You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे- 'जिम सुरू करायला दसऱ्यापासून परवानगी, पण...'
राज्यातील अनेक गोष्टी टप्प्याटप्यानं सुरू होत असताना जिम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर्स मात्र बंद आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्यापासून जिम सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा प्रतिनिधींशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "तुम्ही काळजी घेणार असाल, सर्व नियम काटेकोरपणे पाळणार असाल, तर तुमच्या विश्वासावर मी दसऱ्यापासून जिम सुरू करायला परवानगी देतो."
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, की जिम, व्यायामशाळा या आरोग्यासाठीच आहेत. पण त्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढू नयेत याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मोठया शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना तयार करण्यात आलेली 'एसओपी'चे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. हा व्यवसाय आहे, पण तसा तो जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
अनलॉकच्या पुढच्या टप्प्यातल्या गाईडलाईन्स राज्य सरकारने जाहीर केल्या होत्या. यात 15 ऑक्टोबरपासून राज्यात मेट्रो रेल्वे, आठवडी बाजार आणि लायब्ररींच्या कामकाजाला परवानगी देण्यात आली होती.
पण प्रार्थनास्थळं, शाळा - कॉलेजं, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, स्विमिंगपूल, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, जीम मात्र बंदच असणार होती.
अनलॉकसाठीच्या नवीन गाइडलाइन्स कोणत्या?
- 15 ऑक्टोबरपासून मेट्रो रेल्वे सेवा टप्याटप्याने सुरू होईल. नगरविकास खातं यासाठीची नियमावली तयार करेल.
- आठवडी बाजार भरवायला राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यभरात इतर ठिकाणी आठवडी बाजार - प्राण्यांचे आठवडी बाजार भरवता येतील. स्थानिक प्रशासन यासाठी नियम तयार करेल.
- दुकानं आता सकाळी 9 ते रात्री 9 या वेळात सुरू राहतील.
- शाळा - कॉलेजं - शिक्षण संस्था बंदच राहतील. शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर सुरू राहील. पण 15 ऑक्टोबरपासून ऑनलाईन वर्ग आणि इतर कामांसाठी 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बोलवता येतील. यासाठीची नियमावली शिक्षण खातं जाहीर करणार आहे.
- नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इंडिस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) आणि नोंदणीकृत कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील ट्रेनिंगना सुरुवात होईल.
- ज्या उच्च शिक्षणासाठी संशोधनाची, प्रयोगशाळेची गरज आहे, अशा पीएचडीच्या विद्यार्थ्यांना आणि विज्ञान-तंत्रज्ञान शाखेच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना काम सुरू करता येईल.
- राज्यातील खासगी आणि सरकारी वाचनालयं 15 ऑक्टोबरपासून खुली होतील. त्यासाठी त्यांना सोशल डिस्टंन्सिंग आणि सॅनियाटझेशनचे नियम पाळावे लागतील.
- उद्योगांतर्फे उद्योगांसाठी आयोजित केली जाणारी म्हणजेच B2B प्रदर्शनं भरवता येतील. यासाठी उद्योग खातं मार्गदर्शक सूचना जाहीर करेल.
- देशांतर्गत विमानप्रवास करून येणाऱ्यांची कोव्हिडच्या लक्षणांसाठी तपासणी होईल, पण यापुढे हातावर शिक्का मारला जाणार नाही.
- रेल्वेप्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि स्टँपिंग होणार नाही.
यापूर्वी कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जाहीर करण्यात आलेली आहे.. या नियमावलीचे पालन ग्राहकांना आणि हॉटेल मालकांना करावे लागणार आहे. ग्राहकांनी हे नियम पाळले जात आहेत याची खात्री करुन घेणं आवश्यक आहे.
हॉटेल्ससाठीचे नियम काय आहेत?
- कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.
- सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे.
- आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
- परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी.
- काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत.
- शक्य असल्यास दारे - खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा. टेबलांच्यामध्ये किमान 1 मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा. ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे.
- मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री - प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत.
- सेवा देण्याच्या वस्तु, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत. ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजुला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत.
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डस, डार्टस्, व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल.
- इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमला मनाई असेल. सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे.
- एन95 किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.
- ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे.
अनलॉक 5मध्ये काय-काय झालं?
- महाराष्ट्रातली हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार, फूडकोर्ट्स 5 ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी खुली होतील. पण त्यांना 50% क्षमतेने काम करावं लागेल. या सेवांसाठीची वेगळी नियमावली पर्यटन खातं ठरवून देईल.
- राज्यांर्तगत रेल्वेसेवा लगेच सुरू होईल. पहिलं आणि शेवटचं स्टेशन राज्यामध्येच असणाऱ्या ट्रेन्स पुन्हा धावू लागतील.
- लोकांची वाढलेली रहदारी लक्षात घेता मुंबई MMR भागातल्या लोकल ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येईल.
- मुंबईच्या डबेवाल्यांना MMR भागामध्ये लोकलमधून प्रवास करायला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाकडून QR कोड घ्यावा लागेल.
- पुण्यामधल्या लोकल ट्रेन्सही सुरू होतील. त्यांना मुंबई मेट्रोपोलिटन रिजन (MMR) सारखेच नियम पाळावे लागतील. पुणे पोलीस आयुक्त हे त्यासाठीचे नोडल ऑफिसर असतील.
- ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना राज्यांतर्गत आणि दोन राज्यांमधली वाहतूक विना-अडथळा कोणत्याही वेळी करता येईल. ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांवर यासाठीचे कोणतेही निर्बंध नसतील.
यापूर्वीच्या अनलॉकच्या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी यापुढेही कायम राहतील.
1) राज्यभरातली प्रार्थनास्थळं यापुढेही बंद राहतील.
2) कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी आहे. लग्नासाठीची आमंत्रितांची संख्या 50 पेक्षा कमी असावी लागेल. तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
3) राज्यामधल्या नवरात्रोत्सवासाठी सरकारने याआधीच नियमावली जाहीर केलेली आहे. यानुसार यावर्षी राज्यामध्ये गरबा - दांडियाचं आयोजन करता येणार नाही.
नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठीच्या राज्य सरकारच्या गाईडलाईन्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)