'मी सकाळी उठले की सर्व पूर्वीसारखं असायचं', बायकोला बेशुद्ध करून पतीने भाडोत्रींकरवी केले अनेकदा बलात्कार

फोटो स्रोत, Reuters
- Author, लॉरा गोझ्झी
- Role, फ्रान्स
“बलात्कारासारख्या गोष्टीला शुल्लक ठरवत स्वतःला मॅचो समजणाऱ्या फ्रान्सच्या पुरूषसत्ताक समाजासाठी बदलायची हीच वेळ आहे,” जिसेले पेलिकोट फ्रान्सच्या कोर्टात पोटतिडकीने हे सांगत होत्या.
जिसेले यांना गुंगीची औषधं देऊन अनेकांनी त्यांच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी जिसेले यांच्या नवऱ्यासह 51 लोकांवर खटला चालवण्यात आला. जिसेले यांच्या पतीनंच इतर लोकांना पत्नीवर बलात्कार करण्यासाठी बोलावलं होतं.
मंगळवारी कोर्टात या खटल्याचा शेवटचा जवाब नोंदवताना जिसेले यांनी या सगळ्या प्रकरणाला “भ्याडपणे चालवण्यात येणारा खटला” असं म्हटलं.
बेशुद्धावस्थेत असलेल्या जिसेले यांच्यावर बलात्कार करण्यासाठी ऑनलाइन संपर्क साधून अनेकांना घरी बोलावत त्यांच्यावर अत्याचार करायला लावल्याचं, त्यांचे पूर्वाश्रमीचे पती डॉमिनिक पी. यांनी मान्य केलं. दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मंगळवारी सुरू असलेल्या सुनावणीत बचाव पक्षाच्या वकिलांनी जिसेले यांच्यावर अजूनही त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा दबाव असल्याचं सांगितलं. त्यामुळं त्या अजूनी पूर्णपणे त्यांच्या विरोधात बोलू शकत नसल्याचं सांगितलं. त्यामुळं कोर्टात गोंधळ माजला.
सप्टेंबरमध्ये खटल्याची सुरुवात झाल्यापासूनच जिसेले कोर्टात प्रत्येक सुनावणीसाठी उपस्थित राहात आहेत. ॲव्हिग्ननच्या कोर्टात सुरू असलेली ही सुनावणी सगळ्या जगाला ऐकता, पाहता यावी यासाठी त्यांनी त्यांची ओळख गोपनिय ठेवण्याच्या अधिकारावरही पाणी सोडलंय.
या प्रकरणाने फक्त फ्रान्सलाच नाही तर संपूर्ण जगाला धक्का बसलाय. गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार करण्याच्या समस्येकडे यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय.
पण यावरून फ्रान्समधील बलात्काराच्या व्याख्येत परवानगी या संकल्पनेचा उल्लेख करावा की नाही याबद्दल चर्चा सुरू झालीय.
(सूचना : या बातमीत विचलित करणारी माहिती आहे.)
मंगळवारची सुनावणी हा खटल्यातील आरोपी पुरूषांच्या वकिलांसाठी शेवटची संधी होती. जिसेले यांच्या पूर्वाश्रमीच्या पतींनी त्यांना बलात्कार करण्यासाठी फसवलं असल्याचं वकिलांना न्यायाधीशासमोर पटवून द्यायचं होतं.
बलात्काराचा आरोप असलेले जवळपास 15 पुरूष एका बाजुला आरोपीच्या पिंजऱ्यात बसले होते. तर दुसऱ्या पिंजऱ्यात डॉमिनिक आपल्या तळहातावर हनुवटी ठेवून शांतपणे बसले होते.
जिसेले यांच्यावर बलात्कार केल्याचं जवळपास 50 लोकांनी मान्य केलं आहे. तर अनेकांनी हे आरोप धुडकावून लावले आहेत.


बलात्कार करणाऱ्या पुरूषांवर तसं करण्यासाठी दबाव टाकला किंवा त्यांना अंमली पदार्थ दिले होते का? असा प्रश्न डॉमिनिक यांना कोर्टात विचारा होता. तेव्हा त्यांनी “अजिबात नाही,” असं ठामपणे सांगितलं.
