पॉलिअ‍ॅमरी : 'आम्ही तिघे जोडीदार आहोत आणि एकाच पलंगावर झोपतो'

    • Author, हम्पो लकाजे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेच्या तरुणांमध्ये पॉलिअॅमरी नावाचा नवीन ट्रेंड उदयास येत आहे. पॉलिअॅमरी म्हणजे एकाच वेळी अनेक अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असणं.

लहान केस, सारख्याच रंगाचा पायघोळ आणि टॉप घातलेली लेथाबो मोजालेफा.

लिथाबोनं डिसेंबर 2018 मध्ये फ्लेचर मोजलेफाला डेट करण्यास सुरुवात केली.

फ्लेचरही तितकाच आत्मविश्वासू आहे. त्याला भडक कपडे घालायला आवडतात.

वयाच्या विशीत असलेलं हे जोडपं त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासह दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतातील ग्रामीण भागात राहतात.

ते पहिल्यांदा जेव्हा भेटले, तेव्हा लिथाबो बायसेक्शुयल असल्याची फ्लेचरला कल्पना नव्हती.

लिथाबो सांगते, "मी आमच्या नात्याला दोन-तीन महिने झाल्यानंतर ही गोष्ट फ्लेचरला सांगितली. कारण तेव्हा मला जाणवलं की मी या व्यक्तीशी खरोखरच मोकळेपणानं वागू शकते."

फ्लेचरही माझ्याशी ठीक वागत होता.

"ती माझ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडली आणि याचा मला आनंद वाटत होता," फ्लेचर सांगतो.

आपलं नातं पुढं न्यायचं असेल तर लिथाबोच्या लैंगिक आणि भावनिक गरजा बायसेक्शुयल स्त्री म्हणून तर फ्लेचरच्या हेटेरोसेक्शुयल पुरुष म्हणून पूर्ण कराव्या लागतील, हे या जोडप्याच्या लक्षात आलं.

म्हणून त्यांना नात्यात तिसरी व्यक्ती आणण्याची कल्पना सुचली आणि मग या दोघांनी मिळून त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे ठरवलं.

दोघात तिसरी

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची भेट लुनिया माकुआ या बायसेक्शुयल महिलेशी झाली. ती याच भागातील नाईट क्लबमध्ये स्ट्रीपर म्हणून काम करते. तिचंही वय 20 च्या आसपास आहे.

"आम्ही सोबत आलो. आम्ही चर्चा करत असलेल्या बहुतेक गोष्टींशी आम्ही एकमेकांना रिलेट करत असायचो. त्याला ती सुरुवातीपासूनच आवडायची. मला माहित आहे की त्याला अशा स्त्रिया आवडतात," लिथाबो सांगते.

"माझ्यासोबतही तीच गोष्ट होती. कारण मी देखील अशाच गोष्टी करत आहे. मी देखील एक हस्टलर आहे. त्याच गोष्टीमुळे आम्ही एकमेकांसोबत जोडले गेलो.

लुनियालाही तसंच वाटतं.

"लिथाबोनं माझ्याशी संपर्क केला. मग मी मला डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने माझी फ्लेचरशी ओळख करून दिली. नंतर आम्ही सर्वजण नातेसंबंधात ओढले गेलो," लुनिया सांगते.

"मला लिथाबोबद्दल फीलिंग होत्या. फ्लेचरबद्दलही मला फीलिंग आहेत हे मला तेव्हा कळलं जेव्हा आम्ही एका कार्यक्रमात होतो. मी तिथं त्याचं चुंबन घेतलं होतं.

"काही वेळातच आम्ही सगळे एकत्र आलो. आम्ही तिघे एकच पलंग शेअर करत होतो. विशेषत: सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावताना आणि गेस्ट हाऊसमध्ये राहतानाही आम्ही एकच पलंग शेयर करत होतो."

पण, दक्षिण आफ्रिकेचा ग्रामीण भाग असलेल्या लिम्पोपो प्रांतातील लोकांसाठी पॉलिअॅमरी रिलेशनशिप समजून घेणं नेहमीच कठीण आहे.

