'केवळ विद्यार्थिनीशी लग्न करायचं म्हणून मी पुरूष झालो नाही'

    • Author, मोहर सिंग मीणा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, जयपूरहून

"मला स्वतःचाच, स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या अवयवांचा त्रास व्हायचा. स्त्रीचं शरीर मला नको झालं होतं, त्यात मला अस्वस्थ वाटायचं."

"पण आज मला जसं राहायचं होतं, जसं मला जगायचं होतं, तसं मी जगू शकतोय. आणि हो या सगळ्यात मी खूप खुश आहे."

सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी करून पुरुष बनलेले 28 वर्षीय आरव (आधीचे नाव मीरादेवी) बीबीसीशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त करत होते.

उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील डीग तालुक्यातील एका कुटुंबात पाचवी मुलगी जन्माला आली. साल होतं 1994.

पाच बहिणींमध्ये शेंडफळ असलेल्या या मुलीचं नाव मीरा देवी असं ठेवलं. तिचं वय वाढत होतं तसा तिचा अभ्यासही सुरू होता.

पण मीराला मुलांसारखं राहायला, त्यांच्यासारखे कपडे घालायला आवडायचं. 2018 मध्ये तिनं वयाच्या 24 व्या वर्षात पदार्पण केलं आणि तिला राजस्थानच्या शिक्षण विभागात शारीरिक शिक्षिका म्हणून नोकरी लागली. तिचं पोस्टिंग डीग तालुक्यातील नगला मोती या शासकीय माध्यमिक विद्यालयात झालं. तोपर्यंत तरी सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण यावर्षी 4 नोव्हेंबरला मीरा देवीने नगला मोती गावातल्या एका मुलीशी लग्न केलं. त्यांचं हे लग्न देशभरात चर्चेचा विषय ठरला. कारण मीरा देवींनी स्वतःवर सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी करवून घेतली होती. त्यामुळे आता त्या पुरुष (आरव) झाल्या होत्या.

लिंग बदलण्यासाठी कुटुंबियांना तयार केलं..

शाळेचे रेकॉर्ड तपासले तर त्यात मीरा देवी या महिला शारीरिक शिक्षिकाच आहेत. फक्त आता त्यांना आरव ही नवी ओळख मिळालीय. आरव बीबीसीशी बोलताना सांगतात की, "मला आधीपासूनच प्रॉब्लेम होता. मला स्वतःची आणि स्वतःच्या शरीराची अडचण वाटत होती."

"2010 मध्ये मी जेंडर चेंजवर थोडं वाचलं होतं. मग मी ठरवलं आधी नोकरी लागू दे, मग ठरवता येईल. आणि त्यानंतर घरच्यांना या सर्जरीसाठी तयार करीन." आरव सांगतात, "2018 मध्ये जॉब लागला. त्यानंतर इंटरनेटवर बरीच माहिती गोळा करायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांशी बोललो आणि घरच्यांना सांगितल्यावर ते ही तयार झाले." 2019 मध्ये मी दिल्लीच्या एका हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट सुरू केली. डिसेंबर 2021 मध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण झाली." "आता मात्र मी खूप खुश आहे आणि विशेष म्हणजे माझ्या घरचे सुद्धा खुश आहेत. आता जेंडर चेंज झाल्यामुळे माझ्या बहिणींना भाऊ सुद्धा मिळालाय."

सलग तीन वर्ष ट्रीटमेंट सुरू होती..

आरव बीबीसीशी बोलताना सांगतात की, "2019 पासून डिसेंबर 2021 पर्यंत दिल्लीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जेंडर चेंजसाठी ट्रीटमेंट सुरू होती. ट्रीटमेंटचा खर्च जवळपास 15 लाखाच्या आसपास पोहोचला होता. ते सांगतात, "जेंडर चेंज मधली पहिली पायरी म्हणजे मानसोपचारतज्ज्ञांशी बोलणं. त्यांचे बरेच प्रश्न असतात. उदाहरणार्थ- काय कारण आहे, कोणता दबाव आहे का? वगैरे, वगैरे... शेवटी ते एक सर्टिफिकेट देतात, त्याच आधारावर पुढची प्रोसेस सुरू होते."

