जीजेल पेलिकोवर अनेक वर्षे बलात्कार केल्या प्रकरणी पतीसह 50 आरोपींना शिक्षा

स्केच

फोटो स्रोत, Reuters

    • Author, लॉरा गोझी
    • Role, बीबीसी न्यूज

फ्रान्समध्ये जीजेल पेलिको नावाच्या महिलेवर अनेक वर्ष बलात्कार केल्या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली. जीजेलचा पूर्वाश्रमीचा पती डॉमिनिक पेलिको याला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

पत्नीला झोपेच्या गोळ्या देऊन सुमारे दहा वर्ष तिच्यावर इतर पुरुषांकरवी बलात्कार केल्याप्रकरणी डॉमिनिक दोषी आहे. या प्रकरणी 50 आरोपी होते. न्यायालयाने त्यांनाही शिक्षा सुनावली आहे.

डॉमिनिक पेलिको यांना त्यांची मुलगी कॅरोलिन आणि सून अरॉर यांचे अश्लील फोटो काढल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आलं.

या प्रकरणातील सहआरोपी ज्या पियरे मार्शेल याला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकिलांनी 17 वर्षांच्या शिक्षेची मागणी केली होती. मार्शेलवर स्वतःच्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न आणि बलात्कार केल्याचा आरोप होता. पत्नीला ड्रग्ज दिल्याचाही आरोप त्याच्यावर होता.

मार्शेलने डॉमिनिककडून शिकून पाच वर्षे पत्नीला ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचं मान्य केलं होतं. याशिवाय त्याने डॉमिनिकलाही पत्नीवर बलात्कार करायला लावला. एकूण 50 जणांवर जीजेल पेलिकोवर बलात्काराचा आरोप होता.

कोणाला किती शिक्षा?

डॉमिनिक पेलिको - 20 वर्षे

ज्या पियरे मार्शेल - 12 वर्षे

चार्ली आर्बो - 13 वर्षे

ख्रिश्चन लेस्को - 9 वर्षे

लिओनेल रॉड्रिग्ज - 8 वर्षे

सिरिल डेलविले - 8 वर्षे

जॅक क्यूब - 5 वर्षे

फॅबियन सॉटन - 11 वर्षे

जोसेफ कोको - 3 वर्षे

फिलिप लेलेउ - 5 वर्षे

बोरिस मोलिन - 8 वर्षे

निकोला फ्रँकोइस - 8 वर्षे

बलात्कार करणाऱ्यांत काही तरुण तर काही म्हातारे, कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय, कुणी सडपातळ तर कुणी चांगली शरीरयष्टी असलेला. त्यांच्यात एक पत्रकार आणि डीजेबरोबर अग्निशमन कर्मचारी, ट्रक चालक, सैनिक, वॉचमन यांचाही समावेश होता.

(सूचना : या बातमीत विचलित करणारी माहिती आहे.)

या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबर महिन्यात सुरू झाली होती. आरोपींपैकी काही जण धीट असल्याचं दाखवत होते. पण तरीही बहुतांश आरोपी न्यायाधीशांच्या प्रश्नांची उत्तरं देताना गोंधळलेले दिसून आले. तसेच यापैकी काही जण उत्तर देण्यापूर्वी स्वतःच्या वकिलांकडं चोरट्या नजरेने बघत होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पेलिको दाम्पत्य ज्या मझान गावात राहतात, त्या गावाच्या 50 किलोमीटरपर्यंतच्या परिघात असलेली गावं आणि शहरांमधले हे सगळे आरोपी आहेत.

तीन बचावकर्त्यांतर्फे कोर्टात लढणारे वकील अँटोइन मिनियर म्हणाले की, "सामान्य माणसं असामान्य गोष्टी करतात."

त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "मला वाटतं कोणतीही व्यक्ती अशा प्रकरणांत अडकू शकते. अर्थात अशाच प्रकरणात अडकू शकते, असं म्हणता येणार नाही. पण कोणत्याही सामान्य माणसाकडून अशा पद्धतीचा गंभीर गुन्हा घडू शकतो."

