स्वतःचे डीपफेक पॉर्न आणि रंगवलेली वर्णनं पाहून बसला धक्का, नंतर थेट कायद्याशी भिडलेल्या हॅनाची गोष्ट

इंटरनेटवरील एका पॉर्न वेबसाईटवर आपल्या डीपफेक प्रतिमा लावल्या गेल्याचं कळाल्यानंतर ऑस्ट्रेलियातील हॅना ग्रंडी हिच्या पायाखालची जमीनच सरकली.

फोटो स्रोत, Nikki Short/BBC

    • Author, टिफिनी टर्नबूल
    • Role, बीबीसी न्यूज, सिडनी

(सूचना - खालील मजकुरात काही ठिकाणी आक्षेपार्ह भाषा आणि लैंगिक हिंसाचाराचं वर्णन करण्यात आलेलं आहे.)

फेब्रुवारी महिन्यातील नेहमीसारखीच ती एक रात्र होती. ऑस्ट्रेलियातील सिडनीची राहिवासी असलेल्या हॅना ग्रंडीला अचानक इनबॉक्समध्ये एक अनामिक संदेश आला.

"मी हा इमेल तुम्हाला पाठवतो आहे आणि जोपर्यंत तुम्ही हा माझा इमेल उघडून बघणार नाही तोपर्यंत पाठवत राहणार आहे. कारण ही गोष्ट तुमच्या नजरेत येणं फार गरजेचं आहे," असा दावा हा अनामिक व्यक्तीनं पाठवलेला संदेश करत होता.

या संदेशासोबत एक लिंक होती. त्याला लागून ठळक मोठ्या अक्षरात एक इशारा लिहिलेला होता. "यातला मजकूर अतिशय भयावह आणि हेलावून टाकणारा आहे."

हा संदेश आणि ती लिंक उघडायला हॅना ग्रंडी सुरुवातीला थोडी कचरत होती. कारण हा एखादा ऑनलाईन फसवणुकीचा अथवा आर्थिक घोटाळ्याचा प्रकार असू शकतो, अशी साहजिक शंका तिला आली.

पण शेवटी जेव्हा तिने संकोच बाजूला ठेवून संदेश उघडला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच हादरली. सोबत जोडलेली लिंक उघडल्यानंतर हा प्रकार ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपेक्षाही कितीतरी पटीने अधिक भयावह आणि घृणास्पद असल्याचं समोर आलं.

हॅना ग्रंडीचा चेहरा लावून तिच्या बनावट पॉर्नच्या हजारो प्रतिमा आणि चित्रफिती ही लिंक उघडल्यानंतर समोर आलेल्या वेबसाईटवर होत्या. त्यासोबत हॅनावर बलात्कार आणि तिच्यावरील घृणास्पद लैंगिक अत्याचाराची वर्णन करणारा मजकूर लिहिलेला होता.

"मला दोरीने बांधलं गेलंय. मी घाबरलेले आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. मला एका पिंजऱ्यात नग्न आणि हतबल अवस्थेत कैद केलेलं आहे. अशा खूप साऱ्या प्रतिमा त्यामध्ये होत्या," हॅनानं तिचे डीपफेक पॉर्न पहिल्यांदा तिच्या नजरेस पडले त्याची भयानक आठवण सांगितली.

अतिशय बीभत्स प्रकारे या डीपफेक प्रतिमांवर हॅना ग्रंडीचं नावही स्पष्टपणे काही ठिकाणी लिहिलेलं होतं. सोबत ती कुठे राहते याचा पत्ता आणि तिच्या इन्स्टाग्राम खात्याची वैयक्तिक माहितीसुद्धा तिथेच उघड केलेली होती.

नंतर तर तिला समजलं की या विकृत डीपफेक पॉर्न वेबसाईटवर तिचा मोबाईल क्रमांकदेखील उघड केलेला होता.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

यानंतर जे घडलं ते एखाद्या भीतीदायक आणि थरारक चित्रपटासारखं होतं, असं हॅना ग्रंडी सांगते.

तिच्यासोबत हा सगळा घृणास्पद प्रकार तिच्या जवळच्याच एखाद्या व्यक्तीने केल्याचं स्पष्ट होतं. या विकृत व्यक्तीला शोधून न्याय मिळवण्याची तिची मोहीम सुरू झाली.

हा प्रवास खचितच सोपा नव्हता. या मानसिक धक्क्यातून स्वतःला सावरत तिने आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कायदेशीर लढाई लढली आणि ती जिंकली सुद्धा. आणि ही लढाई फक्त त्या एका विकृत आरोपीविरोधातच नव्हती.

तर या लढाईत तिने ऑस्ट्रेलियातील कालबाह्य कायदे आणि निष्क्रिय व्यवस्थेला आव्हान देत त्यात सुधारणा घडवून आणायला भाग पाडलं.

ही गोष्ट आहे पुरुषी लैंगिक विकृतीने हॅना ग्रंडीवर केलेल्या हल्ल्याची आणि हॅनाने धीरोदात्तपणे केलेल्या प्रतिकाराची!

मूळापासून हादरवून सोडणारा धक्का

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हॅना ग्रंडीला बीभत्स आणि विकृत रुपात दाखवणाऱ्या या वेब पेजचं नावच होतं 'द डिस्ट्रकशन ऑफ हॅना' (हॅनाचा विनाश). म्हणजे हा हल्ला हॅनाच्या कोणत्यातरी जवळच्याच व्यक्तीने ठरवून केलेला आहे, हे स्पष्ट होतं.

