You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक क्रिप्टो 'माफिया' जिचे ड्रग माफियांसोबत होते कथितरित्या संबंध, अचानक गायब झाली अन् पुढे काय झालं?
- Author, बीबीसी आय इन्व्हेस्टीगेशन, पॅनोरमा टीम आणि द मिसिंग क्रिप्टोक्वीन पॉडकास्ट,
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस आणि बीबीसी न्यूज
सप्टेंबर 2019 मध्ये बीबीसी पॉडकास्टने रुजा इग्नातोवाची विलक्षण कथा सांगितली होती. क्रिप्टोकरन्सीतून मोठा गैरव्यवहार केल्यानंतर या बल्गेरियन महिलेच्या मागावर FBI होती. पण ती कुठे गायब झाली याचा कुणाला थांगपत्ताच लागला नाही.
बनावट क्रिप्टोकरन्सीद्वारे तिनं गुंतवणुकदारांची 4.5 अब्ज डॉलरची (3.54 अब्ज पौंड) फसवणूक केली होती आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली.
तिचं नेमकं काय झालं हे शोधण्याचा बीबीसीने प्रयत्न केला आहे. हा शोध कसा करण्यात आला आणि बीबीसीच्या हाती काय आलं याची ही रंजक कथा आहे.
बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन आणि पॅनोरामा यांनी संशयित बल्गेरियन संघटित गुन्हेगारी प्रमुखाशी तिचे जवळचे संबंध आणि तिचा खून झाल्याच्या कथित आरोपांची छाननी केली आहे.
इग्नातोवानं फसवणुकीतून गोळा केलेल्या अब्जावधी रुपये स्वतःसाठी खर्च केले की तिच्या संरक्षणासाठी ज्या लोकांना पैसे देण्यात आले होते त्यांनीच तिची हत्या केली होती ?
ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवीधर
ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवीधर असलेल्या रुजा इग्नातोवाचा जन्म बल्गेरियामध्ये झाला होता. पण ती जर्मनीत लहानाची मोठी झाली. 2014 मध्ये वन-कॉइन (OneCoin)ही क्रिप्टोकरन्सी लॉंच करण्यापूर्वी ( फायनान्स ) वित्त क्षेत्रात तिचं यशस्वी करियर सुरू होतं.
इग्नातोवानं जगभरातील लाखो लोकांना वनकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास पटवून दिलं होतं. बिटकॉइनच्या सुरूवातीच्या गुंतवणुकदारांनी मिळवलेल्या प्रचंड परताव्याप्रमाणेच यातून देखील दणदणीत परतावा मिळवून देण्याचं आश्वासन तिनं गुंतवणुकदारांना दिलं होतं.
मात्र प्रत्यक्षात इग्नातोवानं जिला अनेकजण डॉ. रुजा म्हणून ओळखतात, बिटकॉइनसारख्या अधिकृत मान्यता असलेल्या क्रिप्टोकरन्सीना अधोरेखित करणाऱ्या डिजिटल रेकॉर्डशिवाय चतुराईनं ही गुंतवणूक फसवणूक केली होती.
ऑक्टोबर 2017 मध्ये जर्मनी आणि अमेरिकेतील तपास अधिकारी जेव्हा इग्नातोवापर्यंत पोचले तेव्हा तिनं पहाटे रायनएअरचं सोफियाहून अथेन्सला जाणारं विमान पकडलं आणि त्यानंतर ती पुन्हा कधीही दिसली नाही.
मागील एक वर्षापासून बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या आय इन्व्हेस्टिगेशन्स आणि पॅनोरामाकडून तिचं नेमकं काय झालं आणि ती जिवंत तरी आहे की नाही, याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
यासंदर्भात तिच्या जवळच्या वर्तुळात कोण होतं हे स्थापित करणं महत्त्वाचं होतं.
रिचर्ड रेनहार्ट यांनी एफबीआयसोबत अमेरिकेच्या अंतर्गत महसूल सेवेसाठी वनकॉइनची चौकशी करण्यास सुरूवात केली.
रिचर्ड यांनी बीबीसीला सांगितलं की मुख्य तपास अधिकाऱ्यानं यापूर्वी कधीही लोकांसमोर आपलं नाव दिलं नव्हतं.
