किन्नर आहे म्हणून घरच्यांनी हाकललं, पोट भरण्यासाठी भीक मागितली; पण आता ध्यास IAS बनण्याचा

    • Author, भार्गव परीख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

“आपल्या घरात जन्मलेला मुलगा किन्नर आहे यावर विश्वास ठेवायला माझे वडील तयार नव्हते. मी जर मुलींचे कपडे घातले तर मला मारहाण व्हायची. मला घरातून हाकलूनही दिलं.”

“किन्नर म्हणून मी भीकही मागितली. पण माझी शिकण्याची आवड पाहून आमच्या किन्नर गुरूंनी माझं भीक मागण्याचं काम बंद करून मला शिकवलं. मी. ग्रॅज्युएट झाले. आता मी आयएएसची तयारी करत आहे. माझ्या शिक्षणाचा खर्च माझे गुरू उचलतात.”

24 वर्षांच्या रितू डे सांगत होत्या. रितू आता विवाहित आहे. हृतिक शाह असं त्यांच्या पतीचं नाव आहे.

रितू डे कधी अहमदाबादच्या वडज भागातील किन्नर आखाड्यात, तर कधी स्वतःच्या घरात राहतात. त्यांना तीन भावंडे आहेत. त्यांचा मोठा भाऊ मानसिकदृष्ट्या विकलांग असून मोठ्या बहिणीचे लग्न झालं आहे.

बीबीसीशी बोलताना रितू डे सांगतात, “ माझे वडील रिक्षा चालवायचे. माझा भाऊ मानसिकदृष्ट्या विकलांग आहे, त्यामुळे मीच पुढे त्यांचा वंश चालवणार असं त्यांना वाटायचं. पण लहानपणापासून मला वाटायचं की, मी मुलगा नाही तर मुलगी आहे. मी माझ्या मावशीची साडी नेसायचे. मुलांऐवजी मुलींशी खेळायचे. पण तेव्हा त्यात काही गैर वाटायचं नाही, कारण मी लहान होते.

पण मी सातवीत असताना माझ्या आत्याने मोठ्या बहिणीसाठी इम्पोर्टेड पर्स आणि मेकअपच्या वस्तू आणल्या. मी त्या जबरदस्तीने घेतल्या. मुलींचे कपडे घातले आणि लिपस्टिक लावली.”

रितूच्या म्हणण्यानुसार ज्यादिवशी वडिलांनी रितूला मुलींचे कपडे घालून लिपस्टिक लावलेलं पाहिलं, तेव्हा मारहाण केली. पुन्हा मुलींचे कपडे न घालण्याबद्दल तंबी दिली.

रितू डे सांगत होती, “मी शाळेतून आल्यावर माझ्या खोलीला कुलूप लावायचे आणि मुलींचे कपडे घालायचे. हे माझ्या आईला कळले. त्यामुळे माझ्यावर पुन्हा दबाव येऊ लागला.”

‘... आणि आयुष्यातला संघर्ष सुरू झाला’

“माझ्या वडिलांना जो धक्का बसला तिथून माझ्या आयुष्यातल्या संघर्षाला सुरुवात झाली. मी मुलींसारखे वागते हा त्यांच्यासाठी आघातच होता. त्यांचा वाटत होतं की, मला वेड लागलंय.

एक बुवा माझ्या घरी येऊ लागला. माझे वडील त्याच्यासोबत विधी करायचे. पण माझ्यात बदल झाला नाही. त्यानंतर मला प्रजननक्षमता आणि पुरुषार्थ वाढवणारी औषधं दिली गेली. पण माझ्यामधे फक्त स्त्रैण गुण होते.”

“जेव्हा मी दहावीत गेले, तेव्हा माझे शरीर पुरुषाऐवजी स्त्रीसारखे बदलायला लागलं. माझी छाती उभार घेत होती. मला शर्ट घालता येत नव्हता. शाळेत मुलं मला चिडवायची. माझं चालणं, माझं बोलणं मुलीसारखे असल्याने माझे वर्गशिक्षकही माझी चेष्टा करायचे,” रितू सांगत होत्या.