आरोपीनं फक्त स्वतःच हॅनाच्या डीपफेक प्रतिमा इथे टाकल्या नव्हत्या तर आरोपीसारखीच विकृती बाळगणाऱ्या शेकडो दुराचारी लोकांनी इथे हॅनासोबत लैंगिक अत्याचार करण्याची आपली इच्छा रसभरीत वर्णन करून व्यक्त केली होती. म्हणजेच या सगळ्या विकृतीत इंटरनेटवरील अनेक जण भागीदार होते.

डीपफेक तंत्रज्ञान वापरून हॅनाच्या तब्बल 600 नग्न आणि आक्षेपार्ह प्रतिमा या वेबपेजवर अपलोड करण्यात आलेल्या होत्या. बीभत्स हे विशेषणही मवाळ वाटेल अशा पॉर्नला हॅनाचा चेहरा लावून विकृत लैंगिकतेनं भारलेला कल्पनाविलास फक्त त्या आरोपीनंच नव्हे तर इतरही समविचारी विकृत इंटरनेट वापरकर्त्यांनी निलाजरेपणानं इथे रचला होता.

हॅनासोबत आम्ही कसा संभोग आणि विकृती करत पाशवी आनंद घेऊ, याची रसरशीत वर्णनं आणि धमक्या त्यावर विस्तृतपणे लिहलेल्या होत्या.

त्यातल्या एका प्रमुख पोस्टरवर तिच्या प्रतिमेखाली मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, "हिच्यावर तर मी माझे सगळे लैंगिक विकृतीचे प्रयोग करायला उत्सुक आहे."

आणखी एका प्रतिमेसोबत "मी हिच्या घरात लपून बसणार आहे. ही कधी एकटी असण्याची वाट बघत. ही मला एकट्यात सापडली की हिच्यावर झडप टाकून बळजबरीने मला हिच्यासोबत संभोग करायचा आहे. ती या बलात्काराचा प्रतिकार करेल तेव्हा मला आणखी मजा येणार आहे," असं लिहिलेलं होतं.

या भयानक घटनेला आता 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. शाळेत शिक्षिका असणाऱ्या 35 वर्षीय हॅना ग्रंडीला आजही तो काळा दिवस जशास तसा आठवतो. जेव्हा तिने आपला पती ख्रिस वेंटुरासोबत ते अश्लाघ्य वेबपेज पहिल्यांदा उघडलं होतं. तिला बसलेला तो धक्का आणि जखम अजूनही तितकीच ताजी आहे. त्यातून ती अजूनही पूर्णपणे सावरू शकलेली नाही.

"आजही मला प्रचंड असुरक्षित वाटतं," हॅना मला सांगत होती. घरात चहा घेत गप्पा मारत असताना त्या प्रसंगाची आठवण निघाल्यावर तिचे डोळे अजूनही विस्फरलेले दिसत होते.

ही वेबसाईट चाळताना तिचा पती ख्रिस याला त्याच्या काही मित्रांचेही फोटो तिथे आढळले. या वेबसाईटवर जवळपास 60 महिलांच्या अशाच विकृत प्रतिमा बनवल्या गेलेल्या होत्या. यातल्या बहुतांश पीडित महिला या सिडनीच्याच राहिवासी होत्या.

डीपफेकच्या आधार घेऊन वेबसाईटवर टाकण्यात आलेल्या या सगळ्या प्रतिमा आपल्या सोशल मीडयाच्या खासगी खात्यावरून उचलून मग त्यांचं विकृतीकरण करण्यात आलंय, हे या दांपत्याला नंतर लक्षात आलं. म्हणजे हा सगळा घाणेरडा प्रकार त्यांच्या जवळच्या ओळखीच्या कोणत्यातरी व्यक्तीनं केलेला होता जो त्यांच्या मित्र यादीत होता.

ख्रिस वेंटुरा आणि हॅना ग्रंडी ज्या विद्यापीठात शिकवत होते तिथल्याच आवारातील बारमध्ये ॲन्ड्र्यू हायलर काम करायचा. रोजच्या संपर्कामुळे हे तिघे घनिष्ठ मित्र बनले होते.

फोटो स्रोत, Supplied

फोटो कॅप्शन, ख्रिस वेंटुरा आणि हॅना ग्रंडी ज्या विद्यापीठात शिकवत होते तिथल्याच आवारातील बारमध्ये ॲन्ड्र्यू हायलर काम करायचा.

हा आपला कोणता मित्र किंवा ओळखीची व्यक्ती असेल याचा शोध घ्यायला मग ख्रिस वेंटुरा आणि हॅना ग्रंडीनं सुरूवात केली. त्यासाठी आधी ज्या दुसऱ्या महिलांचंही असंच डीपफेक वापरून या वेबसाईटवर विद्रुपीकरण केलं गेलंय, त्यांचा या दांपत्यानं शोध घेतला. मग या सगळ्या पीडितांची सोशल मिडिया खात्यावरील मित्रयादी काढली.

पीडितांच्या मित्रयादीतील समान नाव वेगळे काढले व संभाव्य गुन्हेगारांची एक यादीच या पडताळणीच्या प्रक्रियेतून तयार केली.

चार तासांत या दोघांनी मिळून 3 संभाव्य गुन्हेगारांना अधोरेखित केलं. यातल्या एकानेच हॅनासह इतर महिलांचे फोटो चोरून त्यांचं विद्रुपीकरण करत ते पॉर्न म्हणून इंटरनेटवर टाकलं होतं.

या यादीतील तिघांपैकी एक नाव होतं ॲन्ड्र्यू हायलर या विद्यापीठातील त्यांच्या घनिष्ठ मित्राचं. ख्रिस वेंटुरा आणि हॅना ग्रंडी ज्या विद्यापीठात नोकरी करत होते त्याच विद्यापीठातील बारमध्ये ॲन्ड्र्यू हायलर व्यवस्थापक म्हणून काम करायचा.

