बारकोड कसे तयार झाले? दिवसाला 7 अब्ज वेळा स्कॅन होणाऱ्या बारकोडच्या जन्माची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी
बारकोडचा शोध कसा लागला, हे सांगणाऱ्या दोन गोष्टी आहेत आणि दोन्हीही तितक्याच खऱ्या आहेत.
पहिली गोष्ट आहे ती सगळ्यांना भावणारी. एका हुशार वैज्ञानिकाला सहज सुचलेलल्या एका कल्पनेतून साकारलेल्या शोधाची. हा शोध लावणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जोसेफ वूडलॅन्ड.
त्यावेळी म्हणजेच 1948 साली तो अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये डेक्स्टर इन्स्टिट्यूटला पदवीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. एकदा त्याच्या ओळखीच्या स्थानिक किराणा दुकानदारानं जोसेफ वूडलॅन्डला एक आव्हान दिलं.
हे आव्हान होतं ग्राहकानं दुकानातून वस्तू घेतल्यानंतर त्याचे पैसे घेणं व नोंद ठेवण्याची किचकट व वेळखाऊ प्रक्रिया सोप्पी आणि जलद करून दाखवण्याचं. पैसे घेऊन विकलेल्या वस्तूंची नोंद ठेवण्याची एक नवी स्वयंचलित पद्धत विकसित करून दाखव, असं आव्हानच या दुकानदारानं जोसेफ वूडलॅन्डला दिलं.
वूडलॅन्ड देखील हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्यानं हे आव्हान स्वीकारलं. त्याने याआधी आण्विक शस्त्रास्त्र विकसित करणाऱ्या अमेरिकेच्या मॅनहॅटन प्रकल्पात काम केलं होतं. त्यामुळे त्याची चिकित्सक संशोधक वृत्ती व हुशारी वादातीत होती.
याशिवायही महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्याने अनेक महत्त्वाचे लहानलहान शोध लावले होते. लिफ्टमध्ये वाजणारं संगीत हे याचं एक प्रातिनिधिक उदाहरण. या शोधाच्या बौद्धिक संपदाहक्कावर दावा करून यावरंच एक व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा मानस होता.
पण या व्यवसायात गुंडांची सद्दी असल्यामुळे ते तुझं जगणं मुष्किल करून टाकतील, अशी भीती दाखवत जोसेफ वूडलॅन्डच्या वडिलांनी त्याला यापासून परावृत्त केलं.
वडिलांचा सल्ला मानत जोसेफ वूडलॅन्डनं या व्यवसायाचा नाद सोडत ड्रेक्सेल इन्स्टिट्यूटमध्ये आपलं उच्चशिक्षण सुरू केलं. आता त्या दुकानदाराने दिलेलं आव्हान स्वीकारून तो खरेदी - विक्री आणि पैशांची नोंद ठेवण्याची नवी पद्धत विकसित कशी करायची, याचाच विचार करत होता.
याचदरम्यान तो मायामीमध्ये आपल्या आजी - आजोबांना भेटायला आला होता. मायामीतील समुद्र किनाऱ्यावर बसून तो तिथल्या वाळूमध्ये आपल्या हाताच्या बोटांनी आकृत्या काढू लागला.
अशा आकृत्या वाळूत काढत असतानाच त्याची नजर समोरच्या खाडीतील चढ - उताराकडे गेली आणि त्याला एका कल्पना सुचली. ज्याप्रमाणे एखादा संदेश पाठवण्यासाठी मोर्सकोडमध्ये टिंब आणि रेषांचा वापर केला जातो. त्याप्रमाणे माहिती जमवून तिची वाहतूक करण्यासाठी अशा मी मातीवर काढलेल्या रेषा वापरता येतील. वर्तुळांचं चक्र असलेलं बुल्स आयचं चिन्हं दुकानातील ठराविक उत्पादनाची माहिती दर्शवण्यासाठी वापरता येईल.