"सुरुवातीला हार्मोन थेरपी सुरू होते. हार्मोन थेरपीमध्ये बॉडी पार्ट्सच्या तीन वेगवेगळ्या सर्जरी केल्या जातात. यामध्ये दोन सर्जरीमध्ये स्तन काढले जातात, पर्सनल पार्टच्या पण दोन सर्जरी केल्या जातात." "या सर्जरीसाठी मांडी, पोट नाहीतर मग हाताची स्किन घेतली जाते. मी माझ्या मांडीची त्वचा दिली. सर्जरी नंतर सहा महिने ते वर्षभर विश्रांती घ्यावी लागते."

दाढी, मिशा आणि आवाजात होणारे बदल

या ट्रीटमेंट दरम्यान आरवच्या शरीरात अनेक बदल झाले जे त्यांना जाणवले. या बदलांमुळे त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढला. ते सांगतात, "मुलीचा आवाज बदलून मुलांचा आवाज येणं किंवा दाढी मिशा येणं यासाठी हार्मोन थेरपी दिली जाते. यामुळे हळूहळू बदल होत जातात."

दाढी-मिशी आल्यावर पुरुषासारखं दिसू लागतो , त्यामुळे कम्फर्टेबल तर वाटतंच पण आत्मविश्वासही वाढतो.

चेहरा, ओठ आणि डोळ्यांच्या वरच्या भागावर देखील बदल केले जातात. यामुळे चेहऱ्यावर थोडेसे बदल होऊन चेहरा मुलांसारखा दिसू लागतो.

'मला स्वतःसाठी जगायचं होतं'

पण विद्यार्थिनीच्या प्रेमापोटी महिला शिक्षिकेने जेंडर चेंज केल्याच्या बातम्या आलेल्या पाहून मला वाईट वाटलं.

आरव सांगतात, "मला आधीतर स्वतःसाठी जगायचं होतं. लग्न तर नंतर केलंय. कारण बाईच्या शरीरात जगणं खूप इरिटेट करणारं होतं, मला वाटायचं की मी जगूच शकणार नाही.

ते पुढे सांगतात, "मी डीगमध्ये राहतो आणि कल्पनाचे घर नगला मोती गावात आहे. आमचे आधीपासूनच घरोब्याचे संबंध आहेत. माझी जिथं पोस्टिंग झाली तिथंच कल्पना शिकत होती."

ते सांगतात, "शक्यता असू शकते की, कल्पनाला मी आवडायचो. पण आम्ही नेहमीच शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यात होतो. माझा शिक्षकी पेशा आहे आणि याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो."

माध्यमांशी बोलताना आरवची पत्नी कल्पना सांगतात की, "मला सर आधीपासूनच आवडायचे. जरी त्यांनी सर्जरी केली नसती तरीही मी त्यांच्याशी लग्न केलं असतं."

आरव सांगतात, "माझी ट्रीटमेंट सुरू असताना कल्पना सुद्धा माझ्यासोबत दिल्लीला आली होती. दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची बोलणी सुरू केली आणि त्यांच्याच इच्छेने आमचं लग्न झालं."

यावर डॉक्टर काय म्हणतात..

सेक्स रिअसाइन्मेंट सर्जरी किंवा जेंडर रिअसाइन्मेंट करवून घेणं भारतात तरी अजूनपर्यंत सामान्य गोष्ट नाहीये. सामाजिक दबाव आणि मान्यता नसल्यामुळे क्वचितच लोक ही शस्त्रक्रिया करतात.

जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष डॉ. राकेश कुमार जैन बीबीसीशी बोलताना सांगतात की, "एखादा पुरुष महिलेप्रमाणे वागत असेल किंवा स्त्री पुरुषासारखी वागत असेल तर त्यांना त्याच जेंडर मध्ये जावं वाटतं."

डॉक्टर जैन सांगतात, "जर एखादी महिला पुरुष बनण्यासाठी आली तर यात खूप मोठी प्रोसिजर करावी लागते. यात महिलांचे स्तन काढून टाकावे लागतात. निप्पलचा आकार लहान करावा लागतो."

