उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ‘या’ वाक्यानंतर अनेक तरुण सभा सोडून निघाले...

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी मैदानावर येताना नागरिक.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी मैदानावर येताना नागरिक.
    • Author, श्रीकांत फकिरबा बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (8 जून) औरंगाबादमध्ये सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादच्या नामांतराची घोषणा करतील, असं सभेसाठी आलेल्या बहुतेक जणांना वाटत होतं.

कारण खुद्द औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकात खैरे यांनी तीन-चार दिवसांपूर्वी यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.

खैरे म्हणाले होते, "उस्मानाबादचं धाराशीव आणि औरंगाबादचे संभाजीनर या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील."

याशिवाय या सभेच्या पार्श्वभूमीवर "होय, हे संभाजीनगरच", "हिंदुत्वाचा गजर, हे आपलं संभाजीनगर", असे बॅनर्स शिवसेनेकडून शहरभर लावण्यात आले होते.

त्यामुळे मग 8 जूनच्या सभेत नामांतराची अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा सभेसाठी आलेले बहुतेक जण बोलून दाखवत होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

ज्येष्ठ नागरिक मोहन औरंगाबादमध्येच राहतात. गळ्यात भगवा रुमाल टाकून ते शिवसेना नेत्यांची भाषणं ऐकत होते.

आजच्या सभेतून काय अपेक्षा आहे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरेंनी तसं वचन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आज ते जाहीर करायला पाहिजे."

पण, औरंगाबादचा पाणीप्रश्नही मोठा आहे, असं मी म्हणताच ते म्हणाले, "पाणी नाही, पाणी नाही, हा सगळा भाजपचा ड्रामा आहे. हा प्रश्न काही आजचा नाही. खूप वर्षांपासून आहे."

सभे सुरू व्हायच्या आधी जमलेली गर्दी.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, सभे सुरू व्हायच्या आधी जमलेली गर्दी.

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतहून शिवसेनेचे पदाधिकारी सभा ऐकायला आले होते. खुर्च्यांवर जागा नसल्याने ते मागे उभे राहून सभा ऐकत होते.

आज नामांतराची अधिकृत घोषणा करणार का साहेब? असं विचारल्यावर ते म्हणाले, "आज औरंगाबादचं संभाजीनगर होतंय का तेच ऐकायला आम्हीही आलोय."

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आलेल्यांपैकी बहुतेक जण ही अशीच अपेक्षा ठेवून आले होते. त्यांच्या बोलण्यातून ते स्पष्टपणे समोर येत होतं.

पण, या सगळ्यांची मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केल्याच्या 14 मिनिटांनंतर निराशा झाली.

सभास्थळी उपस्थित तरुण मुख्यमंत्र्यांना दाद देताना.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, सभास्थळी उपस्थित तरुण मुख्यमंत्र्यांना दाद देताना.

उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी 8 वाजून14 मिनिटांनी भाषण सुरू केलं. उपस्थितांनी त्यांना टाळ्यांनी प्रतिसाद दिला. पुढचे काही क्षण फटाके वाजत राहिले.

मागच्या बाजूनं वाजणाऱ्या फटाक्यांकडे ड्रोन जायला निघाला, तेव्हा मात्र सगळ्यांना माना ड्रोन पाहण्यासाठी मागे वळाल्या.

8 वाजून 26 व्या मिनिटाला मुख्यमंत्री औरंगाबादच्या नामांतराविषयी ते बोलायला लागले.

ते म्हणाले, "संभाजीनगर कधी करणार, असं ते विचारतात. पण, हे कोणी सांगायचं आपल्याला? ते माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं वचन आहे. ते मी विसरलेलो नाही. ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. एक- दीड वर्षं झाले विधानसभेत ठराव मंजूर आहे. कॅबिनेटने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारला ठराव दिला आहे."

ते पुढे म्हणाले, "संभाजीनगर असं या शहराचं नामांतर जेव्हा करेन तेव्हा संभाजीमहाराजांना अभिमान वाटेल, असं आदर्श शहर निर्माण करेन. असं वचन मी तुम्हाला देतो. नाव आताही बदलू शकतो, पण नाव बदललं आणि तुम्हाला पाणी दिलं नाही तर कसं होईल. नाव दिलं पण रोजीरोटी नसेल तर संभाजी महाराज म्हणतील तुला टकमक टोक दाखवतो. नावाला सार्थ ठरेल असं शहर पाहिजे."

मुख्यमंत्र्यांची सभा सुरू असताना रिकाम्या झालेल्या खुर्च्या.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना रिकाम्या झालेल्या खुर्च्या.

"अहो, पण औरंगाबादचं संभाजीनर करता कधी मग?" मुख्यमंत्र्यांच्या वाक्यानंतर हे पहिले उद्गार माझ्या मागे उभे असलेल्या तरुणांनी काढले. त्यानंतर ते सभेतून बाहेर जाण्यासाठी निघाले.

या तरुणांना नामांतराविषयी मुख्यमंत्र्यांकडून ठोस निर्णय अपेक्षित होता.

संभाजीनगर सोडून आता मुख्यमंत्री काहीपण बोलायला लागले. चला घरी, असं म्हणत ते बाहेर पडायला लागले.

त्यांच्या मागे नजर टाकली तर तरुणांचे काही घोळके बाहेर पडण्यासाठी खुर्चीवरून उठत असल्याचं दिसून आलं.

त्यांच्या मागे मागे चालत मी सभेच्या एक्झिट गेटपाशी गेलो. तिथं मला उस्मानाबादच्या चार-पाच तरुणांचा ग्रूप भेटला.

सभेतून बाहेर पडताना तरुण.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, सभेतून बाहेर पडताना तरुण.