“लोक माझा शारीरिक नव्हे, तर मानसिक छळ करत होते. माझा अपमान करत होते. मी दहावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पण माझ्या शरीरात झालेल्या बदलांमुळे शाळेत जायची हिंमत होत नव्हती. म्हणून मी सायन्सला बाह्य विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि अकरावी-बारावीची परीक्षा दिली.

या काळात मी मुलांकडे आकर्षित व्हायला लागले. एका मुलाच्या प्रेमातही पडले. आम्ही तासनतास गप्पा मारायचो. एके दिवशी मी खोलीत लपून त्याच्याशी बोलत होते आणि पकडले गेले. माझे वडील त्या मुलाच्या घरी गेले आणि त्याला धमकावले. या घटनेनंतर घरातील तणाव वाढला होता.”

रितू डे पुढे सांगतात, “एक दिवस माझ्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. या सगळ्यासाठी माझ्या वडिलांनी मला जबाबदार धरलं. मला घराबाहेर बाहेर पडावं लागलं.”

किन्नर म्हणून भीक मागितली आणि अभ्यासही केला

जुन्या दिवसांच्या आठवणीने रितू भावूक होतात.

त्याबद्दल विस्ताराने सांगताना म्हणतात की, “मी त्या मुलाशी संबंध तोडले. मला घरातून हाकलून दिलं होतं. या कठीण काळात माझ्यासारख्याच एका मुलाने मला साथ दिली. तो गे होता.

आम्ही दोघं दुसऱ्या एका गे मुलासोबत राहत होतो त्या मित्रामुळेच माझी ओळख किन्नर समुदायाशी झाली. मी त्यांच्यासारख्या शारीरिक हालचाली करायला, टाळ्या वाजवायला शिकले.”

दरम्यान, रितू डे यांची ओळख डीसामधल्या एका किन्नर गुरूंसोबत झाली. ती डीसाला गेली आणि बाकी किन्नरांसोबत आजूबाजूंच्या गावांमध्ये भीक मागायला लागली.

“एक दिवस भाभरमध्ये आम्ही भिक्षा मागायला गेलो होतो. तिथे कॉलेज पाहून मला पुन्हा अभ्यास करण्याची इच्छा झाली. मी माझ्या गुरूशी बोलले. पण आमच्या मुख्य गुरूंनी मला शिकवायला नकार दिला.”

स्वतःबद्दल पुढे सांगताना त्यांनी म्हटलं, “मी अहमदाबादमध्ये किन्नर आखाडा चालवणाऱ्या गुरू कामिनी डे यांच्या संपर्कात आले. कामिनी डे या पुरोगामी विचारवंत होत्या. जेव्हा मी त्यांना सांगितले की, मला अभ्यास करायचा आहे, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. कारण असं वेगळं असणाऱ्यांसाठी शिकणं कठीण होतं.

त्यांनी अट घातली की, मला स्वत:ला सिद्ध करावे लागेल आणि नंतरच त्या पुढे गुरूशी बोलतील. मी शहर सोडून खेड्यात राहिले. पण मला नवीन गोष्टी वाचायला आणि शिकायला खूप आवडायचं. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल पदाची परीक्षा होती, त्यातील प्रश्नपत्रिका इंटरनेटवर टाकण्यात आली होती.”

एका प्रश्नपत्रिकेनं बदललं आयुष्य

वर्ग-3 पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमुळे आयुष्यात झालेल्या बदलाविषयी सांगताना रितू यांच्या डोळ्यांच चमक आली.

त्या सांगतात, “मी गुरू कामिनी डे यांना म्हटलं की, या स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासमोर लिहीन आणि त्यात उत्तीर्ण झाले तर मला शिक्षण मिळेल का? त्यांनी होकार दिला.

मग मी त्यांच्या समोर बसले आणि एका तासाची प्रश्नपत्रिका फक्त 45 मिनिटात प्रश्नपत्रिका पूर्ण केली. मी या परीक्षेची कोणती तयारी केली नव्हती.

इंटरनेटवर पाहून प्रश्नांची उत्तर शोधली आणि गुण मोजले तेव्हा 100 पैकी 72 गुण मिळाले होते.

