‘माझं कुटुंब आपल्या प्रतिष्ठेच्या नावाखाली माझा खून करण्यासाठीही तयार होतं’

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इशारा

ही बातमी नैराश्य आणि आत्महत्येविषयी आहे.

तुमच्या मनात जर आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा आत्महत्येचे विचार मनात येत असलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल तर मदत मिळवू शकता.

यासाठी तुम्ही भारतात आसरा (http://www.aasra.info/helpline.html) अथवा जागतिक पातळीवर Befrienders WorldWide (http://www.befrienders.org) यांच्याशी संपर्क साधू शकता.

----------------------------------------------------------------------------------------------------

(सुरक्षेच्या कारणास्तव या लेखातील पात्रांची नावे बदलण्यात आली आहेत.)

जन्मतः मुलगी म्हणून ओळख देण्यात आलेल्या ‘मनोज’ने वयाच्या 17व्या वर्षी आपल्याला पुरुष असल्याच्या जाणीवेबाबत कुटुंबीयांना सांगितलं होतं.

मी एका मुलीवर प्रेम करतो, असं सांगितल्यानंतर मनोजच्या घरच्यांकडूनच त्याच्या जीवाला धोका होता.

ही बाब त्याच्या काही केल्या त्याच्या आई-वडिलांच्या पचनी पडत नव्हती. अखेर, त्यांनी मनोजचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. घरात एका ठिकाणी कोंडूनही ठेवण्यात आलं. त्याला सतत जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती.

"माझे आई-वडील मला मारून टाकण्याची तयारी करत होते. वडिलांनी तर माझ्या हाताची नस कापून जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. ”

मनोज सांगतो, “मला इतकी मारहाण होईल, अशी कल्पना मी कधीच केलेली नव्हती. काहीही होऊ दे कुटुंब आपल्या मुलांचं म्हणणं समजून घेतं, असा विचार मी केला होता. पण माझं कुटुंब आपल्या प्रतिष्ठेच्या नावाखाली माझा खून करण्यासाठीही तयार होतं.”

ग्रामीण भागात महिलांच्या आयुष्यावर आधीपासूनच अनेक बंधनं असतात. अशातच एखाद्या महिलेला आपण पुरुष असल्याची जाणीव होत असेल, तर त्याची प्रतिक्रिया अत्यंत टोकाची येऊ शकते.

बिहारच्या एका गावात राहणाऱ्या मनोजच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. मनोजच्या मनातील खळबळीबाबत माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न त्याच्या दुप्पट वयाच्या पुरुषासोबत लावून दिलं.

मनोज सांगतो, “मी माझा जीव देण्यासही तयार होतो. पण माझ्या गर्लफ्रेंडने माझी साथ सोडली नाही. आज मी जिवंत आहे, आम्ही दोघे एकत्र आहोत, याचं प्रमुख कारण म्हणजे तिने कधीच पराभव मानला नाही.”

22 वर्षीय मनोज आणि त्याची 21 वर्षीय गर्लफ्रेंड रश्मी हे दोघे एका मोठ्या शहरात लपूनछपून राहत आहेत.

दरम्यान, त्यांनी एक याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टात समलैंगिकांना लग्नाचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणीही केलेली आहे. आता सदर याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेतं, याची त्यांना प्रतीक्षा आहे.

लग्नाचा अधिकार

2018 साली एका लांबलचक कायदेशीर लढाईनंतर दोन प्रौढ व्यक्तींमध्ये बनवण्यात आलेले समलैंगिक संबंध हे गुन्हा नाहीत, असा आदेश दिला होता.

पण, अजूनही समलैंगिक विवाहाला भारतात कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही.

अशा प्रकारची मागणी करणाऱ्या 21 याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावर आता लवकरच निर्णय येणं अपेक्षित आहे.

सदर याचिकांमध्ये विवाह करण्याची मागणी ही एका मूलभूत अधिकाराच्या स्वरुपात करण्यात आली आहे.

पण चार क्विअर कार्यकर्ते आणि इतर दोन जोडप्यांसोबतच मनोज आणि रश्मी यांच्या याचिकेनुसार कुटुंबाकडून होणारी शारीरिक आणि मानसिक हिंसा यातून बाहेर पडण्यासाठी विवाह हा एकमेक मार्ग असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मनोज म्हणतो, “आमच्या नात्याला कायदेशीर मान्यता मिळाली तर आम्हाला कोणतीच भीती उरणार नाही.”

2011 साली झालेल्या शेवटच्या जनगणनेत भारतात स्वतःला ट्रान्सजेंडर मानणारे सुमारे पाच लाख नागरीक असल्याचं समोर आलं होतं.

LGBTQA हक्क कार्यकर्त्यांच्या मते, हा आकडा प्रत्यक्षात खूपच कमी आहे.