'शरीराने तिच्यावर बलात्कार केला, मेंदूने नाही'

सरकारी वकिलांनी वेगवेगळ्या आरोपांखाली या आरोपींचा शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यात संबंधित आरोपी कितीवेळा पेलिको यांच्या घरी आले? त्यांनी जीजेल यांना कितीवेळा लैंगिक स्पर्श केला किंवा प्रत्यक्ष सेक्स केला होता का? याचा समावेश आहे.

आरोपींपैकी एक असलेले जोसेफ सी. हे 69 वर्षांचे आहेत. ते निवृत्त क्रीडा प्रशिक्षक असून त्यांना नातवंडंही आहेत. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

फिर्यादींनी ज्या शिक्षा ठोठावण्याची मागणी केलेली आहेत, त्यातली ही सगळ्यात कमी कालावधीची शिक्षा आहे.

दुसरीकडे 63 वर्षांच्या रोमेन व्ही. यांना तब्बल 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. रोमेन एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांनी सहावेळा जीजेल यांच्यावर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रोमेन यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, 'त्यांनी अनेकवर्षं उपचार घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरातून एचआयव्हीचा विषाणू गिसेल यांच्या शरीरात गेला असल्याची शक्यता खूपच कमी आहे.'

न्यायालयीन सुनावणीचं स्केच

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, न्यायालयीन सुनावणीचं स्केच
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉमिनिक पेलिकोने या गुन्ह्यांचं व्हीडिओ चित्रीकरण केलेलं असल्यामुळे, फिर्यादींच्या वकिलांकडे सबळ पुरावे आहेत. याच पुराव्यांच्या जोरावर बलात्काराच्या गुन्ह्यातले एवढे बारीक तपशील त्यांना कोर्टात मांडता आले आहेत.

मुख्य आरोपी असणाऱ्या डॉमिनिक पेलिकोने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मान्य केले आहेत. तसेच इतर 50 सहआरोपीही या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिलेली आहे.

व्हीडिओ पुराव्यांमुळे एकाही आरोपीला 'आम्ही कधीच पेलिको यांच्या घरी गेलो नाही' असा दावा करता आलेला नाही.

मात्र, यातले बहुतांश आरोपी बलात्काराच्या गंभीर आरोपांमधून स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, कारण या आरोपांमुळे त्यांना मोठी शिक्षा होऊ शकते.

'हिंसाचार, बळजबरी, धमकी किंवा आश्चर्यकारक'पद्धतीने केलेलं कुठलेही लैंगिक कृत्य म्हणजे बलात्कार होय. फ्रान्सच्या कायद्यात बलात्काराची व्याख्या अशी करण्यात आलेली आहे. या तरतुदींमध्ये कुठेही संमतीची गरज असल्याचा उल्लेख केलेला नाही.

'जीजेल पेलिको या संमती देण्याच्या अवस्थेत नाहीत, याची आरोपीना कसलीही कल्पना नव्हती,'आणि त्यामुळे त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावता येणार नाही, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी फ्रान्सच्या कोर्टात केला आहे.

एक बचावकर्त्या वकिलाने सांगितलं की, "हेतू असल्याशिवाय कुठलाही गुन्हा घडत नाही."

स्वयंसेवी अग्निशामक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ख्रिश्चन एल. यांनी म्हटलं की, "माझ्या शरीराने तिच्यावर बलात्कार केला, पण माझ्या मनाने तसं केलं नाही."

या पन्नास आरोपींपैकी काहींनी अशी कारणं देत, त्यांच्या कृत्याचं समर्थन केल्याचं दिसून येतं.

या पन्नास आरोपींपैकी एकावर जीजेल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आलेला नाही. त्यांचं नाव आहे जीन-पियर एम. आणि ते 63 वर्षांचे आहेत. आरोपपत्रामध्ये ते डॉमिनिक पेलिकोचे 'शिष्य' असल्याचं म्हटलं आहे.