स्वतःचा बचाव करण्यासाठी ते असा युक्तिवाद करत आहेत असंही, डॉमिनिक पुढे म्हणाले.
डॉमिनिक यांना त्यांच्या कुटुंबीयांना, विशेषतः त्यांची मुलगी कॅरोलीन हिला काही सांगायचे आहे का? असंही जिसेले यांच्या वकिलांनी विचारला.

फोटो स्रोत, Benoit PEYRUCQ/AFP
डॉमिनिक यांच्या लॅपटॉपर त्यांच्या कॅरोलीनचेही अर्धनग्न फोटो सापडले होते. ‘माय नेकेड डॉटर’ असं त्या फाईलचं नाव होतं. त्याबद्दल विचारल्यावर त्यांनी खोलीत बसलेल्या त्यांच्या मुलीकडे पाहत म्हटलं, “मी तिची अवस्था पाहिली आहे, कॅरोलीन मी तुला कधीही हात लावला नाही.”
त्यावर कोर्टात वडिलांवर ओरडे कॅरोलिन म्हणाली की, “तुम्ही खोटं बोलत आहात, या खोट्या बोलण्याला मी कंटाळले आहे, असाच तुमचा शेवट होईल.”
दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेव्हा कोर्टरूममध्ये शुकशुकाट पसरला. नंतर डॉमिनिक यांनी हातांनी स्वतःचं डोकं धरलं.
जिसेले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण कुटुंबातले इतर सदस्य डॉमिनिक यांच्याकडं रागानं पाहत होते.
जिसेले भूमिका मांडणार त्यापूर्वी 50 आरोपींपैकी फिलिप एल बोलू लागले. डॉमिनिक यांनी त्यांना घरी बोलावलं आणि स्वतःच्या बायकोवर बलात्कार करण्याचा आग्रह केला तेव्हा धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं.
बलात्काराचा आरोप नाकारताना आणि त्याविषयी स्पष्टीकरण देताना आरोपीनं, "मी त्यावेळी बुद्धीनं नव्हे तर वेगळ्या गोष्टीने (लैंगिक अवयवाने) विचार करत होतो, " असा युक्तिवाद केला.

फोटो स्रोत, Reuters
फिलीप एल बाहेर गेले तेव्हा जिसेले पुन्हा बोलू लागल्या. बंद दरवाज्या आड खटला चालवण्याचा त्यांचा अधिकार त्यांनी सोडला तेव्हाच त्यांनी सारं काही स्वीकारलं होतं. पण आता त्यांना मानसिक थकवा आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिसेले यांना असंही विचारण्यात आलं की, बलात्कार केल्याचं मान्य करणारे आणि नाकारणारे यांच्यात काय फरक आहे. त्यावर “सगळेच माझ्यावर बलात्कार करायलाच आले होते. सगळेच गुन्हेगार आहेत,” असं त्यांनी म्हटलं.
कोर्टात ज्या आरोपींनी बलात्कार केल्याचं मान्य केलं, त्यांच्या डोळ्यात डोळे घोलून पाहिल्याचं जिसेले म्हणाल्या.
“कोर्टात उभं राहून बलात्कार केल्याचं नाकारणारेही मी पाहिले. पण त्यांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा मिस पेलिकोट यांनी त्यांनी कधी परवानगी दिली?” हे विचारायचं असल्याचं ते म्हणाले.
“मला फसवलं गेलं, चलाखीनं तसं करायला लावलं, पाणी प्यायलो त्यातून अंमली पदार्थाची नशा माझ्यावर चढली अशी बरीच कारणं या पुरूषांनी दिली. पण हे सगळं त्यांना कधी कळालं?” असंही जिसेले पुढं म्हणाल्या.
एकिकडं मुलंही वेगळं नाव वापरत असताना, नवऱ्यापासून वेगळं झाल्यावरही त्या जुनं आडनाव वापरतात हेही त्यांना विचारलं.
