'होय, मी बलात्कारी आहे'; नवऱ्यासह 15 जणांनी आरोप स्वीकारले, ड्रग्ज देऊन 10 वर्षे बलात्कार

फोटो स्रोत, Getty Images
(या बातमीतील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)
डॉमिनिक पेलिको या 71 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या बायकोला ड्रग्स देऊन तिच्यावर अत्याचार करण्यासाठी अनेक लोकांना पैसे दिल्याचा आरोप होता.
गेल्या दहा वर्षापासून हे कृत्य हा आरोपी करत होता. त्याच्यावर या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.
2 सप्टेंबर 2024 रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. डॉमिनिक यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप स्वीकारले आहेत.
डॉमिनिक यांच्याबरोबर तिथे 50 इतर आरोपी होते. त्यांच्यावर डॉमिनिक यांची पत्नी (पूर्वाश्रमीची) जिसेल यांच्यावर बलात्कार करण्याचा आरोप होता. त्या आरोपींकडे बघत ते म्हणाले, “मी सुद्धा या लोकांसारखाच बलात्कारी आहे.”
“त्यांना सगळं माहिती होतं. ही गोष्ट ते नाकारू शकत नाही,” असं ते म्हणाले.
या 50 आरोपींपैकी फक्त 15 लोकांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. बहुतांश लोकांनी आपण फक्त लैंगिक कृत्यात सहभाग घेतल्याचं म्हटलं आहे.
डॉमिनिक यांच्या पत्नीबद्दल ते म्हणाले, “तिच्याबरोबर हे सगळं व्हायला नको होतं. मी तिच्याबरोबर खूप आनंदी होतो.”
डॉमिनिक यांनी त्यांची पत्नी आणि कुटुंबाची माफी मागितली. ते म्हणाले, “तुम्ही मला माफ करणार नाही, हे माहिती असून सुद्धा मी तुम्हा सर्वांची माफी मागतो.”
थोड्यावेळाने जिसेल यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली. त्या म्हणाल्या, “हे सगळं ऐकणं माझ्यासाठी अतिशय कठीण आहे. गेल्या 50 वर्षापासून मी या माणसाबरोबर राहत आहे. तो असं काही करेल याची मी कधी कल्पनाही केली नाही. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला.”
कोर्टात कॅमेरे आणण्यास परवानगी नव्हती. तरी जिसेल यांच्या विनंतीनंतर ही सुनावणी सर्व जनतेसाठी खुली करण्यात आली होती. या सुनावणीच्या सुरुवातीलाच आपलं नाव जाहीर करावं असं सांगितलं होतं. त्यांच्या लीगल टीमच्या मते, सुनावणी सुरू झाल्यावर जी काही लाज वाटेल ती आरोपींना वाटेल.


मंगळवारी जेव्हा कोर्टरुमने ब्रेक घेतला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आला. तो त्यांनी स्मिताहास्य ठेवून स्वीकारला.
जेव्हापासून सुनावणी सुरू झाली आहे तेव्हापासून जिसेल धैर्याचं प्रतीक झाल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या शेवटी फ्रान्समधील विविध शहरात लोक एकत्र आले आणि त्यांनी जिसेल यांना आणि बलात्कार झालेल्या इतर पीडितांना पाठिंबा दिला. या सुनावणीमुळे वैवाहिक बलात्कार, संमती,आणि परवानगीशिवाय ड्रग्स देणं यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
डॉमिनिक पेलिको हे वडील आणि आजोबा आहेत. आपला युक्तिवाद करताना त्यांनी कोर्टाला त्यांच्या बालपणी आलेल्या अनुभवांचं कथन केलं. ते नऊ वर्षाचे असतांना एका पुरुष नर्सने त्यांच्यावर अत्याचार केला होता असं ते म्हणाले.
जिसेल यांच्याबरोबरच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, तिचे परपुरुषाबरोबर प्रेमसंबंध आहेत हे कळल्यावर त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते.

फोटो स्रोत, Handout
मंगळवारी आपली बाजू मांडताना आपण आपल्या बायकोचा कधीही द्वेष केला नाही, असं ते वारंवार कोर्टाला सांगत राहिले. मी तिच्यासाठी वेडा होतो, मी तिच्यावर खूप प्रेम केलं आणि आजही करतो असं ते म्हणाले.
“मी तिच्यावर 40 वर्ष चांगल्या पद्धतीने प्रेम केलं आणि दहा वर्ष वाईट पद्धतीने,” असं ज्या दहा वर्षात त्यांनी बायकोला ड्रग्स दिले आणि तिच्यावर अत्याचार केले त्या दहा वर्षांबद्दल ते बोलत होते.
पेलिको यांची स्टेफान बबोनो यांनी उलटतपासणी घेतली. ते जिसेल यांच्या वकिलांच्या टीममधील एक वकील आहेत. आपल्या बायकोला आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत हे दिसल्यावरही त्यांना हा छळ का थांबवावासा वाटला नाही असा प्रश्न वकिलांनी त्यांना विचारला.
सुनावणीच्या आधीच्या सत्रात जिसेल म्हणाल्या की, त्यांना अल्झायमर किंवा वजन कमी होणे, केस गळणे, यामुळे त्यांना ब्रेन ट्युमर होत आहे अशी चिंता सतावत आहे. मात्र नवऱ्याने त्यांना जे ड्रग्स दिले त्याचेच हे परिणाम आहेत.