"उस्मानाबादचं धाराशीव आणि औरंगाबादचं संभाजीनर हे दोन्ही नावं आता काही बदलत नाही. मूड ऑफ झाला. चाललो घरी आता," असं म्हणत तो ग्रूप गेटच्या बाहेर पडला.

सभास्थळी चक्कर टाकली तर अनेक ठिकाणच्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. जागा नाही म्हणून पायऱ्यांवर बसून सभा ऐकणारी मंडळीही निघून चालली होती.

सभा सुरू झाल्यानंतर कमी झालेली गर्दी.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

पुढे मुख्यमंत्री हिंदुत्व, काश्मिरी पंडित या व अशा मुद्द्यांवर बोलत राहिले. 9 वाजून 5 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण संपलं आणि ते मुंबईकडे रवाना झाले.

पाणीप्रश्न आणि सभेकडून अपेक्षा

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेच्या पार्श्वभूमीवर मी काल दिवसभर शहरात फिरत होतो. गृहिणी असो की व्यावसायिक, सगळ्यांच्या बोलण्यातून शहरातील पाणीप्रश्न हा मोठा मुद्दा असल्याचं समोर येत होतं.

औरंगाबादच्या विमानतळ परिसरातील नागरिकांशी पाणी प्रश्नावर चर्चा करत असताना प्रिया सोमवंशी समोर आल्या आणि आधी मला बोलू द्या असं म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, "आधी पाचव्या दिवशी पाणी यायचं, आता ते दहाव्या दिवशी येत आहे. तेही अर्धा तास. तेही वेळेवर येत नाही. कधी सकाळी, तर कधी रात्री 11 वाजता. त्यामुळे आम्हाला कुठे कार्यक्रमाला जाता येत नाही. पस्तीस मिनिटांच्या पाण्यात काय करायचं?"

तर प्रिती सोमवंशी म्हणाल्या, "शहराला नाव कुठलंही ठेवलं तरी त्याच्याशी आपल्याला जास्त काही लगाव नाही. पण पाणी ही मूलभूत गरज आहे. ते व्यवस्थित मिळायला पाहिजे."

सभेसाठी आलेल्या महिला.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, सभेसाठी आलेल्या महिला.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेत शहरातील पाणीप्रश्नावर बोलावं, असं बहुतेक नागरिकांनी आमच्याशी बोलून दाखवलं. मुख्यमंत्र्यांनीही सभेच्या सुरुवातीलाच औरंगाबादच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधलं.

ते म्हणाले, "गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील पाण्याचा प्रश्न अधिक बिकट होता. पाच दिवसांनी येणारं पाणी आठ-दहा दिवसांनी येत होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली की नाही, ते तुम्ही सांगायचं मला. पाच-पाच, दहा-दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं ते आता कमी झालेलं आहे."

"मी समांतर जलवाहिनीचं भूमीपूजन केलं. मी या योजनेचा पाठपुरावा करीन असं वचन दिलं आहे. दुर्दैवानं कोरोनामुळे दीड-दोन वर्षं गेलं. जे वाकडे येतील त्यांना दंड्याने सरळ करा, पण काहीही करून ही योजना पूर्ण करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत."

औरंगाबाद शहरातील बेरोजगारी आणि गुन्हेगारी हा सुद्धा चिंतेचा विषय असल्याचं औरंगाबादकरांनी आमच्याशी बोलून दाखवलं.

वाशिमहून औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेले दोन तरुण मुख्यमंत्र्यांची सभा ऐकायला आले होते.

मुख्यमंत्र्यांनी नेमकं कशावर बोललं पाहिजे, असं विचारल्यावर ते म्हणाले, "औरंगाबादच्या नामांतरावर ते बालतील का ते पाहायला आम्ही आलोय. त्याच्यापेक्षा इतरही प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण, मत मात्र नामांतर, हिंदुत्व अशाच गोष्टींमुळे मिळतं."

शिवसेनेकडून शहरात लावण्यात आलेलं बॅनर.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, शिवसेनेकडून शहरात लावण्यात आलेलं बॅनर.

सभा संपल्यानंतर सगळ्यांची बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ उडाली. फुलंब्री, सिल्लोड इथले काही जण त्यांची गाडी नेमकी कुठे उभी केलीय, ते फोनवरून एकमेकांना विचारत होते.

ज्याला त्याला घरी जाण्याची ओढ लागली होती. रस्त्यावर नेत्यांनी त्यांच्या भागातून आणलेल्या गाड्या सुसाट धावत होत्या. या गाड्यांवर नेत्यांच्या नावासहित मतदारसंघाची स्टिकर्स स्पष्टपणे दिसून येत होती.

फोन आणि पाऊस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, तोच माझ्या शेजारच्या एकाला फोन आला. तो लातूरहून औरंगाबादला नोकरीसाठी आला होता.

"काय पाऊस?" असं तो मोठ्यानं म्हणाला.

काय झालं हो, असं विचारल्यावर तो म्हणाला, "अहो लातूरहून माझे मित्र सभा ऐकायला यत आहेत. ते औरंगाबादच्या सेंट्रल बसस्टँडवर काही वेळात पोहोचणार आहेत. पण मध्येच एका ठिकाणी त्यांना पाऊस लागला आहे. तर ते मला विचारत होते की सभेच्या ठिकाणी पाऊस पडत आहे का?"

"बरं झालं इथं पाऊस नाही. नाहीतर सभा थांबली असती," असं म्हणत त्याने माझ्याकडे बघत उसासा टाकला.

त्याचा तो उसासा बघून उष्णतेमुळे हैराण झालेला आणि पावसाची वाट पाहणारा माझा शेतकरी बाप चटकन माझ्या डोळ्यासमोरून गेला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)