बायकोवर बलात्कार करण्यासाठी अनेक अनोळखी पुरुषांना त्याने आपल्या घरी बोलवलं, काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ल्यूसी क्लार्क- बिलिंग्स
- Role, बीबीसी न्यूज
या बातमीत विचलित करणारी माहिती आहे
अंमली पदार्थ देऊन आपल्या पत्नीवर वारंवार बलात्कार करणे, तसंच तिच्यावर बलात्कार करण्यासाठी अनेक व्यक्तींना बोलावणे या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
71 वर्षीय डॉमिनिक पी. याने अनोळखी माणसांचा ऑनलाइन शोध घेऊन घरी बोलावून पत्नीवर बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे. हा प्रकार गेली दहा वर्षं सुरू होता.
पीडित महिलेला इतके अंमली पदार्थ देण्यात येत असत की आपल्यावर असा लैंगिक अत्याचार होतोय हेही तिला कळत नसे. या घटनेने फ्रान्समध्ये सध्या खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत 72 माणसांनी 92 वेळा बलात्कार केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. 50 माणसांची ओळख पटवण्यात आली असून नवऱ्याबरोबर या व्यक्तींवरही कारवाई सुरू आहे.
पीडित महिला आता 72 वर्षांची आहे. 2020 मध्ये पोलिसांनी सांगितल्यावर त्यांना आपल्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलं.
हा संपूर्ण खटला हा त्यांच्यासाठी अतिशय त्रासदायक अनुभव असणार आहे असं त्यांच्या वकील अँटोनी कॅमस म्हणाल्या. कारण त्या पहिल्यांदाच या घटनेचे पुरावे व्हीडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत.
“गेली अनेक वर्षं त्यांच्यावर जो बलात्कार झाला ते सगळे क्षण अशा पद्धतीने पुन्हा त्यांच्यासमोर येतील.” त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं,
सप्टेंबर 2020 मध्ये एका सुरक्षा रक्षकाने डॉमिनिक यांना एका शॉपिंग सेंटरमध्ये तीन बायकांच्या स्कर्ट खालून शूटिंग करताना पाहिलं तेव्हा पोलिसांना त्याचा संशय आला आणि त्याची चौकशी सुरू केली.
पोलिसांना त्याच्या कॉम्प्युटरवर त्यांच्या बायकोचे बेशुद्धावस्थेत असलेले हजारो फोटो आणि व्हीडिओ दिसले.
या फोटोत या जोडप्याच्या घरात झालेल्या अनेक कथित लैंगिक अत्याचाराचे पुरावे आहेत. हा अत्याचार 2011 मध्ये सुरू झाल्याचा संशय आहे.
तसंच तपासकर्त्यांना डॉमिनिकच्या कॉम्प्युटरवर एका वेबसाइटवरचे चॅट्स सापडले आहेत. त्याच वेबसाइटच्या माध्यमातून त्यांनी अनोळखी लोकांना घरी बोलावून बायकोवर बलात्कार करण्यास सांगितलं.
आपण बायकोला अतिशय तीव्र अशी गुंगीची औषधं दिल्याचे आरोपीने तपासकर्त्यांसमोर कबूल केलं आहेत. त्यात अँटी- अँक्झायटी ड्रगचाही समावेश आहे.
बलात्कारात भाग घेऊन, त्यांनी त्याचं चित्रण केलं आणि इतर पुरुषांना अश्लील भाषा वापरायला सांगितली असंही फिर्यादींचं म्हणणं आहे.
यात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही.


ज्या व्यक्तींवर बलात्काराचे आरोप आहेत ते 26 ते 74 वयोगटातले आहे. समाजातील सर्व स्तरातल्या व्यक्तींचा त्यात समावेश आहे. काहींनी एकदा तर काहींनी सहा वेळा यात भाग घेतला होता असं फिर्यादींचं म्हणणं आहे.
या जोडप्याला त्यांची फँटसी पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करत होतो, असं या लोकांपैकी काही जणांचं म्हणणं आहे. पण ही गोष्ट त्यांना देखील ठाऊक होती की डॉमिनिक हा बायकोच्या परवानगीशिवाय तिला ड्रग्स देत होता आणि त्यानंतर त्या महिलेवर अत्याचार केले जात होते.
डॉमिनिकनेच ही माहिती पोलिसांना दिलेली आहे.
एका तज्ज्ञाच्या मते पीडितेची अवस्था ‘झोपेपेक्षा कोमाकडे झुकणारी होती.”
डॉमिनिक पी म्हणाला की जेव्हा तो नऊ वर्षांचा होता तेव्हा त्याच्यावर बलात्कार करण्यात आला होता.
डॉमिनिकचे वकील बेट्रीस झावरो यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे की डॉमिनिक आता खटल्यासाठी तयार आहे. तो त्याच्या कुटुंबाला आणि बायकोला उत्तर देण्यास तयार आहे असं झावरोंनी सांगितलं.
डॉमिनिकवर 1991 मध्ये सुद्धा बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याने हे आरोप फेटाळले होते. नंतर 1999 मध्येही त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. डीएनए चाचणीनंतर त्याने हा गुन्हा कबूल केला.
हा खटला दक्षिण फ्रान्समधील अविग्नन येथील पार्क दे एक्स्पोझिशन्स येथे पार पडणार असून 20 डिसेंबरपर्यंत हा खटला चालेल.
AFP ने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या तीन मुलांबरोबर कोर्टात आल्या होत्या.
त्यांचे वकील कॅमस म्हणाले की त्या 'इन कॅमेरा' (इन कॅमेरा सुनावणीत खटल्याचे कामकाज सर्वसाधारण जनतेसाठी खुले नसते ) सुनावणीसाठी सुद्धा आग्रह करू शकत होत्या पण त्यांच्या ‘हल्लेखोरांना हेच हवं होतं.’ त्यामुळे तसं करणं टाळलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)










