत नाही. कारण आदिवासी समाजाकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ नाही." अस खोज या सामाजिक संस्थेचे बंड्या साने यांचं म्हणणं आहे.
"पाणी मिळते की नाही, ते शुद्ध आहे का? यासाठी जिल्हाधिकारी यांनी कितीदा खडीमल गावाचा दौरा केला? या गावकऱ्यांच्या समस्या काय आहेत याविषयी कोणालातरू जाब विचारावा लागेलच.
शहरात दोन दिवस पाणी मिळालं नाही, तर प्रशासन हादरतं, मेळघाटमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून तहानलेलं असूनही प्रशासन का खडबडून जाग होत नाही" असा प्रश्न साने यांनी केलाय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