बेपत्ता क्रिप्टोक्वीन जिवंत आहे की मृत?
रुजा इग्नातोवाच्या शोधाच्या कहाणीला अनपेक्षित वळण तेव्हा मिळाली जेव्हा कथितरित्या तिच्या खूनाची कहाणी समोर आली. मात्र रुजाला पाहिल्याचं अनेकांनी म्हटल्यानंतर ही तिचं नेमकं काय झालंय याबाबत संभ्रम अजून कायम आहे.
बीबीसीला समजतं की सर्वसाधारणपणे टाकी म्हणून ओळखलं जाणाऱ्या रिस्टोफोरोस निकोस अमानाटिडिस या माणसाला इग्नातोवाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
"आम्हाला सांगण्यात आलं की अंमली पदार्थांशी संबंधित एक मोठा माणूस तिच्या सुरक्षेचा प्रमुख होता," असं रेनहार्ट यांनी 2023 मध्ये निवृत्त झाल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्या मुलाखतीत आम्हाला सांगितलं.
"टाकी एकापेक्षा जास्त वेळा समोर आला होता. तो एकटाच होता असं नव्हे तर ती पुन्हा वापरली जाणारी पद्धत होती."
आमच्याकडे आधीच असलेल्या माहितीची पुष्टी यामुळे झाली. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी 2019 मध्ये सांगितलं होतं की इग्नातोवाचा सुरक्षा प्रमुख हा बल्गेरियातील संघटित गुन्हेगारीतील प्रमुख व्यक्ती होता. मात्र त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं नव्हतं.
"आमच्याकडे या गोष्टीचे पुरावे आहेत की बल्गेरियातील आजवरचा सर्वांत महत्त्वाचा अंमली पदार्थांचा तस्कराचा वनकॉइनशी जवळचा संबंध होता आणि तो रुजा इग्नातोवाचा खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता," असं सहाय्यक वकिलानं सांगितलं.
हा तोच सुरक्षा प्रमुख होता ज्याला एक दिवस अगोदर न्यायालयात अमेरिकेच्या दुसऱ्या सरकारी वकिलानं इग्नातोवाच्या बेपत्ता होण्यामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं होतं.
रेनहार्ट यांच्या मते, बहुतांश लोकांना वाटतं त्यापेक्षा इग्नातोवा कितीतरी अधिक चाणाक्ष गुन्हेगार होती.
"व्हाइट कॉलर गुन्हेगारांसोबत अंमली पदार्थांचा तस्कर किंवा स्टेरॉईड्सवरील माफिया असण्यासारखं हे आहे," रेनहार्ट सांगतात.
बल्गेरियाच्या ड्रग्स किंगशी क्रिप्टोक्वीनचे संबंध
बीबीसीनं पाहिलेल्या लीक झालेल्या युरोपोल दस्तावेजांनी पुष्टी केलेल्या सिद्धांताप्रमाणे हे आहे. त्यातून दिसून येतं की 2017 मध्ये इग्नातोवा गायब होण्यापूर्वी बल्गेरियन पोलिसांनी तिच्याशी आणि टाकीशी संबंध असल्याचं सिद्ध केलं होतं.
या कागदपत्रांमध्ये पोलीस संशय व्यक्त करतात की वनकॉइनच्या वित्तीय नेटवर्कचा वापर टाकी अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी करत होता.
जसं एल चापो आणि पाब्लो एस्कोबार यांचा गुन्हेगारी जगतात दबदबा होता तसाच टाकीचा दबदबा बल्गेरियात झाला होता.
बल्गेरियातील संघटित गुन्हेगारी संघटनेचा तो प्रमुख असल्याचा आणि अंमली पदार्थांचा तस्कर असल्याचा त्याच्यावर मोठा संशय आहे.
तो आणि त्याच्या सहकाऱ्यांची तिथे सशस्त्र दरोडा, अंमली पदार्थांची तस्करी आणि खूनाच्या प्रकरणांमध्ये चौकशी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकरणात कधीही यशस्वीरित्या खटला चालला नाही.