कोडमध्ये चिन्हाच्या रूपात काढलेल्या उत्पादनावरील ही माहिती वाचून त्यावर प्रक्रिया करणारं एखादं यंत्र दुकानात बसवता येईल, असा विचार जोसेफ वूडलॅन्डला मायामीच्या किनाऱ्यावर सुचला.

फोटो स्रोत, Getty Images
वूडलॅन्डला सुचलेली कल्पना तशी तर चांगली होती पण ती प्रत्यक्षात उतरवता येईल यासाठीचं तंत्रज्ञान तेव्हा अजून विकसित झालेलं नव्हतं. बारकोडच्या शोधा बरोबरच तो बारकोड वाचू शकेल असा संगणक, स्कॅनर आणि लेझरही गरजेचा होता. हळूहळू संगणक आणखी प्रगत होत गेले आणि लेझर तंत्रज्ञान अस्तित्वात आलं तेव्हा ही कल्पना आता प्रत्यक्षात उतरवणं शक्य होणार होतं. मध्यंतरी कोडला स्कॅन करू शकेल अशा यंत्राचा स्वतंत्र शोध लागला.
सुरुवातीला या सगळ्या प्रकरणानं मोठा वाद निर्माण केला. विशेषतः लेझरविषयी त्या काळात अनेक भ्रम पसरवले गेले. बारकोड वाचण्यासाठी स्कॅनरमध्ये बसवलेला हा लेझर लोकांच्या डोळ्यांमध्ये गेल्यास डोळे निकामी करेल, अशी अनाठायी भीती पसरवली गेली.
लेझरचं तंत्रज्ञान थिओडोर मेमन या शास्त्रज्ञानं विकसित केलं होतं. हा शोध लागल्यानंतर त्याचं कौतुक करण्याऐवजी मेमन नावाच्य शास्त्रज्ञानं लोकांचा क्षणाधार्त जीव घेऊ शकेल अशा मृत्यू किरणांची (death ray) निर्मिती केली आहे, अशा मथळ्याची बातमी छापत त्यावेळच्या वृत्तपत्रांनी मेमनची बदनामी केली.
मेमननं जेव्हा पहिल्यांदा हे लेझर किरण विकसित केलं तेव्हा हा शोध लावण्यामागे त्याचा उद्देश फार वेगळा होता. अवजारनिर्मिती आणि वैद्यकीय क्षेत्रात हे लेझर वापरले जातील, असा त्याचा कयास होता. सुपरमार्केटमधील किराणा मालाच्या विक्रीत वस्तूंवरील बारकोड वाचण्यासाठी माझे लेझर किरण कामी येतील, अशी कल्पनाही मेमननं केली नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
पण लेझरच्या वापरातून बारकोड वाचून घेणारं स्कॅनर नावाचं यंत्र पुढील काही वर्षांत हळू हळू आणखी विकसित होत गेलं.
1950 च्या दशकात डेव्हिड कॉलिन्स या अभियंत्यानं रेल्वेगाडीच्या डब्ब्यांवर अशा जाड आणि पातळ रेषा असलेलं कोड बसवलं आणि ते कोड वाचू शकतील असे स्कॅनर रेल्वेरूळावर लावले. यातून मालगाड्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या मालाची नोंदणी केली जाऊ लागली.
1970 च्या दशकात जॉर्ज लॉरर या आयबीएममधील अभियंत्यानं बुल्स आयला पर्याय म्हणून आणखी एक नवा कोड विकसित केला जो आयताकृतीत होता.
हा आयताकृती कोड बुल्स आयपेक्षा प्रभावी होता. दुकानातील बीनबॅग्सवर हे कोड लावून मग त्यांची विक्री यातून केली गेली. समुद्रकिनारी बसून वूडलॅन्डनं रचलेली परिकल्पना आता प्रत्यक्षात उतरली होती.
ही झाली बारकोडच्या जन्माची पहिली गोष्ट. बारकोडच्या जन्माची दुसरी गोष्ट पहिल्या गोष्टी इतकी रंजक नसली तरी तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे.