कामादरम्यान त्यांची रोज भेट होतच असायची. त्यातूनच या तिघांची चांगली मैत्री झाली होती. या विद्यापीठातीलच त्यांचे आणखी काही सहकारी देखील होते. या सगळ्या मित्रांचा एक समूहच बनला होता. ॲन्ड्र्यू या समूहातील सगळ्यात समजूतदार आणि प्रेमळ म्हणून सगळ्यांचा लाडका देखील होता.

तो फार उदार आणि समंजस होता. स्त्रीदाक्षिण्य देखील दाखवायचा. सगळ्यांशी प्रेमाने बोलायचा. विशेषतः आपल्या मैत्रिणींची फार काळजी घ्यायचा. त्यांना रात्री उशीरा घरी जावं लागत असेल तर त्या व्यवस्थित घरी पोहचल्या की नाही, याची नेहमी आस्थेनं चौकशी करायचा.

हॅना, ख्रिस, ॲन्ड्रू आणि बाकीचे त्यांचे मित्र हे कामाव्यतिरिक्तही बाहेर भेटायचे. फिरायला जायचे. त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी बरंच प्रेम आणि विश्वास होता.

"मी त्याला अतिशय चांगला माणूस आणि जवळचा मित्र मानायचे," हॅना सांगत होती.

पण तिघांची ही यादी पुन्हा पुन्हा तपासून नीट पडताळणी केल्यावर हे कृत्य कोणी केलं असेल यावर बोट ठेवणारं एकच उत्तर आलं आणि ते म्हणजे 'ॲन्ड्र्यू हायलर'.

भीती आणि मनस्ताप

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हॅनानं थेट पोलीस स्टेशन गाठलं. झालेल्या घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून ती अजूनही सावरलेली नसली तरी आता पुढे तरी पोलीस या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून माझा त्रास कमी करतील, अशी भाबडी आशा तिला होती.

"मला वाटलेलं पोलीस त्याच दिवशी दुपारी जातील आणि ॲन्ड्र्यू हायलरला अटक करतील," हे बोलताना एक उपहासात्मक हसू ख्रिसच्या चेहऱ्यावर उमटलं जे निराशावादातून आलेलं होतं.

पोलिसांनी दिलेला प्रतिसाद हा या दोघांसाठी आणखी एक तितकाच मोठा धक्का होता.

पीडित हॅनाप्रती सहानुभूती किंवा दयाभाव दाखवण्याऐवजी न्यू साउथ वेल्समधील त्या पोलिस अधिकाऱ्यांनी उलट हॅनालाच, "तुम्ही अँड्र्यूचं काही वाकडं केलं होतं का? असा उलट प्रश्न केला. पीडितेऐवजी त्यांची सहानुभूती आरोपीप्रतीच जास्त वाटत होती.

स्वतः कुठली कारवाई करण्याऐवजी तुम्हीच तुमचा मित्र असलेल्या ॲन्ड्र्यूला हा प्रकार थांबवायला लावा, असा अनाहूत सल्ला देखील त्या पोलीस अधिकार्‍यानं हॅनाला दिला. एकानं तर निर्लज्जपणे तिच्या एका तुलनेनं छोटे कपडे घातलेल्या फोटोकडे बोट दाखवत तुम्ही यात सुंदर दिसत आहात, अशी चावट टिप्पणी देखील केली.

हॅना ग्रंडी प्रकरणाची पोलिसांकडून झालेल्या हाताळणीबद्दल आम्ही प्रश्न विचारले असता त्यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायला न्यू साऊथ वेल्सच्या पोलीस विभागानं नकार दिला.

हॅनाला हा अनुभव मात्र बरंच काही शिकवून गेला. इतक्या संवेदनशील प्रकरणातदेखील पोलीस किती निष्काळजी आणि हलगर्जी असतात, याचा धडा तिला मिळाला. पोलिसांप्रती जो काही आदर आणि सन्मान तिच्या मनात आधी होता तो सगळा क्षणार्धात गळून पडला.

पोलिसांचा एकूणच व्यवहार इतका अप्रासंगिक आणि निगरगट्ट होता की जणूकाही आपणच बेडकाचा फुगवून बैल करत आहोत आणि ही घटना काय इतकी गंभीर नसावी, असं हॅनाला क्षणभर वाटलं.

आपल्या तक्रारीबाबत पोलीस पुरेसे गंभीर नाहीत आणि ते फक्त वेळकाढूपणा करत असल्याचं लक्षात आल्यावर हॅनानं ऑस्ट्रेलियाच्या ई - सुरक्षा आयुक्तांकडे दाद मागितली. या नियंत्रक संस्थेनं मग त्या वेबसाईटवरील हॅनाचा चेहरा वापरून बनवलेला विद्रुप मजकूर तेवढा हटवला.

पण हा प्रकार कोणी केलेला आहे ते शोधून त्याला शिक्षा देणं हे ई - सुरक्षा आयोगाचं अधिकार क्षेत्र नसल्यामुळे कारवाईदाखल अजूनही कुठलंच ठोस पाऊल आरोपीविरोधात उचललं जात नव्हतं.

ॲन्ड्र्यूने हॅनाचे शेकडो फोटो उचलून ते अश्लील पद्धतीने रुपांतरित करुन इंटरनेटवर पॉर्न म्हणून टाकले.

फोटो स्रोत, Supplied

फोटो कॅप्शन, ॲन्ड्र्यूने हॅनाचे शेकडो फोटो उचलून ते अश्लील पद्धतीने रुपांतरित करुन इंटरनेटवर पॉर्न म्हणून टाकले.