2014 साली सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय देताना ट्रान्सजेंडर नागरिकांना पुरुष आणि महिला यांच्याव्यतिरिक्त तिसरी लैंगिक ओळख कायदेशीररित्या दिली होती.

पाच वर्षांनंतर ट्रान्सजेंडर समुदायाच्या अधिकारांसाठी एक कायदाही पारित करण्यात आला. त्याअंतर्गत, शिक्षण, रोजगार, आरोग्य क्षेत्रात ट्रान्सजेंडर व्यक्तींसोबतचा भेदभाव, त्यांच्याविरुद्ध आर्थिक, शारिरीक, लैंगिक किंवा मानसिक हिंसाचार करणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. मात्र, कुटुंबाकडून होणाऱ्या हिंसाचाराला तोंड देणं हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे.

कुटुंबाकडून हिंसाचार

मुंबई राहणाऱ्या महिला हक्क कार्यकर्त्या वीणा गौडा यांच्या मते, बहुतांश कायदे हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचं कुटुंब हे सुरक्षित स्थान असल्याचं गृहित धरतात. मग ते कुटुंब रक्ताच्या नात्यामुळे बनलेलं असो किंवा लग्न अथवा दत्तक घेण्याने.

वीणा यांच्या मते, “कुटुंबात होणारे हिंसाचार आपल्या सर्वांना माहीत आहेत. मग ते पत्नीविरुद्ध, मुलांविरुद्ध किंवा ट्रान्सजेंडर असण्यावरूनही असू शकतात. पण जाणूनबुजून या हिंसेकडे दुर्लक्ष करण्यात येतं. कारण हे मान्य करून त्याच्याकडे पाहिलं तर कुटुंब नावाच्या रचनेविरुद्ध प्रश्न उपस्थित होऊ शकतात.”

एका सार्वजनिक सुनावणीमध्ये 31 क्विअर आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आले, त्या पॅनलमध्ये वीणा गौडा यांचाही समावेश आहे.

आपल्या कुटुंबाकडून आपला कशा प्रकारे छळ झाला, हे या लोकांनी सांगितलेलं आहे.

गौडा यांच्या पॅनलमध्ये एक माजी न्यायाधीश, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आणि राज्य सरकारसोबत काम करत असलेल्या एक समाजसेविकेचा समावेश होता.

एप्रिल महिन्यात या सुनावणीवर आधारित एक अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये असा प्रस्ताव देण्यात आला की क्विअर लोकांना आपलं कुटुंब निवडण्याचा अधिकार देण्यात आला पाहिजे.

आपल्या प्रस्तावात वीणा यांनी लिहिलं, “सुनावणीत ज्या पद्धतीच्या हिंसाचाराचे जबाब लोकांकडून प्राप्त झाले आहेत. त्या आधारावर या लोकांना आपलं कुटुंब निवडण्याचे अधिकार मिळाले नाहीत तर त्यांच्याकडून जगण्याचा अधिकार हिसकावून घेतल्याप्रमाणे आहे.”

वीणा यांच्या मते, विवाहाचा अधिकार हा नव्या कुटुंबाची व्याख्या करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

जबरदस्तीने लग्न करून दिल्यानंतर काही दिवसांनी मनोजने पुन्हा रश्मीसोबत राहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नवऱ्याला याची माहिती मिळताच त्याने दोघांसोबतही लैंगिक संबंध ठेवण्याची धमकी दिली.

मनोज आणि रश्मी तिथून पळून गेले. जवळच्या रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या पहिल्या रेल्वेत ते चढले. पण त्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यामुळे ते पकडले गेले. दोघांना परत आणून जबर मारहाण करण्यात आली.

रश्मी सांगते, “मनोजवर दबाव टाकण्यात आला त्याने त्याच्या मृत्यूसाठी मला जबाबदार ठरवणारं एक पत्र लिहावं.”

मनोजने त्याला नकार दिल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या घरी कोंडून ठेवण्यात आलं. त्याच्याकडून मोबाईल फोनही काढून घेण्यात आला.

अखेर, रश्मीने एका क्विअर महिला हक्क संघटनेशी संपर्क साधून पोलिसांची मदत घेतल्यानंतरच मनोज आपल्या आई-वडिलांच्या घरातून बाहेर पडू शकला.

काही काळ ते ट्रान्सजेंडर लोकांसाठी बनवण्यात आलेल्या सरकारी निवारा केंद्रात राहिला. पण, रश्मी ही ट्रान्सजेंडर नसल्यामुळे दोघांनाही नंतर तिथून बाहेर पडावं लागलं.

पलायन आणि नवं आयुष्य

मनोज त्याच्या पतिपासून घटस्फोट घेण्यात यशस्वी ठरला. तो या बाबतीत नशीबवान ठरला असंच म्हटलं पाहिजे. कारण, कुटुंबीयांच्या तावडीतून सुटून नवं आयुष्य सुरू करण्याची दुसरी संधी मिळणारे लोक खूप कमी आहेत.

