फ्रान्समधील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे पॉर्न फॅन्टसीचं भयंकर रूप समोर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लुईस चून
- Role, थेरपिस्ट-मॅचिंग प्लॅटफॉर्म वेलडूइंगच्या संस्थापक आणि सायकोलॉजीज मासिकाच्या माजी संपादक
(इशारा : सदरील लेखातील काही भागात लैंगिक अत्याचाराचं वर्णन करण्यात आलेलं आहे.)
फ्रान्ससह जगाला हादरवून सोडणाऱ्या जीजेल पेलिको बलात्काराच्या खटल्याचा अंतिम निकाल गुरुवारी लागला. हा खटला आता संपलेला असला तरी या दुर्घटनेचे पडसाद लोकांच्या मनावर खोलवर पडलेले आहेत.
माझ्या संपर्कात आलेली प्रत्येक महिला या घटनेमुळे अवस्थ झालेली पाहायला मिळाली.
अॅव्हिन्यॉन न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याकडे मी गेल्या काही दिवसांपासून करडी नजर ठेवून होते.
दिवसागणिक समोर येत आलेला या खटल्यातील प्रत्येक खुलासा हा अकल्पित आणि तितकाच भयावह होता.
माझ्या मैत्रिणी, मुली, सहकारी आणि मी भाग घेत असलेल्या बूक क्लब मधील महिलांसोबतही मी या खटल्यासंबंधी चर्चा केली. या बलात्काराकडे पाहण्याचा महिलांचा दृष्टीकोन काय आहे आणि या खटल्याचा काय प्रभाव त्यांच्यावर झालाय याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी केला.
जवळपास 10 वर्ष जीजेल पेलिकोचा पती डॉमिनिक पेलिको तिला गुप्तपणे तिच्या नकळत गुंगीचं औषध देऊन इतर पुरूषांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी आमंत्रण देत राहिला.
इंटरनेटवरून अशा इच्छुक कामूक पुरूषांना हेरत आपल्याच बायकोवर बलात्कार करण्यासाठी डॉमिनिक त्यांना बोलवायचा आणि हा संभोग तो कॅमेरामध्ये स्वतः चित्रित देखील करायचा.
या दुष्कर्मासाठी डॉमिनिकने 50 पेक्षा जास्त पुरूषांना आमंत्रित केलेलं होतं. 22 ते 70 अशा सगळ्याच वयोगटातील हे पुरूष वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले होते.
अग्निशामक दलातील कर्मचारी, परिचारक, पत्रकार, तुरुंगाधिकारी, सैन्यातील जवान आणि अजून बरेच जण याच समाविष्ट होते. विकृत लैंगिक आवड हाच काय तो या सगळ्यांमधील एक समान धागा.
स्त्रीचा देह उपभोगण्याची इतकी हवस या सगळ्यांमध्ये भरलेली होती की जे शरिर आपण उपभोगत आहोत ते आपल्या आजीच्या वयाच्या जेष्ठ महिलेचं आहे आणि तिला औषध दिल्यानं ती बेशुद्ध अवस्थेत आहे, याचंही भान त्यांना राहिलं नव्हतं.
एका जुन्या बाहुलीप्रमाणे निपचित पडलेल्या मृतवत शरिराचा ते रानटी बनून संभोग घेत होते.
पती डॉमिनिकसह इतर 50 पुरुषांना या खटल्यातील गुन्हेगार म्हणून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
हे सगळे जण दक्षिण फ्रान्समधील मझान या छोट्याशा शहरातील पेलिको दांपत्याच्या घरापासून 50 किलोमीटरच्या परिघातच राहायला होते.
नृशंस बलात्कारी असलेले हे सगळे पुरुष एरवी त्यांच्या देहबोली वरून कुठल्याही इतर साधारण पुरुषाप्रमाणेच भासतील.


तिशीतील एक तरुणी मला म्हणाली की, "मी पहिल्यांदा या घटनेबद्दल वाचलं तेव्हा मी मुळापासून हादरून गेले. मला समस्त पुरुष जातीचीच भीती आणि घृणा वाटू लागली. जवळपास एक आठवडा कुठल्याच पुरूषाच्या जवळ सुद्धा मी जाऊ शकले नाही. इतकंच काय माझा स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याची देखील मला भीती वाटत होती. इतकी मी हादरले होते."
पीडित जीजेल पेलिकोच्याच वयाची असणारी साठी पार केलेल्या दुसऱ्या एका जेष्ठ महिलेला देखील हाच प्रश्न सतावत होता.
आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या पुरुषांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार रेंगाळत असतील, हाच प्रश्न मला या घटनेनंतर पडू लागला.
इतरांचं जाऊ द्या माझा पती आणि माझ्या मुलाजवळ तरी मी सुरक्षित आहे का? अशी शंका माझ्या मनात या घटनेनंतर उत्पन्न होऊ लागल्याचं त्यांनी सांगितलं.
