भूल देऊन 300 मुलांचे लैंगिक शोषण, या डॉक्टरने भाचीवरही केला होता बलात्कार

फोटो स्रोत, AFP
- Author, लॉरा गोझी
- Role, बीबीसी न्यूज
सूचना : या बातमीतील तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.
फ्रान्सच्या इतिहासातील लहान मुलांच्या छळाची सगळ्यात मोठी घटना घडली आहे. फ्रान्सच्या एका कोर्टात याच महिन्यात या धक्कादायक प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे.
एका माजी सर्जनने शेकडो लहान मुलांना भुलीचं औषध देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जोएल ल स्कॉर्नेक या 73 वर्षीय डॉक्टरवर 299 लहान मुलांचा लैंगिक छळ किंवा बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. फ्रान्सच्या ब्रिटनी प्रांतात ही घटना घडली आहे.
या निवृत्त डॉक्टरने 1989 ते 2014 या काळात त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या लहान मुलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जोएल ल स्कॉर्नेकने सगळेच आरोप मान्य केले नसले तरी, यापैकी काही आरोप स्वीकारले आहेत. अनेक वर्षांच्या पोलीस तपासानंतर वायव्य फ्रान्समधल्या व्हॅनेस येथे या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनेकांना अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. ल स्कॉर्नेकला नोकरी देणारं हॉस्पिटलचं व्यवस्थापन आणि त्याचे सहकारी त्याला संरक्षण देत होते का? हेही तपासलं जाणार आहे.
विशेषतः एफबीआयने ल स्कॉर्नेक हा वेळोवेळी बाल शोषणाची माहिती देणाऱ्या वेबसाईट्सची मदत घेत असल्याबाबत फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना सूचित केलेलं होतं आणि या सूचनेनंतर हॉस्पिटल प्रशासनाने फक्त निलंबनाची कारवाई केली होती. यामुळेच हॉस्पिटल प्रशासन आणि स्कॉर्नेकचे सहकारी देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकू शकतात.
हॉस्पिटल प्रशासनाकडे ल स्कॉर्नेकला थांबवण्याच्या अनेक संधी होत्या. या मुलांशी त्याचा संपर्क येऊ नये म्हणून उपाययोजना देखील करता आल्या असत्या, मात्र असं काहीही केलं गेलं नाही.
ल स्कॉर्नेकच्या कुटुंबीयांना देखील त्याच्या या विकृत स्वभावाची कल्पना होती आणि त्याला अडवण्यासाठी त्यांनी काहीही केलं नसल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणात बाजू मांडणाऱ्या एका वकिलाने बीबीसीला सांगितलं, "त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत मौन बाळगल्यामुळेच स्कॉर्नेक अनेक दशकं हे अत्याचार करू शकला."
ल स्कॉर्नेक हा कधीकाळी अत्यंत प्रतिष्ठित सर्जन होता. त्याच्या शहरात त्याला मान दिला जायचा मात्र 2017 मध्ये स्वतःच्या भाचीवर, एका सहावर्षीय मुलीवर आणि एका तरुण रुग्णावर बलात्कार केल्याच्या संशयाखाली त्याला अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
ज्या भाचीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे ती सध्या 30 वर्षांची आहे. 2020 साली या प्रकरणात त्याला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.


त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली आणि तिथे त्यांना जे काही मिळालं ते अत्यंत धक्कादायक होतं.
त्याच्या घरात लहान मुलांच्या आकाराच्या सेक्स डॉल्स (बाहुल्या) होत्या, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे तब्बल 3 लाखांहून अधिक फोटो होते, 25 वर्षांहून जास्त काळ सुरू असलेल्या त्याच्या वैद्यकीय कारकिर्दीत त्याने केलेल्या अत्याचारांचे तपशील असलेल्या डायऱ्या होत्या. त्यामध्ये त्याने अत्यंत काळजीपूर्वक या सगळ्या अत्याचारांच्या नोंदी ठेवल्या होत्या.