कोयल घोष या पूर्व भारतातील लेस्बियन-बायसेक्शुअल, ट्रान्समस्क्युलिन पीपल राईट्स कलेक्टिव्ह ‘सॅफो फॉर इक्वलिटी’ या संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.

त्या गेल्या 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ क्विअर समुदायासोबत काम करत आहेत.

कोयल यांना अजूनही 2020 वर्षातील तो दिवस आठवतो. त्या दिवशी सॅफोच्या हेल्पलाईनवर क्विअर जोडप्याचा एक कॉल आला होता. हे जोडपं कोलकात्याला पळून आलं होतं. पण त्यांच्याकडे राहण्यासाठी कोणतंच ठिकाण नसल्यामुळे सात रात्री त्यांनी फुटपाथवर झोपूनच काढल्या होत्या.

कोयल म्हणाल्या, “आम्ही एक जागा भाड्याने घेतली. तिथे त्यांना काही दिवस राहण्यास सांगितलं. डोक्यावर छत असेल तरच नोकरी शोधता येते. नव्या शहरात नवं आयुष्य सुरू करण्यासाठी हे आवश्यक असतं.”

समाज हीन दृष्टीने पाहत असल्यामुळे अशा लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कुटुंबाच्या हातून हिंसाचार, शिक्षण अर्धवट सोडणं, जबरदस्तीने लग्न, पलायन यांच्यामुळे ट्रान्सजेंडर लोकांना कायमचा रोजगार मिळू शकत नाही.

भारताच्या गेल्या जनगणनेनुसार, ट्रान्सजेंडरमधील साक्षरतेचं प्रमाण (49.76%) हे देशाच्या सरासरीपेक्षा (74.04%) अत्यंत कमी आहे.

2017 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात 96 % ट्रान्सजेंडरना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना एक तर भीक मागणं अन्यथा देहविक्रय व्यवसाय करणं भाग पडलं होतं.

सॅफोने ठरवलं की घरातून पळून येणाऱ्या जोडप्यांसाठी एक निवारा केंद्र उभं करावं. गेल्या दोन वर्षांत त्या निवारा केंद्रांमध्ये 35 जोडप्यांना राहण्याची जागा देण्यात आली आहे.

काम अवघड आहे. कोयल यांना रोज तीन ते पाच कॉल येतात. वेगवेगळ्या समस्यांमधून तोडगा काढण्यासाठी कोयल या वकिलांशी संपर्क साधतात.

याबाबत सांगताना कोयल यांनी म्हटलं, “मला रोज जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात. गावागावात संतप्त लोक माझ्या मागे लागलेले आहेत. पोलीस ठाण्यातही लोकांना अवघडल्यासारखं होतं. कारण आम्ही आमची क्विअर ओळख लपवत नाही. नेमकं हेच त्यांना सहन होत नाही.”

जेव्हा ट्रान्समॅन आसिफ आणि त्याची गर्लफ्रेंड समिना यांनी कोयल यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी ते पश्चिम बंगालच्या एका गावातील पोलीस ठाण्यात होते.

समिना म्हणत होती की पोलीस कॉन्स्टेबल मला हिजडा म्हणून संबोधत होते. लोकांना आपल्या नात्याबद्दल सांगण्याऐवजी मरून जावं, असं ते म्हणत होते.

आपली लहानपणापासूनची मैत्री प्रेमात रुपांतरीत झाल्यापासून दोघेही आपल्या कुटुंबापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होते.

अखेर, त्यांचा जीव वाचवण्यासाठी ही शेवटची संधी होती. त्यांना मदत गरजेची होती.

समिना म्हणाली, “जेव्हा कोयल इथे आल्या, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हाच कॉन्स्टेबलची वागणूक बदलली. अधिकाऱ्यांनी त्यांना रागावत म्हटलं की पोलिसांत असूनही न्यायालयाचे निर्णय आणि कायदा यांची माहिती तुम्हाला कशी काय नाही?”

आसिफ आणि समिना हे दोघेही आता एका मोठ्या शहरात सुरक्षित आहेत. मनोज आणि रश्मी यांच्या याचिकेत ते दोघेही याचिकाकर्ते आहेत.

आसिफने म्हटलं, “आता आम्ही आनंदात आहोत. पण आम्हाला कागदपत्रे मिळाली पाहिजेत. आम्हाला ते विवाह प्रमाणपत्र हवं, जे आमच्या नातेवाईकांचं तोंड बंद करेल. त्यांच्या मनात कायद्याबाबत भीती निर्माण करेल.”

सध्याचा काळ आता या जोडप्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

आसिफ म्हणतो, “सुप्रीम कोर्टाने आमची मदत केली नाही, तर आम्हाला मरावं लागेल. आम्ही जसे आहोत तसे आमचा स्वीकार कुणीच करणार नाही. आम्ही नेहमी पळत राहू, जीव जाण्याची भीतीही कायम असेल.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)