"ही घटना म्हणजे हिमनग आहे की हिमनगाचं फक्त समोर आलेलं टोक? या विचारानं सगळ्या पुरूषांबाबत मला शंका आणि घृणा वाटू लागली होती" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

फोटो स्रोत, Reuters
61 वर्षीय डॉक्टर स्टेला डफी या एक मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आणि लेखिका आहेत.
पेलिको खटल्याचा अंतिम निकाल समोर आल्यानंतर इंन्स्टाग्रामवरून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया मोठी बोलकी होती.
त्या लिहितात की, "सगळेच पुरुष काही बलात्कारी नसतात, असं मी मानते. किंबहुना अशी मला किमान आशा तरी आहे. पण जीजेल पेलिकोंच्या गावातील महिलांनाही असंच वाटत होतं. स्वतः जीजेल पेलिकोंलाही कधीकाळी असंच वाटत असेल. पण वास्तव अगदीच विपरीत निघालं. या खटल्यामुळे प्रत्येकाचे डोळे विस्फरलेले आहेत. या घटनेनंतर पुरुषांकडे बघण्याचा महिलांचा दृष्टिकोन बदललाय. मी आशा करते की पुरुष यावर विचार करून इतर पुरूषांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन देखील बदलतील. किमान तसा प्रयत्न तरी करतील."
आता हा खटला संपलाय. निकाल लागलाय.
आरोपींना शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाय. पण या निमित्तानं काही गंभीर प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभे राहिलेले आहेत. त्यांची उत्तरं शोधणं खचितच सोप्पं नाही.
इतक्या क्रूर आणि विकृत पद्धतीनं वागण्याची इच्छा या पुरुषांच्या मनात उत्पन्नच कशी होते? यातून त्यांना नेमका काय आनंद मिळतो?
संमतीशिवाय आपण करत असलेला हा संभोग म्हणजे बलात्कार आहे, इतकी साधी गोष्ट त्यांना कळत नाही का? आणि यापेक्षा या निमित्ताने उभा राहिलेला सर्वात मूलभूत प्रश्न म्हणजे इतक्या छोट्या शहरात इतक्या मोठ्या संख्येनं पुरूषांना स्त्रीची अवहेलना करत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा होत असेल तर एकूणच पुरूषांचा लैंगिक कल नेमका कुठल्या दिशेने चालला आहे?
इंटरनेटनं बदलले लैंगिकतेचे आयाम
जीजेल पेलिकोवर झालेला बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराला या पुरुषांच्या विकृतीबरोबरच इंटरनेटही तितकाच हातभार लावलेला आहे.
डॉमिनिक पेलिकोनं इंटरनेटवरील एका वेबसाईटवरून आपल्या पत्नीवर बलात्कार करण्यासाठी या सगळ्या पुरुषांना आमंत्रित केलं होतं.
एखाद्या जाहिरातीप्रमाणे हा सगळा प्रकार झाला. ही फ्रेंच वेबसाईट गोपनीय असल्यामुळे तिच्यावर कुठल्याही प्रकारची निगराणी होऊ शकली नाही.
इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स खोऱ्याने आढळून येतात. या वेबसाईट्सच्या माध्यमातून समान लैंगिक कल असलेल्या लोकांना एकमेकांनी संपर्क साधता येतो. याच माध्यमाचा वापर करून हे लोक आपली विकृती फक्त प्रत्यक्षातच उतरवत नाहीत तर तिचा प्रचार आणि प्रचार करुन या पापातले भागिदारही शोधून काढतात.
अशा वेबसाईट्समुळे या विकृतींना एका प्रकारे मान्यता आणि प्रोत्साहन मिळतं. समान आवड असणारे लोक गोपिनायतेचं कवच उपलब्ध असल्यामुळे कुठलीही तमा न बाळगता आपल्या विकृती निर्धोकपणे प्रसवत राहतात.
या खटल्यानंतर ही संबंधित वेबसाईट आता बंद करण्यात आलेली आहे. मात्र इंटरनेटवर अजूनही अशा अनेक वेबसाईट्स कार्यरत आहेत.
पीडित जीजेल पेलिकोच्या वकिलांनी या वेबसाईटची तुलना हत्येसाठी वापरल्या गेलेल्या शस्त्रासोबत केली.
ही वेबसाईट जर उपलब्ध नसती तर हे आरोपी इतकी मोठा गुन्हा करूच शकले नसते. त्यामुळे या वेबसाईटनं आरोपींच्या हातातील कोलीत म्हणून काम केल्याचं वक्तव्य या वकिलांनी न्यायालयात सुनावणी दरम्यान केलं होतं.
अशा वेबसाईट्स व्यतिरिक्त एकूणातच लोकांच्या विशेषतः पुरूषांच्या लैंगिकतेचे आयाम बदलण्यातही इंटरनेटची मोठी भूमिका राहिली आहे.