त्याने लहान मुलांचा बलात्कार किंवा लैंगिक शोषण केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. डायऱ्यांमध्ये असणाऱ्या तपशिलाबाबत त्याने असा दावा केला आहे की, त्यामध्ये केवळ त्याच्या 'अतृप्त इच्छा आणि स्वप्नांची' माहिती आहे.
मात्र त्याने अनेकवेळा स्वतःचा उल्लेख करताना तो 'पिडोफाईल' (लहान मुलांवर लैंगिक शोषण करण्याची इच्छा असलेला व्यक्ती) असल्याचं म्हटलं आहे.
ल स्कॉर्नेकवर आता 100 पेक्षा जास्त बलात्कार आणि 150 पेक्षा अधिक लैंगिक शोषणाची प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
स्कॉर्नेककडे उपचारासाठी गेलेल्या काही रुग्णांनी म्हटलं आहे की, त्यांना हे स्पष्टपणे आठवतं की तपासणी करण्याच्या नावाखाली हा डॉक्टर त्यांना स्पर्श करायचा. अनेकदा या मुलांचे पालक तिथे नसताना तो त्यांना स्पर्श करायचा. आता ही सगळी मुलं प्रौढ वयाची झाली आहेत.
अनेक पीडित रुग्णांना याबाबत काहीच आठवत नाही कारण, यापैकी अनेकांना भुलीचं औषध दिलं होतं असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ल स्कॉर्नेक प्रकरणात पोलिसांनी त्यांच्याशी अचानक संपर्क साधल्यानंतर त्यांना धक्का बसला. पोलिसांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबतची अत्यंत विदारक माहिती देखील त्यांना दिली, या सगळ्याचा उल्लेख स्कॉर्नेकच्या डायऱ्यांमध्ये होता.
या डॉक्टरच्या विरोधात फ्रान्सच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा हवाला देत 'ल माँड' या फ्रेंच दैनिकाने म्हटलं आहे की, 'हे अत्याचार करत असताना स्कॉर्नेकला तो 'सर्वशक्तिमान' असल्याचं वाटायचं. तसेच अत्यंत काळजीपूर्वक जोखीम घेऊन धोक्यांसोबत खेळल्याची भावना त्याच्यामध्ये जागृत व्हायची.'
यापैकी काही कथित पीडितांनी म्हटलं आहे की, या प्रकरणात झालेल्या धक्कादायक खुलाशांमुळे त्यांना त्यांच्या आयुष्याभर अनुभवाव्या लागलेल्या अस्पष्ट लक्षणांमागची खरी कारणं कळली. त्यांच्या मनावर झालेल्या या आघातांची तीव्रता त्यांच्या लक्षात आली.
कोर्टात काही पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकील फ्रांचेस्का सेट्टा यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या अशिलांमध्ये आत्महत्या केलेल्या दोन पुरुषांच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे. हे दोन्ही पुरुष लहानपणी या डॉक्टरकडे उपचारांसाठी जात होते असा दावा केला जातोय.
फ्रान्स व्हिक्टिम्स असोसिएशनच्या ऑलिव्हिया मॉन्स यांनी अनेक कथित पीडितांशी संवाद साधला. यापैकी अनेकांना त्यांच्यासोबत घडलेल्या गुन्ह्यांचे धूसर तपशील आठवत होते, अनेकांना त्यांच्यासोबत काय घडलं हे शब्दात सांगता देखील येत नव्हतं.
ऑलिव्हिया मॉन्स म्हणाल्या, "या डॉक्टरचं हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना काही प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात झाली."
मॉन्स यांनी हेही सांगितलं की, बहुतांश पीडितांना त्यांच्यावर बलात्कार किंवा लैंगिक छळ झाल्याबाबत काहीही आठवत नाही. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करण्याआधी हे सगळेजण सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगत होते.
मॉन्स म्हणाल्या, "आज यापैकी अनेकांना मोठा धक्का बसला आहे. साहजिकच या प्रकरणाचे तपशील ऐकून ते हादरले आहेत."