सप्टेंबर 1969 ला ग्रोसरी मॅन्युफॅक्चररर्स ऑफ अमेरिका (GMA) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नॅशनल असोसिएशन ऑफ फूड चेन्स (एनएएफसी) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
ही बैठक सिनसिनाटी मधील कॉरोसेल इन नावाच्या मोटेलमध्ये भरेल असं ठरलं. बैठकीचा विषय होता देशातील खाद्यपदार्थ आणि किराणा मालाच्या विक्रीकरिता एक समान बारकोड व्यवस्था आणता येईल की नाही हे ठरवणं. जीएमए ही अमेरिकेतील खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांची संघटना होती. तर एनएएफसी हे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची संघटना होती.

फोटो स्रोत, Getty Images
जीएमए आधीपासून हिशोब ठेवण्यासाठी आपल्या उत्पादनांवर एक 11 अंकी कोड वापरत असे. हे उत्पादन विक्रीला ठेवणाऱ्या एनएएफसीचे सदस्य असलेल्या दुकानदारांनी सुद्धा ही आमची 11 अंकी कोडची व्यवस्था अंगिकारावी जेणेकरून खरेदी विक्रीचा व्यवहार सुरळीत होऊ शकेल, असा प्रस्ताव या बैठकीत जीएमएनं मांडला.
एनएएफसीला हा प्रस्ताव मंजूर नव्हता. कारण 11 ऐवजी अधिक लहान आणि सोपा असा 7 अंकी कोड या व्यवहारात वापरण्यासाठी एनएएफसी आग्रही होती. आमच्या दुकानात ग्राहकांना विक्री करण्यासाठी हा 7 अंकी कोडच वापरणं सोप्पं जाईल, असं त्यांचं म्हणणं होतं.
जीएमए आणि एनएएफसीमध्ये काही एकमत झालं नाही आणि ही बैठक कुठल्याही निर्णयावर न पोहचताच संपली. प्रत्येकजण आपला वेगळा कोड असावा यासाठी आग्रही होता. त्यामुळे बारकोड वापराची गाडीच पुढे सरकत नव्हती.
पुढच्या काही वर्षांमध्ये शेकडो बैठका, चर्चा आणि वादविवाद होऊन शेवटी अमेरिकेतील दुकानदार व उत्पादकांचं युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड (यूपीसी) वर एकमत झालं आणि अमेरिकेत एकसमान बारकोड वापरण्याचा मार्ग मोकळा झाला.

फोटो स्रोत, Getty Images
बारकोडचा जन्म कसा झाला, याच्या या दोन कथा आहेत. आणि दोन्हीही तितक्याच खऱ्या आहेत. बारकोडच्या उगमाबाबत वाद असला तरी बारकोडचा पहिल्यांदा झालेल्या अधिकृत वापराबाबत मात्र कुठलंही दुमत नाही.
1974 सालच्या जून महिन्यात अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ट्रॉय शहरात असलेल्या मार्श सुपरमार्केटमधील काउंटरवर बारकोड पहिल्यांदा अधिकृतपणे वापरला गेला.
या सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या शेरॉन बुचॅनन या 31 वर्षीय कर्मचाऱ्यानं पहिल्यांदा रिंगलेच्या 50 ज्यूसी फ्रूट चिविंग गमच्या पाकिटावरील बारकोड लेझर स्कॅनरवर स्कॅन करून त्यावर आपोआप उमटलेली 67 सेंट्ची किंमत नोंदवून इतिहास रचला. जगातील पहिला पदार्थ बारकोडच्या आधारे विकला गेला. बारकोड ही संकल्पना न राहता व्यावहारिक वापराची गोष्ट आता बनली होती.