लिथाबो कबूल करते की, तिच्या काही समवयस्क दोस्तांना अजूनही या नातेसंबंधांबद्दल समजत नाही. आणि या भागात ती सामान्य गोष्ट आहे.

लिथाबो सांगते, “एक जोडीदार असताना दुसऱ्या जोडीदाराला कसं हाताळते, असं ते मला विचारतात. मी त्यांना समजावून सांगते की, तो फक्त तिचा जोडीदार नाहीये, मीही तिला डेट करत आहे.

“एकदा का लोकांना समजलं की ती देखील माझी जोडीदार आहे, तर ते माझ्यावर पछाडला गेल्याचा आरोप करतात.

“पण, यामुळे मला काही फरक पडत नाही. मी काय करत आहे याची मला जाणीव आहे आणि मी घेत असलेल्या निर्णयांची मला कल्पना आहे."

फ्लेचर सांगतो की, या प्रतिक्रिया रूढिवादी समाजातील विचारसणीतून येतात.

"एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होईल यावर त्यांना विश्वासच बसत नाही."

तिघांना अनेकदा त्यांचं नातं कसं चालतं, हे स्पष्ट करावं लागतं.

"तो काही असा माणूस नाही, जो त्याला हव्या त्या व्यक्तीशी सेक्स करू शकतो,” लिथाबो सांगते.

फ्लेचर तिला पाठिंबा देत म्हणतो, "त्या दोघी माझ्याशिवाय एकमेकींशी लैंगिक संबंध ठेवू शकतात."

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. इयान ऑपरमन म्हणतात की, बहुआयामी संबंधांमध्ये संमती सर्वांत महत्त्वाची असते.

ते सांगतात, "वेगवेगळ्या लैंगिक प्रवृत्तीचे लोक समाजाचा भाग आहेत आणि ते त्यांच्या जोडीदारांसोबत करार करून नातेसंबंधांचे नेटवर्क तयार करतात.

"इतर प्रकारच्या नॉन-मोनोगॅमस रिलेशनशिपपासून पॉलिअॅमरीत अनेक गोष्टी वेगळ्या आहेत."

उदाहरणार्थ, असे लोक आहेत जे त्यांच्या मुख्य नातेसंबंधाच्या बाहेर लैंगिक संबंध ठेवण्यास सहमत आहेत. पण, त्या लैंगिक जोडीदाराशी ते भावनिक बंध तयार करत नाहीत.

येथील रिलेशनशिप काऊन्सिलर सांगतात की, आता पॉलिअॅमरीमध्ये अधिक लोक आहेत आणि दक्षिण आफ्रिकेत ते अपेक्षेपेक्षा अधिक सामान्य आहे.

पॉलिअॅमरस व्यक्ती बहुधा ऑनलाइन डेटिंग सुरू करते.

जोहान्सबर्ग, केपटाऊन आणि डर्बन या मुख्य शहरांमध्ये इतरांना भेटण्यासाठी पॉलिअॅमरस लोक कार्यक्रम आयोजित करत आहेत.

फक्त तरुणच नाही तर...

रिलेशनशिप कोच ट्रेसी जेकब्स यांना त्यांच्याकडे आलेल्या लोकांचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की, पॉलिअॅमरी केवळ तरुण लोकांमध्ये वाढत आहे, असं नाहीये.

त्या सांगतात, "तरुण पिढ्यांमध्ये पॉलिअॅमरी अधिक लोकप्रिय असले तरीही, वृद्ध वयोगटातील इतर व्यक्ती देखील त्याचा सराव करत आहेत.

"पॉलिअॅमरस म्हणून ओळखल्या जाणार्‍या या व्यक्तींची श्रेणी बरीच विस्तृत आहे आणि त्यांचं कोणतंही स्पष्ट असं वय नाही."

