गायीच्या शेणापासून बनवलेल्या चिपमुळे रेडिएशनपासून संरक्षण मिळतं?- रिअॅलिटी चेक

गायीच्या शेणापासून बनवलेली चिप मोबाईमधून होणाऱ्या रेडिएशनपासून संरक्षण देते, असा दावा करण्यात येत आहे.

राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी या चिपसंबंधीची घोषणा केली आणि म्हटलं, "ही एक रेडिएशन चिप आहे, जी मोबाईलमधून रेडिएशन कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते."

सोशल मीडियावर या वक्तव्याची खूप खिल्ली उडविण्यात येत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या या दाव्यात किती तथ्य आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

गायीच्या शेणापासून बनवलेली ही 'चिप' काय आहे?

ही चिप गुजरात राज्यातील एका समूहाकडून तयार करण्यात आली आहे. हा समूह गौशाला चालवतो. मोबाईलच्या बाहेरच्या बाजूला बसविण्याच्या दृष्टिनं ही चिप विकसित करण्यात आली आहे.

ही चिप सार्वजनिक करतानाच दावा करण्यात आला की, मोबाईलधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनवर सुरक्षाकवच म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. पन्नास ते शंभर रुपयांच्या दरम्यान या चिपची किंमत ठेवण्यात आली आहे.

डॉ. कथीरिया यांनी सांगितलं की, देशभरातील जवळपास 500 हून अधिक गौशाळांमध्ये ही चिप बनवली जात आहे.

गुजरातमधील गौशाला समूहानं बीबीसीला सांगितलं, की ते गेल्या वर्षभरापासून ही चिप बनवत आहेत. मात्र अजूनही या चिपची कोणतीही शास्त्रीय चाचणी किंवा परीक्षण झालेलं नाहीये.

गौशाळा चालविणारे दास पई यांनी म्हटलं, "गायीचं शेण आणि चिप बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या अन्य घटकांमध्ये असे गुण आहेत, ज्यामुळे रेडिएशनपासून सुरक्षा मिळू शकते."

मात्र वैज्ञानिक निकषांवर याची कोणतीही पडताळणी झाली नसल्याचंही ते सांगतात.

गायीच्या शेणामध्ये अशाप्रकारचे गुणधर्म असतात?

नाही...पण अशाप्रकारचा दावा करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 2016 मध्ये आरएसएसचे अध्यक्ष शंकर लाल यांनी गायीच्या शेणाबद्दल असाच दावा केला होता.

गायीचं शेण अल्फा, बीटा आणि गॅमा अशा तीनही प्रकारचं रेडिएशन शोषून घेऊ शकतो, हा दावा अनेकदा करण्यात आला होता.

शास्त्रज्ञांनी मात्र हे दावे खोडून काढले होते. गायीचं शेण रेडिएशन कमी करतं, हे सिद्ध करणारं कोणतं संशोधनही झालेलं नाहीये.

अशोका युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्रोफेसर असलेले गौतम मेनन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "गायीच्या शेणात जे घटक असतात, ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे; त्याच्या आधारे हे स्पष्टपणे म्हणता येईल की, शेणात असा कोणताही गुण नाहीये."

रेडिएशनपासून संरक्षण मिळविण्यासाठी ज्या घटकाचा सर्वाधिक वापर होतो, तो घटक म्हणजे शिसं. शिशाचा वापर रेडिएशन थेरपीमध्येही केला जातो. मात्र शेण आणि त्याच्या कथित गुणधर्मांचा दावा करणाऱ्यांचा दावा आहे की, रेडिएशनपासून शेणामुळं संरक्षण होतं या दाव्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे ग्रामीण भागातील लाखो लोक आहेत, जे आपली घरं शेणानं सारवतात.

प्रोफेसर मेनन यांचं म्हणणं आहे की, ग्रामीण भागात लोक घरं शेणानं सारवतात कारण त्यांना शेण सहजपणे उपलब्ध होतं. शेणामुळे थंडावा मिळतो. त्याचा रेडिएशनपासून संरक्षण मिळण्याशी काहीही संबंध नाहीये.

मोबाईलमधून हानिकारक रेडिएशन होतं?

मोबाईलचे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्याबद्दल गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. सतत मोबाईलचा वापर केल्यास कॅन्सर किंवा अन्य गंभीर आजार होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात येते.

मात्र यूएस फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनच्या सल्ल्यानुसार मोबाईल फोनमधून होणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सरसारखे आजार होतात की नाही, हे काही दशकात झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालेलं नाहीये.

ब्रिटनमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक माल्कम स्प्रीरिन यांनी म्हटलं आहे, "मोबाईलमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतकी कमी असते की त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्याला पुरावा नाहीये."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)