You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून काय कराल?
- Author, फ्लोरा कारमायकल आणि मारिआना स्प्रिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा भारतात प्रवेश होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याबाबत असणारे गैरसमज आणि चुकीच्या माहितीचा फैलाव संपायचं नाव घेत नाहीये.
केवळ भारतातच नव्हे, कोरोना व्हायरससंबंधी चुकीची माहिती व्हायरल होणं ही अनेक देशांची समस्या बनली आहे.
युकेतही अशा माहितीवर नियंत्रण आणण्यासाठी संसदीय समितीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. या समितीने नागरिकांना चुकीची माहिती व्हायरल होत असेल तर त्याची उदाहरणं सादर करायची विनंती केली आहे.
सरकारी पातळीवर प्रयत्न होत असले तरी अशा प्रकारची माहिती आपल्याकडून पसरून कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून काय पावलं उचलावीत हे या लेखात सांगणार आहोत.
1. थांबा आणि विचार करा
अशा कठीण काळात आपल्या घरचे आणि मित्रमंडळी सुरक्षित राहावे, त्यांना आसपास काय घडतंय याची माहिती मिळत राहावी असं तुम्हाला वाटणं साहाजिक आहे. म्हणून तुम्हाला काहीही नवीन माहिती मिळाली, मग ते फेसबुक असो, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅप, तुम्ही तातडीने त्यांना फॉरवर्ड करता. पण असं करणं धोक्याचं ठरू शकतं.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर चुकीची माहिती व्हायरल होण्यापासून थांबवायची असेल तर तुम्ही 'आलं की केलं फॉरवर्ड' या सवयीला आळा घातला पाहिजे. समोर असलेल्या माहितीविषयी मनात काहीही संशय असला तर ती फॉरवर्ड करण्याआधी थांबा, क्षणभर विचार करा आणि जर मनात काहीही संशय असला तर त्या माहितीची पडताळणी करा.
2. माहितीचा स्रोत तपासा
कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी तिचा स्रोत तपासा. सगळ्यांत साधा सोपा प्रश्न स्वतःला विचारा, ही माहिती कुठूून आलीये. माझ्या 'मित्राच्या मित्राने' पाठवलीये, किंवा 'मावशीच्या मिस्टरांच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या ताईने' ही फॉरवर्ड केलीय असं काही असेल तर तिथेच तुमच्या डोक्यातली धोक्याची घंटा वाजली पाहिजे.
कधी कधी एखाद्या पोस्टमधली अर्धी माहिती खरी असते आणि अर्धी खोटी किंवा हानीकारक. उदाहरणार्थ, एखाद्या पोस्टमध्ये लिहिलेलं असतं की साबणाने वारंवार हात धुतले तर तुमचा व्हायरसपासून बचाव होऊ शकतो, पण पुढचं वाक्य मात्र खोटी माहिती असू शकते.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
तज्ज्ञांकडून आलेलया खऱ्या माहितीवर विश्वास ठेवा. तज्ज्ञांना सगळंच माहिती असेल असं नाही, पण निदान लांबच्या नातेवाईकांपेक्षा त्यांच्याकडे असणारी माहिती जास्त उपयुक्त आणि खरी असेल.
3. ही फेक न्यूज आहे का?
ज्या मिनिटाला तुमच्या मनात असा संशय येईल त्या मिनिटाला ती माहिती फॉरवर्ड न करण्याचा निर्णय घ्या. अनेकदा दिसतं तसं नसतं. अनेकदा अधिकृत अकाउंटसची कॉपी करून त्यावरून खोटी माहिती पसरवली जाते. माध्यमं, सरकार, प्रशासन यांच्या नावाने खोटी माहिती पसरवली जाते, स्क्रीनशॉटही खोटे असू शकतात किंवा त्यात बदल केला जाऊ शकतो.
कोणतीही माहिती मिळाली की त्या स्रोताचे व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंट आणि वेबसाईट्स तपासा. जर तुम्हाला सहजगत्या ती माहिती सापडत नसेल तरी माहिती खोटी असण्याची शक्यता नक्कीच जास्त असते. एखादी पोस्ट किंवा लिंक संशयास्पद आहे अशी शंका आली, तर याचा अर्थ ती लिंक खोटी किंवा फसवेगिरी करणारी असल्याची शक्यता नक्कीच जास्त आहे.
4. खरं की खोटं या बद्दल संभ्रम?
जेव्हा तुम्हाला एखादी माहिती खरी आहे की खोटी याबद्दल संभ्रम आहे, तेव्हा ती माहिती शेअर करू नका. 'असलीच खरी तर?' असा विचार करू शेअर करू नका. एखाद्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी तज्ज्ञांच्या ग्रुपमध्ये माहिती शेअर केली तर एकवेळ ठीक, पण अशा वेळेस तुमच्या मनात असणाऱ्या शंका स्पष्टपणे विचारा. लक्षात घ्या, तुमच्याकडे आलेली माहिती संदर्भासहित असेलच असं नाही. तो माहितीचा तुकडाही असू शकतो.
5. प्रत्येक मुद्द्याची सत्यता तपासा
अनेकदा तुमच्या फोनवर लांबलचक पोस्ट येऊन थडकतात. अशा वेळेस त्यातले काही मुद्दे बरोबर असतात तर काही चुकीचे. त्यामुळे अशा लांबलचक पोस्टमधल्या प्रत्येक मुद्द्याची सत्यता तपासा.
6. भावना भडकवणाऱ्या पोस्टपासून लांब राहा
ज्या पोस्टमुळे लोकांना भीती वाटते. राग येतो, अस्वस्थ वाटतं किंवा आनंद वाटतो अशा पोस्ट व्हायरल व्हायची शक्यता खूपच जास्त असते. "भीती ही भावना चुकीची माहिती पसरण्यासाठी अनेकदा कारणीभूत असते," फर्स्ट ड्राफ्ट संस्थेच्या क्लेअर वॉर्डल म्हणतात.
एखादी पोस्ट तुमच्या भावनांना हात घालत असेल तर त्यापासून लांब राहा. काही गोष्टी मुद्दाम अशा प्रकारे लिहिलेल्या असतात की ज्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि तातडीने काही अॅक्शन घ्याल. "लोकांना आपल्या घरच्यांना, मित्रांना सुरक्षित ठेवायचं असतं. त्यामुळे 'व्हायरस रोखण्याच्या टीप्स' किंवा 'या उपायांने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती' अशा पोस्ट पाहिल्या की ते लगेच फॉरवर्ड करतात," क्लेअर सांगतात.
7. आपण फक्त आपलं मत तर पुढे फॉरवर्ड करत नाहीत ना?
आपण एखादी गोष्ट का शेअर करतोय, ती खरी आहे म्हणून की त्यात लिहिलेल्या गोष्टी आपल्याला पटतात म्हणून याचा शांतपणे विचार करा. सोशल मीडिया अभ्यासक कार्ल मिलर म्हणतात, "आपण त्याच गोष्टी शेअर करतो ज्या आपल्या मतांशी जुळणाऱ्या असतात. एखादी गोष्ट पाहून जेव्हा आपण रागाने म्हणतो, हो..हो हेच खरंय, असंच झालंय, तेव्हा आपण चुकीच्या माहिती बळी पडलेलो असतो, आणि ती पसरवण्याला हातभारही लावत असतो. असं तुमच्या बाबतीत झालं तर शांत व्हा, आणि ऑनलाईन जी कृती कराल ती विचारपूर्वक करा."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)