जीन यांनीच अंमली पदार्थ देण्याची पद्धत सांगितली होती. तिचाच वापर करून लैंगिक अत्याचार केल्याचं नंतर त्यांना समजलं.

डॉमिनिक पेलिकोला भेटल्यामुळे हा गुन्हा घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फिर्यादींनी जीन-पियर यांना 17 वर्षांची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे.

पेलिकोने आम्हाला फसवलं

54 वर्षांचे अहमद टी. हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत. ते प्लम्बर म्हणून काम करतात. तीस वर्षांपूर्वी त्यांनी लहानपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केलं आहे.

कोर्टात अहमद म्हणाले की, 'जर त्यांना एखाद्या बाईवर बलात्कार करायचा असता, तर त्यांनी यासाठी घरात असणाऱ्या एखाद्या बाईची निवड केलीच नसती.'

रेदुवान ए. हे आणखी एक चाळीस वर्षांचे आरोपी आहेत. सध्या ते बेरोजगार आहेत. त्यांनी असं म्हटलंय की, 'त्यांना जीजेलवर बलात्कारच करायचा असता तर त्यांनी त्या कृत्याचा व्हीडियो का करू दिला असता?'

बचावकर्त्यांपैकी एकाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, डॉमिनिक हा घृणास्पद चारित्र्याचा माणूस असल्यामुळे त्याने आरोपींना हे कृत्य करण्यास भाग पाडलं.

रेदुवान ए हे आणखी एक आरोपी आहेत. त्यांनी अत्यंत रडवेल्या स्वरात सांगितलं की, बेडरूममधून बाहेर पडण्याची त्यांना प्रचंड भीती वाटत होती. त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं की, "कदाचित व्हीडिओ बघून तुम्हाला समजणार नाही, पण मी खरोखर खूप घाबरलो होतो."

इतर आरोपींनी म्हटलं आहे की, त्यांना अंमली पदार्थ मिसळलेली पेये (ड्रिंक्स) पाजण्यात आली आणि त्यामुळे त्यादिवशी नेमकं काय घडलं हे त्यांना आठवत नाही. मात्र डॉमिनिक पेलिकोने अशी पेये पाजल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

जीजेल पेलिको प्रकरणातील आरोपी

फोटो स्रोत, Getty Images

बहुतांश आरोपींनी डॉमनिकने आम्हाला फसवल्याचं म्हटलं आहे. डॉमिनिकने यापैकी अनेकांना हा एक सेक्स गेम असल्याचं सांगितलं आणि सगळं काही संमतीने होत असल्याचं भासवलं, असं अनेकांचं म्हणणं आहे.

आरोपी जोसेफ सी.चे वकील क्रिस्टोफ ब्रुची यांनी बीबीसीला सांगितलं की, "त्यांना अशा परिस्थितीत गोवून त्यांची फसवणूक करण्यात आली."

डॉमिनिक पेलिकोने मात्र अनेकवेळा हे स्पष्ट केलं आहे की, त्याने या सगळ्यांना अनेकवेळा हे सांगितलं होतं, की जीजेल यांना याची कसलीही कल्पना नव्हती.

डॉमिनिकने त्यांना सूचना दिल्या होत्या की, जीजेल यांना झोपेतून उठवू नका आणि ते तिथे आले असल्याची कसलीही खूण सोडू नका.

जीजेल यांना स्पर्श करण्यापूर्वी हात गरम करा आणि सेक्स करण्याआधी कसलाही परफ्युम लावू नका किंवा सिगारेट ओढू नका, अशाप्रकारच्या सूचना दिल्याचं डॉमिनिकने सांगितलं.

डॉमिनिक म्हणाला की, "त्या सगळ्यांना हे माहिती होतं की, ते याला नकार देऊ शकत नाहीत."

आरोपींची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती?