आपण टाकीबद्दल बोललो, तो बल्गेरियातील माफियांचा प्रमुख आहे. तो प्रचंड शक्तिशाली आहे, असं इवान रिस्तानोव म्हणतात. ते बल्गेरियाचे माजी उपमंत्री आहेत. टाकी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीनं गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याच्या आरोपांचा त्यांनी 2022 मध्ये तपास केला होता आणि त्यांची खात्री आहे की ते तसंच होतं.
"टाकी हा भूत आहे. तो तुम्हाला कधीच दिसणार नाही. तुम्ही त्याच्याविषयी फक्त ऐकता. तो तुमच्याशी इतर लोकांच्या माध्यमातून बोलतो. जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर तुम्ही पृथ्वीवरून गायब होता."
"इग्नातोवाला परकी यंत्रणांद्वारे केल्या जाणाऱ्या तपासासह सर्व प्रकारच्या तपासांमधून एकच व्यक्ती संरक्षण देऊ शकते. तो म्हणजे टाकी," रिस्तानोव सांगतात.
बीबीसीनं बल्गेरियन सरकारला भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आरोपाबाबत लिहिलं. बल्गेरियाची राजधानी असलेल्या सोफियामधील कार्यालयानं म्हटलं की "ते गुन्हे आणि ज्या लोकांनी गुन्हे केले आहेत त्यांना संरक्षण देत नाहीत."
टाकी सध्या दुबईत राहतो असं मानलं जातं. तिथं इग्नातोवानं एक लक्झरी पेंट हाऊस विकत घेतलं आहे आणि तिथे तिच्या बॅंक खात्यांमध्ये वनकॉइनच्या फसवणुकीतून मिळालेले लाखो डॉलर्स येत असतात.
टाकी आणि इग्नातोवा यांची भेट कशी झाली किंवा टाकी वनकॉइनच्या प्रकरणात सुरूवातीपासून गुंतलेला होता का याबद्दल माहिती नाही. मात्र अनेक स्रोत सांगतात की त्या दोघांचं वैयक्तिक घनिष्ट नातं होतं आणि तो तिच्या मुलीचा गॉडफादर होता.
इग्नातोवाच्या जवळ असणाऱ्या एका बल्गेरियन स्रोतानं बीबीसीला सांगितलं की संरक्षण पुरवण्यासाठी इग्नातोवानं टाकीला 1,00,000 पौंडापर्यंतची रक्कम दिली असावी.
त्याचबरोबर टाकी आणि इग्नातोवामध्ये इतर आर्थिक संबंध असल्याचं दिसून येतं. युरोपोल दस्तावेजांमध्ये बल्गेरियातील काळ्या समुद्राच्या काठावर एका भूखंडाच्या विक्रीबाबतचा गुंतागुंतीच्या व्यवहाराची माहिती आहे. त्यामध्ये इग्नातोवाच्या एका कंपनीचा टाकीच्या पत्नीशी संबंध आहे.
रुजाच्या सल्लागारानं काय सांगितलं?
फ्रॅंक श्नायडर यांच्याकडून बीबीसीला गोपनीय दस्तावेज पुरवण्यात आले. फ्रॅंक गुप्तहेर होते आणि नंतर इग्नातोवाचे सल्लागार होते. त्यानंतर ते गायब झाले आहेत.
श्नायडरनं आम्हाला सांगितलं की त्याची जुनी बॉस ( रुजा ) गॅंगस्टर आणि गुन्हेगारांबरोबर काम करायची.
जेव्हा आम्ही श्नायडर यांचा त्यांच्या फ्रान्समधील घरी मुलाखत घेतली तेव्हा ते नजरकैदेत होते. वनकॉइन घोटाळ्याच्या संदर्भात अमेरिकेकडे प्रत्यार्पणाची ते वाट पाहत होते.
"यामागे कोण आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण यामुळे माझ्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो...हा खरोखरच गंभीर स्वरूपाचा संघटित गुन्हा आहे."
मात्र शेवटी, इग्नातोवाचा संरक्षकच तिच्या विरोधात गेला होता. 2022 मध्ये बल्गेरियन शोध पत्रकार दिमितार स्टोयानोव आणि शोध न्यूज वेबसाइट bid.bg मध्ये असणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्याच्या हाती एक पोलिस अहवाल लागला होता. हा अहवाल बल्गेरियाच्या एक पोलिस अधिकाऱ्याच्या घरात मिळाला होता, ज्याचा खून करण्यात आला होता.
