You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशियाला अणुबॉम्बची माहिती पुरवणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाचं पुढे काय झालं?
पूर्वी रशियासह आज स्वतंत्र असलेले शेजारचे अनेक देश मिळून सोव्हिएत संघ तयार झाला होता.
या सोव्हिएत संघाला 1953 पूर्वी अण्वस्त्रांचा शोध लावता येणार नाही असा अंदाज अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने व्यक्त केला होता.
सीआयएचा हा अंदाज खोटा ठरवत 29 ऑगस्ट 1949 रोजी सोव्हिएत युनियनने प्लुटोनियम अणुबॉम्बची यशस्वी चाचणी करून पाश्चिमात्य देशांना कोड्यात टाकलं.
सोव्हिएत युनियन हा अशा प्रकारचा अणुबॉम्ब असलेला दुसरा देश बनला.
सोव्हिएत युनियनची पहिली अणुचाचणी
पण सोव्हिएत संघाला अणुबॉम्बची माहिती पुरविणारे दुसरे तिसाे कोणी नव्हते तर अमेरिकन शास्त्रज्ञ थिओडोर हॉल होते. त्यांनी अणुबॉम्ब निर्मितीचे तंत्रज्ञान गुप्तपणे सोव्हिएत संघाला पुरविले होते.
शिवाय थिओडोर हॉल व्यतिरिक्त इतरही शास्त्रज्ञांनी सोव्हिएत संघाला आण्विक तंत्रज्ञानाची माहिती दिल्याचं तितकंच खरं आहे.
पण न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले आणि हार्वर्डमध्ये शिकलेले अणुशास्त्रज्ञ सोव्हिएत संघासाठी गुप्तहेर कसे बनले?
तर सोव्हिएत संघाने पहिली अणुचाचणी घेतली होती कझाकस्तानमध्ये. 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानी शहर नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बसारखाच हा अणुबॉम्ब होता आणि यात काही योगायोग नव्हता.
मॅनहॅटन प्रकल्पांतर्गत अमेरिकेने तयार केलेल्या अणुबॉम्बचं तंत्रज्ञान सोव्हिएत संघाला देण्यात आलं होतं.
'मॅनहॅटन' हा अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिकेने ब्रिटन आणि कॅनडाच्या सहकार्याने विकसित केलेला होता.
थिओडोर हॉल कोण होते?
अमेरिकेच्या मॅनहॅटनमध्ये हा अण्वस्त्र कार्यक्रम गुप्तपणे सुरू होता. थिओडोर हॉल हे त्या मोजक्या लोकांपैकी एक होते ज्यांना हे रहस्य माहीत होतं.
हॉल यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1925 रोजी न्यूयॉर्क मध्ये एका व्यावसायिकाच्या पोटी झाला होता. त्या काळात आलेल्या जागतिक महामंदीमुळे सामान्य अमेरिकन नागरिकांचं जीवन अडचणींनी भरलं होतं.
पण गरीब परिस्थितीने थिओडोर हॉल खचले नाहीत. त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्राचं उच्च शिक्षण घेतलं.
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. 1944 मध्ये त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.
विद्यापीठातील उत्कृष्ट कामगिरीमुळे अमेरिकन अधिकाऱ्यांचं लक्ष थिओडोर हॉलकडे गेलं.
तो काळ असा होता की अमेरिकन सरकार त्यांच्या आण्विक कार्यक्रमासाठी प्रतिभावान लोकांच्या शोधात होते. साहजिकच प्रतिभावान असलेल्या थिओडोर हॉलकडे त्यांचं लक्ष गेलं. लॉस अलामोस प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी त्यांची मुलाखत घेतली.
कम्युनिस्ट मित्र
अमेरिकेच्या अणू कार्यक्रमासाठी थिओडोर हॉल यांची निवड करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांना थिओडोर बद्दल काही गोष्टी माहीत नव्हत्या. जसं की, थिओडोरची एका रशियन व्यक्तीशी घट्ट मैत्री होती.
कॉलेजमध्ये असताना थिओडोर हॉल मार्क्सवादी स्टुडंट युनियनचे सदस्य होते. तसेच कॉलेजच्या वसतिगृहाच्या खोलीत (रूममेट) त्यांचा सॅव्हिल सॅक्स नामक एक मित्र होता.
सॅव्हिल सॅक्सचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला असला तरी तो डाव्या विचारसरणीचा कम्युनिस्ट होता. त्याचे वडील सोव्हिएत युनियनमधून स्थलांतरित झाले होते.
त्यामुळे सॅव्हिल सॅक्सने थिओडोर हॉल यांना आण्विक कार्यक्रमाची माहिती रशियाला देण्यासाठी राजी केलं.
आपल्या मित्राच्या इच्छेनुसार तरुण अणुशास्त्रज्ञ थिओडोर हॉल यांनी लॉस अलामोस प्रयोगशाळेतून सोव्हिएत युनियनला प्लूटोनियम बॉम्बची गुप्त माहिती पाठवली. ही महत्त्वाची माहिती सॅव्हिल सॅक्सच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती.
थिओडोर हॉल यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी न्यूयॉर्क टाईम्सला एक लेखी निवेदन दिलं होतं. 1997 मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखात असं म्हटलं होतं की, त्यांना अण्वस्त्रांवर अमेरिकेच्या मक्तेदारीची भीती वाटत होती.