वरकरणी बारकोड आपल्याला दुकानदाराचा वेळ आणि पैसा वाचवणारं अतिशय साधं तंत्रज्ञान वाटू शकतं. सुपरमार्केट्स आपल्या ग्राहकांना अतिशय जलद आणि प्रभावी सेवा या बारकोडमुळे पुरवू शकतात. पण हा बारकोड तेव्हाच काम करतो जेव्हा तो वरच्या यंत्रणेत नोंदवला गेलेला असेल. त्यामुळे फक्त वस्तूंच्या किंमती आणि दुकानदाराकडे लागलेली ग्राहकांची रांग कमी करणं इतक्यापुरतंच बारकोडचं महत्व मर्यादित नाही.
या बारकोडमुळे अनेकांचा जीवन सुकर झालेलं असलं काही जणांचा वैतागही या बारकोडनंच वाढवलेला आहे.
या बारकोडनं किराणा मालाच्या उद्योगात क्रांती घडवून आणली. बारकोड चालण्यासाठी वस्तूंच्या उत्पादकांना त्या वस्तूवर हा बारकोड आधी बसवावा लागला आणि विक्रेत्यांना विक्रीसाठी आपल्या दुकानात स्कॅनर बसवावा लागला. ही अतिशय खर्चिक गोष्ट होती. त्यामुळे सुरुवातीला काही उत्पादक आणि विक्रेत्यांनी या बारकोडला विरोधदेखील केला.
कारण त्यांना आपली उत्पादन व विक्रीची जुनी यंत्रणा बदलून नवी यंत्रणा खास यासाठी आणावी लागणार होती. या मतमतांतरामुळेच तर इतक्या बैठका पार पडल्या आणि इतके वाद झाले. वूडलॅन्डनं बारकोडचा शोध लावला आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळेजण बारकोड वापरू लागले, इतक्या सहज हे झालं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांना या बायकोडचं महत्व समजलं होतं. पण उत्पादक आणि विक्रेते नवी यंत्रणा आणून बारकोडचा वापर सुरू करायला सुरुवातीला तयार होत नव्हते. आधी विक्रेत्यांनी आपल्या दुकानात पहिल्यांदा स्कॅनर बसवावेत मग आम्ही आमच्या उत्पादनांवर बारकोड छापायला सुरूवात करू, असं उत्पादक म्हणत होते.
तर आधी उत्पादकांनी आपल्या उत्पादनांवर बारकोड छापून द्यावा मग आम्ही आमच्या दुकानात स्कॅनर बसवू, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली होती. या तिढा सुटत नसल्यामुळे शोध लागल्यानंतरही बारकोडचा वापर सुरू व्हायला काही काळ जाऊ द्यावा लागला.
उत्पादक आणि विक्रेते यांच्यातील हा तिढा सोडवणं इतकं अवघड गेलं कारण बारकोडच्या आगमनामुळे या किराणा उद्योग क्षेत्रातील सत्ताकेंद्र बदलणार होतं. आधी सत्ता हातात असलेले उद्योग क्षेत्रातील लोक आपली सत्ता जाईल या भीतीने बारकोडचा स्वीकार करायला तयार होत नव्हते.
छोट्या किराणा दुकानदारांना हा बारकोड नकोच होता. कारण ग्राहकांची मोठी रांग व विक्रीची नोंद ठेवणं ही त्यांची समस्याच नव्हती. त्यांचा उद्योगच अतिशय छोट्या पातळीवरचा असल्यामुळे ग्राहक व विक्रीचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे त्यांना बारकोडची मुळात गरजच नव्हती. गरज नसताना ही बारकोडची नवीन यंत्रणा बसवणं त्यांना उलट अधिक खर्चिक होणार होतं.
दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात ग्राहकांना वस्तू विकणाऱ्या सुपरमार्केट्ससाठी हा बारकोड एक वरदान म्हणून कामी येणार होता. ग्राहकांची मोठी रांग आणि मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या वस्तूंची नोंद नियोजित करणं बारकोडमुळे या सुपरमार्केट्सना सहज शक्य होणार होतं. कारभार आणि उलाढाल इतकी मोठी असल्यामुळे बारकोड बसवण्याचा खर्च या सुपरमार्केट्ससाठी काही जास्त नव्हता.