एरवी अतिरेकी आणि विचित्र मानल्या गेलेल्या लैंगिक कृत्यांनाही मान्यता / स्वीकारार्हता मिळण्यामागे इंटरनेटवरील पॉर्नचा भडिमार हे एक मोठं कारण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पूर्वीची पिवळी पुस्तकं, चावट मासिकं आणि दुकानात सीडींमधून चोरून विकल्या जाणाऱ्या ब्ल्यू फिल्म्सची जागा आता पॉर्नहबसारख्या इंटरनेट वेबसाईट्सनी घेतलेली आहे.
अशा वेबसाईट्समुळे पॉर्न पाहणं अगदी सोप्पं झालेलं आहे. अशा गोष्टी आधी बरीच शक्कल लढवून चोरून पाहाव्या लागत असत. त्यामुळे हे प्रकार पाहिले जाण्याचं प्रमाणही कमी होतं.
इंटरनेटमुळे एका क्लिकवर पॉर्न सहज समोर येतं. त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक रोज पॉर्न पाहत आहे.
2024 च्या जानेवारी महिन्यात एकट्या पॉर्नहब वेबसाईटला 1140 कोटी वेळा लोकांनी भेट दिली.
यावरून लोक जगभरात किती मोठ्या प्रमाणात पॉर्नचा उपभोग घेत आहेत, याचा अंदाज येईल. बहुतांश पॉर्न हे अतिरंजित असतात.
असे पॉर्न सारखे पाहत राहिल्याने यात दाखवली जाणारी लैंगिक कृत्य देखील योग्यच आहेत, असा भ्रम पाहणाऱ्याला होतो.
वारंवार या अतिरंजित लैंगिक कृत्यांचा डोळ्यासमोर भडिमार झाल्यामुळे मग सामान्य लैंगिक कृती दर्शकाला निरस आणि कंटाळवाणी वाटू लागते.
पॉर्न मध्ये दाखवल्या जाणाऱ्या कृत्यांचं आकर्षण आणि अनुकरण करायची इच्छा पाहणाऱ्यांमध्ये उत्पन्न होऊ लागते. ही अतिरंजित लैंगिक कृत्य अवाजवी आणि महिलांची अवहेलना करणारी आहेत, याची जाणीव पॉर्न पाहणाऱ्या पुरूषांना होत नाही.
किंबहुना अशी अवाजवी लैंगिकता आणि अतिरेकी संभोगच समाधानकारक शिवाय योग्य देखील आहे, असा चुकीचा संदेश पुरूषांच्या मनामध्ये पेरण्याचं काम या इंटरनेट पॉर्नमधून होतं.
2024 च्या जानेवारी महिन्यात इंग्लंडमध्ये 25 ते 49 या वयोगटातील इंटरनेट वापरकर्त्यांचं एक सर्वेक्षण घेण्यात आलं.
या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या दहा पैकी एकानं वेळोवेळी आपण पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. यातले बरेच जण तर रोज पॉर्न पाहत असत.
पॉर्नचा सतत उपभोग घेणाऱ्या या लोकांमधील बहुतांश जण पुरुष होते.
24 वर्षांची डेझी नुकतीच विद्यापीठातून पदवीधर होऊन बाहेर पडली आहे. तिच्या ओळखीचे बहुतांश लोक, मित्र - मैत्रिणी पॉर्न पाहतात. ती सुद्धा पाहते. पण स्त्रीवादी पॉर्न बघण्याला तिचं प्राधान्य असतं.
स्त्रीवादी पॉर्न म्हणजे ज्यात लैंगिक कृत्य करताना पुरूषाबरोबरच संबंधित महिलेच्या लैंगिक सुखालाही तितकंच महत्व दिलं जातं.
तिच्या काही पुरूष मित्रांशी देखील मी बोलले. त्यातल्या काहींनी पॉर्न बघणं आता सोडून दिलं आहे. अतिरंजित पॉर्नमुळे अवाजवी अपेक्षा निर्माण होतात.
या अपेक्षा अर्थात वास्तवात संभोग करताना पूर्ण होणं अशक्य असतं. त्यामुळे प्रत्यक्षातील संभोग निराशाजनक आणि कंटाळवाणा वाटू लागतो. म्हणून आम्ही आता पॉर्न बघणं बंद केल्याचं त्यांनी सांगितलं.
इंग्लंड सरकारच्या बालकल्याण विभागात काम करणारे अधिकारी डेम रिचेल डि सुझा यांनी 2023 सालच्या एका संशोधनाचा दाखला देत खुलासा केला की, "आजच्या 16 ते 21 वयोगटातील मुलांनी अगदी शाळेत असतानाच इंटरनेटवर पहिल्यांदा पॉर्न पाहिलं होतं. आज कमी वयात मुलांवर इतका पॉर्नचा भडिमार होत आहे. शिवाय पॉर्नही वरचेवर आणखी उग्र होत गेलेलं आहे. त्यामुळे मागच्या पिढीनं पाहिलेला अश्लील / मादक मजकूर आजच्या पिढीला अगदीच फिका भासतो. अधिकाधिक अवाजवी आणि अवास्तव अश्लील / मादक मजकूराला नवीन पिढी इंटरनेटवरील पॉर्नच्या सहज उपलब्धतेमुळे सरसावली आहे."