यापैकी एका महिलेने फ्रेंच माध्यमांना सांगितलं की, ल स्कॉर्नेकच्या डायरीमध्ये केलेल्या उल्लेखावरून एकदा अचानक पोलीस तिच्या घरी आले. आणि त्यानंतर तिच्या डोक्यात आठवणींचा महापूर आला.
ती म्हणाली, "मला हॉस्पिटलच्या ज्या खोलीत ठेवण्यात आलं होतं, तिथे एक व्यक्ती येतोय, बेडशीट उचलतोय आणि म्हणतोय 'तिथे' सगळं ठीक आहे का हे त्याला तपासायचं आहे. हे सगळं आठवलं...त्याने माझ्यावर बलात्कार केला होता."

फोटो स्रोत, Getty Images
एका कथित पीडितेचे वकील मार्गोक्स कास्टेक्स यांनी बीबीसीला सांगितलं की, तिच्या अशिलाने एखाद्या डॉक्टरवर एवढा विश्वास ठेवला आणि त्याने असं केल्याचा मोठा धक्का बसला आहे.
कास्टेक्स म्हणाल्या, "त्यांच्यासोबत काय घडलं हे त्यांना कधीच कुणाला सांगायचं नव्हतं."
या प्रकरणातील आणखीन एक पीडित असणाऱ्या मेरी विवाहित आहेत, त्यांना मुलं आहेत. त्या म्हणाल्या की, लहान मुलांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरच्या डायरीत माझं नाव समोर आल्यानंतर पोलीस अचानक तिच्या घरी आले.
मेरी यांनी फ्रान्स ब्लुला सांगितलं, "पोलिसांनी त्याचे माझ्याबाबत जे काही लिहिलं आहे ते वाचून दाखवलं, मलाही स्वतःला ते वाचायचं होतं पण माझ्यासाठी ते अशक्य होतं. विचार करा तुम्ही एखादी हार्डकोअर पोर्नोग्राफी वाचत आहात आणि त्यामध्ये जे लिहिलं आहे ते तुमच्याचसोबत लहानपणी घडलं आहे."
मेरी यांनी सांगितलं की, त्यांच्या मनात पुरुष जातीविषयी असणाऱ्या धारणा दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी अनेक वर्षं मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली आहे. त्यांचं समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांना देखील मेरी यांना लहानपणीचा ट्रॉमा (मानसिक आघात) असल्याची शक्यता वाटायची.
त्या म्हणाल्या, "माझ्या कमकुवत स्मरणशक्तीनेच माझं संरक्षण केलं असं मला वाटायचं. पण आता पोलिसांच्या चौकशीत त्या जखमांवर बसलेल्या खपल्या पुन्हा एकदा निघाल्या आहेत. त्या घटनेची चित्रं, शारीरिक वेदना, आठवणी सगळं काही जसंच्या तसं आठवू लागलं आहे. आज असं वाटतंय की माझ्यासोबत नुकतंच हे सगळं घडलं आहे."
पोलिसांनी ल स्कॉर्नेकचा फोटो दाखवल्यानंतर त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्याचं मेरी म्हणाल्या. त्यांना अजूनही त्याची ती 'नजर' स्पष्ट आठवत होती.
हा डॉक्टर एवढा काळ अत्याचार करत राहिला आणि हे गुन्हे कधीही कसे समोर आले नाहीत, याबाबत त्यांना आश्चर्य वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. आता नेमकं असं का घडलं नाही हा भेडसावणारा प्रश्न आहे. आणि येणाऱ्या काळात या प्रकरणाच्या सुनावणीतच या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळू शकेल.
'संस्थात्मक आणि न्यायालयीन चुका'
कोर्टात झालेल्या सुनावण्यांमध्ये सुरुवातीला अनेकांनी असा दावा केला आहे की, 1980च्या मध्यापासूनच स्कॉर्नेकच्या कुटुंबीयांना त्याच्या वागण्याची माहिती होती. लहान मुलांसोबत तो ज्या विचित्र पद्धतीने वागतो ते त्यांना कळत होतं पण कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही.
