You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसः कोव्हिडमधून बरं झाल्यावर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
कोरोनामुक्त झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोव्हिड-19 चा संसर्ग होण्याची शक्यता असते? हा प्रश्न उपस्थित झालाय कारण, मुंबई महापालिका रुग्णालयातील चार निवासी डॉक्टरांना कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा संसर्गाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे कोव्हिड-19 चा संसर्ग पुन्हा होऊ शकतो का? याबाबत संशोधकांनी अभ्यास सुरू केला आहे.
मुंबईत कोव्हिड-19 च्या दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गाचं हे बहुदा पहिलं प्रकरणं आहे. याआधी, हॉंगकॉंगमध्ये कोरोना व्हायरसचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याची घटना समोर आली होती. संशोधकांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णावर सखोल अभ्यास केल्यानंतर, कोव्हिड-19 चा संसर्ग दुसऱ्यांदा होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब केलं होतं.
मुंबईतील डॉक्टरांबाबत माहिती
निवासी डॉक्टरांची संघटना, मार्डच्या माहितीनुसार सायन रुग्णालयातील अॅनेस्थेशिया विभागातील एका डॉक्टरांना, आणि नायर रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांना कोरोना व्हायरसचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
कोव्हिड-19 च्या दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गाबाबत बीबीसीशी बोलताना नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डचे सदस्य म्हणाले, "पुन्हा कोरोनाचा संसर्ग झालेल्या निवासी डॉक्टरांना एक ते दिड महिन्यांपूर्वी कोव्हिड-19 ची लागण झाली होती.
बरं झाल्यानंतर त्यांनी ड्यूटी सुरू केली. मात्र, पुन्हा त्यांची कोव्हिड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. उपचारांनंतर आता हे सर्व निवासी डॉक्टर बरे झाले आहेत."
"दुसऱ्यांदा कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरची पहिल्या संसर्गानंतर पूर्ण ट्रिटमेंट झाली होती. दुसऱ्यांदाही तीव्र लक्षणं दिसून येत नव्हती."
मुंबईत कोरोनाची साथ झपाट्याने पसरू लागल्यानंतर मुंबई महापालिकेने नायर रुग्णालयाला संपूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केलं होतं. तर, सायन रुग्णालयातही मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांवर उपचार अजूनही सुरू आहेत.
कोव्हिड-19 च्या रि-इन्फेक्शनबाबत चौकशी सुरू
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गाचं हे प्रकरणं फार गंभीर आहे. या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग दुसऱ्यांदा झाला? का पहिल्यांदा झालेला संसर्ग पूर्णत: बरा झाला नाही. त्यामुळे त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. याची कारणं शोधून काढण्यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम स्टडी सुरू केली आहे.
याबाबत बीबीसीशी बोलताना नायर रुग्णालयाचे अधीष्ठाता आणि मुंबईतील मोठ्या पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल म्हणाले, "निवासी डॉक्टरांना दुसऱ्यांना (Re-infection) कोव्हिड-19 चा संसर्ग झाला आहे का यावर संशोधन सुरू करण्यात आलं आहे. यासाठी जिनोम स्टडी सुरू करण्यात आली आहे. या डॉक्टरांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टचे नमुने अभ्यासासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत."
"दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या डॉक्टरांच्या शरीरातील कोव्हिड-19 व्हायरसच्या मूळरचनेत बदल झाला आहे का. व्हायरस 'म्युटेट' झाला का यावर संशोधन करण्यात येणार आहे. व्हायरसच्या रचनेत बदल झाला का नाही, यावरून दुसऱ्यांदा संसर्ग झाला का नाही याची ठोस माहिती मिळेल. तोपर्यंत नव्याने इन्फेक्शन झालं असं हे ठामपणे सांगता येणार नाही," असं डॉ. भारमल पुढे म्हणाले.
जिनोम टेस्टिंग म्हणजे काय?
नवी मुंबईतील मायक्रो-बायोलॉजिस्ट डॉ. लीना गजभर यांच्या माहितीनुसार, प्रत्येक व्हायरसची DNA किंवा RNA अशी विशिष्ट रचना असते. काहीवेळा व्हायरस मूळ रचना किंवा गुणधर्मात थोड्याफार प्रमाणात बदल करतो, याला व्हायरसचं म्युटेशन होणं असं म्हणतात. व्हायरसने मूळ रचनेत बदल केला का नाही, हे जाणून घेण्यासाठी जिनोम टेस्टिंग केलं जातं.
"व्हायरसच्या मूळ गुणधर्मात झालेला बदल शोधण्यासाठी जिनोम टेस्टिंग केली जाते. यावरून रुग्णाच्या शरीरात असलेला व्हायरस नवीन आहे का जुना व्हायरस पुन्हा सक्रीय झाला याची माहिती मिळेत. व्हायरसच्या गुणधर्मात बदल झाला असेल तर व्हायरस नवीन बनतो. या नवीन व्हायरस विरोधात शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांदा संसर्ग होतो," असं डॉ. लीना पुढे म्हणाल्या.
जगभरात समोर आलेल्या घटना
24 ऑगस्टला हॉंगकॉंगमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली. ज्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या संसर्गावेळी व्हायरस पूर्णत: वेगळा असल्याचं समोर आलं होतं.
त्यानंतर बेल्जियन, नेदरलॅंड आणि अमेरिकेतूनही कोरोनाचा संसर्ग दुसऱ्यांदा झाल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली
काय म्हणते जागतिक आरोग्य संघटना?
24 ऑगस्टला हॉंगकॉंगमध्ये समोर आलेल्या कोव्हिड-19 च्या रि-इन्फेक्शनबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल हेड डॉ. मारिया वॅन कारकोव्ह म्हणाल्या, "अशा प्रकारचं संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. पण, यावरून आपण कोणत्याही निष्कर्षाला पोहोचू नये. यासाठी मोठ्या संख्येने रुग्णांचा अभ्यास गरजेचा आहे."
कोरोनामुक्त व्यक्तीच्या शरीरात किती दिवस टिकतात अॅंटीबॉडीज?
मुंबईतील आयबिटीस फाउंडेशनचे डॉ. निशांत कुमार यांनी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये कोव्हिड-19 चा किती प्रमाणात संसर्ग झाला आहे. यासाठी मुंबईच्या सर जे.जे हॉस्पिटल, जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात सिरो सर्व्हे केला.
आरोग्यसेवकांच्या शरीरात कोव्हिडविरोधी अॅंटीबॉडी तयार झाल्या आहेत का याचा शोध या माध्यमातून घेण्यात आला.
याबाबत बोलताना डॉ. निशांत कुमार म्हणतात, "कोव्हिड-19 चा संसर्ग झालेल्या एकाही व्यक्तीमध्ये 50 दिवस उलटून गेल्यानंतर अॅंटीबॉडीज आढळून आल्या नाहीत. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरच्या 2-3 आठवड्यानंतर 50 टक्के बाधित आरोग्यसेवकांच्या शरीरात अॅंटीबॉडीज आढळून आल्या.
3 ते 4 आठवड्यांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटीचा दर 90 टक्के. पण, 28 दिवस उलटून गेल्यांनंतर यात झपाट्याने घट झाली. 6 ते 7 आठवड्यांमध्ये याचं प्रमाण 11 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं निदर्शनास आलं."
"कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर 50 दिवसांनी शरीरात अॅंटीबॉडी आढळून आल्या नाहीत ही धोक्याची घंटा नाही. कारण, आपल्या शरीरातील प्रतिकार करण्याची यंत्रणा अत्यंत गुंतागुंतीची असते," असं डॉ. कुमार पुढे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)