पॉर्नमुळे सेक्स प्रती लोकांची धारणा बदलू शकते का?
पौगंडावस्थेत पदार्पण करण्यापूर्वीच लहान वयातच पॉर्न बघण्याचं प्रमाण चिंताजनक पद्धतीनं वाढलेलं आहे.
इतक्या लहान वयात पॉर्न पाहिल्यामुळे मोठं झाल्यावर या मुलांच्या लैंगिक धारणा आणि कल अगदी बदललेले असतात.
उदाहरणादाखल मादक मजकूर म्हणून 20 व्या शतकात लोक प्लेबॉय सारखी मासिकं वाचत / पाहत असत. त्यानुसार त्या काळातील लोकांच्या लैंगिक इच्छा / आकांक्षा देखील आकाराला आल्या.
आता 21 व्या शतकात पॉर्नमुळे लोकांच्या लैंगिक इच्छा / आकांक्षा त्यापेक्षा वेगळ्या झालेल्या आहेत. स्पष्टच भाषेत बोलायचं झाल्यास 20 व्या आणि 21 व्या शतकातील लोकांना लैंगिक उत्तेजना वेगवेगळ्या गोष्टीतून मिळते.
पॉर्न हे या फरकामागचं प्रमुख कारण म्हणता येईल. पॉर्नच्या प्रभावामुळे पुरुषांची लैंगिकता वरचेवर आणखी धोकादायक, अवाजवी आणि मुख्य म्हणजे स्त्रीद्वेषी बनत चालल्याचं पुराव्यानिशी सिद्ध होत आहे.
कोरोना महामारी येण्याअगोदर यासंबंधी एक संशोधन सरकारमार्फत केलं गेलं होतं.
"पॉर्न बघितल्यानंतर त्यामध्ये दाखवली जाणारी अवाजवी लैंगिक कृत्य करण्याची इच्छा पुरूषांमध्ये निर्माण होते आणि तसे प्रयोग ते खऱ्या आयुष्यात महिलांसोबत करायचा प्रयत्न करतात", असं या संशोधनात म्हटलं गेलं.

पॉर्नबाबत इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

पॉर्नमधील दृश्यांमध्ये महिलेच्या तोंडावर फटके मारणं, गळा दाबून तिला गुदमरवायचा प्रयत्न करणं, अतिरेकी बळाचा वापर करून शिश्न महिलेच्या मुखात कोंबण्याचा प्रयत्न करणं, तिच्या अंगावर थुंकणं असे प्रकार दाखवले जातात.
विशेष म्हणजे हे सगळे प्रकार केल्यानं महिलादेखील सुखावत असल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पॉर्न बघणाऱ्या पिढीला हे सगळे अतिरेकी लैंगिक कृत्य सामान्य आणि समाजमान्य वाटू लागतात.
डेझी म्हणाली की, "संभोग करताना महिलेचा गळा दाबणं आता इतकं सामान्य झालं आहे की नवा पिढीचे बहुतांश लोक ते सहज करतात. जणू काही ती मानेचं चुंबन घेण्याइतपत सामान्य गोष्ट आहे. मी मागे माझ्या एका जोडीदारासोबत असताना त्याला आधीच सांगितलं होतं की मला ही गोष्ट आवडत नाही. त्याने सुद्धा माझं ऐकलं आणि आम्ही तो प्रकार कधी केला नाही. पण सगळ्याच मुली माझ्यासारखं स्पष्ट बोलू शकत नाही. त्यामुळे जोडीदार म्हणेल त्या लैंगिक कृती करायला तयार होतात. आणि माझ्या अनुभवानुसार पुरूषांना बेडरूममध्ये बायकांवर वर्चस्व गाजवायला आवडतं. त्यामुळे असे लैंगिक आक्रमणाचे प्रकार पुरूषांकडून बायकांवरच होतात. हेच उलट म्हणजे बायकांकडून पुरूषांवर कधी होताना दिसत नाही."
डेझीपेक्षा तब्बल 40 वर्षांनी मोठ्या असलेल्या सुझेन नोबेल यांनी आपल्या लैंगिक आयुष्याबद्दल वेळोवळी विस्तारानं लिहिलेलं आहे.
लैंगिक संबंधांबाबत त्यांना बरीच जाण देखील आहे. वयस्क लोकांना लैंगिक संबंधांबाबत सल्ला देणारी सेक्स एडवाईस फॉर सिनीयर्स नावाची स्वतंत्र वेबसाईट आणि पॉडकास्ट देखील त्या चालवतात.
बलात्काराच्या दृश्यांना कामूक आणि उत्तेजित करणारा मजकूर म्हणून दाखवणं, हे पॉर्नचं समस्येचं मूळ कारण असल्याचं त्या सांगतात.