सप्टेंबरपासून आतापर्यंत अविनोच्या कोर्टात 50 आरोपी हजर झाले आहेत. सामान्यत: बलात्काराच्या गुन्ह्याच्या तपासाला अनेक दिवस लागतात. परंतु या प्रकरणात सर्वकाही स्पष्ट होते.

43 वर्षांचे सायमन एम हे बांधकाम कामगार आहेत. ते 11 वर्षांचे असताना त्यांच्यावर बलात्कार झाला असल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलं. एका कौटुंबिक मित्राकडून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचं ते म्हणाले.

झिऑन-लुस 46 वर्षांचे आहेत आणि त्यांना चार मुलं आहेत. फ्रान्समध्ये येण्यापूर्वी ते लहानपणी थायलंडमधील निर्वासितांच्या छावणीत राहत होते आणि तिथेच त्यांना व्हिएतनाममध्ये एका बोटीवर टाकून देण्यात आलं.

39 वर्षीय फॅबियन यांना यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. अंमली पदार्थांची तस्करी आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.

फॅबियन यांनी सांगितलं की, लहानपणी त्यांचाही खूप छळ करण्यात आला. आणि त्यांना आई-वडील नाहीत.

कोर्टाने मनोविकार तज्ज्ञाकडे तपासणीसाठी जायला सांगितल्यानंतर, या आरोपींपैकी अनेकांना लहानपणी त्यांच्यासोबत झालेल्या छळाची आठवण झाली. फॅबियन यांनी देखील त्याचवेळी हे सगळं सांगितलं.

या सगळ्या आरोपींचं असं म्हणणं होतं की त्यांचं ज्या पद्धतीने संगोपन झालं, त्यामुळे ते हा गुन्हा करण्यास प्रवृत्त झाले.

या आरोपींच्या पत्नी, जोडीदार (लाईफ पार्टनर) आणि कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या वर्तनाबद्दल त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगण्यात आलं.

या आरोपींच्या नातेवाईकांना जबाब नोंदवताना खूप त्रास झाला. कारण त्यांच्या आयुष्यात कशापद्धतीचे लोक होते हे ऐकून त्यांना खूप धक्का बसला होता.

ख्रिश्चन एलचे वडील म्हणाले, "मला धक्काच बसला आहे. मला तो असा असेल असं कधीच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळेच माझ्या आयुष्यात आनंद होता."

अग्निशमन दलाच्या जवानाचे बालपणही तपासले जात आहे. त्याचे वडील म्हणाले, "काहीतरी घडले असेल. तो नैराश्यात असण्याची शक्यता आहे. मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहीन."

54 वर्षांचा वर्षीय थियरी पा हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याची आधीची बायको क्रोनी म्हणाली की, "थियरी नेहमीच तिच्याशी आणि मुलांशी चांगलं वागायचा. त्यांना सन्मानाने वागवायचा." क्रोनी त्यांच्या पतीला माफ करू शकतात असं वाटतं.

कोर्टाबाहेर जीजेल पेलिकोचे समर्थन करणाऱ्या महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोर्टाबाहेर जीजेल पेलिकोचे समर्थन करणाऱ्या महिला

क्रोनी म्हणाल्या की, "जेव्हा त्याने मला त्याच्यावर कोणते आरोप लावण्यात आले आहेत हे सांगितलं, तेव्हा माझं उत्तर होतं की नाही हे अशक्य आहे. तो इथपर्यंत कसा पोहोचला हे मला कळत नाहीये."

क्रोनीचा असा विश्वास आहे की, त्यांच्या 18 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे थियरी नैराश्यात गेला असेल. तिथूनच त्याने दारू पिण्यास सुरुवात केली आणि अखेरीस डॉमिनिकशी संपर्क साधला.

या प्रकरणात सगळ्यात तरुण असणाऱ्या 27 वर्षीय जॉन के.चा जन्म गयानामध्ये झाला. त्याने फ्रेंच सैन्यात सेवा बजावली आहे. त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी म्हणाली की, "काहीही झाले तरी मी त्याच्या पाठीशी नेहमीच उभी राहीन."