पोलीस दाखवत असलेली निष्क्रियता बघून ख्रिस आणि हॅना ग्रंडी हे दाम्पत्य अक्षरशः हतबल झालं. त्यांंनी पोलिसांकडून आशाच सोडली व स्वतः पैसे जमा करून वकिल व एक डिजीटल पुरावे गोळा करू शकणारा तज्ञ शोधला. जेणेकरून ॲन्डीविरूद्ध खटला दाखल करायला सक्षम पुरावे गोळा करता येतील.

या दरम्यान त्यांनी फारच गुप्तता राखली. प्रत्यक्षात खटला सुरू होईपर्यंत ॲन्डीला याचा कुठलाही सुगावा लागू नये म्हणून त्यांनी अतिशय गुप्तपणे हा सगळा तपास केला. ते या काळात घरीच बसून राहिले. कोणाशी चुकूनही बोलून हे गुपित वेळेआधी फुटल्यास ॲन्डी सावध होईल आणि सगळी योजना फसेल, याची जाणीव त्यांना होती.

कुठेही बाहेर जाण्याला अथवा कोणाशी बोलण्याला रोख लावली गेल्यामुळे आधीच अस्वस्थ असणाऱ्या या जोडप्याची अवस्था आणखी बिकट झाली होती.

ॲन्ड्र्यू असं काही आमच्यासोबत करू शकतो, यावर विश्वास ठेवायला मन अजूनही तयार नव्हतं. पण सगळे पुरावे यामागे ॲन्डीचाच हात असल्याकडे निर्देश करत होते. "आज माझे फोटो विद्रुप करुन आणि माझ्याविषयी नको त्या लैंगिक अत्याचारांचा कल्पनाविलास करणारा ॲन्डी उद्या जाऊन प्रत्यक्षात माझ्यावर बलात्कार अथवा हल्ला करणार नाही, हे कशावरून? या विचारांनीच माझा थरकाप उडायचा," हॅनाने त्या काळात सहन करावी लागलेली अस्वस्थता शब्दबद्ध केली.

हॅना आणि तिचा पती कायम भीतीत असायचे. अश्लील फोटोव्यतिरिक्त लोकांनी त्या वेबसाईटवर हॅनाबद्दल अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या की हॅनाला असुरक्षित वाटणं साहजिक होतं. त्यामुळे या दाम्पत्यानं आपल्या घरात सगळीकडे कॅमेरे बसवले.

हॅनाचं स्थान दर्शवणारं एक ॲप तिच्या फोनमध्ये बसवलं जेणेकरून 24 तास तिच्यावर ख्रिसला देखरेख ठेवता येईल. आरोग्य मापक मोजणारं एक घड्याळही तिने घालायला सुरुवात केली. यावरून हॅनाच्या हृदयाचे ठोके वाढले अथवा वाजायचे थांबले तर त्याची माहिती लगेच ख्रिसला मिळेल.

हॅना तर इतकी बिथरली होती की ती घरातल्या खिडक्या सुद्धा कधी उघडत नसे. कारण तिथून कोणी येईल आणि आपल्यावर हल्ला करेल, अशी भीती तिला असायची. इतकंच काय झोपताना हॅना आणि तिचा पती आपल्या पलंगाच्या बाजूला टेबलावर चाकू ठेवून झोपायचे जेणेकरून कधी हल्ला झालाच तर प्रतिकार करता यावा.

पोलिसांना या प्रकरणाचं गांभीर्य अजून समजलेलं नाही, हे पाहून हॅनाच्या सुरक्षेची जबाबदारी तिचा पती ख्रिस वेंटुराने आपल्या हातात घेतली. त्या वेबसाईटवर तो कायम दक्ष निगराणी घालत असे. कारण तिथे लोकांनी हॅनाबद्दल अर्वाच्य भाषा आणि धमक्या लिहिलेल्या होत्या. कोण हॅनाला धोका पोहोचवू शकतो, याबद्दल तो कायम जागरूक होता. आणि हे सगळं त्यांना एकट्याने करावं लागत होतं. बाहेर कोणालाच अगदी जवळच्या मित्रांनाही या सगळ्या प्रकरणाचा सुगावा लागू नये अन्यथा तपासाची प्रक्रियाच खोळंबू शकते, याची पूर्ण जाणीव त्यांना होती.

"आम्ही आमच्या मित्रांनाच या सगळ्या प्रकारापासून अनभिज्ञ ठेवतोय, याची जाणीव मला खटकत होती. इतकी मोठी गोष्ट होऊनसुद्धा मित्रांना त्याचा थांगपत्ताही न लागू देणं हे आमच्या मैत्रीतही दुरावा निर्माण करत होतं. पण तपासाची प्रक्रिया नीट पूर्ण पार पडत नाही तोपर्यंत दुसरा पर्यायच नव्हता," हॅनानं त्यादरम्यान जाणवलेली अस्वस्थता आमच्याकडे मांडली.

ॲन्डी दिसण्यावरून तरी फार समजूतदार आणि संवेदनशील वाटायचा, असं जेसिका सांगते.

फोटो स्रोत, Nikki Short/BBC

फोटो कॅप्शन, ॲन्डी दिसण्यावरून तरी फार समजूतदार आणि संवेदनशील वाटायचा, असं जेसिका सांगते.

दरम्यान काहीतरी क्षुल्लक कारण देत पोलिसांनी या प्रकरणाचा तपासच थांबवला. तेव्हा हॅना आणि ख्रिस यांच्याकडे स्वतः पुढाकार घेत तपास चालू ठेवण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. या तपासासाठी खासगी तपासनीस आणि खटला पुढे चालवण्यासाठी वकिलही त्यांना स्वतःच नेमावा लागला.

या प्रक्रियेत त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसली. 20 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स त्यांना यासाठी खर्ची घालावे लागले. पण स्वतःची सुरक्षा राखायची आणि ॲन्ड्र्यूला गजाआड करायचं असेल हे सगळं करणं त्यांना भाग होतं.