"संभोगादरम्यान महिलेवर बळाचा वापर करून तिच्यावर बळजबरी करणं हे योग्य असल्याचा भ्रम असे पॉर्न पुरूषांच्या मनात तयार करतात. शिवाय अशी लैंगिक हिंसा आपल्यावर झालेली खुद्द महिलांनाही हवीच असते, असं चित्र या पॉर्नमधून रेखाटलं जातं. पण बघणारा हे विसरतो की ते पॉर्न म्हणजे सगळं रचलेलं कृत्रिम कथानक आहे. या सगळ्या बळजबरीने केल्या जात असलेल्या लैंगिक कृती प्रत्यक्षात फक्त अभिनय आहे. ते सगळं खरंखुरं नव्हे. बलात्कार आणि पॉर्नमधील अभिनयातून बळजबरीने केला जात असल्याचं दाखवणारा संभोग यातला फरक लोकांनी समजून घेण्याची गरज आहे," असं मत त्यांनी बीबीसीशी बोलताना मांडलं.
इंटरनेटवरील एका छोट्या जाहिरातीनं माजवली खळबळ
इंटरनेटमुळे फक्त मोबाईलच्या पडद्यावर पॉर्न बघण्यापर्यंतच लोक थांबलेले नाहीत. तर खऱ्या आयुष्यातही नवनव्या धाडशी लैंगिक आकांक्षांना प्रत्यक्षात उतरवण्याचं साधन इंटरनेट लोकांना देऊ करत आहे.
आधी वेगळ्या धाटणीचे लैंगिक प्रयोग करायला जोडीदार शोधण्यासाठी लोक ठराविक मासिकाच्या एका छोट्या कोपऱ्यात जाहिराती देत असत. किंवा पोस्ट ऑफिस बॉक्सेसचा उपयोग करत असत. पण हा सगळा प्रकार अतिशय गैरसोयीचा आणि क्लिष्ट असायचा. यात बराच वेळ जायचा. शिवाय नाव समोर येऊन बदनामीची भीती देखील असायची.
आता लोकांना घरबसल्या मेल उपलब्ध आहेत. लोकांच्या मोबाईलमध्ये अॅप्स आहेत. ठराविक लैंगिक कृत्यांची आवड असणाऱ्या लोकांचे वेगवेगळे समूह इंटरनेटवर असतात.
त्याद्वारे लोक एकमेकांशी सहज कुठल्याही एरवी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टी बोलू शकतात. इतकंच काय प्रत्यक्षात भेटून लैंगिक संबंधही सहज प्रस्थापित करू शकतात.
इंग्लंडमध्ये नात्यासाठी किंवा फक्त ठराविक लैंगिक संबध ठेवण्यापुरता तात्पुरता जोडीदार शोधण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ॲप्सचा आसरा घेत आहेत.
वेगळ्या किंवा अतिरेकी समजल्या जाणाऱ्या लैंगिक इच्छांना प्रत्यक्षात उतरवू शकणारे संभाव्य जोडीदार शोधून देणारे विशिष्ट ॲप्स आज घडीला इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
असंच एक फील्ड नावाचं ॲप इंग्लंडमध्ये बरंच लोकप्रिय आहे. पॉलीएमरी, बॉन्डेज, सबमिशनपासून समाजमान्य नसलेल्या अथवा परिघाबाहेरच्या तुमच्या सगळ्या लैंगिक इच्छांची पूर्तता करण्यासाठी जोडीदार शोधून देण्याचं काम हे ॲप्स करतात.
अशी वेगळी समान लैंगिक आवड / कल असलेले आपल्यासारखे लोक या ॲप्सवर सहज मिळून जातात. शिवाय हे ॲप्स तुम्हाला अनामिक ठेवून तुमच्या गोपनीयतेची काळजी सुद्धा घेतात.
अल्बर्टिना फिशर या एक मानसोपचारतज्ज्ञ आणि लैंगिक संबंधांच्या समुपदेशक आहेत. कामाच्या निमित्ताने लोक आपल्या सेक्शुअल फॅन्टसी त्यांना सांगतात. त्यामुळे लैंगिकतेचे विविध पदर त्यांंना चांगलेच माहिती आहेत.
सेक्शुअल फॅन्टसी असण्यात काही चुकीचं नाही. फक्त या फॅन्टसीतून कुठलीही कृती करताना आपण आधी आपल्या जोडीदाराला विश्वासात घेऊन त्याची संमती घेणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters
महिला आणि पुरूषांच्या सेक्शुअल फॅन्टसी या वेगवेगळ्या असतात, असं त्या सांगतात.