बारकोड येण्याआधी या सुपरमार्केटमध्ये प्रत्येक ग्राहकाला वस्तू विकून त्याची नोंद ठेवण्यासाठी कामगार ठेवावे लागायचे. ही वेळखाऊ प्रक्रिया होती. कधी कधी एखादा कामगार ग्राहकाकडून रोख पैसे घेऊन वस्तूंची नोंदवहीत नोंद न करताच ती परस्पर विकून ते पैसे आपल्या खिशात घालत असे. आपल्या या कर्मचाऱ्याच्या बेईमानीवर देखरेख ठेवणं देखील या सुपरमार्केट्सना जुन्या यंत्रणेत शक्य नव्हतं. बारकोडमुळे या सगळ्या समस्यांवर तोडगा निघाला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे 1970 - 80 च्या दशकात या बारकोडचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यासोबतच सुपरमार्केट्सचा उदयही. छोटे किराणा दुकानदार आता मागे पडू लागले. मोठ्या प्रमाणात वस्तूंचा साठा करून ठेवून तो ग्राहकांपर्यंत जलद पोहोचवणं या मोठ्या दुकानदारांना सहज शक्य होऊ लागलं.
एकदाच घाऊक दरानं वस्तू खरेदी करून त्यांचा साठा केलेला असल्यामुळे हे सुपरमार्केट्स छोट्या दुकानदारांच्या तुलनेत स्वस्तात वस्तू ग्राहकांना विकू शकत होते.
बारकोड यंत्रणेमुळे आपल्या ग्राहकांची आवड आणि नापसंतीची सगळी नोंददेखील डाटाबेसमध्ये ते साठवू लागले. बारकोडमुळे आधी कल्पनही करता येणार नाही इतक्या क्लिष्ट गोष्टी सहज करता येऊ लागल्या. ग्राहकांंपर्यंत कुठलीही वस्तू अगदी सहज आणि पटकन सुपरमार्केट्सकडून पोहचवल्या जाऊ लागल्या. वस्तूंचा साठा, विक्री व खरेदीची नोंद, ग्राहकांची आवड व प्राधान्यक्रम हेरून त्या दृष्टीने सेवा पुरवणे हे सगळं बारकोडनं घडवून आणलं. त्यामुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला. इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या प्रभावीपणे होणाऱ्या या विक्रीमुळे विशेषतः अमेरिकेत उपभोगवादी संस्कृतीचा उदय झाला.
याचाच प्रत्यय आपल्याला 1988 साली वॉलमार्टनं सुरू केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीतून येऊ शकतो. वॉलमार्ट ही आजघडीला अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी किराणा मालाची विक्री करणारी कंपनी आहे. वॉलमार्टचा हा उदय बारकोडमुळेच शक्य झाला. बारकोड वापरणाऱ्या सुरुवातीच्या काही मोजक्या कंपन्यांपैकी वॉलमार्ट एक होती.
बारकोड यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंचा साठा करून तो प्रभावीपणे ग्राहकांपर्यंत पोहचवणं वॉलमार्टला शक्य झालं. त्यामुळे अगदी कमी काळात वॉलमार्ट इतकी बलाढ्य कंपनी बनली. आज या क्षेत्रातील इतर पुढच्या पाच कंपन्यांची मिळून एकूण जितकी उलाढाल आहे तितकी एकट्या वॉलमार्टची आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वॉलमार्टने बारकोडच्या बळावर चीनमधील उत्पादकांना अमेरिकेतील ग्राहकांशी जोडलं. अमेरिकेच्या तुलनेत चीनमध्ये वस्तूंचं उत्पादन अतिशय स्वस्तात होतं. वॉलमार्ट मोठ्या प्रमाणात एकदाच घाऊक दरानं चीनमधून या वस्तू आयात करत असे. तो माल साठवून अमेरिकेत आपल्या ग्राहकांना विकत असे. इतक्या मोठ्या प्रमाणात साठेबाजी करणं वॉलमार्टला बारकोडमुळेच शक्य झालं.