अखेरीस एक नवीन तपास अधिकारी पोलिसांनी या प्रकरणासाठी नेमला. तेव्हा कुठे तपासाच्या प्रक्रियेनं वेग धरला. पुढच्या दोन आठवड्यांच्या आतच पोलिसांनी ॲन्ड्र्यू हायलरच्या घरावर छापा टाकला. चौकशी केल्यानंतर ॲन्डीनं हे सगळं आपणच केलं होतं, हे मान्य केलं.

तेव्हा कुठे जाऊन हॅना आणि तिचा पती ख्रिस यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तपास पूर्ण होऊन ॲन्डी गजाआड झाल्यामुळे आता आपल्या मित्रांना ते सगळं काही सांगू शकणार होते. जेव्हा त्यांनी झालेला सगळा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला तेव्हा कोणाचाही यावर पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. जेसिका स्टुअर्ट ही हॅना, ख्रिस आणि ॲन्डीची चांगली मैत्रीण होती. अँडीने हॅना सोबत काय केलंय हे पहिल्यांदा ऐकल्यानंतर माझ्या पोटात तर गोळाच आला होता, अशी आठवण जेसिका स्टुअर्ट हिने सांगितली.

"जे घडलं ते ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रचंड राग आणि अस्वस्थता होती. पण ही बातमीच इतकी धक्कादायक होती की पहिल्यांदा ऐकल्यानंतर तिचं गांभीर्य काय आणि त्यावर प्रतिक्रिया काय द्यावी, हेच मला सुचत नव्हतं. मी अक्षरशः सुन्न पडले होते.

ॲन्डी माझ्यासाठी माझ्या कुटुंबातलाच एक सदस्य होता. एक अतिशय समजुतदार, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा मित्र म्हणून मी त्याला ओळखायचे. मला कधीही काहीही अडचण आली की माझा पहिला फोन त्यालाच असायचा. तोसुद्धा कधीही मला मदत करायला हजर असायचा.

हॅनासोबत असा विकृत प्रकार करणारा हा तोच व्यक्ती आहे यावर विश्वास ठेवणं आजही कठीण जातंय. खरं काय, खोटं काय हेच मला आता कळेनासं झालंय," अशा शब्दात जेसिकानं आपल्या मनातील कोलाहल व्यक्त केला.

ऐतिहासिक खटला

हा खटला ऑस्ट्रेलियासाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. या खटल्यातील घडलेल्या गुन्ह्यापासून इतर सगळ्याच गोष्टी उपरोक्त कायद्यासाठीही इतक्या नव्या होत्या त्यावर न्यायनिवाडा करण्यासाठीच्या तरतुदीच कायद्यात उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या खटल्यानं एका अर्थानं ऑस्ट्रेलियातील किंबहुना जगभरातील कायदा व्यवस्थांना आत्मपरिक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करायला भाग पाडलं. म्हणून हा खटला खऱ्या अर्थानं क्रांतीकारी ठरला.

तंत्रज्ञान ज्या वेगानं विकासित होत आहे ते पाहता भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआयच्या) आधारे होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची लाटच पसरणार आहे. आणि त्याचा तपास अथवा न्यायनिवाडा करण्यासाठी कायदा व्यवस्था आणि प्रशासन पुरेसं सज्ज नाही, असा काळजीवाहू इशारा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मागच्या अनेक दिवसांपासून देत आहेत. पण सरकार व कायदेमंडळ बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करण्यात कमी पडत आहेत.

डीपफेकसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानानं विशेषतः महिलांंना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. आणि ही नव्या प्रकारची ऑनलाईन गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करायचं, याबाबत कायदा व व्यवस्था अजूनही म्हणावी तितकी तयार दिसत नाही.

2022 मध्ये ॲन्डीला अटक झाली. पण अटक केल्यानंतर आता कोणत्या कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंदवला जावा, हेच कळायला मार्ग नव्हता. डॉपीफेक पॉर्नोग्राफी बनवणे व तिचा प्रसार करणे, असा कुठला गुन्हाच तेव्हा न्यू साऊथ वेल्स राज्यातील किंबहुना सबंध ऑस्ट्रेलियातील कायद्याच्या पुस्तकात समाविष्ट नव्हता. कारण अशा प्रकारचा गुन्हा तोसुद्धा इतक्या मोठ्या पातळीवर या देशाने आधी कधी अनुभवलाच नव्हता.

39 वर्षीय ॲन्ड्र्यू हायलरवर मग तेव्हा धमकी देणे, बदनामी करणे व गोंधळ घालणे असे गुन्हे नोंदवले गेले. पण हे सगळे गुन्हे कायद्याच्या भाषेत क्षुल्लक होते. त्याला यातून फारशी शिक्षाही झाली नसती. पण त्याने केलेला गुन्हा तर अत्यंत पाशवी होता.

पण कायद्यातंच इंटरनेटवरून केल्या गेलेल्या गुन्ह्यांसाठी गंभीर तरतूद नसल्यामुळे ॲन्डी केलेल्या कृत्याचं प्रायश्चित्त न भोगताच बाहेर सुटेल की काय, या भीतीनं हॅना पुन्हा अस्वस्थ झाली. पण स्थानिक न्यायालयानं जर त्याला कठोर शिक्षा दिली नाही तर न्यायासाठी वरच्या न्यायालयात दाद मागण्याची तयारी हॅनानं करून ठेवली होती.

हॅनासह ॲन्डीच्या विकृतीची शिकार बनलेल्या 25 पीडित महिलांनी एकत्र येऊन न्यायासाठी हा लढा द्यायचं ठरवलं. ॲन्डीनं केलेला गुन्हा गंभीर असून त्यासाठी त्याला होणारी शिक्षाही तितकीच कठोर असली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेत या सगळ्या पीडित महिलांनी एकत्र येऊन हा खटला लढवला.