या बातम्याही वाचा :

“मी बरेचदा थांबण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या व्यसनाची तीव्रता खूप जास्त होती. माझी गरज दिवसेंदिवस वाढत होती.” डॉमिनिक म्हणाले.
“मी तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिचा विश्वासघात केला होता. मी खूप आधीच थांबायला हवं होतं. खरंतर हे सगळं मी सुरूच करायला नको होतं.” असं ते पुढे म्हणाले.
पेलिको यांच्यावर त्यांच्या मुलीला सुद्धा ड्रग्स देण्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. कॅरोलिनचे अर्ध नग्न फोटो त्यांच्या लॅपटॉपवर सापडल्यावर हा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी हा आरोप आधी फेटाळला होता. मंगळवारी ते म्हणाले की, त्यांनी आपल्या नातवंडांना कधीच वाईट पद्धतीने स्पर्श केला नाही.
“मी माझ्या कुटुंबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो की बाकी काहीही वावगं झालेलं नाही,” ते म्हणाले.
पेलिको म्हणाले की, 2010 मध्ये ते इंटरनेटवर ते एका पुरुष नर्सला भेटले आणि तेव्हापासून ते ‘लंपट’ झाले. या नर्सने त्यांना बायकोला गुंगीचं औषध देण्याबद्दल सुचवलं. हे औषध कसं द्यायचं हे स्पष्ट करून सांगितलं आणि ड्रग्स दिलेल्या काही बायकांचे फोटोही शेअर केले.
“तेव्हापासून हे मला उमजलं आणि या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली,” असं त्यांनी सांगितलं.
मंगळवारी झालेल्या सुनावणीत ज्या पुरुषांनी त्यांच्या बेशुद्ध बायकोवर अत्याचार केले त्यांचे व्हीडिओ तयार करण्याबद्दल प्रश्न विचारले गेले. तपास अधिकाऱ्यांना हे व्हीडिओ सापडले. ज्या 50 लोकांवर बलात्कार करण्याचा आरोप आहे त्यांचा शोध घेण्यासाठी हे व्हीडिओ उपयुक्त ठरले.
पेलिको यांनी मान्य केलं की, त्यांनी हे व्हीडिओ ‘आनंद’ म्हणून आणि एक प्रकारचा ‘इन्शुरन्स’ म्हणून तयार केले.
काल झालेल्या सुनावणीत अनेक आरोपी म्हणाले की, ते बलात्कार करत आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना असं वाटत होतं की ते जिसेल यांच्याबरोबर संमतीने लैंगिक संबंध ठेवत आहे. मात्र या भूमिकेचं खंडन करण्याबद्दल पेलिको अतिशय ठाम होते.
सर्व आरोपींना ते ‘विदाऊट हर नॉलेज’ नावाच्या एका चॅट रूममध्ये भेटले. या वेबसाईटवर आता बंदी घालण्यात आली आहे. या वेबसाईटवर पॉर्नोग्राफिक मजकूर होता.
“मी कोणालाही बळजबरी केली नाही. ते मला शोधत आले. त्यांनी मला विचारलं की ते येऊ शकतात का आणि मी हो म्हणालो. मी कोणालाही हातकड्या घातल्या नाहीत की ड्रग्स दिले नाहीत,” ते म्हणाले.
काही आरोपींच्या मते पेलिको यांनी त्यांचे फसवणूक केली आहे. त्यांना वाटलं की, ते एका शृंगारिक खेळात भाग घेत आहेत. जिथे जिसेल यांना शरमल्यासारखं वाटत असल्यामुळे त्या फक्त झोपण्याचं नाटक करत आहे. आपल्या कृत्याचं व्हीडिओ शूटिंग होत आहे याही आरोपाचा अनेकांनी इन्कार केला.
मात्र, पेलिको म्हणाले की, त्यांनी फक्त त्यांच्या बायकोची फसवणूक केली आहे. आपण करत असलेल्या कृत्याचं व्हीडिओ शूटिंग होत आहे याचं त्या पुरुषांना नक्कीच भान असणार असंही ते म्हणाले. “तिकडे एक ट्रायपॉड लावला होता आणि त्याला स्क्रीन जोडली होती. खोलीत येताच सगळ्यांना हे स्पष्ट दिसतं.”
पेलिको म्हणाले की, “त्यांची बायको पीडित आहे आणि ती या गुन्ह्यात वाटेकरी नाही हे त्यांना सांगायचं होतं. तिच्या माहिती शिवाय हे सगळं कृत्य केलं आहे हे त्यांना सिद्ध करायचं होतं. मला माहिती आहे की अनेक आरोपींना हे पटणार नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
बियाट्रीस झव्हारो हे डॉमिनिक यांच्या वकील आहेत. त्यांनी फ्रेंच टीव्हीशी बोलताना सांगितलं लोक त्यांच्या आशिलाविषयी काय विचार करतील हे त्यांना माहिती नव्हतं पण ते खरी माहिती देत आहेत.
त्यापुढे म्हणाल्या की, “पेलिको हे अतिशय तळागाळातील व्यक्ती आहेत. त्यांनी माफीची याचना केली आहे. त्याबद्दल त्यांची पत्नी काय निर्णय घेईल याची मला कल्पना नाही. त्यांचा कबुलीजबाब सुरू आहे आणि तो सुरू राहील. आम्ही या सुनावणीच्या शेवटपर्यंत जाऊ आणि डॉमिनिक पेलिको यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना सविस्तर माहिती मिळेल."
पेलिको यांना किडनीचा संसर्ग आणि किडनी स्टोन झाले आहेत. त्यामुळे एक आठवडा ते कोर्टात उपस्थित राहू शकले नाहीत. ते दिवसभर त्यांची बाजू मांडतील. त्यादरम्यान त्यांना नियमित विश्रांती सुद्धा दिली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