या दस्तावेजात म्हटलं होतं की एका खबऱ्यानं टाकीच्या मेहुण्याला दारूच्या नशेत असं बोलताना ऐकलं होतं की 2018 मध्ये टाकीच्या हुकुमानेच रुजा इग्नातोवाचा खून करण्यात आला होता.
खूनानंतर रुजाच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून एका यॉट ने आयोनियन समुद्रात टाकण्यात आले होते. दिमितार स्टोयानोव म्हणतात, "हे खरं असण्याची खूपच शक्यता आहे."
दिमितार म्हणतात की हा दस्तावेज खरा असल्याची पुष्टी बल्गेरियाच्या अधिकाऱ्यांनी देखील केली आहे. टाकीचे अनेक गुन्हेगार सहकाऱ्यांना देखील या गोष्टीवर विश्वास आहे की टाकीनं रुजाचा खून केला होता.
अर्थात बीबीसी स्वतंत्ररित्या या दाव्याची खातरजमा करू शकलं नाही.
रुजाच्या खूनाबद्दल टाकीच्या जवळच्या लोकांना वाटतं की जगभरात वॉंटेड झाल्यामुळे रुजा टाकीसाठी ओझं झाली होती. स्वत: टाकीला वनकॉइन घोटाळ्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट नष्ट करायची होती.
'क्रिप्टोक्वीनचा खून आणि कूनो चा शोध'
टाकीच्या या साथीदारांमध्ये क्रासिमिर कामेनोव चा देखील समावेश आहे. कुरो या नावानं प्रसिद्ध असलेल्या क्रासिमिरचा शोध इंटरपोल एका खूनाच्या प्रकरणात घेतं आहे.
दिमितार स्टोयानोव म्हणतात की कुरोनं त्यांना सांगितलं होतं की त्याने स्वत: टाकीला रुजा इग्नातोवासमोर आपल्या गुन्हेगारी व्यवसायाची चर्चा करताना ऐकलं होतं. तेव्हा कुरोनं टाकीला या विषयावर बोलण्यापासून टोकत म्हटलं होतं की याविषयी त्याने बोलू नये. त्यावर टाकीनं त्याला उत्तर दिलं होतं की "चिंता करू नकोस, ती एका मेलेल्या माणसासारखी आहे."
कुरोनं असा देखील दावा केला होता की टाकीबद्दल तो सीआयए या अमेरिकन गुप्तहेर संस्थेशी बोलला होता. यामध्ये रुजाचा खून करण्याचा टाकीनं दिलेल्या आदेशाची गोष्टदेखील होती.
कुरोच्या जवळच्या सूत्रांनी बीबीसीला या गोष्टीविषयी दुजोरा दिला की सीआयएच्या अधिकाऱ्यांची आणि कुरोची भेट 2022 च्या अखेरीस झाली होती.
मे 2023 मध्ये कुरोची केपटाउनमधील त्याच्या घरी हत्या करण्यात आली होती. कुरो बरोबरच त्याची पत्नी आणि दोन साथीदारांनादेखील ठार करण्यात आलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचे पोलिस अजूनही खून्यांचा शोध घेत आहेत. मात्र बल्गेरियाचे माजी उपमंत्री इवान रिस्टानोव यांना वाटतं की कुरो च्या खूनाचा संबंधदेखील टाकीशीच आहे.
ते म्हणतात, "काही लोकांना मार्गातून दूर करणं आवश्यक होतं. कारण त्यांच्याकडे टाकीबद्दल थोडी जास्तच माहिती होती. असं दिसतं की हा खून एक संदेश देण्यासाठी करण्यात आला होता. जेणेकरून लोकांना हे कळावं की कोणाशी गाठ आहे."
पत्रकार दिमितार स्टोयानोव सांगतात की रुजा इग्नातोवाच्या खूनाची बातमी प्रकाशित केल्यापासून त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यामुळे त्यांना आपल्या करियरमध्ये चौथ्यांदा तात्पुरतं बल्गेरिया सोडून जावं लागलं आहे.