"बीडीएसएम (बॉन्डेज, डिसिप्लीन, सॅडिजम आणि मॅसोचिझम) ही आजकाल लोकप्रिय सेक्शुअल फॅन्टसी आहे. या सगळ्या गोष्टी करणं तसं काही अनैतिक किंवा धोकादायक नाही. पण या लैंगिक कृत्यात सहभागी असलेल्या दोघांची (सगळ्यांची) आधीच संमती घेतली जाणं महत्वाचं आहे," यावर त्यांनी पुन्हा जोर दिला.
"अर्थात पेलिको प्रकरण या सगळ्यांपेक्षा अतिशय वेगळं आणि फारच गंभीर आहे. तो सरळसरळ लैंगिक हिंसाचार आहे. त्यातली आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे ते दोघं बऱ्याच वर्षांपासून पती - पत्नी म्हणून सुखाने सोबत राहत होते. आपली सेक्शुअल फॅन्टसी जोडीदाराच्या संमतीशिवाय प्रत्यक्षात उतरवणं हे आत्ममग्नतेचं आणि मानसिक विकाराचं लक्षण आहे. जोडीदार शुद्धीत नसताना हे सगळं केलं गेलं. म्हणजे इथे महिलेची इच्छा अथवा गरज गृहितच धरली गेली नाही. म्हणजे तुमची फॅन्टसीच अशी होती की ज्यात महिलेच्या लैंगिक आनंदाबाबत तुम्ही विचारच केला नाही. ही फक्त विकृतीच नाही तर गंभीर गुन्हा झाला," असं आपलं परखड मत अल्बर्टिना फिशर यांनी व्यक्त केलं.
पुरूषांच्या बदलत्या लैंगिक इच्छा
लैंगिक इच्छा हा या सेक्शुअल फॅन्टसीमधला सर्वात कळीचा मुद्दा आहे.
सिग्मंड फ्रॉईडनं या विषयावर केलेलं काम अतिशय क्रांतीकारी आणि मूलभूत स्वरूपाचं आहे.
फ्रॉईडच्या प्रभावामुळेच माणसाने त्याच्या लैंगिक इच्छांचं दमन न करता त्यांना मूर्त स्वरूप देऊन या इच्छा भागवण्याचा प्रयत्न करायला हवा, असा विचार समाजमान्य झाला.
इतकंच नव्हे तर 'स्व'चा शोध घेण्यासाठी आधी स्वतःच्या लैंगिक इच्छा आणि लैंगिक कल ओळखून त्यांची पूर्तता कुठलीही आडकाठी न ठेवता केली पाहिजे, असं मांडणारी एक चळवळच 1960 च्या दशकात गाजली होती.
लैंगिकदृष्ट्या मुक्त समाजाचं फ्रॉईडनं पाहिलेल्या स्वप्नाला या चळवळीनं आकार दिला.
पण माणसाच्या विशेषतः पुरुषांच्या लैंगिक इच्छा हा एक मोठा नाजूक विषय आहे.
स्त्रियांवर वर्चस्व गाजवून हिंसा करण्याकडे हा पुरूषी लैंगिकतेचा कल झुकलेला अनेकदा पाहायला मिळतो.
अशा वेळी फ्रॉईडचं तत्वज्ञान प्रमाण मानून अशा इच्छांना पाठबळ द्यावं का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.
पेलिको खटल्यातील अनेक आरोपींना त्यांच्यावर करण्यात आलेला आरोपच मान्य नव्हता. कारण आपण काही चुकीचं केलंय, असं त्यांना वाटतंच नव्हतं.
एकतर जीजेल पेलिको यांची या सगळ्या कृत्यांना संमती आहे, असं समजून ते हे सगळं करत होते. त्यांना हा सगळा प्रकार म्हणजेच मुक्त लैंगिक अभिव्यक्तीचा अविष्कार वाटत होता.
आम्ही फक्त आमच्या लैंगिक इच्छा भागवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यात गैरवाजवी असं काहीच नाही, असं आजही यातल्या अनेक आरोपींचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आपण संभोग करत असलेल्या महिलेला इतरांसोबत वाटून घेण्याची ही पुरुषांमधील लैंगिक इच्छा (फॅन्टसी) संबंधित महिलेची इच्छा आणि गरजेकडे पूर्णपणे कानाडोळा करते.
काही दिवसांपूर्वीच लिली फिलिप्स या ओन्ली फॅन्स मॉडेलनं लोकप्रिय होण्यासाठी एक दिवसात 100 पुरूषांसोबत संभोग केला होता. यावर बरंच वादंग उठलं होतं.
काहींनी तिला मानसिक विकार जडल्याचं म्हणत सहानुभूती दाखवली तर काहींनी तिच्यावर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचं म्हणत सडकून टीका केली.
पण लोकप्रिय होण्यासाठी पॉर्नस्टार जर असे प्रकार करत असतील तर ते पुरुषांमधील चित्रविचित्र लैंगिक इच्छांचंच निर्देशक म्हणावं लागेल.
कारण या ओन्ली फॅन्सच्या मॉडेल्सचे बहुतांश प्रेक्षक हे पुरूषच असतात. लोकप्रिय होण्यासाठी महिला मॉडेल्स असेच प्रकार करतील जे त्यांचे पुरूष दर्शक आवडीने पाहतील.
