'मला तिच्यापासून दूर करण्यासाठी जबरदस्तीचे उपचार सुरू केले, अॅनेस्थेशियाचा जादा डोस दिला'

    • Author, एस महेश
    • Role, बीबीसी तामिळ

"आम्ही दोघी एकमेकींना खूप चांगलं ओळखतो. आम्हाला दोघींच्या मनातील भावना समजतात. आणि लिंगाच्या आधारावर आम्ही दोघींनी एकमेकींची निवड केलेली नाही."

केरळमधील अफिफा आणि सुमैय्या या समलैंगिक जोडप्याची ही कहाणी आहे.

सुमैय्या शेरीन आणि अफिफा, या दोघीही तरुणी 21 वर्षांच्या असून केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोंडोटी भागातील रहिवासी आहेत. या दोघींच्या नात्याला त्यांच्या पालकांचा तीव्र विरोध होता, पण न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता या दोघी एकत्र राहत आहेत.

त्यांनी बीबीसी तमिळशी बोलताना आपली व्यथा मांडली.

त्या बारावीच्या वर्गात एकत्र शिकत होत्या. तिथेच त्या एकमेकींच्या प्रेमात पडल्या. कोरोना लॉकडाऊन दरम्यान त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

अफिफा सांगते, "मी काही बोलण्याआधीच तिला एखादी गोष्ट समजते, माझंही अगदी तसंच आहे. आमच्यात असलेल्या समजूतदारपणाच्या भावनेमुळेच आम्ही प्रेमात पडलो. एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही लिंग पाहिलं नाही."

सुरुवातीला अफिफाच्या कुटुंबियांना आमच्याबद्दल शंका आली. त्यानंतर 27 जानेवारी 2023 रोजी ती घरातून निघून गेल्यावर तिच्या पालकांनी मलप्पुरम कोंडोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पुढे 29 जानेवारी 2023 रोजी या दोघींनाही मलप्पुरम दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांनी एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने ती मान्य करून त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली.

दोघीही पुन्हा वेगळ्या झाल्या

या दोघीही एर्नाकुलम येथील एका कंपनीत काम करतात. 30 मे रोजी आफिफाचे आई वडील तिच्या कामाच्या ठिकाणी आले. तिला सुमैय्यापासून वेगळं करायचं म्हणून ते तिला जबरदस्तीने घेऊन गेले.

यावर सुमैय्याने एर्नाकुलम बुधनकुरुसू आणि कोंडोटी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार नोंदवली. पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सुमैय्याने 5 जून रोजी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयाने 9 जूनला अफिफाला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. मात्र तिच्या पालकांनी न्यायालयाकडून वेळ मागून घेतली आणि 19 जून रोजी तिला न्यायालयात हजर केले.

आफिफाने न्यायालयात सांगितलं की, तिला सुमैय्यासोबत राहायचं नाहीये आणि ती तिच्या पालकांसोबत निघून गेली.

जबरदस्तीचे उपचार

काही दिवसांनंतर अफिफाने सुमैय्याला फोन केला. तिने सुमैय्याला सांगितलं की, तिला न्यायालयात स्वतःच्या मर्जीने बोलता आलं नाही.

समलैंगिक आकर्षण संपविण्यासाठी तिच्यावर कन्व्हर्जन थेरपी नावाचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

यानंतर उपेक्षित लोकांसाठी लढणाऱ्या वनजा कलेक्टिव्ह या संस्थेच्या माध्यमातून पोलिसांच्या मदतीने अफिफाच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले.

मात्र अफिफाचे आई-वडील आणि तिच्या गावातील लोकांनी याला विरोध केला. शेवटी खूप प्रयत्नानंतर पोलिसांच्या मदतीने अफिफाची सुटका करण्यात आली.

मला सुमैय्यासोबत जायचं नाहीये असं अफिफाने न्यायालयात का सांगितलं त्याचं तिने स्पष्टीकरण दिलं.

सुमैय्यापासून वेगळं करण्यासाठी अफिफाच्या पालकांनी तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले होते.

न्यायालयाने 9 जून रोजी तिला हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र उपचार सुरू असल्यामुळे तिला 19 रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं.

अफिफा सांगते, "त्यांनी मला जबरदस्तीने कोझिकोड भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांनी मला रक्त तपासणीच्या बहाण्याने भूल दिली."

"मी दोन दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर मी डॉक्टरांना आमच्या नात्याबद्दल सांगितलं. तसेच मला सुमैय्याकडे जायचं आहे असंही सांगितलं.

पण तिथल्या डॉक्टर आणि समुपदेशकाने मला सांगितलं की, समलैंगिकता विकार आहे. दोन महिलांमधील हे नातं अनैसर्गिक आहे. पण उपचाराने तुम्ही सहज बरे होता."

अफिफा सांगते की, न्यायालयात हजर होण्यापूर्वी तिने डॉक्टरला पुन्हा सांगितलं की तिला सुमैय्याकडे जायचं आहे. यावर संतापलेल्या डॉक्टरांनी तिला अॅनेस्थेसियाचा जादाचा डोस दिला.

त्यामुळे तिला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा ती शुद्धीत नव्हती. तिचे पाय लुळे पडले होते. चालताना तोल जाईल की काय असं तिला वाटत होतं. तिला नीट विचार करता येत नव्हता, ना बोलता येत होतं.

तिच्या आईवडिलांनी तिला धमकावलं होतं की, तू मेलीस तरी चालेल पण आम्ही तुला सुमैय्यासोबत जाऊ देणार नाही.

अफिफाने सांगितलं की, तिने न्यायालयासमोर असं सांगितलं कारण तिला सुमैय्याच्या जीवाची भीती होती.

समाज आपलं प्रेम स्वीकारत नाही, असं सांगणाऱ्या सुमैय्या आणि अफिफावर शारीरिक संबंधांसाठी एकत्र आल्याची टीका होते.

"दोन स्त्रिया केवळ त्यांच्या लैंगिक इच्छांसाठीच एकत्र आल्याचं समाजाला वाटतं. अशा लोकांशी बोलणं व्यर्थ आहे. तुम्ही त्यांना समजावू शकत नाही."

सुमैय्या सांगते, "डॉक्टरांनाच आमचं नातं समजू शकलं नाही. मग आई-वडील आणि सोबतच्या माणसांना तरी कसं समजेल. त्यांच्याकडून अशी अपेक्षा तरी कशी ठेवता येईल,"

अनेकजण सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून त्यांना त्रास देतात.

त्या सांगतात की, "आमच्यात असलेली वासना आमच्या नात्याचं मूळ कारण असल्याची टीका आमच्यावर होते. पण बनावट अकाऊंट वरून टीका करणारे समोर येऊन टीका करण्याचं धाडस दाखवत नाहीत."

समलिंगी जोडप्यांना भारतात कायदेशीररित्या विवाह करता येत नाही, यावर दोघांनीही चिंता व्यक्त केली.

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अद्याप खटला सुरू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)