त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, ॲव्हिन्गनच्या कोर्टात पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या मुलांना या नावाची लाज वाटू लागली होती. पण त्यांीनातवंड मात्र अजूनही तेच नाव लावतात.
“आजीबद्दल त्यांना अभिमान वाटावा असं मला वाटतं,” असं त्या म्हणाल्या. माझं नाव आता जगभर माहीत झालंय. त्यांना त्या नावाची लाज वाटता कामा नये. त्यांच्या या उत्तराने कोर्टात शांतता पसरली होती.
बचाव पक्षाच्या वकील नादिया-एल-बॉऊरोमी यांनी जिसेले यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा कोर्टातलं वातावर तापलं. जिसेले पती सोडून इतर सर्व आरोपींबद्दल खूप वाईट शब्द वापरत होत्या, असं त्या म्हणाल्या.
“माफ करा पण तुमच्याकडे पाहून तुम्हाला कधी रडू येईल असं मला वाटतच नाही,” असं नादिया म्हणाल्या. त्यांचा आक्रमक पावित्रा पाहून लोकांमध्ये, कोर्टात उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्येही कुजबूज सुरू झाली. अनेक लोकांनी नकारार्थी माना हलवल्या.
सकाळी उठल्यानंतर रात्री काहीतरी घडलं असल्याची कोणतीही चिन्हं दिसली नसल्याचं जिसेले यांनी सांगितलं. “असं कधीच झालं नाही. मी उठायचे तेव्हा रात्री झोपताना असतील तेच कपडे माझ्या अंगावर असत. सगळं नेहमीसारखंच असायचं,” असं त्या म्हणाल्या.
पण, नवऱ्याने नकळत दिलेल्या गुंगीच्या औषधामुळे आरोग्यावर होत असलेल्या परिणामांवर उपचार करत 10 वर्ष घालवली असल्याचं त्या म्हणाल्या.
“मी मरावं किंवा एखाद्या मानसिक रुग्णालयाच जावं असं मला वाटत होतं. आता मी 72 वर्षांची आहे आणि माझ्याकडे अजून किती दिवस उरलेत मला माहिती नाही,” असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Benoit PEYRUCQ/AFP
डॉमिनिक यांच्या लॅपटॉपमध्ये असणाऱ्या मुलगी कॅरोलीन हीच्या फोटोंबद्दलही बचाव पक्षाच्या वकिलांनी जिसेले यांना विचारलं.
त्यावेळी त्यांची मुलं कोर्टातून बाहेर गेली आणि काही वेळाने परतली. तेव्हा “हा कौटुंबिक खटला नाही,” असं जिसेले म्हणाल्या.
बचाव पक्षाच्या वकिलांनी जिसेले यांच्यावर अजूनही त्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या नियंत्रणात असल्याचं आणि त्याच्या विरोधात बोलत नसल्याचा आरोप केला. त्यावेळी त्या शांतपणे उभ्या होत्या. दोन्ही पक्षाचे वकील एकमेकांशी तावातावाने युक्तिवाद करत होते. न्यायाधीशाला मध्ये पडून हा वाद थांबवावा लागला.
त्यानंतर शेवटी डॉमिनिक यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये पोलिसांना दिलेला जवाब वाचला गेला. एका महिलेच्या स्कर्टच्या आतलं चित्रिकरण करताना डॉमिनिक यांना सुपरमार्केटच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने पकडलं होतं, तेव्हाचा हा जवाब होता.
यामुळंच पोलिसांना त्यांच्या पत्नीवर इतर पुरूष बलात्कार करत असतानाचे हजारो व्हीडिओ सापडले होते. जे काही झालं होतं त्याची जिसेले यांना कल्पनाच नव्हती. जे काही घडलं त्यासह 2011 ते 2020 या काळात त्यांना गुंगीची औषधं दिली गेली असल्याचं त्यांना माहितीही नव्हतं.
डिसेंबरच्या शेवटी या प्रकरणी निकाल लागल्यानंतर हा खटला संपणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











