युरोपातील अण्वस्त्र संशोधन केंद्रात नटराजाची मूर्ती का ठेवलीय? - फॅक्ट चेक

    • Author, विग्नेश ए.
    • Role, बीबीसी तमिळ प्रतिनिधी

स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर जगातील सर्वोत्तम विज्ञान संशोधन संस्थांपैकी एक असलेली युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर रिसर्च (CERN) ही संस्था आहे. इथं संशोधन करण्यासाठी अत्यंत जटिल उपकरणांचा वापर केला जातो.

CERN च्या अधिकृत वेबसाईटनुसार, "आपल्या आजूबाजूला असलेलया बहुतांश गोष्टी बनवण्यासाठी लागणाऱ्या कणांच्या मुलभूत संरचनेचा आम्ही अभ्यास करतो. त्यासाठी सर्वांत मोठ्या आणि किचकट वाटणाऱ्या उपकरणांचा आम्ही वापर करतो."

2012 साली लार्ज हॅड्रॉनकोलायडर नावाच्या एका पार्टिकल एस्केलेटरचा वापर करून दुजोरा दिला गेला नव्हता, तोपर्यंत 'गॉड पार्टिकल'ला सुद्धा कल्पनावत मानलं जात असे.

संशोधन क्षेत्रात इतकं महत्त्व राखून असलेल्या संस्थेत हिंदू देवता शंकराच्या 'नटराज'ची मूर्ती ठेवण्यात आली आहे.

18 जून 2004 साली CERN च्या परिसरात या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील दिग्गज कंपनी फेसबुक आणि ऑर्कुटची स्थापनही त्याचवेळी झाली होती. अर्थात, हा केवळ योगायोग.

इंटरनेटच्या शोधानंतर ते जितक्या वेगानं जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलं, तितक्याच वेगानं फेक न्यूज म्हणजे अफवा किंवा खोटी माहितीही पसरू लागली. नटराजाच्या मूर्तीबाबतही अशा अनेक फेक न्यूज पसरल्या आहेत.

नटराजाच्या मूर्तीबाबत नेमक्या काय फेक न्यूज पसरल्या आहेत आणि त्यामागचं नेमकं सत्य काय आहे, हे आपण या बातमीतून पडताळून पाहू.

काही सोशल मीडिया युजर्सचा दावा आहे की, "नटराजाच्या मूर्तीमध्ये अण्वस्त्राची संरचना आहे. त्यामुळेच CERN ने आपल्या परिसरात ठेवण्याचा निर्णय घेतला."

आणखी एका असा दावा करण्यात येतोय की, "या मूर्तीत नटराज 'आनंद तांडवम' मुद्रेत नृत्य करत आहेत. याला परदेशी शास्त्रज्ञ 'कॉस्मिक डान्स' म्हणतात. ही मुद्रा अण्वस्त्राच्या आतील उप-अण्वस्त्रांच्या गतीएवढी आहे."

"नटराज पूर्ण ब्रह्मांडाचं प्रतीक आहेत. हेच सांगण्यासाठी CERN च्या शास्त्रज्ञांनी या मूर्तीची स्थापना केलीय," असाही दावा काहीजण करत आहेत.

हिंदू देवदेवतांच्या मूर्तींबाबत तथ्यहीन आणि शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टी सोशल मीडियावर पसरत असतात. मात्र, नटराजाच्या मूर्तीबाबत आम्ही पडताळणी केली. सत्य काय आहे, हे पाहण्याआधी आपण यासंबंधी काही रंजक गोष्टी पाहू.

नास्तिक मूर्तीकारानं बनवली मूर्ती

नटराजाची ही मूर्ती बनवणारे मूर्तीकार नास्तिक आहेत आणि ते तामिळनाडूतील आहेत. 'सिर्पी' (शिल्पकार) म्हणून ओळखले जाणारे राजन हे तामिळनाडूतील पेरियार यांच्या विचारांचे पुरस्कर्ते मानले जातात.

तामिळनाडूतील अंधश्रद्धा, जाती व्यवस्था, धार्मिक विश्वास आणि ज्योतिष्य इत्यादी गोष्टींवर टीका करणारे त्यांचे व्हीडिओ नेहमीच उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या निशाण्यावर असतात.

बीबीसी तामिळशी बोलताना राजन यांनी सांगितलं, 1998 साली भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज इंपोरियमने या मूर्तीची ऑर्डर दिली.

कधीकाळी तामिळनाडूतील कुंभकोणमध्ये राहणारे राजन आता या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात नाहीत.

"1980 च्या दशकात सातत्यानं दिल्ली आणि उत्तरेकडील भागात जात असे आणि सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज इंपोरियमसोबत व्यावसायिक कारणांमुळे संपर्कातही होतो. त्यांनीच मला ही मूर्ती बनवण्याची ऑर्डर दिली होती," असं राजन सांगतात.

मूर्तीकलेच्या क्षेत्रात दलित कामगारांना आणण्यासाठी प्रयत्न करणारे राजन सांगतात, माझे विचार आणि माझा व्यवसाय यांच्यात कधीच संघर्ष होत नाही.

CERN मध्ये मूर्ती ठेवण्यामागे कारण काय?

CERN च्या इमारत क्र. 39 आणि 40 च्या मधोमध नटाराजाची मूर्ती बसवण्यात आली आहे. भारत सरकारनेच CERN ला ही मूर्ती भेट दिली होती.

CERN च्या वेबसाईटवर काही प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत, त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

"शिवाची ही मूर्ती CERN सोबत आपण जोडल्याचं प्रतीक म्हणून भारतानं भेट स्वरूपात दिलीय. भारत आणि CERN चं नात दृढ राहावं हा उद्देश होता. अर्थात सहा दशकांनंतरही ते नातं कायम आहे," असं CERN च्या वेबसाईटवरच म्हटलंय.

भारत युरोपियन देश नसला, तरीही गेल्या सहा दशकांपासून भारत CERN चा सदस्य आहे. त्यामुळे ही मूर्ती भेट म्हणून दिली गेली होती, कुठल्याही शास्त्रीय कारणामुळे नव्हे.

CERN नुसार, "हिंदू धर्मात भगवान शंकर नटराजाच्या रुपात नृत्य करतात याला जीवन आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. नटराजाचं पारलौकिक नृत्य आणि आण्विकशास्त्राचा असलेला वैश्विक उत्पत्तीशी संबंध यातील प्रतिकात्मक साधर्म्याला अनुसरून भारत सरकारने ही मूर्ती प्रतीक म्हणून निवडली."

पौराणिक कथा आणि विज्ञानामध्ये भारत सरकारने तयार केलेलं हे केवळ रूपक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भेटवस्तू म्हणून सरकारतर्फे दिली जाते. त्यामागे काही खास तार्किक कारण आहे असं नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)