मागच्या वर्षी चाललेला हा खटला या महिलांनी एकजूट दाखवत दिलेल्या या असामान्य लढाईमुळेच प्रचंड गाजला. ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जगाला या प्रकरणाची दखल घ्यायला या रणरागिणींनी भाग पाडलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

हा खटला चालू असताना साक्षीदार म्हणून जेसिकानं ॲन्डीला उद्देशून केलेली वक्तव्यं सुद्धा तितकीच गाजली.

"तू फक्त आपल्या मैत्रीलाच नव्हे तर माणूसकीला काळीमा फासला आहेस. तुझ्या या वागणुकीमुळे मी फक्त एक मित्र नाही तर बरंच काही गमावलं आहे. एरवी मित्रांमध्ये असल्यावर मी सुरक्षित असल्याची भावना आता हरवली आहे. सबंध जगच आता एक अनोळखी आणि धोकादायक जागा वाटत आहे.

आता मी सतत भीतीत असते. रात्री मला झोप लागत नाही. चुकून लागलीच तर या विचारांनी अचानक दचकून जाग येते. नवे मित्र करणं तर आता मला अशक्यच होणार आहे. कोणावर विश्वास ठेवावा की नाही? हा प्रश्न घेऊनच आता मला जगावं लागेल.

कोणताही नवीन व्यक्ती भेटला की ती तुझ्यासारखी तरी नसेल ना? ही माझ्या डोक्यातील शंका मला कुठलंच नवीन नातं निर्माण करायला परवानगी देणार नाही. तू माझं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहेस," अशा शब्दात जेसिकानं भर न्यायालयात ॲन्ड्र्यूला उद्देशून आपल्या संताप आणि हतबलतेला वाट मोकळी करून दिली.

खटल्याचं कामकाज सुरू असताना ॲन्डीनं गुन्हेगार म्हणून पीडितांची जाहीर माफी मागण्याची वेळ आली तेव्हा हॅना आणि जेसिका सरळ न्यायालयातून उठून बाहेर गेल्या.

"ॲन्डीनं केलेलं कृत्य इतकं घृणास्पद आहे की त्याने आता काहीही केलं तरी मला बरं वाटणार नाही. त्याचे कुठलेच शब्द माफीला आता पात्र नाहीत. मला हेच त्याला दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे त्याचा माफीनामा न ऐकताच मी तिथून बाहेर पडले," हॅनानं खटल्याचं कामकाज सुरू असताना तडकाफडकी न्यायालयातून बाहेर पडण्यामागचं आपलं कारण स्पष्ट केलं.

हे सगळं त्याने का केलं? या प्रश्नाचं सुनावणीदरम्यान उत्तर देताना ॲन्ड्र्यू हायलर म्हणाला की, "ते करताना मनातल्या अतृप्त इच्छा आणि वासनांना मोकळी वाट मिळत गेल्यामुळे मला छान वाटत होतं. अर्थात असं करणं चुकीचं आहे याची जाणीव मला होती. मात्र त्याचे प्रत्यक्ष परिणाम इतके गंभीर असतील आणि लोक त्यामुळे इतके दुखावले जातील याची मला कल्पना नव्हती.

आता सगळं घडून गेल्यावर मला जाणवतंय की मी किती गंभीर गुन्हा केलेला आहे. आणि माझ्या हातून झालेल्या या भयावह कृत्याबद्दल मला पश्चात्ताप होतोय. त्यामुळे मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो."

न्यायाधीश जेन कल्वर यांचं मात्र या माफीनाम्यामुळे काही समाधान झालं नाही. आरोपीला त्यानं केलेल्या कृत्याचा थोडा बहुत पश्चाताप होत असला तरी आपल्यामुळे लोकांचं आयुष्य किती प्रमाणात उध्वस्त झालंय, याची तीव्रता त्याला अजून समजलेली नाही, असं निरीक्षण नोंदवत या महिला न्यायाधीशांनी ॲन्ड्र्यू हायलरला नऊ वर्षांचा तुरुंगवास सुनावला. इंटरनेटवरून केल्या गेलेल्या गुन्ह्यासाठी दिली गेलेली ही देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा होती. त्यामुळे न्यायालयाच्या या निकालानं एक नवा मापदंड प्रस्थापित झाला.

मागच्या वर्षी अँड्र्यू हायलरला न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर हॅना आणि जेसिकानं एकमेकांना आलिंगन देऊन आनंद साजरा केला.

फोटो स्रोत, Ethan Rix/ABC News

फोटो कॅप्शन, मागच्या वर्षी अँड्र्यू हायलरला न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर हॅना आणि जेसिकानं एकमेकांना आलिंगन देऊन आनंद साजरा केला.

"हा निकाल ऐकल्यानंतर न्यायालयातील सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. इतक्या महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर कोणीतरी आमचा आवाज ऐकला, याचं समाधान मिळालं," अशी प्रतिक्रिया जेसिकाने सदर निकालानंतर दिली.

तुरुंगवास जरी नऊ वर्षांचा असला तरी 2019 सालच्या डिसेंबर महिन्यात ॲन्डी जामीन मिळण्यासाठी पात्र ठरणार आहे. निकाल लागल्यानंतर वरच्या न्यायालयात या शिक्षेविरोधात दाद मागण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

निकोल शॅकलटन या मेलबर्नमधील आर एम आय टी विद्यापीठात कायदा तज्ञ आणि प्राध्यापिका आहेत. तंत्रज्ञान आणि लैंगिक विषयांवरील कायद्यांमध्ये त्यांना विशेष जाण आहे. या निकालामुळे भविष्यातील खटल्यांसाठी एक नवा मापदंड प्रस्थापित झाल्याचं मत त्यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. "हा सगळा प्रकार म्हणजे फक्त ऑनलाईन फसवणुकीपुरता मर्यादीत नाही.