महिलेकडे एक माणूस म्हणून न बघता फक्त संभोगाची एक वस्तू म्हणून पाहण्याची ही पुरूषांमधील वृत्ती या समस्येचं मूळ आहे.
पुरूषांमधील ही लैंगिक इच्छा महिलेचं स्वतंत्र अस्तित्वच नाकारत तिच्याकडे फक्त उपभोगाची वस्तू / खेळणं म्हणून पाहते.
अर्थात पुरूषांमधील लैंगिक इच्छांना अनेक पदर आहेत. सगळ्याच पुरूषी लैंगिक इच्छा या आक्षेपार्ह नसतात.
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली अथवा सामाजिक नैतिकतेच्या दबावामुळे पारंपारिकदृष्ट्या पुरूष आपल्या लैंगिक इच्छांंना दाबून ठेवत आलेले आहेत.
पण मुक्त लैंगिक अभिव्यक्तीच्या प्रसारामुळे लैंगिक इच्छांवर लावली गेलेली ही पारंपारिक रोख आता हळूहळू हटवली जात आहे.
उलट स्वतःचा शोध घेऊन खऱ्या अर्थानं मुक्त होण्यासाठी लैंगिक इच्छा / आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी पुरस्कार केला जात आहे.
पुरुषांमधील या आक्षेपार्ह लैंगिक इच्छा / आकांक्षा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या मुक्त लैंगिक अभिव्यक्तीच्या नवीन विचारसरणीनं एका वेगळ्याच गंभीर समस्येला जन्म दिला आहे.
ॲन्ड्रू टेटचा प्रभाव
लंडनमधील साऊथ केन्सिंग्टन येथे मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या आंद्रे दे ट्रिचेट यांनी या सगळ्या प्रकरणाचा संबंध ॲन्ड्रू टेट आणि तत्सम इन्फ्ल्यून्सरच्या वाढत्या प्रभावाशी जोडत एकं वेगळं विश्लेषण मांडलं.
ॲन्ड्रू टेट हा उघडपणे स्त्रीद्वेषी इन्फ्ल्यूएन्सर आहे. पुरूषांच्या पुरूषी भावनांना चेतावून महिलांची बदनामी करण्याचं काम तो इंटरनेटवरून करत असतो. असं काम करूनच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे.
एक्सवर त्याचे तब्बल एक कोटींपेक्षा जास्त फोलोवर्स आहेत.
"स्त्रीवादाच्या उदयामुळे पुरूषांमधील अस्वस्थता आणि असुरक्षतेची भावना वाढते आहे. एका बाजूला पारंपरिक पुरूषप्रधान संस्कृती पुरूषांनी कणखर आणि आक्रमक असलं पाहिजे, असं सांगते. तर दुसऱ्या बाजुला स्त्रीवादासारखे नवे विचार पुरूषांनाही बायकांप्रमाणेच भावना असतात. त्यामुळे पुरूषांनी सुद्धा भावनिक होण्यात आणि मनमोकळेपणाने रडण्यात काहीच चुकीचं नाही. उलट ती पुरूषांच्या मानसिक आरोग्यासाठी चांगलीच गोष्ट ठरेल, असं हा स्त्रीवादी विचार सांगतो. या दोन विरोधाभासी विचारसरणीच्या कोलाहालात गोंधळलेले अनेक पुरूष मला भेटतात. या वैचारिक आणि मानसिक गोंधळातूनच स्त्रीवादी विचारसरणीला लक्ष्य करण्याची वृत्ती पुरूषांमध्ये निर्माण होते. असे गोंधळलेले पुरुष मग ॲन्ड्रू टेट सारख्या स्त्रीद्वेषी व्यक्तीमत्वाकडे आकर्षित होतात," असं आंद्रे सांगतात.
आंद्रे दे ट्रिचेट यांच्याकडे उपचारासाठी येणारे 60 टक्के रूग्ण हे पुरूष आहे. यातले बहुतांश जण याच वैचारिक आणि मानसिक गोंधळातून जात असल्याचं त्यांना आढळून आलं.
पारंपरिकरित्या पुरूषांनी महिलांवर सत्ता आणि अधिकार गाजवला पाहिजे, अशी अपेक्षा केली जाते. ॉतसेच संस्कार लहानपणापासून पुरूषांवर केले जातात.
पण मग स्त्रीवादाच्या आगमनामुळे पुरूषांना महिलांवर हवा तितका अधिकार गाजवता येत नाही. त्यातून त्यांना असुरक्षित वाटायला लागतं.
आपल्या पुरूषत्वावरच सवाल उपस्थित झाल्यानं आक्रमक होऊन या पुरूषत्वावर दावा सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड मग तो करू लागतो. त्यातूनच पेलिको प्रकरणासारखे कृत्य घडू शकतात.