स्कॉर्नेकच्या माजी पत्नीने त्यांना हे माहीत होतं हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्यांना तीन मुलं आहेत आणि स्कॉर्नेकला अटक होण्याआधी त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती.
ल स्कॉर्नेक हा डॉक्टर होता आणि त्याला ऑपेरा आवडायचा. त्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात अनेकांना त्याचा अभिमान होता. त्यांच्या छोट्या शहरात त्याला अनेकवर्षं सन्मानाने बघितलं जायचं. कदाचित यामुळेच त्याला संरक्षण मिळत होतं.
वकील फ्रेडरिक बेनोइस्ट यांनी बीबीसीला सांगितलं, "अनेक पातळ्यांवर झालेल्या हलगर्जीपणामुळे ल स्कॉर्नेकला हे गुन्हे करण्याची सूट मिळाली."
लहान मुलांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या 'द चाइल्डस व्हॉइस' या संस्थेकडून फ्रेडरिक बेनोइस्ट हा खटला लढवत आहेत. ही संस्था या घटनेत झालेल्या संस्थात्मक आणि न्यायालयीन चुका समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या चुकांमुळेच ल स्कॉर्नेक एवढी वर्षं लहान मुलांवर अत्याचार करत राहिला.

फोटो स्रोत, Getty Images
2000 सालच्या सुरुवातीलाच एफबीआयने ल स्कॉर्नेक लहान मुलांच्या शोषणाची माहिती देणाऱ्या वेबसाईट्स वापरत असल्याचा इशारा फ्रेंच अधिकाऱ्यांना दिलेला होता. त्यानंतर त्याच्यावर फक्त चार महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यावेळी त्याला कसलेही वैद्यकीय किंवा मानसोपचार घेण्याची सक्ती करण्यात आली नाही.
बेनोइस्ट म्हणाले की, फिर्यादींनी कसलीच माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली नव्हती आणि परिणामी स्कॉर्नेकवर काहीही कारवाई झाली नाही. त्यानंतरही स्कॉर्नेक डॉक्टर म्हणून काम करत राहिला, यादरम्यान त्याने अनेक लहान मुलांवर उपचार देखील केले.
2006 साली ल स्कॉर्नेकच्या एका सहकाऱ्याने त्याच्यावर असलेल्या आरोपांबाबत कुठेतरी वाचलं, त्या सहकाऱ्याला आधीपासूनच स्कॉर्नेकबाबत शंका होती. त्यानंतर त्यांनी प्रादेशिक वैद्यकीय संघटनेकडे कारवाई करण्याची मागणी केली होती.
यानंतर याबाबत एक निवाडा झाला. त्यात एक डॉक्टर अनुपस्थित राहिला आणि इतर सर्व डॉक्टरांनी स्कॉर्नेकने कसल्याही प्रकारच्या वैद्यकीय आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं. वैद्यकीय आचारसंहिता म्हणजेच मेडिकल कोड ऑफ एथिक्समध्ये असा नियम आहे की, 'डॉक्टरांनी कसल्याही परिस्थितीत रुग्णांच्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन करू नये आणि स्वतःच्या कामाबाबत कर्तव्यनिष्ठ असावं." डॉक्टरांनी केलेल्या या निवाड्यानंतर स्कॉर्नेकवर कसलीच कारवाई झाली नाही.
फ्रेडरिक बेनोइस्ट म्हणाले, "यामुळेच आमच्याकडे हे सिद्ध करणारा पुरावा आहे की स्कॉर्नेकच्या सगळ्या सहकाऱ्यांना याची कल्पना होती आणि त्यापैकी कुणीही काहीही केलं नाही. त्याला थांबवता येण्याची संधी होती पण तसं झालं नाही आणि त्याचे परिणाम भयानक झाले."