महिलांविरूद्ध होणाऱ्या या ऑनलाईन गुन्ह्यांचे पडसाद महिलांवर प्रत्यक्ष आयुष्यात होणाऱ्या हिंसाचारावर पडतात. हा मुद्दा खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी सुद्धा अधोरेखित केला," असं देखील त्यांनी सांगितलं.

या ऐतिहासिक खटल्यानंतर देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गैरवापरावर आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलियासह इतर अनेक देशांमधील कायदे व प्रशासन व्यवस्था पुरेशा सक्षम नाहीत, अशी खंत निकोल शॅकलटनसह अनेक तज्ञ व्यक्त करतात.

या प्रकरणातून धडा घेत ऑस्ट्रेलियानं संसदेत नवीन कायदा पारित केला असून या कायद्यानुसार कोणाचीही डीपफेक पॉर्नोग्राफी बनवणे व तिचा प्रसार करणे हा गंभीर गुन्हा ठरणार आहे. इतर अनेक देशही या नव्या प्रकारच्या गुन्ह्यांना अधोरेखित करण्यासाठी आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सुधारणा अजूनही अपुऱ्या असून त्यामध्ये अजूनही अनेक दोष बाकी राहिल्याचं आढळून आलं आहे.

डीपफेक पॉर्नोग्राफीवर सरसकट बंदी आणि तिचं सरसकट गुन्हेगारीकरण करण्याची नितांत गरज आहे. ते अद्याप होताना दिसत नाही. कायदा सुद्धा याबाबत बराच संदिग्ध आहे. उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये डीपफेक पॉर्नोग्राफीचा प्रसार करणं हा कायद्याने गुन्हा असला तरी ती बनवणं किंवा तिचा उपभोग घेणं हा अजूनही गुन्हा समजला जात नाही.

यात बदल करून प्रसाराबरोबरच डीपफेक पॉर्न बनवणे व त्याच्या उपभोगावरही प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा आणखी कठोर करण्यासाठीचा नवीन प्रस्ताव नुकताच ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

डीपफेक पॉर्नोग्राफी सारख्या ऑनलाइन गुन्हेगारीवर देखरेख ठेवण्यासाठी पुरेसं पोलीस बळ उपलब्ध नसणं ही एक मोठी समस्या आहे. पारंपारिक गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपलब्ध पोलीस बळ आधीच कमी पडत असताना या नव्या प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्याचं मोठं आव्हान भविष्यात जगभरातील पोलिसांसमोर असणार आहे.

पोलीस दलाची संख्या वाढवण्याबरोबरच या नव्या प्रकारच्या गुन्हेगारीचं स्वरूप समजून घेत त्याला रोखण्यासाठी नव्या मार्गांचा अवलंब करण्याचं प्रशिक्षणही पोलिसांना दिलं जाण्याची गरज आहे. अशा प्रकारचे ऑनलाईन गुन्हे हाताळण्याचं कौशल्य आणि गांभीर्य आजच्या पोलिसांना नसल्यामुळेच सुरुवातीच्या काळात हॅनाला स्वतः मैदानात उतरून गुन्हेगाराचा छडा लावण्यापासून त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यापर्यंत सगळे सोपस्कार पार पाडावे लागले होते.

मुळात असे गुन्हे आज किती मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर घडत आहेत, याकडेही पोलिसांची म्हणावी तितकी करडी नजर नाही. त्यामुळे हॅनासोबत असा ऑनलाईन गुन्हा घडलेला आहे, ही माहिती सुद्धा एका खासगी गुन्हे अन्वेषकानं सांगितल्यावरच प्रकाशात आली. हॅनाला तो अनामिक ई - मेल पाठवणारा व्यक्ती हा एक खाजगी गुन्हे अन्वेषक / तपासनीस होता.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे केल्या जाणाऱ्या या नव्या प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावणं आमच्यासाठी अधिक आव्हानात्मक असल्याचं न्यू साउथ वेल्सच्या पोलीस विभागांनं अधिकृतरित्या मान्य केलं. सोबतच अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर रोख लावण्यासाठी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासंबंधी आवश्यक ते प्रशिक्षण देऊन पोलिस बळ अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आलं.

ऑनलाईन गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी संबंधित तंत्रज्ञानातील कंपन्या आणि ई - सुरक्षा आयोगासोबत मिळून आमचं पोलीस प्रशासन काम करत असल्याचा खुलासाही न्यू साउथ वेल्सच्या पोलीस दलानं केला.

"पीडितांची बदनामी करण्याच्या हेतूनं इंटरनेटवर टाकला गेलेला हा आक्षेपार्ह मजकूर हटवण्याला आमचं प्रमुख प्राधान्य असून यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे," असा दावा ऑस्ट्रेलियातील ई - सुरक्षा आयोगाच्या प्रमुख ज्यूली इनमट ग्रँट यांनी केला. पण असा आक्षेपार्ह मजकूर बनवून तो इंटरनेटवरून प्रसारित करणाऱ्या गुन्हेगाराचा छडा लावून त्याला शिक्षा देण्याचा कायदेशीर अधिकार ई - सुरक्षा आयोगाला नाही, ही बाब सुद्धा त्यांनी अधोरेखित केली.

पोलिसांच्या मानसिकतेत आणि कार्यशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे, असं मत ख्रिस आणि हॅना ग्रंडी यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Nikki Short/BBC

फोटो कॅप्शन, पोलिसांच्या मानसिकतेत आणि कार्यशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे, असं मत ख्रिस आणि हॅना ग्रंडी यांनी व्यक्त केलं.