जॉन के यांनी जीजेल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. जीजेल बेशुद्ध असल्याचं त्यांना माहिती होतं, पण सेक्ससाठी त्यांची संमती नाही याची कल्पना जॉन यांना नसल्याचं म्हटलं आहे.

समीरा नावाच्या महिलेने अश्रू ढाळत सांगितले की, 'साडेतीन वर्षांपासून जेरोम व्ही सहा वेळा पेलिकोच्या घरी का गेला, असा प्रश्न तिला पडला होता.'

"आम्ही रोज सेक्स करायचो, त्यामुळे त्याला दुसरीकडे का जावं लागलं? ते मला समजत नाही," तिने रडत रडत हे सांगितलं. ती अजूनही जेरोम व्ही सोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि जेरोमच्या अटकेच्या वेळी ग्रीनग्रोसरमध्ये काम करत होती.

जेरोम व्ही हे आणखीन एक आरोपी आहेत, ज्यांनी जीजेलवर बलात्कार केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

जीजेल पेलिको काय म्हणाल्या?

जीजेल म्हणतात की, त्या शुद्धीत असतानाच या सगळ्या आरोपींनी त्यांच्यावर बलात्कार केला आहे.

बचावकर्त्यांपैकी अनेकांच्या पत्नी आणि जोडीदारांनी स्वतःच्या तपासण्या करून घेतल्या आहेत. जीजेल यांच्याप्रमाणे त्यांच्या जोडीदारांनी त्यांना अंमली पदार्थ दिले आहेत का? हे तपासण्यासाठी त्यांनी चाचण्या करून घेतल्या.

यापैकी एका महिलेने सांगितलं की, त्यांना नेहमी अशी शंका असायची की, जो माणूस त्यांचा एवढा सन्मान करतो, जो अत्यंत गंभीर आहे. त्याने तिला अमली पदार्थ देऊन असा प्रकार तर केला नसेल?

एवढ्या मोठ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना जोडणारा एक सामान धागा काय असू शकतो? हे शोधण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच केला गेला.

स्केच

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनावणीदरम्यान काही आरोपींनी आरोप स्वीकारले तर काहींनी ते नाकारले.

जीजेल यांच्या वकिलांनी सांगितलं की, "हे सगळे आरोपी त्यांच्या मर्जीने पेलिको यांच्यासोबत गेले होते का? या प्रश्नाचं उत्तर अनेक प्रयत्न करूनही मिळालेलं नाही."

या सगळ्या आरोपींमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. आणि ती म्हणजे या सगळ्यांनीच जाणून बुजून पोलिसांकडे तक्रार करण्याचं टाळलं. अग्निशामक म्हणून काम करणारे जॅक सी. म्हणाले की, त्यांनी असं करण्याचा विचार केला होता, पण ते झालं नाही.

55 वर्षांचे पॅट्रिस एन. म्हणाले की, "मला माझा संपूर्ण दिवस पोलीस स्टेशनमध्ये वाया घालवायचा नव्हता."

'या आरोपींनी डॉमिनिक पेलिको यांच्या प्रभावाखाली हे सगळं केलं,' असं म्हणणं उचित ठरेल का? हे सुनावणीच्या सुरुवातीला जीजेल पेलिको यांना विचारण्यात आलेलं होतं.

नकारार्थी मान हालवत जीजेल म्हणाल्या की, "त्यांच्यावर बंदूक रोखल्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केलेला नाही. ते पूर्ण शुद्धीत होते आणि माझ्यावर बलात्कार करत होते."

जीजेल यांनी प्रतिप्रश्न केला की, "असं असेल तर ते पोलिसांकडे का गेले नाहीत? त्यांनी निनावी कॉल केला असता तरी मी वाचले असते."

थोडावेळ शांत राहिल्यानंतर त्या म्हणाल्या की, "मात्र असं कुणीही केलं नाही....कुणीच नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.