कारण ग्राहकांची आवड काय आहे याची नोंद व त्यानुसार मालाची साठवणूक करणारी यंत्रणा वॉलमार्टकडे होती. ही पद्धत इतकी प्रभावी होती की चीनमधील अनेक मोठ मोठ्या उत्पादकांचा त्यावेळी एकच ग्राहक असायचा. तो म्हणजे वॉलमार्ट.
या एका ग्राहकाच्या जोरावर चीनमधील अनेक कारखाने उभे राहिले. एकच ग्राहक इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या वस्तूंची एकगठ्ठा आधीच मागणी नोंदवून ठेवत असल्यामुळे चीनमधील उत्पादकांनाही ते अनुकूल होतं. आणि वॉलमार्टलाही तेच हवं होतं. त्यामुळे सगळ्यांचाच यातून फायदा होत होता. अमेरिकेतील ग्राहकांनाही यामुळे वस्तू स्वस्तात मिळू लागल्या.
मायामीच्या समुद्र किनाऱ्यावर बसून तिथल्या रेतीत हाताने रेखाटत असताना जोसेफ वूडलॅन्डला ही कल्पना सुचली. पुढे जाऊन जॉर्ज लॉररनं या बारकोड मध्ये सुधारणा आणत त्याला व्यवहारात उतरवलं. बारकोडनं फक्त किराणा मालाच्या उद्योगाची कार्यक्षमता वाढवली नाही तर या क्षेत्राची कार्यपद्धतीच कायमसाठी बदलली.
बारकोडनं मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन आणि विक्री किती सहज शक्य आहे, हे दाखवून दिलं. या बारकोडमुळे जागतिक बाजारपेठेतील उलाढाल प्रचंड वाढली. त्यामुळेच हा बारकोड आज जागतिक भांडवलशाहीचं एक प्रतिक बनला आहे. ठराविक आकारात काढल्या गेलेल्या या काळ्या आणि पांढऱ्या रेषांनी अर्थव्यवस्थेला आधुनिक बनवत आपलं जग कायमसाठी बदलून टाकलं.
आज आपण प्रत्येक दुकानात खरेदीनंतर पैसे भरण्यासाठी वापरत असलेला क्यू आर कोड हा देखील बारकोडचीच सुधारित आवृत्ती आहे. उदाहरणार्थ बारकोड हा एकमितीय (1 - Dimensional) असतो तर क्यू आर कोड हा द्विमीतीय ( 2 - Dimensional). या छोट्या कोडमध्ये इतकी माहिती साठवलेली असते की यातून उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत सगळ्यांना आवश्यक ती माहिती पोहचवून उत्पादनापासून विक्रीपर्यंतचा व्यवहार सुकर केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
या क्यू आर कोडमध्ये वस्तूंच्या किंमती बरोबरच त्याबद्दलची सगळी इत्यंभूत माहिती साठवलेली असते. ही माहिती दुसऱ्या कोणत्या पद्धतीने त्या वस्तूवर नोंदवलं जाणं शक्यच झालं नसतं. पण एका कोडमधून ही सगळी माहिती वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकाला मिळते. त्यामुळे तो व्यवहार अधिक पारदर्शक होतो.
आजघडीला एका दिवसात जगात वेगवेगळ्या ठिकाणी 7 अब्ज वेळा बारकोड स्कॅन केला जातो. प्रत्येक क्षेत्रात, उद्योगात व व्यवहारात प्रत्येक पातळीवर बारकोडचा वापर केला जातो. इतका तो आपल्या जीवनाचा आणि आधुनिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे.
बारकोडचा इतिहास हा इतका जटील आणि वादग्रस्त असला तरी जोसेफ वूडलॅन्डनं मायामीच्या समुद्र किनाऱ्यावर रेखाटलेल्या या चित्रानं जगाला कायमसाठी बदलून टाकलं, यात काही वाद नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