माझा उत्साह पाहून गुरू कामिनी डे यांनी माझ्या गुरूंना मला अहमदाबादला नेणं आवश्यक आहे हे पटवून दिलं. त्यानंतर त्यांनी मला अहमदाबादच्या आखाड्यात आणलं. मी घरून बारावीची मार्कशीट आणून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.”

बीबीसीने गुरू कामिनी डे यांच्याशीही संवाद साधला.

कामिनी डे सांगत होत्या, “आमच्या किन्नर समाजात जवळपास कोणालाच अभ्यास करायला आवडत नाही. रितू डे यांची शिकण्याची आवड पाहून मी प्रभावित झाले. तिच्या शिकवणीचा आणि कॉलेजचा खर्च उचलायचं मी ठरवलं. तिने मनापासून अभ्यास केला. आमच्या आखाड्यात शिकण्यासाठी तिला भीक मागण्यापासून सूट देण्यात आली होती.

मग मी तिला संगणकाऐवजी टॅब घेऊन दिला, जेणेकरून इतरांना त्रास होऊ नये. आता तिचं आयुष्य छान सुरू होतं. सोबतच ती मोबाईलवरून आमचे व्हीडिओ डाऊनलोड करून रील बनवायची आणि आमच्या समाजाचे किस्से, आमच्या मजेशीर गोष्टी सोशल मीडियावर टाकायची. त्यामुळे लवकरच ती आमच्या आखाड्यात सर्वांची लाडकी बनली.

प्रत्येक किन्नर तिला अभ्यासासाठी मदत करण्यास तयार होता आणि मानसिकदृष्या खचलेल्या रितू डेला एक नवीन आत्मविश्वास मिळत गेला. कोणत्याही शिकवणीशिवाय तिला चांगले गुण मिळायचे, त्यामुळे आम्हालाही अभिमान वाटायचा.”

रितू डे सांगतात, “मी चांगल्या मार्कांनी पास व्हायचे. कॉलेजमध्ये मी किन्नर आहे आणि शिकायला आलीये, असं अभिमानानं सांगायचे. जर कोणी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला तर मी किन्नरांप्रमाणे टाळ्या वाजवते.”

आता ध्यास IAS बनण्याचा...

पुढील शिक्षण घेतल्यानंतर रितू डे यांना आयएएस व्हायचं आहे.

आयएएस होण्याच्या स्वप्नाबद्दल रितू डे सांगतात, “इंटरनेटवर वाचून मी इतिहास विषय घेऊन बीए पास केलं. माझे चांगले मार्क्स पाहून लोक माझ्या नोट्स घ्यायला यायचे. कॉलेजमध्ये सुरुवातीला मला कोणीही स्वीकारलं नाही, पण नंतर सगळ्यांनी मला स्वीकारलं.

मी इतिहास घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मला सांगितले की, माझं सामान्य ज्ञान पाहून मी IAS ची परीक्षा देऊ शकते. म्हणून मी ठरवलं की मला कोणत्याही परिस्थितीत आयएएस व्हायचं आहे.”

रितू डे यांच्या गुरू कामिनी डे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “तिची पुढे शिकण्याची इच्छा पाहून आम्ही तिला आयएएस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवून दिला.

जेव्हा या केंद्राच्या व्यवस्थापनाला कळले की, ती ट्रान्सजेंडर आहे आणि तिने आयुष्यात अशा समस्या पाहिल्या आहेत तेव्हा त्यांनी तिची फी माफ केली.

तिला अतिरिक्त मार्गदर्शन केलं जातं. आम्ही विकत घेऊ शकत नाही अशी पुस्तके वाचण्याची व्यवस्था केली आहे. प्रशिक्षण केंद्रातील प्राध्यापकांना तिची प्रतिभा दिसते आणि त्यांना वाटते की ती आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होईल.”

अहमदाबादमधील आश्रम रोडवर चालणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या संस्थेचे नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना सांगितलं,

“हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे. यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास आहे. एका विद्यार्थ्याची फी माफ करून आम्हाला प्रसिद्धी मिळवायची नाही. ती IAS ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आम्ही तिला शिक्षक म्हणून बोलावू. आम्ही तिला आनंद देण्याचा आणि गरीब, ट्रान्सजेंडर मुलांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)