त्यामुळे अणुऊर्जेचा समतोल राखण्यासाठी सोव्हिएत संघाकडेही अण्वस्त्रं हवीत असं हॉल यांचं म्हणणं होतं.
एक तरुण अणुशास्त्रज्ञ
दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघ हा अमेरिकेचा मित्र होता.
थिओडोर हॉल यांचं म्हणणं होतं की, "सोव्हिएत संघाने हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध लढा दिला. या युद्धात जर्मनीचं मोठं नुकसान झालं. आणि सोव्हिएत संघाने पाश्चात्य मित्र राष्ट्रांना पराभवापासून वाचवलं."
रशियाच्या ज्या लोकांना माहिती होतं की, थिओडोर हॉल यांनी सोव्हिएत रशियाला प्लुटोनियम अणुबॉम्बची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ते लोक त्यांना प्रेमाने 'द यंगस्टर' म्हणायचे.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या नागासाकीवर प्लुटोनियम अणुबॉम्ब आणि हिरोशिमावर युरेनियम अणुबॉम्ब टाकला होता.
अमेरिकेने सोव्हिएत संघाची हेरगिरी केली
दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि सोव्हिएत संघाचा एक समान शत्रू होता तो म्हणजे जर्मनी. म्हणून ते एकमेकांची खबरबात ठेवायचे नाहीत असं नव्हतं.
खरं तर अमेरिकेने सोव्हिएत संघाची हेरगिरी रोखण्यासाठी 'वेनोना' नावाचा कार्यक्रम सुरू केला होता.
आणि डिसेंबर 1946 मध्ये अमेरिकन हेरांना कळलं की सोव्हिएत संघाचे अंतर्गत व्यवहार मंत्रालय काही अमेरिकन लोकांशी गुप्तपणे संपर्कात आहे.
हे सोव्हिएत हेर अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रकल्पात सामील असल्याचंही त्यांना समजलं.
ठोस माहिती मिळाली नाही
दरम्यान थिओडोर हॉल यांनी 1950 मध्ये शिकागो विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला होता. त्यावेळी ते सोव्हिएत संघाच्या संपर्कात असल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर एफबीआयने थिओडोर हॉलची यांची भेट घेतली.
मात्र थिओडोर हॉल आणि त्यांचा मित्र सॅव्हिल सॅक्स यांनी मॅनहॅटन प्रकल्पाची माहिती सोव्हिएत संघाला पुरवली आहे याची कोणतीही ठोस माहिती एफबीआयला मिळाली नाही.
यापूर्वी मॅनहॅटन प्रकल्पावर काम करणाऱ्या क्लॉस फुच या जर्मन शास्त्रज्ञाला 1949 मध्ये अटक करण्यात आली होती.
त्यानंतर त्याने आपल्या कबुली जबाबात म्हटलं होतं की त्याने अमेरिकेचं आण्विक तंत्रज्ञान शत्रू राष्ट्राला दिलं होतं.
ब्रिटनचा प्रवास
थिओडोर हॉल हे हेर नव्हते. तसेच त्यांनी सोव्हिएत संघाला अशी कोणतीही माहिती पुरवल्याची अधिकृत नोंद अमेरिकन गुप्तहेर संघटनेकडे नव्हती.
मॅनहॅटन प्रकल्पानंतर थिओडोर हॉल कुठेच प्रकाश झोतात आले नाहीत.
पण त्याचवेळी, अमेरिकन अधिकारी मॉस्कोच्या संपर्कात होते. या प्रकरणात पुरावा म्हणून या गोष्टी सादर करण्यात आल्या असाव्यात.
परंतु अमेरिकन अधिकारी न्यायालयात याविषयी सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत.
यामुळे थिओडोर हॉल या अण्वस्त्र घोटाळ्यातून सुखरूप बाहेर पडले.
पण तरीही थिओडोर हॉल आणि त्यांची पत्नी त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी चिंतित होते. त्यामुळे हॉल यांनी न्यूयॉर्कच्या हॉस्पिटल मधील संशोधनाची नोकरी सोडली.
ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात नोकरी मिळाल्यानंतर थिओडोर हॉल आपल्या पत्नीसह ब्रिटनला गेले.
त्यानंतर 1984 मध्ये त्यांच्या भूतकाळातील घटना समोर येऊ लागताच थिओडोर हॉल यांनी निवृत्ती स्वीकारली.
1996 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांवरून त्यांचे सोव्हिएत संघाशी असलेले संबंध उघड झाले. मात्र, तोपर्यंत सॅव्हिल सॅक्ससह सर्व साक्षीदारांचा मृत्यू झाला होता.
सत्य पुढे आलं
थिओडोर हॉल यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "माझ्यावर इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप आहे. मी माझा मार्ग बदलला नसता तर गेल्या पन्नास वर्षांत पुन्हा एक अणुयुद्ध झाले असते."
म्हणजे 1949 मध्ये किंवा 1950 च्या सुरुवातीला चीनवर अणुबॉम्ब टाकण्याची योजना होती.
हॉल यांनी त्या मुलाखतीत पुढे म्हटलं होतं की, "आणि हे सर्व रोखण्यासाठी मी मदत केली. त्यामुळे माझ्यावर लावलेले सर्व आरोप मी स्विकारतो."
74 वर्षांपूर्वी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आला होता.
त्यानंतर आजतागायत कोणत्याही देशाने युद्धात अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही. यात त्यांचाही महत्त्वाचा वाटा होता या विश्वासाने थिओडोर हॉल यांनी हे जग सोडलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)