पेलिको प्रकरण म्हणजे पुरूषांमधील असुरक्षिततेची भावना किती टोकाला पोहचली आहे, याचंच एक अतिरेकी उदाहरण म्हणावं लागेल.
पारंपरिक मार्गानं पुरूषत्व सिद्ध करता न आल्यानं असे अतिरेकी प्रकार करून स्वतःचं पुरूषत्व सिद्ध करायला हा असुरक्षिततेनं बिथरलेला पुरुष प्रवृत्त होतो.
ऑनलाईन स्त्रीद्वेषी ग्रूप अशा असुरक्षित पुरूषांना हेरून त्यांना आसरा देतात. अशा समूहांमध्ये पुरूषांच्या असुरक्षिततेला गोंजारून त्यांच्यातील नैराश्याला स्त्रीद्वेषाच्या मार्गाने वाट मोकळी करून दिली जाते.
आक्षेपार्ह स्त्रीद्वेषी वृत्तीवर रोख लावण्याऐवजी त्यांना आणखी जास्त प्रोत्साहन देण्याचं काम असे ऑनलाईन ग्रूप करतात.
डॉमिनिक पेलिकोसुद्धा अशाच एका ऑनलाईन ग्रूपचा भाग होता. ॲन्ड्रू टेटचा उदय पुरूषांमधील या वाढत्या असुरक्षिततेचंच प्रतिक आहे," असं विश्लेषण आंद्रे दे ट्रिचेट यांनी मांडलं.

फोटो स्रोत, EPA
पेलिको खटल्याच्या निमित्ताने संभोग करण्याआधी संमतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संभोगासाठी दिली जाणारी संमती नेमकी कशी निर्धारित करावी, याबाबत आता नव्याने चर्चा होत आहे. त्यासाठी विशेष कायदा आखण्याची मागणीही अनेक जण करत आहेत.
पण ही संमती नेमकी कशी आणि कधी ग्राह्य धरावी, हे फारसं स्पष्ट नसल्यानं याचं ठोस उत्तर मात्र कोणाकडेच नाही.
संभोगासाठीची संमती ही किती क्लिष्ट गोष्ट आहे याचा अंदाज 24 वर्षीय डेझीच्या अनुभवावरून येऊ शकतो.
डेझी म्हणते की "तिच्या वयाच्या अनेक महिला आपल्या पुरुष जोडीदाराचं मन राखण्यासाठी स्वतःला आवडत नसलेल्या लैंगिक कृत्यांसाठी संमती देतात. आपल्या जोडीदाराला जर एखाद्या कृत्यातून लैंगिक सुख मिळत असेल तर आपण कशाला आडकाठी घ्या असा विचार करत बऱ्याच महिला अनिच्छेनं या लैंगिक कृती करायला तयार होतात."
आता या अनिच्छेनं दिल्या गेलेल्या होकाराला संमती म्हणावं का? हा प्रश्नच आहे.
एकतर अतिरंजित आणि अवास्तव पॉर्न बघून पुरूषांच्या लैंगिक इच्छा आकाराला येत आहेत. आणि नात्यात पुरूषाचं मन राखण्यासाठी अशा अवाजवी पुरूषी लैंगिक इच्छांची पूर्ती करण्याचं ओझं स्त्रियांवर टाकलं जात आहे.
नात्याच्या किंवा प्रेमाच्या दडपणापोटी अशा अवाजवी लैंगिक कृत्यांसाठी स्त्रिया जर अनिच्छेनं तयार होत असतील तर संमतीकडे फक्त होकार अथवा नकार अशा सोप्या परिभाषेतून पाहणं पुरेसं ठरत नाही.
त्यामुळे यावर आणखी खोलात जाऊन विचार विमर्श केला जाण्याची गरज आहे.
पेलिको खटला आता संपला आहे. आरोपींना शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळालाय. पण या खटल्याच्या निमित्ताने आ वासून उभे राहिलेले काही मूलभूत प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.
या प्रश्नांची उत्तरं शोधणं ही खचितच सोप्पी गोष्ट नाही. पण इतर पीडित स्त्रियांना बोलण्याची हिंमत मिळावी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी जीजेल पेलिको यांनी बदनामी आणि परिणामांची तमा न बाळगता हा लढा लढला.
एरवी अशा घटनेतील पीडित स्वतःची ओळख गोपनीय ठेवायला प्राधान्य देतात. पण जे आपल्यासोबत झालं ते इतरांसोबत होऊ नये या भावनेनं जीजेल पेलिको यांनी स्वतः जगासमोर येत धीरोदात्तपणे या खटल्याचा सामना केला.
त्यांच्या या निर्भीड आणि खंबीर लढ्यामुळे त्या आज जगातील स्त्रीवादी चळवळीची नायिका बनल्या आहेत.
72 वर्षीय जीजेल पेलिको यांचा हा लढा यशस्वी व्हावा यासाठी तरी किमान या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं ही आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