महिलांचे ऑर्गन्स काढावे लागतात. जसं की गर्भाशय आणि अंडाशय काढून टाकावं लागतं. आणि याच ठिकाणी टिश्यूपासून पेनिस रिकंस्ट्रक्शन केलं जातं. जर याठिकाणी टिश्यू कमी असतील तर मांडी किंवा इतर मांसपेशीमधून टिश्यू घेतले जातात.

ते सांगतात, "यात हार्मोन थेरपी, सायकोथेरपीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे आवाजात, शरीरावरील केसांमध्ये पुरुषांसारखे बदल होतात. या बदलांमुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास येतो."

डॉ. जैन सांगतात, "विचारण्यासाठी तर खूप लोक येतात. पण आमच्या इथे अजूनतरी जेंडर रिअसाइन्मेंट सुरू झालेलं नाही."

"आमच्याकडे बरेचसे असे लोक येतात ज्यांना व्हजायना, पेनिस नाहीये. आम्ही त्यांच्यासाठी व्हजायना, पेनिस बनवून देतो."

डॉ. जैन सांगतात की, "स्त्री जेव्हा पुरुष बनते आणि पुरुष जेव्हा स्त्री बनतो तेव्हा त्यांच्यावर ज्या सर्जरी होतात त्यामुळे त्यांना भविष्यात पालक बनता येणार नसतं."

स्टाफने आणि कुटुंबियांनी पाठिंबा दिला...

आरव सांगतात, "मी आधीपण असाच राहायचो. शाळेत मॅडम ऐवजी सर म्हणून हाक मारलेली मला आवडायचं. शाळेच्या स्टाफला पण माहिती होतं याबद्दल. त्यांच्यासाठी यात आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं."

डीग तालुक्याचे अतिरिक्त मुख्य ब्लॉक शिक्षण अधिकारी महेश कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मीरा देवी नगला मोती येथील सरकारी माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांनी विभागाच्या रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव बदलून आरव करावं म्हणून अर्ज केलाय. आम्ही त्यांचा अर्ज पुढे पाठवलाय."

आरवचे वडील लष्करात निवृत्त झालेत आणि ते आता शेती करतात. आई अंगणवाडीत कर्मचारी होती, पण आता त्याही निवृत्त झाल्यात. कल्पनाचे वडीलही शेती करतात. कल्पनाला तीन बहिणी आहेत, तर आरवला पाच बहिणी आहेत.

आरवचे वडील वीरी सिंह मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, "त्याने मुलींसारखे कपडे कधीच घातले नाहीत. तो नेहमीच मुलांबरोबर खेळायचा."

आरव सांगतात, "मी शाळेत अगदी पुरुषांसारखे कपडे घालायचो आणि तसाच राहायचो."

आरव आणि कल्पना दोघेही खेळाडू..

कल्पना ही कबड्डीपटू असून 2023 मध्ये दुबईत होणाऱ्या प्रो कबड्डीसाठी ती सध्या प्रशिक्षण घेते आहे.

आरव सांगतात, "कल्पना चार वेळा राज्यस्तरावर खेळलीय. राजस्थान ग्रामीण ऑलिम्पिकमध्ये ती भरतपूरची कॅप्टन होती. मागच्या वर्षी महाराष्ट्रात सुद्धा राष्ट्रीय स्तरावर ती खेळली होती."

ते सांगतात, "7 नोव्हेंबरला अमरावतीत कबड्डीच्या मॅचेस होत्या. पण 4 तारखेला लग्न असल्यामुळे कल्पना जाऊ शकली नाही."

मी क्रिकेट आणि हॉकी असे दोन्ही गेम खेळतो. मी नॅशनल लेव्हलचे सात सामने खेळलेत, बरीच पदकं जिंकली आहेत.

पण आमच्या शाळेत साधनांची कमतरता असल्यामुळे आम्ही मुलांना कबड्डीच्या मॅचेससाठी तयार करतोय.

आरव सांगतात की, "माझी अशी इच्छा आहे की, कल्पनाने देखील माझ्यासारखं शारीरिक प्रशिक्षक व्हावं. पण कल्पनाला जो निर्णय घ्यायचाय त्यासाठी घरचे नेहमीच तिला सपोर्ट करतील."

आरव म्हणतात, "जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वीकारत नाही, तेव्हा समाजाने त्याला जेंडर चेंज केल्यावर सहकार्य केलं पाहिजे. नाकी त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)