इंटिमेट रिलेशनशिप कोच एलिझाबेथ रेटिफ सांगतात की, पॉलिअॅमरस संबंध देखील अधिक आकर्षक असतात कारण ते अधिक लवचिकता देतात आणि पारंपरिक भूमिकांना आव्हान देतात.

"तुम्ही तुमच्या जोडीदारासह आणि तिच्या दुसऱ्या जोडीदारासह आणि त्यांच्या एका मुलासोबत घरात राहत असाल, तर तुमच्या लैंगिक भूमिका एकपत्नीत्व किंवा बहुपत्नीत्वाच्या सेटअपमध्ये ज्यापद्धतीनं कार्य करायला जातात, तशा त्या यावेळी करत नाहीत."

पॉलिअॅमरी बद्दल सामान्यतः विचारले जाणारा प्रश्न म्हणजे त्याचा मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो?

विशेषतः लुनिया, लिथाबो आणि फ्लेचर सारख्या प्रकरणांमध्ये.

"मला वाटतं की त्याला दोन आई आहेत हे जाणून घेऊन माझं बाळ मोठं होणार आहे. मी अशी पॉलिगेमस कुटुंबं पाहिली आहेत जिथं पतीला अनेक बायका आहेत आणि ते एकाच अंगणात आणि एकाच घरात वाढलेले आहेत. त्यामुळे, मला वाटतं की सर्वकाही ठीक होणार आहे," लिथाबो फ्लेचर आणि तिच्या मुलाबद्दल सांगते.

लुनियाही या मताशी सहमत आहे. ती सांगते की, ती लिथाबोच्या मुलाची जैविक आई नसली तरी बाळाच्या संगोपनात तिचा सहभाग आहे.

"लिथाबो सहसा बिझी असते. म्हणून जेव्हा ती नसते तेव्हा मी बाळाला सांभाळते. मला वाटतं की, एके दिवशी मलाही मूल होईल, पण सध्या मी करत असलेल्या कामाच्या स्वरूपामुळे ते शक्य नाही.

"मला मूल होणार असेल, तर आम्ही सर्वांनी मान्य केलं पाहिजे. मला लिथाबोशी याबाबत बोलणं आवश्यक आहे. जर तिला योग्य वाटत असेल तर आम्ही मूल जन्मास घालू.”

डॉ. ऑपरमन सांगतात की, या अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये मुलांशी काळजीपूर्वक संभाषण साधणं आवश्यक आहे.

"पॉलिअॅमरस कुटुंबातील मुलांचा गोंधळ उडू शकतो आणि जेव्हा पालक त्यांच्या नातेसंबंधाच्या स्वरूपाबद्दल प्रामाणिक नसतात तेव्हा असे होऊ शकते.

"प्रेम अनेक मार्गांनी व्यक्त केलं जाऊ शकतं ही वस्तुस्थिती मुलांना नीट समजून सांगितली नाही तर ते गोंधळात पडू शकतात."

लुनिया, लिथाबो आणि फ्लेचर चौथ्या व्यक्तीला त्यांच्या नात्यात आमंत्रित करण्याची शक्यता आहे.

लिथाबो सांगते, "आम्ही अजून एक महिला नात्यात घेण्यास तयार आहोत. पण अर्थात ती तयार असेल तरच.

सध्या फ्लेचर हा या नात्यातील एकमेव पुरुष आहे आणि आपण दोन्ही गर्लफ्रेंडचा सन्मान करतो, असं तो सांगतो.

"जेव्हा दोन स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा ते खरोखरच खूप मौल्यवान असतं. त्यामुळे मी भाग्यवान आहे. मी खरोखरच त्यांचे कौतुक करतो आणि मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे.

पण जर त्याच्या मुलाची आई लिथाबोनं दुसऱ्या पुरुषाला या नात्यात आणलं तर?

या प्रश्नावर फ्लेचर म्हणतो, "तर मी त्या नात्याचा भाग होणार नाही कारण मी हेटरोसेक्शुयल आहे. पण जर लिथाबोला एखाद्या पुरुषासोबत दुसरं नातं जोडायचं असेल तर त्याला माझी हरकत नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)