रुजाच्या खूनामागचा हेतू माहीत असल्याचा दावा दिमितार करत नाहीत. मात्र प्रॉपर्टीचे दस्तावेज दाखवतात आणि प्रत्यक्ष साक्षीदारांनी देखील त्यांना सांगितलं आहे की रुजा गायब झाल्यापासून बल्गेरियातील अनेक मालमत्तांचा वापर आता टाकीशी संबंधित लोक करत आहेत.
टाकीला कधीही रुजा इग्नातोवाच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली नाही. रुजाचा मृतदेह देखील मिळालेला नाही आणि तपास करणाऱ्यांचं म्हणणं आहे की टाकीच्या विरोधात खटला चालवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पुरावेदेखील नाहीत.
मात्र आयआरएसचे माजी तपास अधिकारी रिचर्ड राइनहार्ट यांना देखील असं वाटतं की रुजा इग्नातोवाचा मृत्यू झाला आहे. मात्र रुजाच्या मृत्यूशी टाकीचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे त्यांनी पाहिलेले नाहीत. मात्र त्यांना असं वाटतं की अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीशी हे सर्व मिळतं जुळतं आहे.
रिचर्ड म्हणतात, "चोरांमध्ये देण्यात आलेल्या वचनांना काहीही किंमत नसते...ही गोष्ट तर सर्वांनाच माहित आहे की अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या टोळ्या किती हिंसक असतात. जर टाकीला वाटलं असेल की रुजामुळे तो अडचणीत येऊ शकतो...तर या गोष्टीची भरपूर शक्यता आहे की अटक होण्याऐवजी त्यानं रुजाचा खून केला असेल."
बीबीसीनं या प्रकरणाचा तपास करताना या आरोपांबद्दल उत्तर जाणून घेण्यासाठी टाकीच्या वकिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना कोणतंही उत्तर मिळालं नाही.
2022 मध्ये रुजा इग्नातोवाचा समावेश एफबीआयच्या दहा मोस्ट वॉंटेड लोकांच्या यादीत करण्यात आला होता. आजही तिचं नाव या यादीत आहे.
लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न ?
रुजाच्या कथित खूनानंतर दि मिसिंग क्रिप्टोक्वीन पॉडकास्ट बनवणाऱ्या बीबीसीच्या टीमला रुजा इग्नातोवा अनेक ठिकाणी दिसल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. यामध्ये 2022 मध्ये ग्रीसमध्ये तिला पकडण्यासाठी चालवण्यात आलेल्या एका अयशस्वी पोलिस मोहिमेचाही सहभाग होता.
असंदेखील घडू शकतं की लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी रुजाच्या मृत्यूच्या अफवा पसरवण्यात आल्या आहेत. जेणेकरून लोक रुजाचा पाठलाग करणं थांबवतील.
मात्र तरीदेखील अनेक वर्षे बेपत्ता असणं खूपच कठीण आहे. इतक्या वर्षांनीदेखील रुजाला अटक करण्यात आलेली नाही, यावरून एका गोष्टीची खूप शक्यता आहे की ती आता पळत फिरत नाही.
इवान रिस्टानोव म्हणतात, एका वळणावर येऊन असंच होतं की जणूकाही एल्विस प्रेस्ले अजूनही जिवंत असेल....मात्र असं असण्याची अजिबात शक्यता नाही.
तर रिचर्ड राइनहार्ट यांचं म्हणणं आहे की एफबीआय मोस्ट वॉंटेड यादीमध्ये एखाद्या नावाचा समावेश गंमत म्हणून करत नाही. मात्र या यादीतून ती लोकांचं नाव तेव्हाच काढते जेव्हा त्या लोकांचा मृत्यू झाल्याचे भक्कम पुरावे हाती येतात. आणि प्राप्त परिस्थितीत रुजा इग्नातोवाच्या बाबतीत असे पुरावे कदाचित कधीच मिळणार नाहीत.
याचाच अर्थ, किमान सध्या पुरतं तरी गायब झालेली क्रिप्टोक्वीन अशी महिला आहे जिचा शोध सुरू आहे.