या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून आलेले वाईट अनुभवही ख्रिस आणि हॅना ग्रंडीसाठी तितकेच धक्कादायक आणि निराशाजनक होते.

"कायद्यांमध्ये सुधारणा आणली तरी जोपर्यंत पोलिसांच्या नाकर्तेपणावर तोडगा काढला जात नाही तोपर्यंत या सुधारित कायद्यांचाही काही उपयोग होणार नाही," अशा तीव्र शब्दात ख्रिस आपली नाराजी व्यक्त करतात.

"ॲन्डीनं जे कृत्य केलं ते तर निर्विवादपणे घृणास्पद होतं. पण या निमित्तानं पोलिसांनी दाखवलेली अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणा हा सुद्धा तितकाच डोक्यात तिडीक आणणारा आहे. साधा न्याय मिळवण्यासाठी जर वयाची तिशी पार केलेल्या दोन पीडित लोकांना आपला इतका वेळ, पैसा आणि इतर संसाधनं पोलिसांमागे खर्ची घालावा लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही," पोलीस व्यवस्थेवरील आपला राग व्यक्त करताना हॅना ग्रंडी देखील तितक्याच आक्रमक झालेल्या दिसल्या.

किमान भविष्यात तरी आमच्या सारख्या पीडितांना न्याय मिळवण्यासाठी इतका मनस्ताप सहन करावा लागू नये, इतकीच इच्छा ख्रिस वेंटुरा आणि हॅना ग्रंडी यांनी यावेळी व्यक्त केली.

मागच्या काही काळापासून अशा डीपफेक पॉर्नोग्राफीच्या गुन्हेगारीचं प्रस्थ वेगाने वाढत असून मागच्या सहा महिन्यातच न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया मध्ये अशाच दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

शाळेतील मुलांनी डीपफेकच्या मदतीने आपल्या वर्गातील मैत्रिणींचे नग्न फोटो आणि व्हिडिओ बनवून इंटरनेटवर प्रसारित केल्याचे गैरप्रकार नुकतेच उघडकीस आले असून ही समस्या कायदा व सुव्यवस्थेसाठी वरचेवर आणखी नवनवे आव्हान उभे करणार असल्याची चिन्हं आहेत.

या दुर्घटनेला आता काही वर्ष उलटून गेली आहेत. हॅना सुद्धा झालं गेलं सगळं विसरून आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करते आहे. मोठ्या कष्टांने तिने या धक्क्यातून स्वतःला सावरत आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणलेली आहे. पण वरच्या न्यायालयात अँडीला दिलासा मिळाल्यास तिच्या या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरलं जाण्याची भीती आहे.

तिच्या घरी सोफ्यावर छातीभोवती गुडघे आवळून बसलेली असताना या एकूण घटनाक्रमाकडे मागे वळून पाहताना हॅना ग्रंडी म्हणाली की, "ॲन्डीला मिळालेली कठोर शिक्षा योग्यच होती. कारण त्याने माझं आणि माझ्यासारख्या इतर मुलींचं आयुष्य कायमसाठी उध्वस्त केलेलं आहे. इंटरनेटवर त्यानं बनवलेलं हे आमचे विद्रूप स्वरूप कायमसाठी राहणार आहे."

इंटरनेटवरील आक्षेपार्ह मजकुरावर देखरेख ठेवणारी एक खास सेवा कार्यरत आहे. आपला चेहरा लावून बनवलेलं ते विद्रुप डीपफेक पॉर्न पुन्हा इंटरनेटवर येऊ नये, यासाठी हॅना ही सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीला अजूनही दरमहा पैसे देत असते.

अजूनही भविष्यात आपल्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी किंबहुना स्वतःच्या मुलांनी जर हे माझं विद्रूप केलं गेलेलं रूप चुकून इंटरनेटवर पाहिलं तर काय होईल? या भीतीनं आजही हॅनाचा तितकाच थरकाप उडतो. दुर्दैवानं आपलं उर्वरित आयुष्य तिला याच भीतीत जगावं लागणार आहे.

"फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून आपण आपल्या आयुष्यातील सुखद क्षण इतरांसोबत वाटायचा प्रयत्न करतो. घरी नवीन कुत्रा पाळायला आणला, नवीन घर विकत घेतलं, अथवा लग्न ठरलं असे आनंदाचे क्षण द्विगुणीत करण्यासाठी आपण त्याचे फोटो इंटरनेटवर टाकतो. पण याच फोटोंचं विद्रूपीकरण करत आपले हे आनंदाचे क्षण कधी पॉर्नमध्ये बदलले जातात, याची कल्पनाही आपल्याला नसते. त्या नराधमानं माझ्या आयुष्यातील अशा प्रत्येक आनंदी क्षणाला विकृत पॉर्नमध्ये बदलून टाकलं.

आता भूतकाळातील ते सुखाचे क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी म्हणून या फोटोंकडे पाहिलं की आनंद होण्याऐवजी माझ्यावर कोणी बलात्कार करत आहे, असं वाटतं. ॲन्डीनं माझं हसतखेळत चालू असलेलं आयुष्य, माझा रम्य भूतकाळ आणि आश्वासक भविष्यही त्याच्या क्षणिक विकृत लैंगिक सुखासाठी कायमचं नष्ट करून टाकलंय," हॅना ग्रंडीच्या बोलण्यात राग जास्त होता की हतबलता हे कळायला मार्ग नव्हता. कदाचित दोन्हींचं विघातक मिश्रण असलेला अटळ निराशावाद तिच्या बोलण्यातून झळकत होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.