बीबीसीने याविषयी प्रादेशिक वैद्यकीय संघटना आणि फिर्यादींशी संपर्क साधला.
अखेर एका सहा वर्षीय पीडित मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर ल स्कॉर्नेकला अटक करण्यात आली. तोपर्यंत, तो एका मोठ्या पडक्या घरात, लहान मुलांच्या आकाराच्या सेक्स डॉल्सनी वेढलेल्या घरात एकटाच राहू लागला होता.
अखेर खडबडून जागं करणारी वेळ आली
ल स्कॉर्नेकने ज्या भाचीवर अत्याचार केले होते, तिच्या वकील ड्रिगेझ एका सुनावणीमध्ये स्कॉर्नेकच्या समोर बसल्या होत्या. फ्रान्सच्या नैऋत्येकडे असणाऱ्या सेंट्स कोर्टात 2020 साली ही सुनावणी पार पडली.
त्याबाबत बोलताना ड्रिगेझ म्हणाल्या, "तो अत्यंत थंड डोक्याने आणि विचार करून उत्तरं देत होता. तो खूप हुशार आहे मात्र त्याच्यात तसूभरही सहानुभूती नव्हती."
या सुनावणीमध्ये स्कॉर्नेकने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवर केलेल्या अत्याचाराचे आरोप समोर आले. मात्र ड्रिगेझ म्हणाल्या की, या सगळ्या आरोपांवर त्याने कसलीच प्रतिक्रिया दिली नाही आणि बहुतांश वेळ तो फक्त जमिनीकडे बघत होता.
सुनावणी सुरू असताना स्कॉर्नेक आणि त्याच्या सेक्स डॉल्सचे भयानक व्हीडिओ कोर्टात दाखवण्यात आले. त्याबाबत बोलताना ड्रिगेझ म्हणाल्या, "कोर्टात उपस्थित असलेला प्रत्येक माणूस त्यावेळी स्क्रीनकडे बघत होता, मी मात्र स्कॉर्नेककडे बघत होते. त्या क्षणापर्यंत त्याची नजर जमिनीला खिळलेली होती. पण व्हीडिओ सुरु झाल्यानंतर तो तिथे बघू लागला आणि ते बघत असताना त्याच्या डोळ्यात एक चमक होती."
फ्रान्सच्या व्हॅनेस शहरात या खटल्याच्या सुनावणीची तयारी सुरू आहे. कधीकाळी एका विद्यापीठाचा भाग असलेल्या इमारतीच्या तीन मोठमोठ्या हॉल्समध्ये शेकडो पीडितांची, कुटुंबीयांची आणि त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधींची व्यवस्था करण्यात आली आहे.
येत्या 24 फेब्रुवारीला या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे आणि साधारणतः जून महिन्यापर्यंत ही सुनावणी चालणार आहे.
पीडितांना बंद दरवाज्यात सुनावणीचा अधिकार आहे आणि त्यांनी तो सोडण्याची तयारी दाखवली तरच, प्रसारमाध्यमांना आणि सामान्य नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहता येणार आहे.
अनेक वकिलांना असं वाटतं की, ही सुनावणी स्कॉर्नेकवर कसलीही कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकारी आणि प्रशासनाला खडबडून जागी करणारी असेल.
या प्रकरणातील पीडितांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असणार आहे. कारण त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आपबिती त्यांना सांगता येणार आहे.
वकील फ्रांचेस्का सेट्टा यांनी सांगितलं की, जरी यातल्या अनेकांना त्यांच्यासोबत काय घडलं हे आठवत नसलं तरीही ते या प्रकरणातले पीडित आहेत. आणि त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता न केल्यामुळेच स्कॉर्नेकला हे गुन्हे करण्याची सूट मिळाली.
बेनोइस्ट म्हणाले, "पीडितांना बोलण्यासाठीची ही एक संधी असेल. या प्रकरणाची सुनावणी बंद दाराआड होणं हे माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी असेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











